डॉ. उज्ज्वला दळवी

सर्व व्यवहारांच्या नोंदी ब्लॉकचेन या तंत्रज्ञानात गणिती साखळबंदांनी आणि कडय़ाकुलपांनी बांधल्या जातात. त्यामुळे त्या नोंदी अभेद्य- अक्षय होतात. जगाला झपाटून टाकण्याची क्षमता त्या तंत्रज्ञानात आहे.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
chinese company spending huge amount on shameless sales training skills for employees
“तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण
land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?

लाख-दीड लाख वर्षांपूर्वी एका आदिमानवाने पक्षी मारला. दुसऱ्याने रुचकर कंदमुळं उकरून काढली. त्यांनी आपल्याजवळच्या खाऊची अदलाबदल केली आणि मानवी व्यापाराची पहिली सुरुवात झाली. नंतर सोप्या देवाणघेवाणीसाठी कवडय़ा, मणी, धातूचे तुकडे वापरात आले. सुमारे पाच-सहा हजार वर्षांपूर्वी नसíगक काचेचा (obsidian) दूर पल्ल्याचा व्यापार सुरू झाला आणि जड वस्तूंच्या अदलाबदलीची अडचण व्हायला लागली. म्हणून मातीच्या ठिकऱ्यांवरच्या शिक्क्यांच्या हुंडय़ा झाल्या आणि व्यापारात आंतरराष्ट्रीय विश्वासाचा शिरकाव झाला. मग राजेराण्यांचे शिक्के असलेल्या नाण्यांच्या आधारावर मोठमोठय़ा उलाढाली झाल्या. तेराव्या शतकापर्यंत कागदी चलन रूढ झालं. गेल्या काही दशकांत प्लास्टिकची करड, बँकांतून देवाणघेवाण, आंतरजाली खिसे अशी नवनवी अर्थरूपं अवतरली. कधीही प्रत्यक्ष संपर्कात न आलेल्या कुठल्याशा संस्थेवर पूर्ण भरवसा ठेवून अमूर्त व्यवहार करायची सवय लागली.

तसल्या व्यवहारात काही मातबर धनिक-वणिकांना जबरदस्त ठेचा लागल्या. त्रयस्थ संस्थेच्या मध्यस्थीशिवाय, दोन पक्षांमध्ये पूर्ण सुरक्षित व्यवहार होण्याची निकड भासायला लागली. शिवाय त्याच सुमाराला आंतरजालावरच्या व्हिडीयो गेम्सच्या जुगारातून काही जणांना अमाप पसा मिळाला. त्या धनाचे हंडे गुप्त गुहांत लपवायची सोय, अधल्यामधल्या जासुदांना वगळून मोहरांची थली देत्याकडून सरळ घेत्याकडे सुपूर्द होण्याची व्यवस्था हे सारं त्यांना हवं होतं. त्या संगणकी विद्वानांनी १९८३ सालापासूनच भामटय़ांपासून संरक्षण आणि कर बुडवायच्या पळवाटा शोधल्या. सुरुवातीची फसगत, ठेचा यातून पुढे जाताजाता २००९ साल उजाडलं. सातोशी नाकामोटो या जगाला आजतागायत पूर्णपणे अज्ञात असलेल्या माणसाने बिटकॉइन नावाच्या आभासी चलनाचा एक नवाच प्रस्ताव जगापुढे मांडला. गेल्या १० वर्षांत त्या बिटकॉइनने जगात धमाल केली. दिवसेंदिवस त्याची रहस्यकथा अधिकाधिक सुरस आणि चमत्कारिक होत चालली आहे.

पण ती विज्ञानरहस्यकथा आहे. तिचं विज्ञानसूत्र म्हणजेच ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी. ते तंत्रज्ञान सगळ्या व्यवहारांच्या नोंदींना गणिती साखळबंदांनी, कडय़ाकुलपांनी जखडतं. त्यामुळे त्या नोंदी अभेद्य, अक्षय होतात. त्या तंत्रज्ञानाला जगाला झपाटून टाकायची क्षमता आहे. बिटकॉइन हा त्याचा केवळ एक अवतार आहे.

पण ते ब्लॉक चेन म्हणजे आहे तरी काय?

