सुहास जोशी

१५९ दिवसांत २९ हजार किलोमीटर सायकिलग करून जगप्रदक्षिणा पूर्ण करणारी पहिली अशियाई महिला म्हणून विक्रम करणारी २० वर्षांची वेदांगी कुलकर्णी हिची मोहीम साहसी असली तरी तिच्या या प्रवासात जगाच्या कानाकोपऱ्यातील चांगुलपणाचे एक अनोखे दर्शन घडते.

वेदांगी, एकटीच सायकलवरून जगाची प्रदक्षिणा करायला निघाली होती तेव्हाचा हा प्रसंग. स्पेनमध्ये असताना अचानक तिच्या सायकलला एका दुचाकीने थांबवले. दुचाकीवरील एकाने तिला चाकूचा धाक दाखवला, धक्काबुक्की केली. सर्व सामान विस्कटले. तिच्याकडील सर्व पैसे काढून घेतले. ती तेथेच रस्त्याच्या कडेला सायकलसहितच पडली होती. सुदैवाने पासपोर्ट आणि इतर कागदपत्रं व्यवस्थित राहिली होती. फोनदेखील होता. पण परक्या देशात, ना भाषा माहीत ना तिच्या हाती काही संपर्काचं साधन, ना कोणाशी वैयक्तिक ओळख. मानसिक आणि शारीरिक धक्का बसलेला. त्यात पुन्हा सायकलची अवस्था कशी आहे हे तिला माहीतच नव्हते. ती तशीच उठली, सायकल उचलली आणि ढकलत ढकलत काही अंतर गेली. जवळच एक पेट्रोल पंप होता. एव्हाना संध्याकाळ होत आलेली. त्या पंपावरच्या माणसाला तिची अवस्था पाहून काय झाले असावे याची साधारण कल्पना आली. त्याने तिला पाणी दिले. तिच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला आणि लगेच पोलिसांना कळवले. त्याने पेट्रोल पंप बंद केला. जवळच एक पब होता तिकडे तो तिला घेऊन गेला. त्या पबमध्ये एक कुटुंब आले होते. त्यांनादेखील एकूणच तिची अवस्था पाहून अंदाज आला. त्यांनी त्या पबमध्ये तिला एक खोली भाडय़ाने घेऊन तिची राहण्याची व्यवस्था केली. जवळच्याच एका वैद्यकीय केंद्रात तिच्यावर उपचार केले.  झाल्या प्रकाराने वेदांगी प्रचंड थकली होती, काहीशी मानसिक धक्क्यात होती. लगेचच निद्रेच्या अधीन झाली.

सकाळी जाग आली तशी ती धावत सायकलकडे गेली. गेले अनेक दिवस ही सायकलच तिची सोबतीण होती. सायकलची फ्रेम सुस्थितीत होती. तिला हायसं वाटलं. कारण फ्रेमला धक्का लागला असता आणि सायकल बदलावी लागली असती तर तिला हा विश्वविक्रमच करता आला नसता. (विश्वविक्रमाच्या नियमानुसार सायकल बदलता येत नाही.) काल रात्री ज्यांनी तिला येथवर पोहोचवले ते रात्रीच निघून गेले होते. खोलीतल्या एका टेबलवर त्या कुटुंबाने तिच्यासाठी सुंदर संदेश लिहून ठेवला होता.

आता तिला कालचा घटनाक्रम आठवू लागला. आदल्या दिवशी सायंकाळी लूटमारीचा प्रसंग, त्यानंतर तो पेट्रोलपंपावरचा माणूस आणि नंतर ते कुटंब. त्यांची नावंदेखील तिला माहीत नव्हती. ना त्यांना हिची माहिती होती. ती वेदांगी कुलकर्णी आहे आणि सायकलवरून जगप्रदक्षिणा करत आहे याची त्यांना कसलीच माहिती नव्हती. त्यांनी केवळ माणुसकीच्या भावनेने चांगुलपणातून तिला मदत केली होती, इतकंच.

