24 November 2017

News Flash

गणेश विशेष : पुराभिलेखांतून दिसणारा गणेशाचा विकास

गणेशाचा एक देवता म्हणून झालेला विकास आपल्याला या शिलालेखांतून आणि प्रतिमांवरून दिसून येतो.

आनंद कानिटकर | Updated: August 18, 2017 1:07 AM

गणपतीच्या देवता म्हणून झालेल्या प्रवासाचा शोध घेताना पाचवे शतक ते पंधरावे शतक या हजार वर्षांच्या काळातले शिलालेख तसेच प्रतिमा महत्त्वाच्या ठरतात.

भारतात सर्वात पूजनीय मानल्या जाणाऱ्या देवतेचे म्हणजेच गणेशाचे प्राचीन काळापासून प्रतिमा स्वरूपात अंकन होत आहे. भारतातील इतर महत्त्वाचे पंथ म्हणजे शैव, वैष्णव आणि शाक्त पंथांतील देवतांच्या प्रतिमा आणि शिलालेखीय पुरावे आपल्याला इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून मिळतात. त्यांचे प्राचीन नाण्यांवर अंकनही केलेले आढळते. परंतु गणेशाच्या बाबतीत प्रतिमा आणि शिलालेखीय पुरावे त्यामानाने उशिरा म्हणजे इ. स. चौथ्या/ पाचव्या शतकापासून उपलब्ध होतात. गणेशाच्या प्रतिमा गुप्तकाळापासून (इ. स. चौथे/ पाचवे शतक) मोठय़ा प्रमाणावर प्रचलित झालेल्या दिसतात. याचप्रमाणे गणेशाचा उल्लेख असलेले शिलालेखही सापडतात. इ. स. पाचवे शतक ते इ. स. १५ वे शतक या हजार वर्षांच्या काळातील गणेशाचा एक देवता म्हणून झालेला विकास आपल्याला या शिलालेखांतून आणि प्रतिमांवरून दिसून येतो.

अर्थात जरी इ. स. तिसऱ्या शतकापूर्वीच्या गणेश प्रतिमा आणि त्याचे शिलालेखीय पुरावे सापडले नाहीत तरी भारतातील प्राचीन साहित्यामध्ये आपल्याला विनायकाचे वर्णन आढळते. भारतातील प्राचीन साहित्य म्हणजे ऋग्वेद (ऋग्वेदाचा काळ आता इ. स. पूर्व १८०० वर्षे मानला जातो). या ऋग्वेदामध्ये बृहस्पती अथवा ब्रह्मणस्पती याचे वर्णन आहे; परंतु त्यात गजमुख गणेशाचे वर्णन येत नाही. इतकेच नाही तर ऋग्वेदामध्ये इंद्राला गणपती म्हटले आहे. ऋग्वेदानंतर रचल्या गेलेल्या अथर्ववेदात येणाऱ्या पापमोचनसूक्तामध्ये ८५ देवतांचा उल्लेख आहे. त्यात ब्रह्मणस्पती आहे, परंतु गणेश किंवा गणपती यांचा उल्लेख नाही. यावरून वैदिक वाङ्मयामध्ये गणपती हे गणांचा अधिपती या अर्थाचे विशेषण म्हणून येते हे स्पष्ट आहे, तर गणेश हे नाव वैदिक वाङ्मयामध्ये आढळत नाही. यानंतर गणपतीचे प्रसिद्ध असलेले विनायक हे नाव ‘मानव गृसूत्र’ या ग्रंथात येते. यात वर्णन केल्याप्रमाणे शालकंटक, देवयजन, उस्मित आणि कुष्माण्डराजपुत्र हे चार विनायक आहेत. यातही गणेश हे नाव येत नाही. तसेच या विनायकांचे गजमुख आहे असेही वर्णन येत नाही. हे चारही विनायक लोकांच्या कार्यात विघ्न आणायचे. त्यामुळे याच मानव गृसूत्रात या विनायकांची शांती कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या/ तिसऱ्या शतकातील ‘बौधायन गृ परिशेष कल्प’ या ग्रंथातील उल्लेखानुसार या चार विनायकांच्या एकत्रीकरणाने एक विनायक होतो ज्याला ‘हस्तिमुख’ (हत्तीचे मुख असलेला) म्हटलेले आहे. याच काळातील इतर ग्रंथांमध्ये विघ्न आणि विनायकाला गजमुख म्हटलेले आढळते. यावरून मूळच्या विघ्न निर्माण करणाऱ्या विनायकाची शांती करून प्रसन्न करून घेता येते व त्यानंतर तो विघ्नांचे हरण करतो अशी मान्यता रूढ झाली. नंतर इसवी सनाच्या दुसऱ्या/ तिसऱ्या शतकात त्याला गजमुख किंवा गजानन म्हणून संबोधले जाऊ लागले व याच काळात त्याच्या प्रतिमा घडवल्या जाऊ लागल्या.

