26 May 2020

News Flash

शताब्दी ‘आर्ट डेको’ची

शतकभरापूर्वी काही कलावंतांच्या बंडामधून उभ्या राहिलेल्या ‘आर्ट डेको’च्या चळवळीला आता फायबर तसंच ग्राफीनच्या युगात नवा साज चढण्याची शक्यता आहे.

‘आर्ट डेको’च्या या ट्रेण्डला आता नव्याने सुरुवात झाली आहे.

विनायक परब

शतकभरापूर्वी काही कलावंतांच्या बंडामधून उभ्या राहिलेल्या ‘आर्ट डेको’च्या चळवळीला आता फायबर तसंच ग्राफीनच्या युगात नवा साज चढण्याची शक्यता आहे.

रेडिओ सेटपासून व्हॅक्यूम क्लीनपर्यंत, एवढेच नव्हे तर अवकाशापासून ते थेट पाण्यातही आपल्या सौंदर्याचा ठसा उमटवणारी शैली म्हणून ‘आर्ट डेको’ जगभरात प्रसिद्ध आहे. पहिल्या महायुद्धाच्या आधीच ‘आर्ट डेको’ किंवा डेकोरेटिव्ह आर्ट ही चळवळ जगात उभी राहिली. चळवळ करावी या उद्देशाने कुणी ती सुरू केलेली नव्हती. मुळात तिची प्रतिमासृष्टीच इतकी मोहक होती की, चित्र-शिल्पकला, वास्तुकला, नृत्य यांच्यातील प्रतिमा-रूपकांचा एक अपूर्व असा संगम या शैलीत घडून आला आणि या शैलीचे स्वतंत्र सौंदर्यशास्त्रच जगभरात विकसित झाले. वास्तुकलेपासून ते दागिन्यांपर्यंत आणि गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वानाच या शैलीची भुरळ पडली. केवळ युरोप, अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगावर या शैलीने गारूड केले. आशिया खंडात पर्शिअन तसंच भारतीय नक्षीकाम लेवून ही शैली स्वतला अधिक समृद्ध करती झाली. यंदा या कलाशैलीचे शतक जगभर साजरे होत असून पुन्हा एकदा ‘आर्ट डेको’च्या या ट्रेण्डला आता नव्याने सुरुवात झाली आहे.

फ्रान्समध्ये १८५८ साली फोटोग्राफी बुलेटिनमध्ये ‘आर्ट डेकोरेटिव्ह’ या शब्दाचा वापर सर्वप्रथम करण्यात आला. १८६८ सालापासून वर्तमानपत्रांनीही हा शब्दप्रयोग करण्यास सुरुवात केली. मात्र प्रत्यक्ष या शैलीच्या जन्मास कारणीभूत ठरला तो फ्रान्स सरकारने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय. जगभरात अनेक ठिकाणी आजही चित्र-शिल्पकार हे अस्सल कलावंत म्हणून ओळखले जातात; तर कारागिरांना कमअस्सल किंवा नक्कल करणारे असे मानले जाते. फ्रान्समध्येही हाच पायंडा होता. मात्र १८७५ साली फ्रान्स सरकारने सोनार, लोहार, सुतार आदी कारागिरांना कलावंताचा दर्जा बहाल केला, त्याने संपूर्ण देशात नवचैतन्याची एक लाट आली. १९०१ साली ‘सोसायटी ऑफ डेकोरेटिव्ह आर्टिस्ट’ची स्थापना झाली आणि १९०२ साली तुरीन येथे अलंकरण करणाऱ्या कलावंतांची पहिली परिषद पार पडली. याच सुमारास अनेक फ्रेन्च ब्रॅण्ड्सनी कारागिरांची शेकडय़ांनी भरती केली आणि विविध उत्पादने या शैलीमध्ये बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली. याच काळात ‘आर्ट डेको’ची चळवळ होण्यास कारणीभूत ठरला तो फ्रेन्च राष्ट्रवाद. त्या वेळेस जर्मनीमधून कमी किमतीच्या सजावटीच्या वस्तू खूप मोठय़ा प्रमाणावर येत होत्या. तेव्हा कलावंताचा दर्जा मिळालेल्या कारागिरांनी बंड करून निर्णय घेतला की, वार्षिक प्रदर्शनात पूर्णपणे नवे, आधुनिक असेच डिझाइनच स्वीकारले जाईल. जर्मन किंवा जुने डिझाइन स्वीकारले जाणार नाही. ही शैली मुळात पहिल्या महायुद्धाआधी जन्माला आलेली असली तरी तिचा प्रसार महायुद्धानंतर जगभर होण्यास १९१९ उजाडले. आता या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ही शैली बहरली ती १९२०-३० या दशकामध्ये. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ बेविस हिलीअर यांनी त्यावर जगभरातील पहिला शोधप्रबंध लिहिला आणि या शैलीला अकादमिक मान्यता जगभर मिळाली. १९६६ साली पॅरिसमध्ये पार पडलेल्या आणि तब्बल चार महिने चाललेल्या प्रदर्शनानंतर ‘आर्ट डेको’ ही शैली खऱ्या अर्थाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. या शैलीला जोड मिळाली ती विविध टप्प्यांमध्ये झालेल्या तंत्रज्ञानातील क्रांतीची. २० व्या शतकाच्या पहिल्या २५ वर्षांत क्रोम प्लेटिंग, स्टेनलेस स्टील, प्लास्टिक ही नवमाध्यमे अस्तित्वात आली. त्यावरही ‘आर्ट डेको’च्या कलावंतांनी नानाविध प्रयोग केले. त्या माध्यमांची बलस्थाने कलेसाठी खुबीने वापरली. या नव्या माध्यमामध्ये गोलाकार, अर्धगोलाकार व विविध रूपाकारांना आकार देणे किंवा चकचकीत पॉलिश करणे शक्य होते. किंवा लयकारीत वाकविणे अथवा आकार देणेही सहजशक्य ठरले. पॅरिस, ब्रुसेल्स या ठिकाणी या शैलीचे पहिले दर्शन घडले.

(संपूर्ण लेखासाठी वाचा लोकप्रभा दिवाळी अंक २०१९. बाजारात सर्वत्र उपलब्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 4:33 pm

Web Title: lokprabha diwali issue 2019 art deco decorative art
Next Stories
1 बहोत हार्ड है बन्टाय!
2 ज्वालामुखीच्या प्रदेशात
3 ट्रेण्ड :यंदाच्या सणासुदीत ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ
Just Now!
X