ती संगणकी खातेवहीच असते. महत्त्वाच्या व्यवहारांच्या किंवा घटनांच्या नोंदी करून त्या नोंदींचे  एका-एका मेगाबाइटचे गट केले तर ते होतात नोंदगट ऊर्फ ब्लॉक्स. तशा नोंदगटांची साखळी म्हणजे ब्लॉक चेन.

ती साखळी एकाच वेळी अनेक भागीदारांच्या संगणकांवर नोंदली जाते. ते सगळे संगणक एकमेकांशी जोडलेले असतात. ते भागीदार बहुतेक वेळा निनावी असतात. बिटकॉइनची पहिली साखळी सुरू करणाऱ्याचं सातोशी हे नावही बहुधा अनेक भागीदारांनी मिळून त्या कामापुरतं घेतलेलं एकत्रित टोपणनाव असावं. पण ते सारे अनामिक भागीदार वचनाचे सच्चे असतात. त्या साखळी विषयीचे सगळे कठीण नियम ते सचोटीने पाळतात.

साखळीत नवा नोंदगट जोडायचा अधिकार मिळवण्यासाठी एक अवघड गणिती पण जिंकणं गरजेचं असतं. तो पण जिंकायला मूळ पात्रतेच्याही काही अटी असतात. पण जिंकला की नाही हा निकाल देण्याचेही निकष असतात. तो पण, त्या अटी आणि ते निकषही सगळे भागीदार मिळून ठरवतात. कुठल्याही गटात लहानसासुद्धा फेरफार करायचा की नाही ते एकमतानेच ठरतं.

त्या नोंदी आर्थिक व्यवहाराच्या असतील, जमिनीच्या सातबाराच्या असतील किंवा हॉस्पिटलातल्या रुग्णांचे तपशील असतील. त्या साखळीचं मुख्य वैशिष्टय़ म्हणजे तिच्यातला प्रत्येक नोंदगट त्याच्या मागच्या आणि पुढच्या नोंदगटाशी पक्क्या गणिती गाठींनी गुंफलेला असतो. त्याच्यावर व्यवहाराच्या वेळेची मोहर उमटवलेली असते. एकदा साखळीत गुंफल्या गेल्या की त्या नोंदी कुणालाही बघता येतात पण त्यांची कॉपी करणं किंवा त्यांच्यात कुठलाही बदल करणं शक्य नसतं.

तसं कसं होतं?

प्रत्येक नोंदगट उघडायला एक परवलीचा आकडा (हॅश) असतो. कुठल्याही ब्लॉक चेनमध्ये त्या हॅशची वैशिष्टय़ं सर्वानुमते ठरवलेली असतात. कधी तो सात शेपटय़ांच्या उंदरासारखा सात शून्यांनी सुरू होणारा चौसष्ट तुकडी (अंक, अक्षरं आणि चिन्हं) आकडा असतो तर कधी ते मारुतीचं, बिनशून्यांचं २५६ तुकडी शेपूट असतं. (हे हॅश नेमके कसे असतात ते समजून घेण्यासाठी नमस्ते व नमस्कार ही हॅश चौकट दिली आहे.)

तो हॅश अत्यंत किचकट संगणकी गणिताच्या करामतीने उत्पन्न होतो. ब्लॉक चेनच्या लोकशाही तत्त्वानुसार तो हॅश बनवायला सगळ्या भागीदारांच्या अनुमतीने एक गणिती फलनसूत्र (mathematical function) ठरवलेलं असतं.

त्या गणितात त्या नोंदगटातल्या सगळ्या नोंदी आणि आधीच्या गटाचा (सात शून्यं-चौसष्ट तुकडे) परवलीचा आकडा यांना गोवून घ्यावंच लागतं. आणि ते ठरवलेलं, सर्वसंमत फलनसूत्र वापरून त्या गणिताचं उत्तर पुन्हा सात शून्यांचं शेपूटवालं, चौसष्ट तुकडीच असावं लागतं.

ते सहजासहजी घडणं अशक्यच असतं. मग तसा अवघड पण जिंकायला त्या गणितात इतर काही आकडे भरीला घालावे लागतात. त्यांना नॉन्स (nonce) असा शब्द आहे.

