डॉ. उज्ज्वला दळवी

अंतराळ प्रवास ही आजही अप्रूपाची गोष्ट असली तरी येत्या २५-३० वर्षांत माणूस अंतराळात तीन तीन वर्षांचे दौरे करणार आहे. ते सुरळीत पार पडावेत यासाठी गेली काही वर्षे सुरू असलेल्या प्रयोगांवर एक नजर

‘युरोप टूरला चाललात? छत्री ठेवाच जवळ! मळमळ, जुलाब, सर्दी वगरेंची गरजेची औषधं, सनस्क्रीन आणि सुटी नाणीसुद्धा असू देत सोबत!’

पंधरवडय़ाच्या टूरला जाताना तिथे काय त्रास होऊ शकतो ते जाणून घेतो आपण! आजपासून २०-२५ वर्षांनी माणूस मंगळाचा, तब्बल तीन वर्षांचा दौरा करणार आहे. तेव्हा ‘घर का खाना’ तर सोडाच, गरजेला हॉस्पिटल किंवा केमिस्टदेखील नसतील. अंतरिक्ष सोसेल का माणसाला? तिथले घातक किरण, दुबळं गुरुत्वाकर्षण, माफक आहार यांचे त्याच्या शरीरावर काय परिणाम होतील? जिव्हाळ्याच्या जगाशी चुटपुटता संबंध, बंदिस्त जागेतलं वास्तव्य आणि भोवती सतत तेच पाच-सहा चेहरे यामुळे त्याचं मन बंड करेल का?

त्या सगळ्या अडचणींची आधीपासून कल्पना असावी, त्यांच्यावरचे तोडगे तयार असावेत, त्यायोगे अंतराळवीरांना आपली अवघड कामगिरी चोख बजावता यावी, त्यांची प्रकृती ठणठणीत राहावी आणि अंतरिक्षयात्रा सुरक्षित व्हावी म्हणून मोठय़ा प्रमाणात आंतरराष्ट्रीय संशोधन चालू आहे. हा अभ्यास १९४७ सालापासून सुरू झाला. त्या वर्षी शेवाळ आणि चिलटं अंतराळाच्या सीमेपर्यंत जाऊन आली. संशोधकांनी त्यांच्यावरचे घातक किरणांचे परिणाम नोंदले. १९५० च्या दशकात माकडांनीही प्रवास केला. त्यांच्या शरीरात रक्तदाब, हृदयाचे ठोके, श्वसन याची नोंद करणारे सेन्सर बसवलेले होते. १९५१ साली दोन कुत्रे खरोखर अंतराळात जाऊन आले. १९५७ साली मॉस्कोच्या लायका या भटक्या कुत्रीने अंतराळात जाऊन पृथ्वीभोवती चकरा मारल्या. त्याच वेळेस मुश्का नावाची भटकी कुत्री तशाच यानात, तशाच यंत्रसामग्रीसह, तशाच अन्नावर तौलनिक अभ्यासासाठी ठेवली गेली. मग बेडूक, उंदीर, भुंगे, फुलपाखरं, पाली, मासे आणि कोळी, ससे आणि कासवं, असे अनेक प्राणी अंतराळात गेले. त्यांच्यावरील अंतरिक्ष-परिणामांची नोंद झाली.

१९६१ साली रशियाच्या युरी गागारीनला अंतराळात पाठवण्यापूर्वी वोस्टोक यानाच्या हुबेहूब प्रतिकृतीतून गागारीनच्या आकाराचा आयव्हॅन आयव्हॅनोविच नावाचा बाहुला आणि एक खराखुरा कुत्रा अंतराळात भ्रमण करून आले. त्यानंतरच आदर्श प्रकृतिमान असलेला २७ वर्षांचा गागारीन अंतरिक्ष प्रवासातल्या गती-गुरुत्वाकर्षणाच्या प्रचंड उलथापालथीला सामोरा गेला आणि सर्वकाळ शुद्धीवर राहून, तल्लख डोक्याने काम करून सुखरूप परत आला. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष संशोधनातला तो फार मोठा विजय ठरला.

तब्येतीने ठणठणीत असलेल्या २६ वर्षांच्या वॅलेंटीना तेरेश्कोवाला अंतरिक्षात जाण्यापूर्वी खडतर तपश्चर्या करावी लागली. मेरी-गो-राऊंडसारख्या सेंट्रिफ्यूजमध्ये बसून अत्यंत वेगाने प्रचंड दाबाखाली गरगर फिरणं, निर्वात खोलीत वजनरहित अवस्था अनुभवणं, अतिउष्ण वातावरण सहन करणं, बंदिस्त कोठडीत दीर्घ एकांतवास सोसणं आदी कठीण कसोटय़ांना सामोरं जावं लागलं. अंतरिक्षात तीन दिवस भ्रमण करून येणारी पहिली महिला म्हणून १९६३ मध्ये तिची नोंद झाली. नंतर लगेचच तिने आन्द्रियान निकोलायेव्ह या अंतराळवीराशी लग्न केलं आणि वर्षभरातच एलेना नावाच्या निकोप मुलीला जन्म दिला. तिचं मातृत्व ही अंतराळ प्रवासाच्या बिनधोकपणाची ग्वाहीच होती.