तसा तिला लोकांचा चांगुलपणा नवा नव्हता. ऑस्ट्रेलियापासून सुरुवात करून न्यूझीलंड, कॅनडा, आईसलॅण्ड, फिनलॅण्ड, पोर्तुगाल असे तिचे सायकिलग सुरू असताना अशा अनेक अनोळखी लोकांनी तिला अशीच मदत वेळोवेळी केली होती. वेदांगी सांगते की, तिच्या या सायकिलग मोहिमेच्या सरावादरम्यान भेटलेल्या टकर कुटुंबाने तर तिला हा आत्मविश्वास मिळवून दिला होता की, जगात सगळीच माणसं काही वाईट नसतात. चांगली माणसं आहेत, चांगुलपणा आजही टिकून आहे. अर्थातच या २९ हजार किलोमीटरच्या तिच्या प्रवासासाठी शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस लागणार होता हे नक्कीच. त्यासाठी तिने मेहनत प्रचंड केली होतीच, पण माणसाने माणसाप्रति दाखवलेला चांगुलपणा हा तिच्या संपूर्ण मोहिमेचा कणाच होता.

२०१८ च्या सुरुवातीला मोहिमेच्या बरेच आधी ती लंडन एिडबरा ते लंडन या सायकिलग स्पध्रेत तिला सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे तिने बोर्नमाऊथपासून याच मार्गावर सायकिलग करायचे ठरवले. तेव्हा वाटेवर एका रात्री तिला मुक्कामासाठी काहीच सुविधा नव्हती. वाटेवर असलेल्या टकर कुटुंबीयांच्या घरी ती गेली. त्यांची तिच्याशी कसलीही ओळख नव्हती. पण त्यांच्या गप्पा रंगल्या आणि ती तेथे थांबली. त्यांनी तिला पुढील सायकिलगसाठी काही सामग्री तर दिलीच पण जगप्रदक्षिणेच्या मोहिमेवर निघणार म्हटल्यावर तिला पाचशे पौंडाची घसघशीत आíथक मदतदेखील केली. वेदांगी सांगते की, त्यांच्या या एकूणच पाठिंब्याचे मला आश्चर्य वाटले पण त्याचबरोबर जगात चांगली माणसं असतात याबद्दलचा माझा विश्वास दृढ झाला.

पुढे सायकिलगवरून जगप्रदक्षिणा करताना वेदांगी कॅनडातल्या जवळपास निर्मनुष्य अशा प्रदेशात होती. तिच्या नियोजित मार्गावरच हा प्रदेश होता. किमान पाच दिवस तरी तिला हा भाग पार करण्यासाठी लागणार होते. तशी तिने तयारीदेखील केली होतीच. साधारण दुसऱ्या दिवशी एक गाडी तिला शोधत आली. त्यात दोन तरुण होते. त्यांनी तिच्यासाठी खाण्यापिण्याच्या काही गोष्टी आणल्या होत्या. वेदांगीसाठी हा सुखद धक्काच होता. त्या लोकांना यापूर्वी तिने कधीही पाहिले नव्हते. ना त्यांच्याशी काही संपर्क होता. तिच्या सायकिलग मोहिमेबद्दल त्यांना हस्ते परहस्ते समजले होते. थोडेफार समाजमाध्यमांवरदेखील वाचलं-पाहिलं होतं. पण त्यांची ही भेट काही आधी ठरलेली नव्हती की वेदांगीने अशा काही मदतीची अपेक्षा केली होती. आणि अचानक ते त्या निर्मनुष्य भागात तिला भेटले होते.

