विजया जांगळे

वसई-नालासोपाऱ्याच्या गल्लीबोळांत, खुल्या मैदान-उद्यानांत, उन्हा-पावसात फ्लिप्स-ट्रिक्स शिकत अनेक मुलं हिप-हॉपच्या जागतिक क्षितिजावर चमकली. ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ जिंकून ‘किंग्ज युनायटेड इंडिया’च्या क्रूने लॉस एन्जेलिसमध्ये नालासोपाऱ्याचा डंका पिटला. ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ची अंतिम फेरी गाठणाऱ्या ‘व्ही अनबिटेबल्स’ची सुरुवातही या गल्लीबोळांतूनच झाली आहे.

‘मधुबन के गेट पे छोडना है तो साठ रुपया, अंदर जाना है तो अस्सी.. ‘किंग्ज युनायटेड’ जाना है क्या? आते समय उधर से रिक्षा नही मिलेगा. ष्टॅण्ड तक चलके आना पडेगा.’ फक्त ‘मधुबन टाऊनशिप?’ एवढं विचारल्याबरोबर रिक्षावाला स्वत:च सगळं सांगू लागला. ‘किंग्ज युनायटेड इंडिया’चा स्टुडिओ आता वसईतला लॅण्डमार्क झालाय. तो लोकवस्तीपासून काहीसा दूर असूनही रस्त्यावर वर्दळ असते. ‘पयले कुनी नसायचं हितं. पन आता ही पोरं असतात. रस्त्यानी सरळ चालत न्हाईत. नाचतच जातात. हिते नाचाचे खूप कलास झालेत. पुढच्या कोपऱ्यावर पन येक हाय. पन जो आतमधी हाय ना.. तिथंच जास्ती गर्दी असते.’ भाजीवाल्या काकी सांगतात. लांबलचक माळावर मध्येच उगवल्यासारख्या दोन इमारती. त्यातलाच एक ‘किंग्ज युनायटेड इंडिया’चा स्टुडिओ. हिप-हॉपमधली जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे ‘वर्ल्ड ऑफ डान्स’. ही स्पर्धा जिंकून वसई-नालासोपाऱ्याला नृत्याच्या जागतिक मंचावर ओळख मिळवून देणाऱ्या ‘द किंग्ज’ने इथेच सराव केला. डान्सर्सच्या गर्दीमुळे स्टुडिओ सहज लक्ष वेधून घेतो. प्रवेशद्वारावरच तिघांची प्रॅक्टिस सुरू होती. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणं अशक्यच! दणाणतं संगीत स्टुडिओच्या भिंतींना न जुमानता बाहेर पडत होतं. रिसेप्शनवर डान्सर्सची लगबग. त्यात सात-आठ वर्षांचे भावी डान्सर्सही. आत एक मोठी आणि दोन लहान सराव खोल्या. एक कोपरा रेकॉर्डिग रूमचा; पण हा सगळा तामझाम आजचा! देश-विदेशातल्या अनेक स्पर्धा जिंकल्यानंतरचा! १० वर्षांपूर्वी यापैकी काहीही नव्हतं.

आज ‘वर्ल्ड ऑफ डान्स’चे विजेते म्हणून जगासमोर आलेले डान्सर्स तेव्हा नालासोपारा- वसईत मिळेल त्या मैदानात, बागेत, खाडीकिनारी, कन्स्ट्रक्शन साइटवर, शाळांच्या व्हरांडय़ांत, फुटपाथवर उन्हा-पावसात प्रॅक्टिस करत होते. हाती पैसा नव्हता, घरच्यांचा विरोध होता, जबाबदाऱ्यांचं ओझं तर होतंच, अपघातांचा धोका होता, यातून हाती काय लागणार हे माहीत नव्हतं, पण ‘डान्स के लिये कुछ भी’ अशा जिद्दीने ते पुढे जात राहिले. ही जिद्दच त्यांना वसईच्या गल्लीबोळांतून जगाच्या मंचावर घेऊन गेली.

हिप-हॉप संस्कृतीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे बी बॉइंग. चापल्य, साहस, लवचीकता, शारीरिक तंदुरुस्तीचा कस लावणारा असा हा एक वेगळाच नृत्य प्रकार आहे. उत्तम बी बॉइंग करणाऱ्या, पण इथे-तिथे विखुरलेल्या मुलांना एकत्र आणलं सुरेश मुकुंद आणि वर्नन माँटेरिओने. ‘फिक्टिशियस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या क्रूने ‘हिप हॉप इंटरनॅशनल’मध्ये पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरी गाठली. त्यांच्या या प्रवासावर ‘एबीसीडी-२’ हा चित्रपट आला; पण त्यानंतर त्यांचा क्रू फुटला. सुरेशबरोबर राहिलेल्यांनी ‘किंग्ज युनायटेड इंडिया’ हा क्रू तयार केला. या क्रूने २०१९ मध्ये ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ जिंकून श्रेष्ठत्व सिद्ध केलं.

या विजेतेपदामुळे हिप-हॉपच्या जागतिक क्षितिजावर भारताला खास ओळख प्राप्त झालीच शिवाय स्पर्धेतून मिळालेल्या सात कोटी रुपयांच्या सांघिक पारितोषिकाने या धडपडणाऱ्या मुलांना आर्थिक स्थैर्यही मिळवून दिलं. त्यातील प्रत्येक डान्सरचा प्रवास ही स्वतंत्र कथा आहे..

(संपूर्ण लेखासाठी वाचा लोकप्रभा दिवाळी अंक २०१९. बाजारात सर्वत्र उपलब्ध)