26 May 2020

News Flash

सात ‘स’कारांवर भर

सगळा कारभार फक्त पोस्टाने चालायचा अशा काळात खरोखरच प्रचंड व्हायरल झालेल्या माणसाची अद्भुत कथा-

अमीन सायानी

अमीन सायानी

आरजे म्हणून, निवेदक म्हणून काम करणाऱ्यांना ताबडतोब लोक ओळखायला लागतात.  पटकन कोणतीही गोष्ट व्हायरल होण्याच्या आजकालच्या जमान्यात ते अगदी साहजिकच आहे. पण सगळा कारभार फक्त पोस्टाने चालायचा अशा काळात खरोखरच प्रचंड व्हायरल झालेल्या माणसाची अद्भुत कथा-

मी मुंबईत, वेगवेगळ्या भाषा बोलल्या जाणाऱ्या कुटुंबात जन्माला आलो. मुंबईत बोलली जाणारी हिंदी म्हणजे हिंदुस्तानी भाषेची खिचडी होती. माझ्या हिंदीमध्ये अधेमध्ये इंग्रजीही डोकावायची. माझं शिक्षण न्यू एरा स्कूल या गुजराती माध्यमाच्या शाळेत झालं. पिनाकिन त्रिवेदी हे आमचे शिक्षक रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन विद्यापीठात शिकले होते. ते बंगाली रवींद्र संगीताचे जाणकार होते. त्यांच्याकडून मी अनेक बंगाली गाणीही शिकलो. शाळेच्या कार्यक्रमात मी ती गाणी चांगल्या पद्धतीने गायचोदेखील. मी तीन ते चार वर्षे शास्त्रीय संगीतदेखील शिकलो. शाहब साब मुन्शीजींनी आम्हाला हिंदुस्तानी आणि नंतर पर्शियन शिकवलं. साध्यासरळ, सुंदर हिंदुस्तानी भाषेकडे जाणारी आणखी एक सुंदर वाट माझ्यासमोर त्याच काळात आकस्मिकपणे उभी राहिली. ती वाट होती, माझ्या आईने सुरू केलेल्या ‘रेहबार’ या पाक्षिकाची. १९३० तसंच ४० च्या दशकात माझ्या आईचं म्हणजे कुलसुम सायानीचं समाजकार्य जोरात सुरू होतं. वंचित स्त्रियांची साक्षरता आणि शिक्षण या क्षेत्रात तिचं काम चालत असे. तिचं काम ती इतक्या जोमाने करत असे की त्याची चर्चा थेट महात्मा गांधींच्या कानावर गेली. १९४० मध्ये त्यांनी तिला बोलावून सांगितलं की बेटा कुलसुम, साध्यासोप्या हिंदुस्तानी भाषेच्या प्रसारासाठी तू एक पाक्षिक काढ. संस्कृतप्रचूर, लोकांना न कळणाऱ्या हिंदीपेक्षा ही साधीसोपी हिंदी भाषा उद्या देशाची राष्ट्रीय भाषा व्हावी असं मला वाटतं. मग माझ्या आईने ‘रेहबार’ नावाचं पाक्षिक प्रसिद्ध करायला सुरुवात केली. रेहबारचा अर्थ आहे गाइड, मार्गदर्शक. ते पाक्षिक देवनागरी (हिंदी आणि मराठी भाषकांसाठी), गुजराती आणि उर्दू या तीन लिपींमध्ये प्रसिद्ध होत असे. लिपी वेगवेगळी असली तरी त्यांची भाषा साधीसोपी हिंदुस्तानी होती. काही मोठे हिंदी तसंच उर्दू लेखक आम्हाला संपादनाच्या कामात मदत करत.

मी तिथे हरकाम्या होतो. रजिस्टरमध्ये नोंदी करणं, अंकाचं फोल्डिंग, त्यावर पत्ते घालणं, पोस्टाने पाठवायच्या अंकांवर स्टॅम्प लावणं ही सगळी कामं मी करायचो. पण या सगळ्यापेक्षा मला जास्त रस असायचा तो त्यात असलेल्या एकापेक्षा एक सुंदर लेखांमध्ये. ते सगळे लेख मी वाचून काढायचो. मी ‘रेहबार’च्या अंकांमध्ये लहान लहान लेख लिहायलाही सुरुवात केली होती.

माझी लेखणी हिंदुस्तानी भाषा लिहिण्याच्या बाबतीत बहरायला लागली असली तरी ती भाषा बोलण्याच्या बाबतीत माझी जीभ मात्र कच्चीच राहिली होती. ही अडचण अर्थातच इंग्रजी बोलण्याच्या बाबतीत तेव्हा मला नव्हती. वयाच्या १३व्या वर्षांपर्यंत मी इंग्रजी भाषेतला उत्तम निवेदक झालो होतो. त्याचं श्रेय अर्थातच माझ्याहून सहा वर्षांनी मोठय़ा असलेल्या माझ्या भावाला हमीद सायानीला जातं. तो मुंबईतल्या तेव्हाच्या ऑल इंडिया रेडिओच्या इंग्रजी कार्यक्रमांमधला सेवेतला तरुण धडाडीचा निवेदक व्हायला सुरुवात झाली होती. मी तेव्हा जेमतेम आठ वर्षांचा होतो. तो मला त्याच्याबरोबर रेडिओ केंद्रावर घेऊन जात असे. मायक्रोफोनची माझी भीती घालवणं, माझा आवाज सुधारणं यासाठी तो तेव्हा प्रयत्न करत असे. त्यामुळे मी लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. त्यातून शिकत शिकत मी नभोनाटय़ांमध्ये, रेडिओवरच्या चर्चामध्ये भाग घ्यायला लागलो. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं निवेदन करायला लागलो.