सातवाहन, कुषाण काळ
(इ.स.पू. पहिले ते इ.स. तिसरे शतक) 

इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात उत्तर भारतात कुषाण राजांची सत्ता होती. या राजांच्या नाण्यांवर शिव, बुद्ध, इत्यादी देवतांचे अंकन केलेले आढळते. यातीलच एका कुषाण राजाच्या नाण्यावर स्कंद, कुमार, विशाख आणि महासेन अशा चार देवतांचे अंकन दिसून येते. या चार देवतांचे विलीनीकरण काíतकेय या देवतेत झाले आणि स्कंद, कुमार, विशाख आणि महासेन ही काíतकेयाची चार नावे म्हणून ओळखली जाऊ लागली. याच काळात कधी तरी चार विनायकांचा मिळून एक विनायक अथवा गणपती बनला आणि यानंतर निर्माण झालेल्या अनेक पुराणांमधून या गणेशाबद्दलच्या अनेक पुराकथा उदयाला आल्या. पुराणांचा काळ हा त्यात उल्लेखलेल्या वंशावळींच्या आधारे मांडला जातो; परंतु या पुराणांमध्ये नंतरच्या काळात भर घालण्यात आल्याने त्यातील प्रत्येक पुराकथेचा काळ वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे पुराणांतील पुराव्यांवरून आपली दिशाभूल होऊ शकते. परंतु शिलालेख, नाणी, प्रतिमा आणि मंदिरे इत्यादी पुराव्यांचा काळ निश्चित करणे तुलनेने सोपे असल्यामुळे देवताविकास या विषयात आपल्याला या पुराव्यांचा वापर करणे योग्य ठरते. अशाच पद्धतीने शिलालेख, प्रतिमा आणि मंदिरे यांवरून गणेश या देवतेचा प्रवास समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

वैदिक साहित्यातील लिखित पुरावे सोडले तर भारतात मिळणाऱ्या प्राचीन प्रतिमांचा पुरावा म्हणजे कुषाण राजांच्या कारकीर्दीत (इ. स. पहिले ते इ. स. तिसरे शतक) उत्तर भारतात निर्माण करण्यात आलेल्या विविध देवतांच्या मूर्ती. या काळातील  शिव, विष्णू, दुर्गा, सूर्य, काíतकेय, बुद्ध यांच्या मूर्ती उत्तर भारतात मोठय़ा प्रमाणावर सापडतात. याच काळातील काही प्रतिमा गजमुख आणि मानवी शरीर अशा स्वरूपात आढळल्या आहेत. परंतु या काळातील गणेशाचा किंवा विनायकाचा शिलालेखीय पुरावा सापडत नाही. सातवाहन काळात (इसवी सन पहिल्या/ दुसऱ्या शतकात) महाराष्ट्रात प्राकृत भाषेत रचलेल्या ‘गाथासप्तशती’ या ग्रंथातील एका गाथेत ‘गणवई’च्या मूर्तीचा उल्लेख येतो. हा उल्लेख गणपतीचा असावा असा काही संशोधकांचा अंदाज आहे. परंतु गाथासप्तशतीच्या इतर काही हस्तलिखित प्रतींमध्ये या गाथेचा उल्लेख नसल्यामुळे ही गाथा नंतरच्या काळात गाथासप्तशतीमध्ये समाविष्ट करण्यात आली असावी, असा काही संशोधकांचा आक्षेप आहे.

गुप्त, वाकाटक काळ
(इ. स. तिसरे ते इ. स. पाचवे शतक) 

कुषाण राजांच्यानंतर उत्तर भारतात राज्य करीत असलेल्या गुप्त राजांच्या काळात (इ. स.  चौथे/पाचवे शतक) रामगढ, उदयगिरी, अहिच्छत्र, भितरगाव, देवगढ येथे निर्माण झालेल्या गुंफांमध्ये आणि मंदिरांमध्ये गणेशाच्या प्रतिमा सापडल्या आहेत. रामगड येथील गणेश प्रतिमा ही सप्तमातृकांबरोबर येते, तर उदयगिरी येथील गुंफेमध्ये गणेशाची स्वतंत्र प्रतिमा आहे. भुमरा, भीतरगाव, देवगड येथील गुप्तकालीन मंदिरांच्या बाह्य़िभतीवर गणेशाच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. द्विभुज असलेल्या या मूर्तीवर अलंकार नाहीत, परंतु सर्पयज्ञोपवीत मात्र आहे. तसेच उदयगिरी येथील गणेशमूर्तीच्या हातात मोदकपात्रदेखील दाखवलेले आहे. वैष्णव असलेल्या गुप्त घराण्यातील राजांचे असंख्य शिलालेख आणि ताम्रपट उपलब्ध आहेत. स्वत:ला परमभागवत म्हणवून घेणाऱ्या या गुप्त राजांच्या शिलालेखांत गणपतीचा उल्लेख येत नाही. याच घराण्यातील स्कंदगुप्त आणि कुमारगुप्त हे राजे काíतकेयाचे भक्त होते, परंतु त्यांच्याही शिलालेखांमध्ये गणपतीचा उल्लेख मिळत नाही.

याच गुप्त राजांच्या उतरत्या काळात हुणांच्या स्वाऱ्या उत्तर भारतावर झाल्या. या हुणांपकी असणाऱ्या िखगल नावाच्या राजाने उभारलेली ही ‘महाविनायकाची’ प्रतिमा अफगाणिस्तानातील गार्देज या ठिकाणी विसाव्या शतकात सापडली. त्यानंतर ही प्रतिमा काबूल येथे आणली गेली आणि ‘काबूल महाविनायक’ म्हणून ही प्रतिमा संशोधकांत प्रसिद्ध झाली. काबूल येथील बाबा पीर रतननाथ दग्र्यात ती प्रतिमा ठेवण्यात आलेली होती व तिचे १९७० च्या दशकापर्यंत पूजन होत होते.

