05 March 2021

News Flash

हसवण्याचा गंभीर धंदा

कुणालाही खळखळून हसवता येणं ही स्टॅण्ड-अप कॉमेडीची पूर्वअट.

बोचऱ्या, धारदार विनोदाला सत्ताधारी कायमच वचकून असतात.

वैशाली चिटणीस

कुणालाही खळखळून हसवता येणं ही स्टॅण्ड-अप कॉमेडीची पूर्वअट. ती पूर्ण करण्यासाठी पूरक अशी परिस्थिती आपल्या देशात आहेच, त्याबरोबर तथाकथित संवेदनशील लोकांमुळे हे काम कधी नव्हे इतकं कठीण होऊन बसलं आहे.

हसन मिन्हाज हा अमेरिकेत राहणारा भारतीय वंशाचा स्टॅण्ड-अप कॉमेडियन. नेटफ्लिक्सवर त्याचा ‘पेट्रियॉट अ‍ॅक्ट’ हा शो लोकप्रिय आहे. आपल्याकडच्या लोकसभा निवडणुकांवर त्याने  त्याच्या पद्धतीने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर कॉमेंट्स केल्या होत्या. परिणामी अलीकडेच ह्य़ूस्टन इथं झालेल्या हावडी मोदी कार्यक्रमात हसन मिन्हाजला कार्यक्रमाच्या ठिकाणी ं प्रवेश मिळाला नाही.

ही आहे बोचऱ्या, धारदार विनोदाची किंमत. अशा विनोदाला सत्ताधारी कायमच वचकून असतात. कधी कधी व्यंगचित्रकारांना अशा पद्धतीने राजकीय रोषाला सामोरं जावं लागतं. आज ती जागा वेगवेगळ्या क्लब्जमध्ये, विशेषत: ऑनलाइन फ्लॅटफॉर्मवर सादरीकरण करणाऱ्या स्टॅण्ड-अप कॉमेडियन्सनी घेतली आहे.

इंटरनेटमुळे माणसाच्या आयुष्यात काय काय बदललं याचा आढावा घ्यायला गेलं तर मनोरंजनाचा नंबर बराच वरचा लागेल. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून बघितल्या जाणाऱ्या स्टॅण्ड-अप कॉमेडी या विनोदाची पखरण करणाऱ्या शोंमुळे हा कार्यक्रम करणारे काही जण रातोरात स्टार झाले आहेत. क्रिकेटपटू आणि सिनेकलाकार यांनाच मिळणारी अमाप लोकप्रियता आता स्टॅण्ड-अप कॉमेडियन्सनाही मिळायला लागली आहे. नव्या जगाचे तळपते तारेच झाले आहेत हे स्टॅण्ड-अप कॉमेडियन्स.

खळखळून हसायला बहुतेकांना आवडत असतं. पूर्वी सर्कशीतले जोकर लोकांना हसवण्याचं काम करत. पण त्यात शारीर विनोदांचा भाग जास्त असायचा. पुलंच्या एकपात्री प्रयोगांसारख्या कार्यक्रमांमधूनही लोकांनी विनोदाचा मनसोक्त आनंद घेतला. कधीमधी येणारी विनोदी नाटकंही त्यांना खळखळून हसायला लावत. घरोघरी बघितल्या जाणाऱ्या टीव्हीवर खासगी वाहिन्यांचं बस्तान चांगलं बसल्यानंतर रिअ‍ॅलिटी शो सुरू झाले. त्यात हिंदी-मराठीमधल्या कार्यक्रमांनी विनोदाचा तडका देऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या अपेक्षा वाढवत नेल्या. या कार्यक्रमांमधून लोकप्रिय झालेली राजू श्रीवास्तव, सुनील पाल यांच्यासारखी मंडळी स्टार होत गेली. पण त्यातून सादर होणारे त्याच त्याच प्रकारचे विनोद, अंगविक्षेपांना दिलं जाणारं अवाजवी महत्त्व, नावीन्याचा अभाव, विनोदाच्या नावाखाली आचरट चाळे या सगळ्यांना प्रेक्षक कंटाळत गेले. त्यांना हवा असलेला विनोदाचा निखळ आनंद त्यांना टीव्हीवरच्या विनोदी रिअ‍ॅलिटी शोमधून मिळेनासा झाला.

याच दरम्यान तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे इंटरनेट अधिक वेगाने विकसित होत होतं. प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसायला सुरुवात झाली होती. मग या मोबाइलला स्पीड मिळाला आणि त्याचा उपयोग फोन करण्यापेक्षा डाटाच्या वापरासाठी अधिक व्हायला लागला. टीव्हीवरच्या त्याच त्या तकलादू मनोरंजनाला कंटाळलेली तरुण पिढी हातातल्या मोबाइलमधून मिळणाऱ्या कण्टेण्टकडे वेगाने वळायला लागली. टीव्हीवरच्या घिस्यापिटय़ा मालिकांपेक्षा वेबसीरिजचा मसाला तिला अधिक भावला. त्याबरोबरच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर असलेल्या स्टॅण्ड-अप कॉमेडीनेही तिचे लक्ष वेधून घेतले.