वेदांगीच्या सायकलवरून जगप्रदक्षिणेच्या सुरुवातीलाच तिला असाच एक अवलिया भेटला होता. चक्क खराखुरा गँगस्टर. ऑस्ट्रेलियातल्या लाँगेस्ट रोडवर ती त्यादिवशी सायकिलग करत होती. सुरुवातीला तिचा चित्रीकरणाचा चमू आणि आणि वडील तिच्यासोबत होते. पण त्याच रस्त्यावर नंतर ते बरेच पुढे जाऊन थांबले होते. हा गँगस्टर त्या रस्त्याने जात होता तेव्हा ही एकटीच सायकलवर होती. गँगस्टरची गाडी तिच्या बाजूने जात होती. त्याने एकदोन कोकचे कॅन काढून तिच्याकडे टाकले. वेदांगीने राह चलत भेट म्हणून ते घेतले. पण काही क्षणातच त्याने गाडी पुढे लावून तिला थांबवले. तोपर्यंत वेदांगीला माहीत नव्हते की तो कोण आहे आणि त्यालादेखील माहीत नव्हते की ही कोण आहे. बोलणे झाले, वेदांगीच्या सायकिलग मोहिमेबद्दल त्याला कळले. त्यानंतर त्याने सांगितले की, तो गँगस्टर आहे. हा सर्व शे-दोनेशे किमीचा भाग त्याचाच आहे. कुठेही काही मदत लागली तर बिनधास्त फोन कर असे सांगून नंबर तर दिलाच, पण त्याच्या कुटुंबातील लोकांना फोन करून त्यांना वेदांगीशी बोलायला लावले.

खरं तर हे सारंच विचित्र आणि मजेशीर होतं. म्हटलं तर त्यात भीती होती, म्हटलं तर काहीच नाही. त्यात तो गँगस्टर पुन्हा सांगत होता, सगळा एरिया आपलाच आहे, कधीही फोन कर. तसा तो कुकर्मी माणूस, पण त्याच्यातदेखील कुठेतरी चांगुलपणा असावा कदाचित राहिलेला.

पाच-दहा देश ओलांडायचे म्हणजे अर्थातच व्हिसा नामक कायदेशीर कटकटी होत्याच. त्या काही ठिकाणी सुरळीत झाल्या तर काही ठिकाणी भलतीच कटकट होती. पण येथेदेखील चांगुलपणाच तिच्या मदतीस आला. कॅनडातून वेदांगीला युरोपात जायचे होते. त्यासाठी शेन्गेन व्हिसा मिळवणे गरजेचे होते. कॅनडातील युरोपीय देशाच्या दूतावासात ती गेली. तिच्या नियोजित मार्गावरील देश होता पोर्तुगल. पण तेथे नकारघंटा ऐकायला मिळाली. आणि मग पाठोपाठ प्रत्येक युरोपीय देशांच्या दूतावासातून तिला नकारघंटाच ऐकायला लागली. एका दूतावासात तर तिला दरवाज्यातूनच बाहेर जावे लागले. अखेरीस आईस लॅण्डच्या दूतावासात ती गेली. खरं तर आईस लॅण्ड तिच्या मार्गावर नव्हते. पण कसेही करून शेन्गेन व्हिसा मिळवायचा आणि युरोपात जायचे हेच उद्दिष्ट होते. तेथील एका अधिकाऱ्याला इतर युरोपियन देशांच्या दूतावासांनी वेदांगीला व्हिसा नाकारला आहे याची माहिती होती. पण त्याने तिला बोलावले. आणि तिला दोन दिवसांत व्हिसा मिळवून दिला. कोण कुठला तो अधिकारी आणि ही पुण्यातली मुलगी. पण त्या अधिकाऱ्याने तिला केलेली मदत ही मोहीम पूर्ण होण्यासाठी अत्यंत मोलाची होती.

पोर्तुगालला तिला असाच एक अवलिया भेटला. खरंतर तो अवलिया म्हणजे लुई हा तिच्या काही मित्रांना मनाली-लेह मार्गावर सायकिलग करताना एखादं तास भेटला होता. तेवढीच काय ती ओळख. पण त्याने पोर्तुगालला वेदांगीला भरपूर मदत केली.

