26 May 2020

News Flash

हडप्पा हीच वैदिक संस्कृती – डॉ. वसंत शिंदे

हडप्पाकालीन स्थळ असलेल्या राखीगढी येथे मानवी सांगाडय़ातील डीएनएच्या शास्त्रीय अभ्यासावरून ‘हडप्पा हीच वैदिक संस्कृती’ असल्याचा निष्कर्ष जाहीर करण्यात आला.

आर्य हे इराणवरून आले नसून ते भारतीयच होते, असे ठाम व ठोस प्रतिपादन या शोधप्रबंधात करण्यात आले आहे.

शमिका वृषाली

हडप्पाकालीन स्थळ असलेल्या राखीगढी येथे मानवी सांगाडय़ातील डीएनएच्या शास्त्रीय अभ्यासावरून ‘हडप्पा हीच वैदिक संस्कृती’ असल्याचा निष्कर्ष जाहीर करण्यात आला. त्यानंतर जगभर त्यावर चर्चा, प्रतिवाद सुरू आहेत. या संशोधन चमूचे प्रमुख तसेच अभिमत विद्यापीठ असलेल्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. वसंत शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा..

काही प्रश्न स्वतंत्र देशाच्या मुळाशी ठाण मांडून बसलेले असतात. स्वतंत्र भारताचा नागरिक असलो तरी मी नक्की कोण आहे? इथपासून ते नेमके अस्तित्व काय? मूळ याच देशातील आहे की बाहेरून आलो/आले आहे? आपण नेमके कुणाचे वंशज आहोत? बाहेरून आलेल्या आर्याचे की स्थानिक द्रविडांचे? आर्य म्हटले तर आपण इथले ठरत नाही. मग अनार्य आहोत का? तसे असेल तर हे अनार्य खरंच द्रविड होते की आणखी कोणी? प्रश्नांचे हे मोहोळ असेच वाढत जाते. आज २१ व्या शतकातही हे यक्षप्रश्न कायम आहेत!

इतिहासाच्या काळोख्या डोहात भारतीयांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करून राहिलेले मिथक आहे ते आर्य-अनार्याचे. या आख्यायिकेप्रमाणे हडप्पा संस्कृतीला कोणा परकीय आर्यानी नष्ट करून स्वत:ची संस्कृती वसवली. अनार्याना कायमस्वरूपी आपले दास करून आपल्या संस्कृतीचे ठसे या भारतभूमीवर उठवले. या आख्यायिकेच्या अस्तित्वाने गेली दोन शतके भारतीय मन व बुद्धी हादरली होती. अनेक बुद्धिवंतांनी आपापल्या परीने अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अनेक नव्या गोष्टी दृष्टिपथास आल्या आणि संशोधनात मोलाची भर पडत मार्ग प्रशस्त होत गेला. अस्तित्वाचा हा शोध आजतागायत सुरूच आहे..

अशाच प्रकारचा एक शोध आता एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या आधारे पुढे आला असून त्यामुळे जग परत एकदा आर्य-अनार्य वादाकडे वळले आहे. अभिमत विद्यापीठ असलेल्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ पुरातत्त्वज्ज्ञ डॉ. वसंत िशदे यांनी केलेल्या संशोधनांतर्गत आर्य हे कुणी बाहेरून आलेले नव्हते. तर आजचे भारतीय हे इथलेच मूळ निवासी आहेत, असे विधान करण्यात आले. त्यासाठी शास्त्रीय पुरावा देण्यात आला आणि पुन्हा एकदा जगाचे लक्ष या वादाकडे आणि पर्यायाने नव्या संशोधनाकडे गेले. डॉ. वसंत िशदे गेली अनेक वष्रे सातत्याने हडप्पा संस्कृतीवर सखोल संशोधन करत आहेत. हरयाणा येथील राखीगढी या हडप्पा संस्कृतीच्या स्थळावरील उत्खननादरम्यान त्यांना सापडलेल्या ४५ वर्षीय हडप्पाकालीन महिलेच्या कानातील हाडात संशोधकांना अखंड डीएनएचे काही नमुने मिळाले. प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतर लक्षात आलेली बाब म्हणजे त्या स्त्रीची गुणसूत्रे आणि आज भारतीयांमध्ये आढळणाऱ्या गुणसूत्रांमध्ये कमालीचे साम्य आहे. हे साम्य पडताळून पाहण्यासाठी डॉ. िशदे व त्यांच्या सहसंशोधकांनी १४०० भारतीयांच्या डीएनएचे नमुने गोळा केले. आपण भारतीय त्या हडप्पाकालीन संस्कृतीचेच वंशज आहोत व आर्य कोणी बाहेरून आलेले नसून तेही याच संस्कृतीचा एक भाग आहेत, हे सिद्ध झाल्याचा दावा डॉ. शिंदे यांच्या टीमने केला आहे. त्यांचा हा शोधप्रबंध सेल व सायन्स या दोन जागतिक दर्जाच्या प्रतिष्ठित संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.

यापूर्वी आर्य हे इराणमधून आलेले आहेत असे गृहीतक मांडण्यात आले होते; परंतु भारतीयांच्या व इराणी लोकांच्या डीएनएमध्ये कुठलेही साम्य आढळत नाही, यावरून आर्य हे इराणवरून आले नसून ते भारतीयच होते, असे ठाम व ठोस प्रतिपादन या शोधप्रबंधात करण्यात आले आहे. असे असले तरी त्यांच्या संशोधनानंतर अनेक प्रश्न, शंका नव्याने विचारण्यात आल्या. म्हणूनच ‘लोकप्रभा’ने डॉ. वसंत िशदे यांच्याकडूनच त्या प्रश्नांची उत्तरे  जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आर्य-अनार्य या वादाच्या मुळाशी असलेली हडप्पा ही नेमकी कोणती संस्कृती आहे? तिची वैशिष्टय़े कोणती?