या प्रतिमेचे वैशिष्टय़ म्हणजे ही शिलालेख असलेली व ‘महाविनायक’ असा उल्लेख असलेली गणेशाची सर्वात प्राचीन मूर्ती आहे. या मूर्तीच्या बठकीवर दोन ओळींमध्ये संस्कृत भाषेत व ब्राह्मी लिपीत (प्राचीन भारतातील एक लिपी) लेख कोरलेला आहे. ‘परमभट्टारक महाराजाधिराज शाही िखगल याने त्याच्या राज्याच्या आठव्या वर्षी महाज्येष्ठ महिन्याच्या शुक्लपक्षातील त्रयोदशीला विशाखा नक्षत्रावर, सिंहलग्न असताना या महाविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली’ असा हा लेख आहे. या िखगल नावाचे अथवा पदवीचे दोन राजे अफगाणिस्तानात हुणांच्या अल्कोन टोळीत आढळतात. या राजवटीतील तोरमान आणि मिहिरकुल या राजांनी उत्तरभारतात शिरकाव केला होता व त्यांचे गुप्त राजांशी युद्धही झाले होते. परंतु या मूर्तीच्या शिल्पशैलीवरून व नाणकशास्त्रीय पुराव्यावरून ही मूर्ती हूण राजा शाही िखगल (इ. स. सहावे शतक) याने स्थापन केली असावी. ही महाविनायकाची मूर्ती हूणांच्या टोळीतील राजाने स्थापन केली होती, तसेच त्यावर संस्कृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लेख कोरवून घेतलेला होता ही बाब महत्त्वाची ठरते.

ही संगमरवरात घडवलेली महाविनायकाची मूर्ती (उंची २८ इंच व रुंदी १४ इंच) आलीढ आसनात उभी आहे. अफगाणिस्तानातील ग्रीक कलेच्या प्रभावामुळे या मूर्तीचे हात, पाय व छाती पिळदार आहेत. याची सोंड डावीकडे वळलेली आहे व मूर्ती एकदंत आहे. डोक्यावर अर्धमुकुट असून गळ्यात कंठा आहे. हा मुकुट रिबिनीने डोक्याच्या मागच्या बाजूला बांधला आहे. तत्कालीन पíशअन राजे अशा पद्धतीने अर्धमुकुट बांधत असत. त्यामुळे हा पíशअन प्रभाव या विनायकाच्या मूर्तीवर दिसून येतो. या मूर्तीला चार हात होते, पण ते तुटले आहेत. या महाविनायकाने नागयज्ञोपवीत घातले असून कमरेखाली व्याघ्रचर्म नेसले आहे.

अफगाणिस्तानावरील सोव्हिएत आक्रमणानंतर १९८० मध्ये ही मूर्ती काबूलमधील राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आली. त्यानंतर आलेल्या तालिबान राजवटीत काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयाची नासधूस झाली व नंतर या संग्रहालयावर बॉम्ब पडला. संग्रहालयातील रजिस्टरमध्ये या मूर्तीची नोंद आहे, परंतु दुर्दैवाने तालिबान राजवटीनंतर या मूर्तीचा ठावठिकाणा अद्याप लागू शकलेला नाही. त्यामुळे या मूर्तीच्या छायाचित्रावरच आता समाधान मानावे लागते. तरीदेखील पíशयन, ग्रीक आणि भारतीय कलेचा नमुना असलेली ही महाविनायकाची मूर्ती गणेशमूर्तीच्या इतिहासात अद्वितीय ठरली आहे.

काबूल येथील दुसरी गणेशमूर्तीदेखील वैशिष्टय़पूर्ण आहे. ही संगमरवरी मूर्ती काबूलपासून दहा किमी लांब असलेल्या सकर दरा येथे मिळाली होती. या मूर्तीबरोबरच येथे सूर्य आणि शिवाची मूर्ती आढळून आली होती. ही गणेशाची मूर्ती काबूलमधील शोर बाजार येथे आणण्यात आली व तेथे ती पुजली जात असे, त्यामुळे यास शोर बाजार गणेश असे म्हटले जात असे. याही मूर्तीचा ठावठिकाणा सध्या माहीत नाही. या गणेशाला सर्पयज्ञोपवीत दाखवले असून त्याची छाती पिळदार दाखवण्यात आलेली आहे. या मूर्तीस चार हात होते. मूर्तीचा वरचा डावा हात तुटलेला आहे, तर खालील दोन्ही हात शेजारी उभ्या असलेल्या गणांच्या डोक्यावर ठेवलेले होते. या गणांचे कुरळे केस, कानातील पत्रकुंडले भारतातील गुप्तशैलीचा प्रभाव दाखवतात. या मूर्तीवर कोणताही शिलालेख नाही. या मूर्तीवर ग्रीकशैलीचा कमी तर गुप्तशैलीचा जास्त प्रभाव आहे. यावरून ही मूर्ती कदाचित इसवी सनाच्या चौथ्या शतकातील (कुशाण व गुप्त राजवटींच्या मधल्या काळातील) असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. वैशिष्टय़ाची बाब म्हणजे १९८० पर्यंत ही मूर्ती काबूलमधील िहदूंकडून मंदिरात पुजली जात होती.

याच शोर बाजार गणेशमूर्तीशी साधम्र्य दाखवणारी गणेशमूर्ती शिकागो येथील खासगी संग्रहात आहे. ही गुप्त काळातील द्विभुज गणेशाची मूर्ती असून तिच्या डाव्या हातात मोदक पात्र दाखवण्यात आलेले आहे, तर मूर्तीची सोंड मोदकपात्राकडे वळलेली आहे.