पुढे व्हिसाचा आणखीन एक अनुभव आला तो रशियन दूतावासांमध्ये. तिने आधी काढून ठेवलेल्या रशियन व्हिसाची मुदत संपली होती. तिला नवीन व्हिसा हवा होता. ठरलेल्या मार्गानुसार तिला रशियात सायकिलग करणे गरजेचे होते. अखेरीस ती फिनलंडच्या रशियन दूतावासात गेली. तेथे तीन तरुण मुली कर्मचारी होत्या. तिच्या सायकिलग मोहिमेबद्दल त्यांना खूपच कौतुक वाटले. जवळपास अर्धा तास तिच्याशी गप्पा मारत होत्या. त्यांनी तिला चार दिवसात व्हिसा मिळेल याची खात्री दिली. तोपर्यंत मिळालेल्या वेळेचा सुदुपयोग करून वेदांगी आर्टिक सर्कलला फिरूनदेखील आली. सरकारी कर्मचाऱ्यांकडून ही अशी उत्स्फूर्त आणि प्रोत्साहन देणारी मदत मिळत होती. त्यांचे विहित काम करण्यापलीकडची ही मदत होती आणि ती चांगुलपणातून केली जात होती.

रशियातला तिचा प्रवासदेखील असाच भन्नाट होता. एकतर थंडी चांगलीच होती. तिच्या संपूर्ण सायकिलग मोहिमेत जेव्हा फिल्म क्रू तिच्याबरोबर असायचा तेव्हाच त्या काही अगदी मोजक्या दिवसांसाठी ती हॉटेलमध्ये राहायची. एरवी रस्त्याच्या कडेला राहायची तिला सवय होती. रशियातदेखील ती अति रहदारीच्या वेळी अशीच रस्त्याकडेला बर्फात गुहा करून राहिली होती. नंतर सायकिलग करताना थंडीने हात गारठून जायचे. मग ती एखादा ट्रक थांबवायची आणि त्याच्या केबिनमध्ये थोडा वेळ बसून हातांना गरम करून घ्यायची. हे ट्रक ड्रायव्हरदेखील तिला अगदी सहज मदत करायचे. कसली तक्रार न करता.

रशियात ती एक दिवसाच्या मुक्कामासाठी एका हॉटेलमध्ये थांबणार होती. त्या हॉटेल कर्मचाऱ्यांना आधी तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण ती तेथे पोहचेपर्यंत एव्हाना तिचा पंचवीस एक हजार किलोमीटरचा प्रवास झाला होता. समाजमाध्यमातील आणि प्रसिद्धी माध्यमातील तिच्या माहितीवरून हॉटेल कर्मचाऱ्यांना कळले की वेदांगी नेमकी कोण आहे. त्या सर्वानी मिळून तिच्या स्वागताची तयारी केली. ती सायकलवरून तेथे पोहचली तेव्हा संपूर्ण हॉटेल तिच्या स्वागतासाठी जमा झाले होते. तिच्यासाठी खास केक तेथील एक प्रसिद्ध ठिकाणाहून मागवला होता. एकूणच ते स्वागत म्हणजे तिच्यासाठी सुखद धक्काच होते. जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात कोणी तरी तिचं इतकं कौतुक करतंय हे तिला सुखावणारं होतं. किंबहुना चांगुलपणावरचा विश्वास वाढवणारे होते.

असे कैक अनुभव होते. न्यूझीलंडमध्ये सन्यदलातील लोकांनी तिला मदत केली होती. तर अन्य कोठे खाण्यापिण्याची सोय केलेली. कोणी शाब्दिक प्रोत्साहन दिलेले. हे सारेच माणुसकीचे अनुभव होते.

१५९ दिवसांत, २९ हजार किलोमीटर इतका भला मोठा प्रवास सायकिलगवरून करणारी पहिली अशियाई महिला असा विक्रम तिने नक्कीच केला. पण त्याहीपेक्षा तिला या सर्व प्रवासात जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला तो खूप महत्त्वाचा होता. धर्म, जात, पंथ, भाषा, वर्ण असल्या कोणत्याही कोत्या वृत्तीच्या भिंती त्यामध्ये नव्हत्या. होती ती केवळ एका माणसाने दुसऱ्या माणसाला केलेली निखळ मदत. तिच्या साहसाइतकाच हा अनुभवदेखील अगदी अस्सल आणि जिवंत होता.