अगदी बाळबोध उदाहरण द्यायचं तर

[(७ + १३) ७ ५ + (५+७)/३] = १५१

ह्य़ा व्यावहारिक नोंदी आहेत,

४७ हा आधीच्या गटाचा परवलीचा शब्द आहे आणि उत्तर ९७ यायला हवं.

म्हणजे नोंदी आणि परवलीचा शब्द यांची नुसती बेरीज केली तरी

१५१+/- क्ष = ९७ असं समीकरण येतं.

हे उदाहरणच सोप्पं असल्यामुळे १५१ – ९७ = क्ष = नॉन्स असं उत्तर सहज काढता येतं.

पण खऱ्या ब्लॉक चेनच्या गणितांत भल्याथोरल्या अविभाज्य संख्या (prime numbers), वर्ग, घन, ज्या (साइन), कोज्या (को-साइन) अडनडी गणिती फलने असा सगळा संगणकी गुंता असतो.

त्यामुळे त्या गाळलेल्या ‘क्ष’ची किंमत शोधायला अतिशय प्रगत गणित आणि जबरदस्त संगणकी क्षमता पणाला लावावी लागते. तरीही ती किंमत पहिल्या फटक्यात मिळत नाही. ती मिळेपर्यंत वेगवेगळ्या आकडय़ांशी झुंजत पुन्हा पुन्हा गणित करत राहावं लागतं. तो शोध हा नुसता मानवी खटाटोप नसतो. योग्य आकडा मिळेतोवर भव्य ज्ञानयज्ञ चालतो. दांडग्या संगणकांची प्रचंड कुवत पणाला लावली जाते, अहोरात्र विजेचा होम होतो. एक बिटकॉइन खणून काढायला जेवढी वीज लागते तेवढय़ात ३६ हजार किटल्या भरून पाणी उकळेल. शक्तिशाली संगणक अक्षरश अगणित वेळा ते गणित करून सरतेशेवटी सुयोग्य आकडा मिळवतात. तरीही त्याला मान्यता देणारे संगणक तो आकडा पुन्हा कसाला लावून तावूनसुलाखून घेतात. तो आकडा सापडणं हे एखाद्या बडय़ा लॉटरीचं तिकीट लागण्याहून हजारो पट अधिक कठीण असतं.

ते अविश्रांत खडतर काम पाहून पाश्चात्त्य मनांना अमेरिकेतल्या सोन्याच्या खाणींची, तिथे अनेकांनी केलेल्या मानमोडय़ा कष्टांची आणि त्या प्रचंड उलाढालींची म्हणजेच गोल्ड रशची आठवण झाली. म्हणून ते नॉन्स आकडे आणि तो सात शून्यांचं शेपूटवाला परवलीचा शब्द शोधण्याच्या त्या कष्टाच्या कामाला त्यांनी उत्खनन (mining) म्हटलं.

तेवढं काम करून तो आकडा सिद्ध केला की त्याला प्रूफ ऑफ वर्क म्हणतात. त्याचा मोबदला म्हणून त्या कामकऱ्याला ऊर्फ मायनरला (miner) बिटकॉइनसारखं एक चलनी टोकन मिळतं आणि तो नोंदगट साखळीत ओवायचा मानही मिळतो. आधीपासून मिळालेली तशी टोकन्स तारण किंवा डिपॉझिट (proof of stake) म्हणून ठेवली किंवा सर्वसामान्य चलनाच्या रूपात काही डिपॉझिट ठेवलं तरी पुढचा गट ओवता येतो. किंवा सर्वसामान्य चलनाच्या बदल्यात ब्लॉक चेनचं टोकन घेता येतं. त्याशिवाय एक निकराचा पर्याय ब्लॉक चेनच्या भागीदारांना फक्त एकदाच वापरता येतो. तो म्हणजे सगळ्या पुराव्यांनिशी आपली ओळख जाहीर करण्याचा (proof of authority). आपली ओळख तशी जाहीर केली आणि बाकीचे सगळे भागीदार नामानिराळे असले की कुठलाही घोटाळा आपल्यावरच शेकण्याचा मोठा धोका असतो. म्हणून बहुतेक भागीदार अगदी नाइलाज झाला तरच तो मार्ग चोखाळतात.