स्टॅण्ड-अप कॉमेडी हा मूळचा अमेरिकन प्रकार. ऑगस्टस लाँगस्टीट, मार्क ट्वीन यांनी अमेरिकेत विनोदाची परंपरा रुजवायचा प्रयत्न केला. त्यानंतर १९ व्या तसंच २० व्या शतकात  स्टॅण्ड अप कॉमेडीचा उदय झाला. हा खरं तर मनोरंजनाचा वेगळाच प्रकार होता. त्यात कुणी निवेदक नव्हता. कथानक नव्हतं. बॅकस्टोरी नव्हती. सेट नव्हते, एडिटिंग नव्हतं की निर्माते नव्हते. कॉमेडियन्स आणि प्रेक्षक एकमेकांसमोर असायचे. प्रेक्षकांशी होणाऱ्या थेट संवादातून कॉमेडियन आणि प्रेक्षक यांची नाळ जुळायची.  हीच स्टॅण्ड अप कॉमेडी जगभर पसरत गेली.

भारतात स्टॅण्ड-अप कॉमेडीचा मुख्यत्वे प्रसार झाला तो यूटय़ूबच्या वाढत्या वापराबरोबर. यूटय़ूबने या क्रांतीत मोलाचा वाटा उचलला. एआयबी, ईआयसी (ईस्ट इंडिया कॉमेडी) यांच्याबरोबरच वैयक्तिक कॉमेडियन्सना आपले व्हिडीओ लोकांबरोबर शेअर करण्यासाठी यू-टय़ुब हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ठरला. कारण आपल्याकडच्या टीव्हीवर प्रापंचिक कार्यक्रमांचा असलेला भडिमार आणि त्यांना जोडून येणारी  सेन्सॉरशिप पाहता तिथे स्टॅण्ड-अप कॉमेडियन्सना जागा मिळणं शक्यच नव्हतं. सिनेमा हे माध्यम खूप लोकांपर्यंत घेऊन जाणारं असलं तरी या स्टॅण्ड-अप कॉमेडियन्सना जे म्हणायचं होतं, ज्या पद्धतीने मांडायचं होतं ते सगळं सिनेमासाठी अडचणीचं होतं. आपल्याकडे बहुतेकदा देशभरातल्या सगळ्या जाती, जमाती, धर्म, पंथ, वर्ग, वयोगट या सगळ्यांनाच सांभाळून घेत, कुणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घेत सर्वसमावेशक आणि तितकाच सबगोलंकारी व्यावसायिक सिनेमा काढावा लागतो. ही कसरत करताना तो विषयवस्तू म्हणून बोथट होत जातो. आपल्या बोचऱ्या विनोदाचे फटकारे मारताना राजकारणी, कलाकार, बँकवाले, मीडिया हाऊस या कुणाचाही मुलाहिजा न बाळगणाऱ्या स्टॅण्ड-अप कॉमेडियन्सना स्वत:वर अशी बंधनं घालून घेता येणं शक्यच नव्हतं. टीव्हीवर अशा टीकेमुळे प्रायोजक दुरावण्याची भीती असते, तर सिनेमात कुणाकुणाच्या भावना दुखावल्या जाऊन गदारोळ व्हायची शक्यता असते. त्यामुळे हुशार आणि तरुण कॉमेडियन्सनी शहाणपणाने ती वाटच वगळली आणि गूगल आणि यूटय़ूबचा मार्ग स्वीकारला.

असं सगळं असलं तरी आपल्याकडे सुरुवातीला स्टॅण्ड-अप कॉमेडी मुख्यत्वे इंग्रजीत असायची. तिची भाषा थेट इंग्लंड अमेरिकेतून येऊन मुंबईत, दिल्लीमध्ये उतरल्यासारखी इंग्रजी, तर विषय पाश्चात्त्यांच्या अंगाने जाणारे होते. तिचा प्रेक्षकही इंग्रजीच होता. पण ‘प्रादेशिक भाषेत सांगितलेली  प्रादेशिक गोष्टदेखील चांगले पैसे मिळवून देईल.’ हे ऑस्कर वाइल्डचं विधान भारतातल्या इंदौरसारख्या शहरात राहणाऱ्या झाकीर खान नावाच्या हिंदी भाषिक स्टॅण्ड-अप कॉमेडियनने शब्दश: खरं करून दाखवलं आहे. त्याने भारतातल्या कॉमेडीच्या बाजारपेठेची सगळी गणितंच बदलली आहेत. त्याची हिंदूी भाषा, मध्य भारतातल्या नवमध्यमवर्गीय तेही मुस्लीम कुटुंबात जगतानाचे अनुभव, विनोदाची उत्तम जाण आणि अफलातून सादरीकरण या गोष्टींमुळे झाकीर खान आज देशातल्या महत्त्वाच्या कॉमेडियन्सपैकी आहे. इंग्रजी स्टॅण्ड-अप कॉमेडीची री न ओढता, स्थानिक भाषा, स्थानिक अनुभव, त्यांच्यामध्ये असलेला रांगडेपणा याच्या बळावर त्याने सगळा हिंदी पट्टा सहज जोडून घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 2:10 pm

Web Title: lokprabha diwali issue 2019 stand up comedy
Next Stories
1 काळाच्या पडद्याआडची असामान्य शौर्यकथा
2 लॉस एन्जेलिसमध्ये नालासोपाऱ्याचा डंका!
3 ठसकेबाज व्हायरल फाईव्ह
Just Now!
X