24 November 2017

News Flash

गणेश विशेष : अष्टविनायकांची पुरातत्त्वीय पार्श्वभूमी

अष्टविनायकांच्या मंदिरांची स्थापत्यशैली मध्ययुगीन वाटते.

डॉ. मंजिरी भालेराव | Updated: August 18, 2017 1:03 AM

अष्टविनायकांच्या मंदिरांची स्थापत्यशैली मध्ययुगीन वाटते. ही मंदिरे गाणपत्य संप्रदायाच्या लोकप्रियतेमुळे निर्माण झाली असावीत. ही सर्वच ठिकाणे महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर होती, हे दर्शवणारे पुरावे आजही सगळीकडे आढळून येतात.

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले अष्टविनायक हे भाविकांच्या दृष्टीने जरी युगानुयुगे तिथे आहेत, तरी इतिहाससंशोधकांच्या अभ्यासानुसार या सर्व मंदिरांची आजची रूपे ही पेशवाईपर्यंत मागे नेता येतात. मराठाकालीन शैलीच्या या सर्व मंदिरांच्या स्थळांच्या महत्त्वाबद्दल अनेक संशोधकांनी आपली मते मांडली आहेत. पण त्यात बहुतेक सगळे पौराणिक कथांच्या आधाराने विवेचन करतात. अनेक ठिकाणी राक्षसांचा वध करून गणपतीची प्रतिष्ठापना केली अशा प्रकारच्या कथा सांगितल्या जातात. परंतु या सर्व स्थळांचा स्वतंत्र अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे बहुतेक सर्व स्थळे ही महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर आहेत आणि त्या सर्व गावांना तसेच त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशाला बराच प्राचीन इतिहास आहे. या इतिहासाच्या खुणा त्या परिसरात ठिकठिकाणी आढळतात. क्वचित काही वेळेस त्यांचा प्राचीन अभिलेखांमध्ये उल्लेख सापडतो, पण सर्वसामान्य भक्तांना या गोष्टी सांगितल्याशिवाय लक्षात येत नाहीत. हे त्यांना सहज समाजावे म्हणून हा लेखप्रपंच!

अष्टविनायकांमध्ये आद्य असलेले स्थळ म्हणजे पुणे जिल्ह्यतील मोरगाव. या ठिकाणाजवळ असलेली नदी म्हणजे कऱ्हा. हिच्या आधारानेच या परिसरात जवळजवळ ७५ हजार वर्षांपूर्वी  इंडोनेशियातील सुमात्रा या बेटावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची राख मोरगावाजवळ आढळून आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राखेच्या खाली अश्मयुगीन मानवाने तयार केलेली दगडी हत्यारे मोठय़ा संख्येने सापडली आहेत. डेक्कन कॉलेजच्या डॉ. शीला मिश्रा आणि  डॉ. सुषमा देव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात मानवाच्या वस्तीच्या अवशेषांवर ज्वालामुखीचे अवशेष सापडले यावरून या परिसरात मानव राहत असतानाच कधीतरी ही राख येथे आली असावी असे दिसते. या ठिकाणी ऐतिहासिक काळातही मानवाची वस्ती होती हे मोरगावात नुकतेच राजेंद्र ढुमे यांनी केलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात त्यांना सातवाहन काळात होती तशी खापरे तसेच यादव काळातील मंदिरांसारखी मंदिरे आणि अनेक वीरगळ (प्राचीन काळी गावाच्या रक्षणासाठी स्वतचे बलिदान दिलेल्या शूर वीरांचे स्मारक म्हणून उभारलेल्या शिळा. हे अवशेष साधारणपणे इ.स.च्या ११ व्या ते १२ व्या शतकातील असतात) मोरगावातील ‘पांढरीचा महादेव’ या स्थानिक देवालयाच्या परिसरात आढळले. प्राचीन मानवी वस्तीची जागा बहुतेक वेळेस स्थानिक लोक पांढरीची जागा किंवा पांढर या नावाने ओळखतात. त्यामुळे या ठिकाणी मोरगावमधील प्राचीन वस्तीचे अवशेष असलेले हे ठिकाण आहे हे त्या गावाच्या लोकांच्या स्मृतीने जपले आहे. त्यामुळे गावातले कोणतेही कार्य असले तरी या पांढरीच्या महादेवाला आधी पुजले जाते आणि मग मयूरेश्वराला. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्वज्ञांनी केलेले उत्खनन आणि राजेंद्र ढुमे यांनी केलेले संशोधन यामुळे मोरगावच्या इतिहासाचा नवीन अध्यायच आता लिहिला गेला आहे.