बिटकॉइनच्या साखळीत तसा नोंदगट ओवायचा मान मिळाला की त्या भागीदाराच्या संगणकी खिशात (wallet) आभासी चलनाचं टोकन जमा होतं. त्या व्यवहारावर त्या वेळेची मोहरही तात्काळ उमटवली जाते. त्या नोंदगटातली उलाढाल जेवढी मोठी तेवढं चलन अधिक मिळतं. तसं आभासी चलन खिशात ठेवायला, तिथून काढायला, ते चलन रुपयांत-डॉलरमध्ये बदलायला खास बँका, एटीएम वगरे सुविधा असतात. फक्त मध्यवर्ती तारणव्यवस्थेचं पाठबळ नसल्यामुळे बिटकॉइनची किंमत रुपयासारखी ठरावीक न राहता कांद्या-बटाटय़ासारखी अस्थिर असते.

ब्लॉक चेनमधल्या त्या सगळ्या नोंदी आणि वॉलेट्स जगासमोर उघडच मांडलेली असतात. ती कुणालाही बघता येतात. पण त्याची कॉपी करणं शक्य नसतं. शिवाय एखाद्या भागीदारालासुद्धा त्या नोंदीत अगदी एका स्वल्पविरामाचादेखील फेरफार करता येत नाही. कुठल्याही गटातला तपशील बदलला, अगदी एक आकडा, स्वल्पविराम किंवा अनुस्वार जरी इकडचा तिकडे केला तरी त्या गटानंतरच परवलीच्या सात शून्यवाल्या चौसष्ट तुकडी शब्दाचं गणित चुकतं आणि मग पुढच्या सगळ्या गटांचे परवलीचे शब्द बाद होतात.

कधी काही योग्य आणि अपरिहार्य फेरफार करायचा असला तरी त्यासाठी तो गट आणि तिथून पुढचे सगळे गट, सगळ्यांचे परवलीचे आकडे, भरीला घालायचे नॉन्स आकडे असं सगळंच बदलावं लागतं आणि त्यासाठी सगळ्या भागीदारांच्या संगणकांकडून मंजुरी मिळवावी लागते.

एकूण काय, ब्लॉक चेन ही अलीबाबाच्या गुहांची मालिका असते. आतला खजिना नुसता बघायला ‘तिळा उघड,’ म्हणणं सोपं आहे. पण तिथली एक सोन्याची मोहर जरी इकडची तिकडे झाली तरी पुढच्या गुहेच्या परवलीच्या ‘जवा उघड’चं ‘तांदळा उघड’ होतं आणि पुढची गुहा उघडत नाही.

तरीही कुणी इरेला पडून काही तरी बदलायचं ठरवलंच आणि पुढच्या सगळ्या साखळीसाठी डोकेफोड, संगणकतोड करून सगळे नवे परवलीचे शब्द बनवले तरी ते सारे फेरफार फक्त त्याच्या आणि फार तर त्याच्या काही दोस्तांच्या संगणकांवर होतील. बाकीच्या अनेक भागीदार संगणकांवर जुन्याच नोंदी असतील. जुन्या सगळ्या नोंदी रद्दबातल ठरवायला बहुमत हवं. म्हणजे शंभरातले कमीत कमी एक्कावन्न संगणक बंडखोराच्या दोस्तांचे असायला हवेत.

बिटकॉइनसारख्या साखळ्यांत लाखो नोंदगट ओवलेले असतात. तेवढय़ा सगळ्यांत नवे बदल करणं बाहुबली संगणकांनाही अशक्यप्राय आहे. आणि तेवढंही जमलंच तरी लढाई संपत नाही. मूळच्या साखळ्या लाखो भागीदारांच्या संगणकांवर जतन केलेल्या असतात. पारदर्शक, लोकशाही तत्त्वामुळे प्रत्येक भागीदाराला खऱ्या साखळ्या ओळखायचा अधिकार असतो. त्यामुळे लबाडी पटकन उघडकीला येते आणि शरणागती पत्करावीच लागते. त्यामुळे तसे घोटाळे फक्त नवखुऱ्या, लहान ब्लॉक चेन्समध्ये होणं शक्य असतं.