कुषाण काळापेक्षा गुप्त राजांच्या काळात (इ. स. चौथे/ पाचवे शतक) गणेशमूर्तीची संख्या वाढलेली दिसून येते. या काळात गणपतीची मूर्ती कशी असावी याची माहिती वराहमिहिराने इ. स. सहाव्या शतकात लिहिलेल्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात देण्यात आलेली आहे. या ग्रंथातील उल्लेखानुसार तो गजमुख, लंबोदर, परशुधारी असावा तसेच त्याच्या हातात मुळा असावा असे नमूद केले आहे. उत्तर भारतात उदयगिरी, अहिच्छत्र, भितरगाव, देवगढ, राजघाट इत्यादी ठिकाणी गुप्त काळातील ज्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत, त्यावर मुकुट अथवा अलंकार नाही. सर्व गणपती डाव्या सोंडेचे आहेत. देवगढ येथील गणेश मूर्तीच्या हातात मोदकपात्र नाही, परंतु हातात परशू, मुळा घेतलेला दिसतो. या मुळ्याऐवजी नंतरच्या काळात हस्तिदंत दाखवला जाऊ लागला. तसेच या मूर्तीच्या सोबत उंदीर नाही. त्यामुळे बौधायन गृह्य़सूत्र व बौधायन धर्मसूत्र या ग्रंथांमध्ये वर्णन केलेली विनायकाची विशेषणे हस्तिमुख, एकदंत, लंबोदर गुप्तकाळातील या मूर्तीना लागू पडतात. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये विनायकाला मुळा, मोदक इ. अर्पण करावेत, असे सांगितले आहे.

मूर्ती स्थापनेचा उल्लेख

गुप्त किंवा वाकाटकांच्या ताम्रपटामध्ये जरी गणेशाचा उल्लेख मिळत नसला तरी त्यांना समकालीन असणाऱ्या विष्णुकुण्डि घराण्यातील राजाच्या शिलालेखात मात्र तो मिळतो. विष्णुकुण्डि घराण्यातील राजा माधववर्मा (दुसरा) (राज्यकाळ : इ. स. ४६६ ते इ. स. ५०२) याच्या वेलपुरू (गुंटूर जिल्हा, आंध्र प्रदेश) येथील शिलालेखातील विनायकाचा उल्लेख हा उपलब्ध असलेल्या शिलालेखांत सर्वात प्राचीन मानावा लागेल. सुरुवातीला आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यमच्या आसपासच्या प्रदेशात राज्य करणाऱ्या माधववर्माने वेंगी (आंध्र प्रदेश)वर विजय मिळवून राज्यविस्तार केला होता. महाराष्ट्रातील वाकाटक आणि राष्ट्रकूट (मानपूर शाखा) या दोन्ही घराण्यांबरोबर त्याचे वैवाहिक संबंध होते. तसेच बनवासी (उत्तर कर्नाटक) येथील कदंब घराण्याबरोबरही त्याचे चांगले संबंध होते. त्याने अकरा अश्वमेध यज्ञ केले असल्याची माहिती आपल्याला त्याच्या ताम्रपटांवरून मिळते.

या माधववम्र्याच्या ३३ व्या राज्यवर्षांतील म्हणजे इ. स. ४९९ मधील खंडित शिलालेख वेलपुरू (आंध्र प्रदेश) येथे मिळाला आहे. या शिलालेखात वेलपुरू येथे सन्याची छावणी पडलेली असताना माधववम्र्याच्या सांगण्यावरून त्याच्या राजपुत्राने दन्तिमुख स्वामीची मूर्ती आणवली आणि त्या मूर्तीची स्थापना करून तिची मनोभावे पूजा केल्याचा उल्लेख आहे. माधववम्र्याच्या या राजपुत्राने युद्धावर जाण्याआधी रणदुंदुभी सज्ज केल्याचा उल्लेखही या शिलालेखात आहे. ‘अशी विनायकाची पूजा करणाऱ्याला विजय मिळतो आणि राजाच्या आज्ञेवरून स्थापन केलेल्या या विनायकाला सर्व जण नमन करीत आहेत’, असा उल्लेख या शिलालेखात केला आहे. यातील विनायकाच्या उल्लेखावरून ‘दन्तिमुख स्वामी’ म्हणजेच गणपती हे लक्षात येते. भारतातील विनायकाच्या स्थापनेचा हा सर्वात प्राचीन शिलालेखीय उल्लेख आहे. तसेच युद्धावर जाण्याआधी विजय मिळवण्यासाठी विनायकाची पूजा केली जात असे याचाही हा पुरावा आहे. रणदीक्षा घेताना रणदुंदुभींची पूजा करण्यासंबंधी आश्वलायन गृह्य़सूत्रात नोंद आहे. तसेच युद्धात विजय मिळवण्यासाठी शिव अथवा दुग्रेची पूजा करीत असत असेही इतर उदाहरणांवरून स्पष्ट होते. श्रीशैल्यम येथील शिवाचा भक्त असणाऱ्या माधववम्र्याने त्याच्या राजपुत्राला रणदीक्षा घेताना विघ्नहर्त्यां विनायकाची पूजा करण्याची आज्ञा द्यावी यात नवल नाही.

यानंतरचा गणेशाच्या संबंधीचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे भरमौर (चंबा, हिमाचल प्रदेश) येथील राजा मेरूवर्मन (इ. स. सातवे शतक) याने करवून घेतलेली व पीठावर लेख कोरलेली असलेली गणेशाची कांस्यप्रतिमा. या प्रतिमेवरील लेखाची सुरुवात ‘श्री गणेशाय नम:’ या वंदनाने सुरू झालेली असून पुढे त्या लेखात मेरूवर्मन राजाने ही गुग्गी या कारागिराने तयार केलेली गणेश प्रतिमा स्थापन केली असा उल्लेख केला आहे. येथीलच युगवर्मन राजाच्या ताम्रपटाची सुरुवात ‘श्री गणेशाय नम:’ या चरणाने झाली आहे. यावरून उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशातही गुप्तोत्तर काळात स्वतंत्र देवता म्हणून गणेशपूजन सुरू झाले होते हे लक्षात येते.