पुढे इ.स.च्या १३ व्या शतकात मोरया गोसावींच्या वास्तव्याने पावन झालेले हे ठिकाण मयूरेश्वर या गणपतीसाठी म्हणून खूप प्रसिद्ध झाले. खुद्द गणपतीच्या मंदिराच्या समोरच एक उत्कृष्ट शिल्प म्हणून दाखवता येईल असे नंदीचे एक भव्य शिल्प आहे. खरे तर गणपतीच्या मंदिरासमोर त्याचे वाहन म्हणून मूषक यायला हवा. पण इथे मात्र मंदिरातून बाहेर पडल्यावर आधी भव्य नंदी दिसतो आणि मग दुसरीकडे मूषक दिसतो. त्या नंदीच्या शेजारीच एका वीरगळाचे अवशेष आहेत. यावरून इथेही एक प्राचीन मंदिर असावे असे वाटू शकते. स्थानिक परंपरेनुसार यवतजवळील भुलेश्वरच्या मंदिरात नेण्यासाठी केलेला हा नंदी तिथे पोचलाच नाही आणि म्हणून तो मोरगावातच राहिला. नेमका इतिहास आज सांगणे खरोखर अवघड आहे, पण या प्राचीन अवशेषाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा प्रकारे मोरगावातील प्राचीन वस्तीच्या निदर्शक असलेल्या अनेक खुणा संपूर्ण गावात ठिकठिकाणी विखुरल्या आहेत. या पुरातत्त्वीय अवशेषांचा शास्त्रीय अभ्यास केला असता या परिसरातील मानवी वस्तीच्या प्राचीनतेचा इतिहास सहज समजू शकतो आणि गणपतीच्या मंदिराच्या निर्मितीच्या कितीतरी आधी या परिसरात असलेले मानवाचे वास्तव्य लक्षात येते.

अष्टविनायकांच्या यात्रेतील दुसरे ठिकाण म्हणजे सिद्धटेक आणि तिथे आहे सिद्धिविनायक. अहमदनगर जिल्ह्य़ात दौंड तालुक्यात भीमा नदीच्या काठावर हे ठिकाण आहे, भीमा नदीच्या खोऱ्यात अनेक प्राचीन वस्तीची स्थळे उजेडात आली आहेत. खुद्द सिद्धटेक या गावात जरी संशोधन झाले नसले तरी या गावापासून साधारण १५ कि.मी.च्या अंतरावर पेडगाव नावाचे गाव आहे. तिथे बहादूरगड किंवा धर्मवीरगड नावाचा एक भुईकोट किल्ला आहे. या ठिकाणी किल्ला तयार होण्याच्या आधी इथे इ.स.च्या बाराव्या शतकातली अतिशय देखणी मंदिरे बांधली गेली होती. ती कोणी बांधली याची नोंद नसली तरी या मंदिरांचे अस्तित्व या प्रदेशाच्या प्राचीनतेबद्दल बरेच काही सांगून जाते. परंतु या परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण करून त्याचा अहवाल प्रकाशित होण्याची आवश्यकता आहे. ज्याअर्थी सिद्धटेकपासून इतक्या जवळ असलेल्या ठिकाणी बाराव्या शतकात मानवाची वस्ती होती तर सिद्धटेकला असणेही काही अवघड नाही.