भारतामध्ये माणसाच्या स्थिर जीवनाला सुरुवात ही साधारणपणे इसवी सनपूर्व सात हजारमध्ये (म्हणजेच आजपासून सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वी) झाली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी भारतात आणि सध्या पाकिस्तानमध्ये असलेले मेहेरगढ. येथे इसवी सनपूर्व सात हजार वर्षांपूर्वी भारतातला माणूस हा स्थिर जीवन जगत होता. त्यानंतर भारतीयांच्या सांस्कृतिक विकासाला सुरुवात झाली. त्यातच प्रगतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर तत्कालीन भारतीयांनी निर्माण केलेल्या नावीन्यपूर्ण संस्कृतीला जग हडप्पा संस्कृती म्हणून ओळखते. भारताच्या वायव्य व पश्चिम भागात या हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडतात. हडप्पा संस्कृतीची सुरुवात साधारणत: इसवी सनपूर्व ५५०० मध्ये झाली. ही संस्कृती स्थिर जीवन जगणारी होती आणि या संस्कृतीतील नागरी जीवनाला इसवी सनपूर्व ५५०० मध्ये आरंभ झाला. हडप्पा संस्कृती ही इसवी सनपूर्व ५५०० ते इसवी सनपूर्व १५०० या काळात विकसित झाली. त्याचे तीन टप्पे आहेत. पहिला म्हणजे पूर्व हडप्पा (अर्ली हडप्पा), या काळात ग्रामीण जीवन विकसित झाल्याचे दिसते. दुसरा म्हणजे विकसित किंवा परिपक्व अवस्थेतील हडप्पा (मॅच्युअर हडप्पा- इसवी सनपूर्व २५००) या काळात शहरी जीवन पूर्णपणे विकसित झाले, तर तिसऱ्या टप्प्यात (इसवी सनपूर्व १९००) या संस्कृतीच्या ऱ्हासाला सुरुवात झालेली दिसते. भारतामध्ये व भारताच्या बाहेर अशा प्रकारे नागरिकरणाचे अभिनव प्रयोग करणारी व प्रगतीचे पुरावे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर निर्माण करणारी दुसरी कोणतीही संस्कृती नाही. या संस्कृतीची व्याप्ती मोठी होती.

सद्य: पाकिस्तानमध्ये हडप्पा या ठिकाणी प्रथम या संस्कृतीचे पुरावे मिळाले म्हणूनच या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असे म्हणतात. १९२० साली या ठिकाणी जॉन मार्शल या ब्रिटिश अधिकाऱ्याने या ठिकाणी प्रथम उत्खनन केले. अनेक इतिहासकारांना ही संस्कृती पूर्व-ऐतिहासिक काळातील (इसवी सनपूर्व सहाव्या शतकातील) असावी असे वाटले. एवढी प्रगत संस्कृती त्यापूर्वीचीही असू शकते याची कल्पनाच तेव्हा नव्हती. हडप्पाच्या शोधामुळे भारतीय स्थिर जीवनाचा इतिहास हा किमान २५०० ते ३००० वर्षे मागे गेला. १९२४ साली जॉन मार्शल आणि लिओनार्ड वूली यांच्यात चर्चा झाली, लिओनार्ड वूली हे मेसोपोटेमियात पुरातत्त्वज्ञ म्हणून काम करत होते. त्यांनी जॉन मार्शल यांना सुचवले की, हडप्पा या ठिकाणी ज्या मुद्रा मिळतात तशाच मुद्रा मेसोपोटेमियात मिळाल्या आहेत. त्या मुद्रा ज्या थरात मिळाल्या तो थर प्राचीन आहे, त्याचा काळ हा इसवी सनपूर्व २४०० इतका जुना आहे. यावरून जॉन मार्शल यांच्या लक्षात आले की, हडप्पा संस्कृतीही तेवढीच जुनी असू शकते. त्यानंतर जॉन मार्शल यांनी २० सप्टेंबर १९२४ रोजी या संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारा पहिला शोधप्रबंध ‘द इलस्ट्रेटेड लंडन न्यूज’मध्ये लिहिला. त्याचे शीर्षक होते ‘द अनाऊन्समेंट ऑफ द डिस्कव्हरी ऑफ द एन्शंट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन’.

हडप्पा हे भारतीय इतिहासातील पहिलं नागरीकरण असून ती ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे. जगाच्या इतिहासात प्राचीनतम समजल्या जाणाऱ्या इजिप्त व मेसोपोटेमिया या संस्कृतींना हडप्पा ही समकालीन संस्कृती होती व त्यांच्यात व्यापारी संबंध होते हे आता पुरेशा पुराव्याने सिद्ध झाले आहे. ही नागर व प्रगत संस्कृती होती, याच संस्कृतीने भारतीय संस्कृतीचा पाया रचला. त्या संस्कृतीने ज्या चालीरीती रचल्या त्याच आपण आजही समाजात पाळताना दिसतो.

(संपूर्ण संपूर्ण मुलाखतीसाठी वाचा लोकप्रभा दिवाळी अंक २०१९. बाजारात सर्वत्र उपलब्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 6:25 pm

Web Title: lokprabha diwali issue 2019 harappa
Next Stories
1 चाँद के पार चलो…
2 अजिंठय़ाचा गाइड
3 सध्याचे कॉमेडी शो अल्पजीवी!
Just Now!
X