कलचुरी राजांचा काळ

गुप्त-वाकाटक घराण्यांनंतर मध्य आणि पश्चिम भारतात राज्य करणारे प्रमुख घराणे म्हणजे कलचुरी घराणे. या कलचुरी राजांच्या काळात इ. स. सहाव्या शतकात निर्माण झालेल्या घारापुरी (मुंबई) येथील शैव लेण्यांतून गणेशाच्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला दिसतात. घारापुरी येथील लेण्यात शिव-नटराजाच्या शिल्पपटात गणेश कोरलेला आढळतो, इतकेच नाही तर येथील शिवपार्वतीच्या विवाहप्रसंगाच्या शिल्पपटातदेखील विविध देवतांसह गणेशाचे शिल्प आढळते. याच काळात कर्नाटकातील बदामीच्या चालुक्य राजांच्या अमदानीत निर्माण झालेल्या बदामी येथील रावण की पहाडी येथील गुंफेमधील नटराजाच्या शिल्पातदेखील शेजारी गणेश उभा असलेला दाखवला आहे.

गुर्गी (पन्ना जिल्हा, मध्य प्रदेश) येथील कलचुरी राजा कोकल्लदेव (इ. स. ९९० ते इ.स. १०१५) याच्या शिलालेखात गणपतीच्या मूर्तीचा उल्लेख येतो. शिवमंदिराची उभारणी करताना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती आणि सरस्वती यांच्या मूर्तीची स्थापना केल्याचा उल्लेख या शिलालेखात केला आहे. कलचुरी राजा नरसिंह याच्या इ. स. ११५५ मधील भेडाघाट येथील शिलालेखात विघ्नहर्त्यां गणेशाची स्तुती केलेली आहे आणि नंतर लगेच सरस्वतीचे स्तवन केलेले आहे.  विघ्नहर्त्यां गणेशाचा बुद्धीची देवता या स्वरूपात झालेला विकास आपल्याला गणेश आणि सरस्वती यांच्या एकत्रित स्तवनातून दिसून येतो. कथासरित्सागर या ग्रंथाच्या सुरुवातीस शंकर आणि वाग्देवी (सरस्वती) यांच्याबरोबरच गणेशाचेही स्तवन केले गेले आहे.

कलचुरी राजांच्या बाराव्या शतकातील शिलालेखांमध्ये अनेकदा गणपतीच्या स्तवनाचे श्लोक येतात. यातीलच इ. स. ११४८ मधील रत्नपूर कलचुरी राजा पृथ्वीदेव दुसरा याच्या शिलालेखातील श्लोकात गणपतीला ‘द्वैमातुर’ म्हटले आहे. तसेह हा विघ्नहर्ता कल्याणकारी गणेश आपल्या नृत्याला सुरुवात करतो आहे, असाही त्यात उल्लेख आहे. अमरकोष या ग्रंथात गणेशाला ‘द्वैमातुर’ म्हटले आहे.

याशिवाय खरोद (रायपूर, छत्तीसगड) येथील इ. स. ११८१ मधील शिलालेखाचा उल्लेख केलाच पाहिजे. रत्नपूरचा कलचुरी राजा रत्नदेव (तिसरा) याचा प्रधानमंत्री गंगाधर याने हेरंब गणपती आणि तुंड गणपती यांची दोन मंदिरे रत्नपूर आणि बालुदा येथे उभारल्याचा या शिलालेखात उल्लेख आहे.

उत्तर कलचुरी राजांपकी सोळाव्या शतकातील वाहरेंद्र नावाचा राजा गणेशभक्त होता. त्याच्या अनेक शिलालेखांतून ‘श्री गणेशाय नम:’ अथवा ‘श्री लंबोदराय नम:’ असे गणेशवंदन केलेले आढळते. त्याच्या कोसगीन (छत्तीसगड) येथील शिलालेखाची  सुरुवात ‘श्री महागणेशाय नम:’ अशी झालेली आढळते. महागणेश किंवा महागणपती हा गाणपत्य पंथातील गणपतीच्या पाच रूपांतील एक आहे. दहाव्या शतकानंतर गाणपत्य पंथ उदयाला आला असे संशोधकांचे मानणे आहे. या गाणपत्य पंथातील महागणपतीचा सोळाव्या शतकातील शिलालेखीय पुरावा मिळणे ही महत्त्वाची बाब आहे.

राष्ट्रकूट राजांचा काळ

राष्ट्रकूट राजांच्या काळात निर्माण झालेल्या वेरूळ येथील शैव लेण्यांतूनही गणेशाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांपकी रामेश्वर लेणे व कैलास लेणे (यज्ञशाळा) येथील गणेश हा सप्तमातृकांसह आहे. सप्तमातृका विविध म्हणजे देवांच्या शक्ती ज्यात ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, माहेन्द्री व नारसिंही यांचा समावेश होतो. या सप्तमातृकांनी शंकराला अंधकासुरवधाच्या वेळी मदत केली होती. या सप्तमातृका त्यांच्या बालकांसोबत दाखवतात. या सप्तमातृकांच्या मूर्तीसोबत वीरभद्र आणि गणेशही दाखवला जातो. ‘सुप्रभेदागम’ या आगमग्रंथात गणेश सप्तमातृकांसोबत दाखवावा असे सांगितले आहे. या सप्तमातृकांसोबत दाखवल्या गेलेल्या गणेशाच्या अत्यंत सुंदर मूर्ती वेरूळच्या रामेश्वर व कैलास लेण्यात आहेत. या सप्तमातृकापट्टाचा वापर इथेच न थांबता नंतरच्या काळात निर्माण होणाऱ्या मंदिरांमध्येही करण्यात आला. इ. स. ११ ते इ. स. १३ व्या शतकात निर्माण झालेल्या अनेक शैव मंदिरांमध्ये मंडपात वीरभद्र व गणेशासह सप्तमातृकापट्ट देवकोष्ठात विराजमान असतो. सुरुवातीला सप्तमातृकापट्टासोबत दाखवल्या जाणाऱ्या गणेशाला नंतर मंदिराच्या मंडपातील देवकोष्ठात स्वतंत्र स्थान मिळालेले आढळते.