अष्टविनायकांच्या यात्रेतील तिसरे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्य़ातील सुधागड तालुक्यातील पाली आणि इथला गणपती आहे बल्लाळेश्वर. अतिशय मोठय़ा प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असलेले हे गाव सह्य़ाद्रीमधील काही महत्त्वाच्या घाटवाटांच्या जवळ आहे. कोकणातून देशावर येण्यासाठी जे विविध मार्ग आहेत त्यापकी एक महत्त्वाचा मार्ग पाली या गावाजवळून जातो. तसेच या गावाच्या जवळ सुधागड, सुरगड आणि सरसगड  हे महत्त्वाचे किल्ले आहेत. त्यापकी सुधागड या किल्ल्याच्या जवळ ठाणाले, धोंडसे, नेणावली, इ. ठिकाणे बौद्ध गुंफासमूहाची स्थळे आहेत. या लेणी इ.स.पू. पहिल्या शतकापासून ते इ.स.च्या दुसऱ्या शतकापर्यंत तयार होत होत्या. याचा अर्थ या काळात इथे मोठय़ा प्रमाणात लोकांची वस्ती होती ज्यांच्या आधाराने बौद्धभिक्षु राहात होते. काही तज्ज्ञांच्या मते अशा घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी काही लोक देवतांची स्थापना करत असत. काही ठिकाणी यक्ष अशा प्रकारचे रक्षण करण्याचे काम करत अशी समजूत होती. हळू हळू अशा लोकदेवतांच्या ऐवजी या ठिकाणी गणपती पूजा रूढ झाली असावी असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

अष्टविनायकांच्या यात्रेतील चौथे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्य़ातील खालापूर तालुक्यातील महड. वरद विनायक असे या गणपतीचे नाव आहे. कोकणातून देशावर जाणाऱ्या एका मार्गावरचा हा रक्षणकर्ता देव असावा असे अनेक तज्ज्ञांना वाटते. इथून प्रबळगड, माणिकगड, कर्नाळा हे किल्लेही जवळच आहेत. त्याचबरोबर राजमाची या किल्ल्यात असलेल्या कोंडाणे या इ.स.पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी या परिसराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. त्यामुळे पालीसारखेच स्थान असलेल्या या देवतेचे महत्त्व व्यापार आणि दळणवळणाबरोबर वाढले यात काही नवल नाही. पण ज्या परिसरात हा गणपती आहे त्याची प्राचीनता जवळपासच्या पुरातत्त्वीय अवशेषांवरून लक्षात येते.

अष्टविनायकांच्या यात्रेतील पाचवे ठिकाण आहे ते म्हणजे थेऊर. पुणे सोलापूर महामार्गावर असलेले पुणे जिल्ह्य़ातील हे ठिकाण माधवराव पेशवे यांच्या वास्तव्यासाठी आणि रमाबाईंच्या सती जाण्यामुळे प्रसिद्ध आहे. मुळा नदीच्या तीरावर हे गाव वसलेले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या पुरातत्त्वज्ञांनी केलेल्या उत्खननात या गावात इ. स. पूर्व १५०० या काळातील ताम्रपाषाणयुगीन वस्तीचे पुरावे, तेव्हाची घरे, खापरे, दागिने, पाटे- वरवंटे तसेच भांडय़ात पुरलेली दफने, इ. पुरावे उजेडात आले होते. तसेच चिंतामणी साखर कारखान्याच्या मागे केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील वस्तीची निदर्शक खापरेही सापडली होती. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या इ.स. ७६८ च्या तळेगाव ताम्रपटात थेऊरचे ‘थिउरग्राम’ असे नाव आढळते तर मुळा नदीचे ‘मुईला’ असे नाव दिसते. चिंतामणी साखर कारखान्याच्या मागे असलेल्या परिसरात इ.स.च्या १२-१३ व्या शतकातील अनेक वीरगळही पाहायला मिळतात. आजच्या चिंतामणी गणेशाच्या मंदिराच्या प्रदक्षिणापथावर ठेवलेल्या अनेक भग्न मूर्तीमध्ये काही वीरगळांचे अवशेष आहेत हे स्पष्टपणे दिसते. यावरून किती प्राचीन काळापासून या परिसरात मानवाची वस्ती आहे हे लक्षात येते. पुणे आणि परिसराची प्राचीनताही या पुरातत्त्वीय अवशेषांवरून लक्षात येते.