त्यानंतर आर्मस्ट्राँगपासून सुनीता विल्यम्सपर्यंत सगळे जण स्वखुशीने अंतराळ संशोधनातले विद्वान, बुद्धिमान, बलवान गिनीपिग्ज झाले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (करर) ही भलीथोरली प्रयोगशाळा २००० सालापासून अंतराळात वेगवेगळे प्रयोग करते आहे. तिथे अनेक देशांचे तरुण शास्त्रज्ञ स्वतवरच संशोधन करत निरीक्षण-नोंदी करताहेत. तिथे वनस्पतींवर, जंतूंवर, प्राण्यांवरदेखील संशोधन होतंच आहे. २००४ सालापासून अमेरिकेत, ह्य़ूस्टनच्या बाजूला, जॉन्सन स्पेस सेंटर या अंतराळनगरात भरवशाच्या, सुरक्षित आणि यशस्वी अंतराळमोहिमांना पाठबळ देणारा ‘मानवी संशोधन प्रकल्प’च सुरू आहे. अंतरिक्ष प्रवासासाठी शिक्षण, कसोटय़ा, यानाबाहेर खुल्या अंतराळात चालण्याच्या दृष्टीने संशोधन वगरे अनेक कामं तिथे चालू आहेत. अतिशय कठीण परिस्थितीत काम करायच्या सरावासाठी सागरतळाशीदेखील अ‍ॅक्वेरियस नावाची एक अत्याधुनिक प्रयोगशाळा बांधलेली आहे. त्या सगळ्या अभ्यासातून आतापर्यंत बरीच माहिती गोळा झाली आहे.

 

नगण्य गुरुत्वाकर्षण

अंतरिक्षातल्या नगण्य गुरुत्वाकर्षणामुळे खाणंपिणं, तोंड धुणं, प्रातर्वधिी वगरेंसाठी चांगलीच कसरत करावी लागते. कणन् कण, थेंबन् थेंब कसोशीने पकडून बंदिस्त करावा लागतो. त्या सगळ्या आन्हिकांसाठी खास तंत्रं बनवलेली आहेत. शरीराचं वजन तोलायची कटकट गेल्यामुळे हाडांना आणि स्नायूंना फारसं कामच राहत नाही. पृथ्वीवर तो व्यायाम गृहीत धरला जातो. तो नसल्यामुळे स्नायू दुबळे होतात. हाडांची झीज पृथ्वीवरच्या तुलनेत १२ पट वाढते. हाडं झिजल्यामुळे बाहेर पडणारं कॅल्शियम रक्तात उतरतं आणि तिथून लघवीवाटे शरीराबाहेर जातं. त्या प्रवासात ते मूत्रिपडांत साचून मूतखडय़ांचं प्रमाण वाढतं. एरवी गुरुत्वाकर्षणामुळे पायांकडे ओढ घेणारं पाणी वजनरहित अवस्थेत शरीरभर एकसारखं पसरतं. म्हणजे डोक्याकडे अधिक पाणी जाऊन चेहरा सुजमट होतो, डोळ्यांमागे सूज येते, दृष्टिमज्जातंतूवर दाब येतो, दृष्टी धूसर होते. मेंदू सुजमट झाला तर विचार करायची क्षमता कमी होते. गुरुत्वाकर्षणावर मात करून रक्त मेंदूकडे पंप करायचं कामच घटल्यामुळे हृदयाचे स्नायूसुद्धा कमकुवत होतात. पृथ्वीवर परतल्यावर हा दुबळेपणा काही दिवस त्रास देतो.

कानाच्या अंतर्भागात एक आडवी, एक उभी आणि एक तिरपी अशा तीन पोकळ नळ्या असतात. त्या द्रवाने अर्धवट भरलेल्या असतात. त्या द्रवात कॅल्शियमचे कण तरंगत असतात. डोक्याच्या उभ्या, आडव्या, तिरप्या स्थितीप्रमाणे दर क्षणी त्या द्रवाची पातळी हालत राहते आणि त्याप्रमाणे त्या कॅल्शियमच्या कणांची जागा बदलते. तिथले मज्जातंतू ती बित्तंबातमी मेंदूला कळवतात. डोक्याची, शरीराची जमिनीच्या संदर्भातली स्थिती मेंदूला समजते. वजनरहित अवस्थेत ते कण आणि तो द्रवपदार्थदेखील आपली नळ्यांतली पातळी सोडून नाचायला लागतात. वर-खाली हे नेहमीचे संदर्भच हरपतात. तोल सावरणं, लहानमोठय़ा हालचाली सुसूत्रपणे करणं कठीण होतं.

अंतरिक्षासाठीच बनवलेल्या खास यंत्रांच्या मदतीने नियमित, भरपूर व्यायाम केला की हाडं, स्नायू, हृदय मजबूत राहतात. मांडय़ांभोवती घट्ट पट्टे बांधून पायांतलं पाणी डोक्याकडे जाणं कमी करता येतं. वेगवेगळ्या औषधांनी हाडांची झीज, मूतखडे टाळता येतात.

(संपूर्ण लेखासाठी वाचा लोकप्रभा दिवाळी अंक २०१९. बाजारात सर्वत्र उपलब्ध)