राष्ट्रकूटांची राजधानी असणाऱ्या कंधार (नांदेड जिल्हा) येथे सापडलेल्या राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या  शिलालेखात कंधारमधील विविध स्थानांचे वर्णन आहे. या शिलालेखातील उल्लेखानुसार या कंधारनगरीमध्ये अनेक मंदिरे होती. तसेच या नगराला प्रवेशद्वारे होती. त्यातील एक प्रवेशद्वार ‘यक्षद्वार’ म्हणून ओळखले जात असे. कदाचित या प्रवेशद्वारापाशी एखाद्या यक्षाचे मंदिर असावे. तर दुसरे प्रवेशद्वार ‘मंडल सिद्धिविनायक’ द्वार म्हणून ओळखले जात असे. या द्वाराजवळ असलेल्या मंडलसिद्धिविनायकाच्या मंदिराचा देखील या शिलालेखात उल्लेख आहे. प्राचीन कंधारपुराच्या प्रवेशद्वाराशी असणारा मंडलसिद्धिविनायक आत्ता शिवेवरचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची प्रवेशद्वाराशी निगडित असलेली स्मृती शिवेवरचा गणपती या नावातून जपली गेली आहे. राष्ट्रकूट कलेचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या मूर्ती या मानवी प्रमाणापेक्षा मोठय़ा असत. वेरूळ येथील िहदू लेण्यांतून याची उदाहरणे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे या शिवेवरचा गणपतीची पाय दुमडून बसलेली मूर्तीदेखील साडेपाच फुटांची आहे. काळाच्या ओघात ही मूर्ती खराब झालेली असून तिच्यावर शेंदराचा लेपही लावला आहे.

चालुक्यकालीन विनायकोत्सव

वर उल्लेख केलेल्या विष्णुकुण्डि राजांनंतर वेंगी (आंध्र प्रदेश) येथे चालुक्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. येथील इ. स. अकराव्या शतकातील चालुक्य राजा भीम (पहिला) याच्या काकुमरानू ताम्रपटात (गुंटूर जिल्हा, आंध्र प्रदेश) दिलेल्या दानांच्या यादीत ‘एरुवक प्रथम हल धावन’ आणि विनायकोत्सवावरील कराचा उल्लेख आहे. यावरून पाऊस पडल्यावर शेतामध्ये केलेल्या पहिल्या नांगरणीनंतर गावात उत्सव साजरा केला जात असे, तसेच त्याचबरोबर गावातील विनायकाचा उत्सव अकराव्या शतकात साजरा केला जात असे हे समजते. परंतु या ताम्रपटामध्ये विनायकोत्सवाविषयी अधिक तपशील मिळत नाही.

यादव, शिलाहार राजांचा काळ

महाराष्ट्रातील शिलाहार राजे शैवपंथाचे अनुयायी होते आणि त्यांच्या काळात गणेशाची लोकप्रियता वाढली असावी हे आपल्याला शिलाहार राजांच्या ताम्रपटांवरून लक्षात येते. शिलाहारांच्या १४ ताम्रपटांची सुरुवात श्री विनायकाय नम, श्री लंबोदराय नम अथवा श्री गणनायकाय नम या वंदनाने सुरू झालेली दिसते. त्यांच्या एका लेखात विघ्नहर्त्यां गणेशाला मोदक प्रिय असल्याचा उल्लेख तर आहेच; परंतु गणेशाशी संबंधित अंगारिकेचाही उल्लेख आहे.

मुंबईतील बौद्ध कान्हेरी लेणे क्रमांक ११ मधील इ. स. ८५१ मध्ये कोरलेल्या एका शिलालेखात राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष (इ. स. ८१४ ते इ. स. ८८०) याचे मांडलिक असलेल्या शिलाहार वंशातील कपर्दनि (दुसरा) याच्या राज्यात गौड (सध्याचा बंगाल) येथून आलेला गोमील अविघ्नकर याच्या दानाचा उल्लेख आहे. यातील अविघ्नकर हे व्यक्तिनाम गणपतीवरून ठेवल्याचे अगदीच स्पष्ट होते. ब्रह्मपुराणात आपल्याला गणपतीच्या संदर्भात ‘अविघ्नतीर्थ’ नावाच्या स्थळाचा उल्लेख मिळतो.

या काळातील इ. स. ८६२ चा दोन शिलालेख कोरलेला एक स्तंभ घटीयाला (जोधपूर, राजस्थान) येथे सापडला होता. हा स्तंभ प्रतिहार घराण्यातील श्रीकक्कुक राजाने उभारला होता. यातील एका शिलालेखाची सुरुवात ‘ओं विनायकाय नम:’ अशी विनायकाला वंदन करून झालेली आहे. तर याच स्तंभावरील दुसऱ्या लेखात समृद्धीसाठी विनायकाची स्थापना या स्तंभावर केल्याचाही उल्लेख आहे. या स्तंभावर चारही बाजूंनी गणेशमूर्ती कोरलेल्या होत्या. याच शिलालेखात वर्णन केल्याप्रमाणे श्रीकक्कुक राजाने याच ठिकाणी बाजारपेठ तयार केली होती. त्या बाजारातील चौकात हा स्तंभ राजाने उभारला असावा.