अष्टविनायकांच्या यात्रेतील सहावे ठिकाण आहे ते म्हणजे पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री. गिरीजात्मजा असे नाव असलेल्या या गणपतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. पण या गणपतीचे वास्तव्य मुळात एका बौद्ध विहारात (भिक्षू राहण्याच्या खोलीत) आहे हे तिथे गेल्यावर लगेच लक्षात येते. कल्याणहून देशावर येण्यासाठी असलेल्या विविध मार्गापकी सर्वात जास्त वापरला गेलेला आणि त्यामुळे प्रसिद्ध असलेला नाणेघाट हा व्यापारी मार्ग पुढे जुन्नर या गावात येतो. या गावाच्या भोवती असलेल्या टेकडय़ांमध्ये एकूण मिळून जवळजवळ १८० च्या आसपास बौद्ध लेणी आहेत. पण या लेणीमध्ये बौद्धभिक्षू राहणे बंद झाले तेव्हा तिथे गणपतीची प्रतिष्ठापना झाली असावी असे दिसते. जुन्नर गावात असलेल्या या लेणी इ.स. पूर्व पहिले शतक ते इ.स.चे दुसरे-तिसरे शतक या काळापर्यंत तयार होत होत्या असे दिसते. जुन्नर गावात सातवाहन काळातील एक अतिशय महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते हे तिथे सापडणाऱ्या नाण्यांवरून, उत्खनित अवशेषांवरून वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे या व्यापाराचा रक्षणकर्ता हा देव इथे कधीतरी मध्ययुगात प्रस्थापित झाला असावा असे दिसते.

अष्टविनायकांच्या यात्रेतील सातवे ठिकाण आहे ओझर. पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तालुक्यातील विघ्नेश्वर नावाने प्रसिद्ध असलेला हा गणपती जुन्नरपासून जवळच आहे. पण माळशेज घाटातून येणाऱ्या प्रवाशांसाठी लेण्याद्रीपेक्षा जास्त जवळ आहे. तसेच लेण्याद्रीइतके उंच नसल्यामुळे सामान घेऊन जाणाऱ्या व्यापारी आणि प्रवाशांसाठी कुकडी नदीच्या काठी असणारे विघ्नहराचे मंदिर जास्त सोयीचे ठरले. त्याचप्रमाणे संपूर्ण भारत आडवा छेदणारा कल्याण ते विशाखापट्टणम् हा रस्ता जो पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी जोडतो, अशा या महत्त्वाच्या व्यापारी मार्गाच्या जवळ असलेले हे विघ्नहराचे मंदिर खरे तर रक्षणकर्त्यां देवतेचे आहे. अगदी प्राचीन काळापासून नाणेघाटातून जरी व्यापारी जुन्नरला आले तरी तो सगळा माल पुढे महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांमध्ये नेला जायचा. यामध्ये पठण (प्रतिष्ठान) हे महत्त्वाचे केंद्र होते. जुन्नरहून आळेफाटा या चौरस्त्याकडे जायचा एक शॉर्टकटसुद्धा ओझरवरून गेलेला दिसतो. अशा सर्व प्रकारांनी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ठिकाणी महत्त्वाचे देवस्थान उभे राहिले यात नवल नाही. पाण्याचे सान्निध्य हेसुद्धा यासाठी महत्त्वाचे ठरले असणार. त्यामुळे प्राचीन काळापासून प्रवाशांच्या मार्गातील विघ्नांचे हरण करणाऱ्या एखाद्या देवतेचे अस्तित्व या ठिकाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुन्नरच्या प्राचीनतेएवढीच प्राचीनता याही ठिकाणाला लाभली आहे हे लक्षात घेणे जरुरीचे आहे.