आणखी एक मेख आहे. ब्लॉक चेनमधल्या सगळ्या नोंदींसाठी एक सार्वजनिक किल्ली असते. ती कुणालाही अर्ज करून मिळू शकते. त्या किल्लीने नोंदगट उघडून बघता येतात. ते म्युझियममधल्या काचेआडच्या वस्तूंसारखे नजरेला दिसले तरी हाताशी येत नाहीत. पण कुणी फेरफार केले, हॅश बदलला तर त्या दर्दी प्रेक्षकांच्या सरावलेल्या नजरांना ते कळेल. मोजक्या संगणकांवरच्या वेगळ्या नोंदी तांदळातल्या खडय़ांसारख्या नजरेला टोचतील. चोर पकडले जातील.

संगणकी गणिताच्या भक्कम सुरक्षाकवचामुळे नोंदगटांची तशी साखळी पारदर्शक आणि तरीही अक्षय, अभेद्य बनते. त्यात नोंदलेल्या कुठल्याही व्यवहारात लाचलुचपत, वशिला, वरिष्ठांचा दबाव वगरे कसल्याही कारणाने काहीही फेरफार होऊ शकत नाही. अन्यायाने कुठलाही पुरावा नष्ट होत नाही. एका नोंदगटाच्या पुढे दुसरा नोंदगट जोडला गेला की पहिल्या गटाला परवलीच्या शब्दाचं म्हणजेच हॅशचं कडीकुलूप लागतं. त्याच्यावर मुहूर्ताची मोहर उमटते. असे जितके अधिक नोंदगट त्या पहिल्या गटाच्या पुढे जोडले जातील तितका तो अधिक सुरक्षित होत जातो. त्याला कन्फर्मेशन (confirmation) म्हणतात.

इतका सगळा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे ब्लॉक चेनच्या उलाढालींना कुठल्याही मध्यवर्ती शासनाची गरज नसते. कडक नियम पाळणारा प्रत्येक जागरूक भागीदार हा प्रशासकाचं काम करतो. त्यामुळे अधिकाराचं विकेंद्रीकरण होतं. दोन भागीदारांमध्ये होणाऱ्या त्या व्यवहाराला वेगळा खर्च लागत नाही आणि त्याला दोन बँकांमधल्या व्यवहाराहून वेळही कमी लागतो. एक मध्यवर्ती केंद्र नसल्यामुळे हॅकर्सना एका ठिकाणी हल्ला करून डल्ला मारता येत नाही.

काही नोंदसाखळ्यात सगळ्या भागीदारांना समान हक्क असतात. बिटकॉइन हे त्या लोकशाहीचं प्रचलित उदाहरण आहे. नियम पाळले तर त्यात कुणालाही शिरकाव करून घेता येतो आणि मतदानाचा अधिकार सर्वाना सारखाच असतो. तशा साखळ्यांत पारदर्शकता अधिक असते.

त्याउलट काही साखळ्यांमध्ये शिरकाव करून घ्यायला खास परवानगी घ्यावी लागते. त्यांच्यातल्या काही भागीदार संगणकांना ती परवानगी देण्याचे किंवा नाकारण्याचे खास अधिकार असतात. त्या साखळ्या सुरक्षित असल्या तरी पूर्णपणे पारदर्शक नसतात. त्या अंतर्गत खासगी उद्योगधंद्यांसाठी कामाच्या असतात.

ज्या संस्थांत मोठय़ा प्रमाणात व्यावहारिक उलाढाली होत असतात तिथे व्यवहाराचा वेग वाढवायला नव्या युक्त्या योजल्या जातात.

काही साखळ्यांमध्ये प्रत्येक बारीकसारीक व्यवहार नोंदगटात बंदिस्त केला जात नाही. एका ठरावीक टप्प्यापर्यंतचे किंवा एका दिवसाचे सगळे व्यवहार पूर्ण करून एकूण ताळाच नोंदला तर सुरक्षित नोंदही होते आणि व्यवहारही वेगाने होतात. या व्यवस्थेला लाइटनिंग नेटवर्क (Lightening Network) म्हणतात.

दुसराही एक मार्ग आहे. त्यात छोटय़ाछोटय़ा देवाणघेवाणींच्या नोंदसाखळ्या वेगळ्या असतात. त्या व्यवहारांचा एखादा मोठा टप्पा पूर्ण झाला की त्यानंतर त्याचा ताळा वेगळ्या मुख्य नोंदसाखळीत नोंदला जातो. त्या पद्धतीने नोंदींचा ट्रॅफिक जॅम टळतो आणि कामाचा वेगही वाढतो. याला शाìडग असं नाव आहे. पण तशा अनेक उपसाखळ्या झाल्या तरी सगळ्यात लांब असलेली नोंदसाखळीच मुख्य मानली जाते.