गावाच्या चौकात चारही बाजूंनी दर्शन घेता येऊ शकणाऱ्या ‘चौबारा’ गणेशाची स्थापना करण्याची परंपरा त्या काळात निर्माण झाली होती असे आपल्याला दिसून येते. चौबारा म्हणजे चौक. यावरून चौकांत उभारलेला गणपती तो ‘चौबारा गणपती’.  यादवकाळात महाराष्ट्रातदेखील नगरातील चौकांत गणेशाचे छोटेखानी मंदिर उभारले जात असे हे उपलब्ध पुराव्यांवरून समजते. अंबेजोगाई येथे यादवराजा सिंघण याचा सेनापती खोलेश्वर याने उभारलेल्या ‘चौबारा’ गणपतीच्या मंदिराचा उल्लेख यासंबंधी केला पाहिजे. अंबेजोगाई येथे एका चौकात खोलेश्वराने हे छोटेखानी गणपतीचे मंदिर उभारले आहे व याच मंदिरात त्यासंबंधीचा शिलालेखही कोरलेला आहे.

यादवकाळातील महत्त्वाच्या महानुभाव पंथाच्या साहित्यातदेखील आपल्याला गणेशाचे उल्लेख आढळतात. महानुभावांच्या इ. स. १४व्या शतकातील स्थानपोथी आणि लीळाचरित्र या ग्रंथांत आपल्याला महाराष्ट्रातील यादवकालीन परिस्थितीची माहिती मिळते. या ग्रंथांत गणपतीचा उल्लेख विनायक अथवा गणेश नावाने येतो. गणेशाच्या नावाने मठ असल्याचाही उल्लेख त्यात येतो. याशिवाय महाराष्ट्रातील कित्येक गावांत गणेशाचे छोटेखानी मंदिर असल्याचा अथवा चौबारा म्हणजे चौकात गणपतीचे मंदिर उभारले असल्याचे उल्लेख  महानुभावांच्या ‘स्थानपोथी’ या ग्रंथात येतात. त्याचप्रमाणे गणेशाचे धाबे अथवा साजे नावाच्या मंदिराचा उल्लेख येतो. ही गणपतीची चारखांबी छोटेखानी मंदिरे असावीत. चौकांत स्थापन केलेली गणेशाची मूर्ती ही चारही बाजूंनी कोरलेली असे, त्यामुळे चार खांबांच्या छोटय़ा मंदिरातील गणेशमूर्तीचे दर्शन चौकातील चारही बाजूंनी घेता येण्याची सोय असे. प्राचीन काळी गावातील चौकात यक्षांचे स्थान असे व त्यांना चौकात नवेद्यही दाखवला जाई. यक्ष-विनायकाबद्दलचा हा संकेत यादवकाळात चौकात उभारलेल्या गणपतीच्या मंदिरामध्ये दिसून येतो.

इ. स. सातव्या शतकात भारतात आलेल्या श्वान सांग आणि इ ित्सग या चिनी प्रवाशांनी गणपतीचा उल्लेख केलेला नाही; परंतु इसवी सनाच्या अकराव्या शतकात भारतात आलेल्या अल्बरुनी या अरब प्रवाशाने मात्र शिवपुत्र गजमुख गणपतीचा उल्लेख केला आहे. यावरून अकराव्या शतकापर्यंत गणपतीचे वाढलेले महत्त्व लक्षात येते.

महाराष्ट्रातील लेण्यातील गणेशमूर्ती

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील बौद्ध लेण्यांमध्ये शेवटचे लेणे वैशिष्टय़पूर्ण आहे. त्या लेण्यात सप्तमातृका, गणेश, महिषासुरमर्दनिी आणि बुद्ध यांच्या प्रतिमा आहेत. बौद्ध धर्मात गणपती प्रसिद्ध झालेला असला तरीदेखील सप्तमातृका, महिषासुरमर्दनिी यांसोबत बुद्धाची प्रतिमा कोरून दोन्ही धर्मातील अनुयायांना प्रार्थनेसाठी एक स्थळ उपलब्ध करून दिले होते.

याचप्रमाणे कोकणातील पन्हाळे काजी येथील बौद्ध, नाथपंथी लेण्यांमध्ये आपल्याला गणेशप्रतिमा आढळतात. यातील लेणे क्रमांक २९च्या प्रवेशद्वारातील सरस्वती, गणेश आणि लक्ष्मी यांची एकत्रित प्रतिमा प्राचीन कलाइतिहासात अद्वितीय आहे.

इ. स. पाचवे शतक ते इ. स. १५व्या शतकापर्यंतचा गणेशप्रतिमेचा हा प्रवास अत्यंत विलक्षण आहे. सुरुवातीच्या काळात एक यक्ष तसेच शिव, विष्णूच्या समोर दुय्यम देवता पुजल्या जाणाऱ्या गणेशाला यथावकाश पंचायतनात स्थान मिळाले आणि शिव, शक्ती, विष्णू, सूर्य यांच्या सोबत गणेशाचे पूजन सुरू झाले. त्याचबरोबर इ. स. आठव्या शतकापासून गणपतीचा स्वतंत्र गाणपत्य पंथदेखील उदयाला आला.