१९८५ मध्ये माझ्या शैक्षणिक आयुष्यात असा एक प्रसंग घडला ज्यामुळे मी हिंदुस्तानी भाषेच्या अधिक जवळ गेलो. आजारपणामुळे मला मुंबईतल्या शाळेमधून मध्य प्रदेशात ग्वाल्हेरमधल्या प्रसिद्ध सिंदिया स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. माझी तिथे वसतिगृहात राहण्याची सोय करण्यात आली. दीडेक र्वष मला कोणत्याही खेळात भाग घेऊ देऊ नये अशी माझ्या पालकांनी शाळेला विनंती केली होती. खेळात भाग घेता येत नव्हता म्हणून मी नाटक, वक्तृत्व स्पर्धा यात भाग घ्यायला सुरुवात केली. ते सगळं अर्थातच इंग्रजीत होतं. ग्वाल्हेर हे मध्य भारतातलं शहर होतं, त्यामुळे माझी हिंदूुस्तानी भाषाही बरीच सुधारली.  सिंदिया स्कूल ही राष्ट्रीय शाळा होती, या शाळेतले विद्यार्थीही स्वातंत्र्याच्या चळवळीच्या प्रेरणेने भारले गेले होते.

पुन्हा सिनेसंगीत

स्वातंत्र्यचळवळीतल्या दिवसांची गोष्ट. माझी शाळा गवालिया टँकजवळ होती. आमच्या घरासमोर एक पारशी कुटुंब राहत असे. अरुणा असफअली आणि अच्युत पटवर्धन हे दोन नेते भूमिगत होत तेव्हा त्या पारसी कुटुंबात रहायला येत. त्यांच्या घरी हे पाहुणे राहायला आले आहेत हे बाहेर कुठेही बोलायचं नाही असं आम्हा मुलांना बजावून सांगितलेलं असायचं. तिथे राहत असताना ते दोघेही अधूनमधून जेवायला आमच्या घरीही येत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेडिओ सिलोनवर गीतमाला हा माझा कार्यक्रम लोकप्रिय झाला त्या काळात एकदा अरुणा असफअली आमच्या घरी जेवायला आल्या होत्या. त्यांनी मला बाजूला घेतलं आणि म्हणाल्या, ‘अमीन तुला लाज नाही वाटत?, एवढं ऑल इंडिया रेडिओ असताना तू रेडिओ सिलोनवर कार्यक्रम का करतोस?’, मग मी त्यांना सांगितलं की, आपल्याकडे रेडिओवर व्यावसायिक कार्यक्रम केले जात नाहीत. केसकरांना फिल्मी गाणी रेडिओवर वाजवली जायला नको आहेत. त्यावर अरुणाजी म्हणाल्या की, तू मला एक नोट लिहून दे, मी ती नेहरूंपर्यंत संसदेत पोहचवीन. त्यांनी माझी नोट पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपर्यंत पोहोचवली. मग रेडिओवर व्यावसायिक कार्यक्रम असायला हवेत ही संसदेत चर्चा झाली आणि आकाशवाणीवर पुन्हा सिनेसंगीत वाजू लागलं.

कुटुंबाचा वारसा

माझं आडनाव सगळीकडे सयानी असं लिहिलं जातं. ते खरं तर सायानी असं आहे. खरं तर तेही आमचं मूळ आडनाव नाही. आमचं मूळ आडनाव सज्जन. माझे पूर्वज हिंदू होते. पण नंतर नेमक्या कोणत्या कारणामुळे माहीत नाही, मुस्लीम धर्म स्वीकारण्यात आला. त्यात माझ्या आजोबांचं नाव होतं, सायाजी. या सायाजींचं नंतर सायानी झालं. माझं सगळं कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होतं. गांधीजींशी आमचा निकटचा संबंध होता. माझे वडील शिक्षणाबाबत खूप आग्रही असत. लहानपणी लंडन, मग मुंबई, ग्वाल्हेर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांमध्ये माझं शिक्षण झालं. त्यामुळे मला इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, मराठी अशा भाषा येतात. शाळेत असताना माझा वेलिंगकर नावाचा मित्र होता. त्याच्या घरी गणेशचतुर्थीला, संक्रांतीला मी हमखास जायचो. गणपतीची आरती, संक्रांतीचा ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ हे मला आवडायचं. ‘नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू’ हे ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं, गोविंद कुरवाळीकर यांनी गायलेलं मराठी गाणं मला फार आवडायचं.

मुंबई तेव्हाची आणि आताची

माझ्या लहानपणी मुंबईत ब्रिटिशांचं राज्य होतं. पण तेव्हाची मुंबईही वेगळी होती. लहान लहान इमारती होत्या. आजची मुंबई खूप गजबजलेली झाली आहे. खूप ट्रॅफिक आहे, गर्दी आहे. गडबड गोंधळ आहे. पाण्याची, जागेची अडचण आहे. तेव्हा हे काहीही नव्हतं. खरं तर मुंबईतच नाही तर आपल्या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात आज मोठा गोंधळ आहे. रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये त्याचं प्रतिबिंब बघायला मिळतं.

(संपूर्ण लेखासाठी वाचा लोकप्रभा दिवाळी २०१९ चा अंक. बाजारात सर्वत्र उपलब्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 4:38 pm

Web Title: lokprabha diwali issue 2019 ameen sayani
Next Stories
1 शताब्दी ‘आर्ट डेको’ची
2 बहोत हार्ड है बन्टाय!
3 ज्वालामुखीच्या प्रदेशात
Just Now!
X