सध्या ब्लॉक चेन तंत्रज्ञान मुख्यत्वे बिटकॉइनसारख्या आभासी चलनांकरता वापरलं जातं. पण त्या तंत्रज्ञानाला खऱ्या जगातही अनेक क्षेत्रांत वाव आहे. त्याची पारदर्शक आणि सुरक्षित व्यवस्था मोठय़ा भांडवलदारी संस्थांना, सरकारांना किंवा रुग्णालयांना फारच उपयोगाची होऊ शकते. तिथे धनाढय़ता आणि संगणकी बळ यांचा दिमाख दाखवायचा नसतो. त्यामुळे परवलीचे शब्द बिनशेपटीचे आणि लहान असतात. तरी उत्खनन करावं लागतंच. पण त्यात संगणकी शक्ती, मानवी कष्ट आणि वीज यांची उधळपट्टी नसते.

आठ वर्षांपूर्वी जर्मनीत अन्नविषबाधेची मोठी दुर्घटना झाली. सहाशे लोकांना एका घातक जंतूची लागण झाली, सहा माणसं दगावली. ते जंतू जर्मनीत आणल्याचं खापर स्पेनच्या काकडय़ांच्या माथी फोडलं गेलं आणि मग ते जंतू इजिप्तहून आलेल्या मोडावलेल्या धान्यातून आल्याचं निष्पन्न झालं. जर ते दोन्ही खाद्यपदार्थ कुठून निघाले, कुठे पोचले, कुणी खाल्ले याच्या तारीखवार रीतसर पक्क्या नोंदी आधीच झाल्या असत्या तर जंतूंचा माग लवकर काढता आला असता, साथ लवकर आटोक्यात आली असती आणि बरंच नुकसान टळलं असतं. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाने ते अन्न शेतमळ्यावरून निघालं, वातानुकूलित गाडीत भरलं, गोदामात पोचलं, आगगाडीने पुढे निघालं, बाजारात पोचलं, वगरे सगळ्या नोंदी तारीख, वेळ, स्थळ वगरे सगळ्या महत्त्वाच्या मुद्दय़ांसह तत्काळ मिळाल्या असत्या. आता वॉलमार्टसारख्या मातब्बर संस्थाही आयबीएमबरोबर ते नवं तंत्रज्ञान राबवणार आहेत. मग पदार्थाच्या प्रत्येक पुडय़ाचा, पिशवीचा उगमापासूनचा इतिहास सहज बघता येईल. अन्नविषबाधा, भ्रष्टाचार, निष्काळजीपणामुळे होणारी नासाडी या साऱ्याला आळा घालता येईल.

हिऱ्यांचा इतिहासही आता असाच खाणीपासून दागिन्यापर्यंत आणि विद्यमान मालकापर्यंत इत्थंभूत नोंदला जाईल.

मध्यंतरी आधार कार्डावरून मोठा गदारोळ माजला होता. बँक अकाऊंटपासून सगळी माहिती आधार कार्डाला जोडली तर तेवढय़ा एका कार्डावरून भामटय़ांना आपली सगळी माहिती मिळेल आणि तिचा डेटा बँकांतर्फे भलताच गरवापर होईल अशी लोकांना भीती वाटत होती. पण तीच माहिती जर ब्लॉक चेनमध्ये जतन केली तर त्या डेटय़ावरचा मालकीहक्क शिक्कामोर्तबासह नोंदला जाईल आणि दुसऱ्या कुणी त्याचा परस्पर वापर केला तर लगेच कायदेशीर कारवाई करता येईल. इतकंच नव्हे तर त्या नोंदगटांचा काही भाग कूटशब्दांच्या आड दडवून अपारदर्शक करता येईल. तीच गत बौद्धिक संपत्तीची. मराठीतल्या सुंदर कवितांची चिनी भाषांतरं झाली तर त्यावर कुणाचाच वचक नसतो. मूळ कवीला त्यातून काहीही फायदा होत नाही. ब्लॉक चेनमध्ये कविता गोवल्या की त्यांना कॉपीराइटहून अधिक संरक्षण मिळतं. मोठय़ा चित्रकारांच्या कलाकृतींचे तपशील आणि हक्क ब्लॉक चेनमध्ये गुंफून त्यांची अनेक लहानलहान टोकन्स केली तर अनेक मध्यमवर्गीयांना त्यांच्यात गुंतवणूक करता येईल. ती धनाढय़ांची मिरास राहणार नाही. त्या अनेक व्यवहारांतून त्या चित्राची काळजी घ्यायला लागणारी रक्कमही राखून ठेवता येईल.