सध्या अनेक जण इतर देवांबरोबरच गणपतीचीही पूजा करतात व त्याचे दर्शन घेतात. पण गाणपत्य पंथानुसार गुरूकडून दीक्षा घेणे आवश्यक असते. या पंथात गणपतीलाच सर्वोच्च देव मानून त्याची आराधना केली जाते. ‘शांकरविजय’ या इ. स. दहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ग्रंथात गाणपत्य पंथाचे उल्लेख आढळतात. गाणपत्य पंथातील विचारधारेनुसार गणेशाच्या कृपेने ब्रह्मा आणि इतर देव निर्माण झाले. या पंथाच्या भक्तांना या पंथाची शिकवण समजून घ्यावी लागते, इतकेच नाही तर त्याचे काटेकोर पालन करावे लागते. गाणपत्य पंथ हा सहा उपपंथ मिळून झालेला होता. ते सहा उपपंथ म्हणजे महागणपती, हरिद्रा गणपती, उच्छिष्ट गणपती, नवनीत गणपती, स्वर्ण गणपती व संतान गणपती. गाणपत्य पंथामध्ये गणपतीची पाच रूपे मानली जातात. ती म्हणजे उच्छिष्ट गणपती, महागणपती, िपगल गणपती, ऊध्र्व गणपती, शक्ती गणपती. गाणपत्य पंथाचे भक्त याच गणेशरूपांची आराधना करतात. तसेच यांची चिन्हे शरीरावर गोंदवून घेणे हाही आराधनेचा एक भाग असतो. वरील पाच रूपांपकी महागणपतीची पूजा अनेक ठिकाणी केली जाते.

शैव, शाक्त, वैष्णव व सौर पंथांप्रमाणे गाणपत्य पंथामध्येही ग्रंथनिर्मिती झाली. गणेशपुराण व मुद्गल पुराण ही गाणपत्य पंथाची दोन उपपुराणे आहेत. या पुराणांचा रचना काल ११ वे ते १४ वे शतक असावा, असे अभ्यासक मानतात. इतर पुराणांतून गणपतीची स्तुती केलेली आढळते, पण त्या पुराणांतून शिव, विष्णू, ब्रह्मा, देवी यांनाच मुख्य देवता कल्पून गणेशाला दुय्यम स्थान दिले  होते. गणेशपुराण व मुद्गल पुराणामध्ये मात्र गणेशाला सर्वोच्च देवतेचे स्थान दिले आहे. त्यामुळे इतर सर्व देवता त्यांच्या कार्यात, युद्धात यशस्वी होण्यासाठी प्रथम गणेशाची आराधना करतात, अशा पुराकथा या गणेशपुराण आणि मुद्गल पुराणात येतात.

१३व्या, १४व्या शतकांमध्ये गणेश उपासक होते याचा पुरावा आपल्याला तत्कालीन वीरगळांवरून येतो. अंबरनाथ येथील देवालयाच्या प्रांगणात असलेल्या एका वीरगळावर गणेशाची प्रतिमा आहे. युद्धात मरण प्राप्त झालेल्या वीराच्या स्मरणार्थ वीरगळ उभारला जात असे. तो वीर ज्या पंथाचा अनुयायी असेल त्या पंथाच्या देवतेचे अंकन वीरगळाच्या वरच्या भागात केलेले असे. वीरगळांवर प्रामुख्याने शिविपडीचे अंकन असले तरी काही वीरगळांवर महालक्ष्मी, कृष्ण, पाश्र्वनाथ, महावीर अशा देवतांचे अंकन केलेले असते. वीरमरण प्राप्त झालेला वीर हा कैलासवासी झाला किंवा महालक्ष्मी अथवा पाश्र्वनाथाच्या पायी एकरूप झाला असे त्यातून दर्शविले जाई. त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील वीरगळावर गणेशाची प्रतिमा असल्याने तो वीर गाणपत्य पंथातील असावा आणि मृत्यूपश्चात गणेशाशी एकरूप झाला असे त्यातून सुचवले आहे. अशाच पद्धतीचे गणेशप्रतिमा असलेले वीरगळ पुणे शहरातील कसबा पेठ भागात आहेत. मोरया गोसावी यांचे चिंचवड येथील वास्तव्य, पुण्यातील उत्तर यादवकाळातील कसबा गणपती आणि गणेशप्रतिमा असलेले हे वीरगळ यांवरून पुणे परिसरात मध्ययुगात गाणपत्य पंथ असावा हे लक्षात येते.

श्रीमोरया गोसावी यांनी १६ व्या शतकात गाणपत्य पंथाची दीक्षा घेऊन गणेशउपासना केली. आणि गाणपत्य पंथाचा प्रसार केला. पुणे जिल्ह्य़ातील अष्टविनायक स्थानांचा जीर्णोद्धार यानंतरच्या काळात म्हणजे १७व्या आणि १८ व्या शतकात झाला. १८ व्या शतकात गाणपत्य पंथाला पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्यामुळे मोठा आश्रय लाभला. कसबा गणपती हे ग्रामदैवत असणाऱ्या पुण्यात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून त्याला एका चळवळीचे स्वरूप दिले.

भारतातील जवळजवळ ७० हून अधिक प्राचीन पुराभिलेखांतून आपल्याला गणेशाबद्दल उल्लेख आढळतात. त्यातील काही महत्त्वाच्या ताम्रपट, शिलालेखांतील पुराव्यातून भारतातील राजस्थान, गुजराथ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू इत्यादी राज्यांतून गणेशाचा स्वतंत्र देवता म्हणून होणारा विकास मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

(छायाचित्र सौजन्य : डॉ. अरुणचंद्र पाठक, सायली पलांडे-दातार, प्रवीण कदम, अमेरिकन इन्स्टीटय़ूट ऑफ इंडियन स्टडीज, इस्ट अँड वेस्ट जर्नल)
आनंद कानिटकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on August 18, 2017 1:07 am

Web Title: lokprabha gash vishesh 2017 ancient ganesha