अष्टविनायकांच्या यात्रेतील आठवे ठिकाण आहे पुणे जिल्ह्य़ातील रांजणगाव. पुणे ते औरंगाबाद म्हणजे म्हणजे पश्चिम भारतातून पठण तसेच पूर्वेकडील महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांना जोडणारा हा रस्ता आहे. सह्य़ाद्री पर्वतातून देशावर येताना विविध घाटमार्गातून देशावर यावे लागे. त्या मार्गावरील बौद्ध गुंफांना हे व्यापारी दान देत असत. अशा भाजे, काल्रे, बेडसे, शेलारवाडी या गुंफा पुणे रस्त्यावर आहेतच. अशा महामार्गावर प्राचीन काळापासून ठरावीक अंतरावर गावं असत. हेच प्राचीन रस्ते आजचे महामार्ग बनले आहेत. रांजणगाव परिसरही अशाच प्रकारचा एक महामार्ग आज जातो, पण त्याची प्राचीनता कमीतकमी दोन हजार वष्रे जुनी असावी असे वाटते. या गावात  १९७५ साली सातवाहनांना समकालीन असणाऱ्या पश्चिमी क्षत्रप राजांच्या इ.स. दुसऱ्या – तिसऱ्या शतकातल्या एकूण एक हजार ५१८ चांदीच्या नाण्यांचा संग्रह भिकू खेडकर नावाच्या एका शेतकऱ्याला शेतात सापडला. त्या नाण्यांचा अभ्यास डेक्कन कॉलेजच्या नाणकशास्त्रज्ञ   डॉ. शोभना गोखले यांनी केला. यावरून इ.स.च्या दुसऱ्या – तिसऱ्या शतकात या परिसरात वस्ती होती हे स्पष्ट दिसते. तसेच रांजणगावच्या जवळ चार कि. मी. अंतरावर िपपरी दुमाला नावाचे एक लहानसे गाव आहे. तिथे साधारण १२ व्या – १३व्या शतकातले सोमेश्वर नावाचे एक मंदिर आणि दोन मोठय़ा पुष्करणी आहेत. अनेक देखणी शिल्पं आणि वीरगळ या मंदिर आणि परिसरात आहेत. तसेच या गावात प्राचीन वस्तीची निदर्शक अशी पांढरीची जमीनही दिसते. त्यावरून साधारणपणे ८०० ते एक हजार वर्षांपासून या परिसरात मानवी वस्ती होती हे स्पष्ट दिसते.

खुद्द रांजणगावच्या महागणपतीच्या मंदिराच्या आवारात अनेक पुरातत्त्वीय अवशेष ठेवले आहेत असे दिसते. यामध्ये वीरगळ, सतीचा हात, एका जुन्या मंदिराच्या स्तंभांचे अवशेष तसेच मंदिराच्या मागच्या विहिरीतील कोनाडय़ात विष्णूची एक सुरेख, पण भग्न मूर्ती ठेवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणपतीच्या मंदिराच्या प्रदक्षिणापथावर एका शिवाचे मंदिर गणपतीच्या गाभाऱ्याच्या बरोबर पाठीमागे आहे. या मंदिराच्या अस्तित्वासाठी स्थानिक लोकांनी दिलेली स्पष्टीकरणे पटण्यासारखी नाहीत. पण हे मंदिर इथे बांधायच्या आधी एखादे शिवाचे मंदिर येथे असावे असे वाटते. शक्यता अशी दिसते की ते मंदिर पडले असावे आणि त्याचेच अवशेष या परिसरात ठेवले असावेत. या प्राचीन मंदिराचे अस्तित्व पूर्णपणे पुसण्यापेक्षा एका छोटय़ा गर्भगृहात एक शिविलग प्रतिष्ठापित केले असावे असे वाटते. मंदिराच्या बाहेरही एक सती शिळा आहे. या सर्व गोष्टींवरून असे दिसते की या मंदिराची आजची बांधणी मध्ययुगात झालेली असली तरी या ठिकाणी एक प्राचीन शिवमंदिर असावे आणि ते पडक्या अवस्थेत असल्यामुळे त्या जागेवर गाणपत्य संप्रदायाच्या लोकप्रियतेमुळे नवीन गणपतीचे मंदिर उभे राहिले असावे.

अशा प्रकारे आज सर्वच अष्टविनायकांची मंदिरे मध्ययुगीन स्थापत्यशैलीतील वाटत असली तरी प्रत्येक ठिकाणी गाणपत्य संप्रदायाच्या लोकप्रियतेच्या लाटेमुळे ही निर्मिती झाली असावी. पण त्या सर्वच ठिकाणी प्राचीन काळात कोणाचे न कोणाचे तरी मंदिर होते आणि त्या परिसरात वस्ती होती, तसेच ती स्थळे महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर होती, हे दर्शवणारे पुरावे आजही सगळीकडे आढळून येतात. पण काळाच्या ओघात ही स्थळे  ‘स्मार्ट’ होतील तेव्हा कदाचित हे अवशेष नाहीसे होतील आणि त्या स्थळांचा हा इतिहासही स्मृतिपटलावरून पुसला जाईल. पण त्यांची वेळेत नोंद करून ठेवली तर पुढच्या पिढीसाठी त्याचा उपयोग होईल.
डॉ. मंजिरी भालेराव – response.lokprabha@expressindia.com

First Published on August 18, 2017 1:03 am

Web Title: lokprabha gash vishesh 2017 ashtavinayak