हॉस्पिटलांमधल्या रुग्णांच्या प्रकृतीसंबंधीच्या, उपचारांच्या नोंदी तशाच कूटगणिती ब्लॉक-साखळ्यांत, वेळेचं शिक्कामोर्तब करून बंदिस्त केल्या की भविष्यात कधीही गरजेला त्यांचा संदर्भ घेता येईल. शिवाय कुठल्याही संशोधनासाठी त्या नोंदी वापरायच्या झाल्या तर त्याबद्दल योग्य मोबदला मागायचा रुग्णाला हक्क राहील.

निवडणुकांच्या वेळी तर या तंत्राची फारच मदत होईल. मतमोजणीच्या यंत्राने ठरावीक मतांचा पुंजका सरळ ब्लॉक चेनमध्येच घालून कुलूपबंद केला की नंतरचा सगळा गोंधळ टळेल.

आयबीएम, बीएनपी परिबास, अमेरिकन एक्स्प्रेस, डॉइश बोर्स वगरे शंभराहून अधिक मातब्बर भांडवलदारी संस्थांनी एकत्र येऊन आपल्या नोंदगटांची एक सामायिक साखळी बनवली आहे. तिच्या जगड्व्याळ पसाऱ्याला ‘हायपरलेजर’ असा शब्द वापरला जातो. त्या महा-खातेवहीतल्या ‘अ-क्षर’ नोंदींवरून कुठलाही व्यवहार केव्हाही बघता येईल, भ्रष्टाचार, अफरातफर, चुकीचे निर्णय वगरे सगळ्या पापांची उगमस्थानं अचूकपणे हुडकता येतील आणि म्हणूनच, प्रत्येक जण झक मारत पापभीरू होईल.

भारतात बिटकॉइन बेकायदेशीर ठरवलं आहे. पण इतर बँका, भांडवलदारी संस्था वगरेंच्या मदतीने स्वत:चंच एक नवं डिजिटल चलन आणायचा रिझव्‍‌र्ह बँकेचा मनसुबा आहे.

सहारा वाळवंटाच्या दक्षिणेला अनेक छोटेछोटे देश आहेत. त्यांच्यात आपसात अनेक व्यवहार चालतात. प्रत्येक देशाचं चलन वेगळं. बँकांतून पसे द्यावे तर त्यांची पद्धत कटकटीची, वेळखाऊ. व्यवहार करणार कसा? तिथे नोंदसाखळ्यांच्या मदतीने बिटपेसा (BitPesa) हे सर्वमान्य डिजिटल चलन लोकप्रिय झालं आहे. मास्टरकार्ड ही क्रेडिट कार्डाची कंपनी, मस्र्क ही सागरी व्यापारसंस्था, काही प्रथितयश विमाकंपन्या वगरे बडय़ा संस्थांनी ब्लॉक चेनचा मार्ग चोखाळायचं ठरवलं आहे.

ते तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्यांची यादी फार मोठी नाही. पण मास्टरकार्ड आणि मस्र्कसारख्या मातब्बर संस्थांना त्यांच्या समस्यांवर तोडगा म्हणून ते तंत्रज्ञान वापरायचं आहे यातच सारं काही आलं. त्या तंत्राचा एका पद्धतीचा वापर सगळ्या समस्या सोडवू शकणारही नाही. पण संगणकतज्ज्ञ त्यातून नवनवे मार्ग काढतील. आभासी गुप्तधन संगणकी गुहांत दडवायला, धनदांडग्यांचा शौक म्हणून जन्मलेलं ते गुणी तंत्रज्ञान सर्वसामान्यांचं, खऱ्या आयुष्यातलं रोजचं जगणं सुकर करायला मुकाटय़ाने काम करत राहील.