गणपतीच्या काही मूर्तीना दोन तर काहींना चार हात असतात. काहींजवळ वाहन म्हणून उंदीर तर काहींजवळ मोर असतो. गणपती मूर्तीच्या तपशिलात असे वैविध्य का असते, त्यामागे काही विशिष्ट अर्थ असतो का याचा शोध –

श्रीगणेश दैवत माहिती नाही असा भारतीय सापडणे विरळाच आहे. अनेकांच्या पूजेत ते असते, ध्यानात ते असते. कित्येकांचे तर ते कुलदैवत आहे. कोकणात तर त्याचे विशेष माहात्म्य आहे. पण म्हणून या दैवताची पुरेपूर माहिती साऱ्यांनाच असते असे नाही. गणपती पार्वतीच्या  अंगमळापासून झाला. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊ नये. तो कार्तिकेयाचा धाकटा भाऊ आहे. ती विद्येची देवता आहे. तो आधी दु:खकर्ता होता मग सुखकर्ता झाला, एवढी व अशा प्रकारची थोडी जुजबी माहिती अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंतबहुतेकांना असते. येथे प्रयत्न केला आहे तो यापेक्षा अधिक माहिती तीही प्रत्यक्ष गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्तीच्याद्वारे देण्याचा.

मूर्ती विविध प्रकारच्या का असतात हे आपणास समोपनिषदातून कळते.

चिन्मयस्थाद्वितियस्य।
निष्कलस्याशरीरिण:
उपासकानां कार्यार्थ।
ब्रह्मणो रुप कल्पना:॥

म्हणजे ब्रह्म हे चिन्मय आहे, अद्वितीय आहे, कला नसलेले आणि शरीर नसलेले असे आहे. मात्र उपासक आपले कार्य सिद्धीला जावे म्हणून त्याला विविध रूपांत पाहात असतो.  यासंबंधी एक गोष्ट प्रचलित आहे. एकाने सिद्धविनायकाची मूर्ती घडविण्यास सांगितलेली असते. कारण त्याला नातवाला पाहण्याची घाई झालेली असते. हे कळल्यावर स्नेही सांगतो ‘तर मग बाल गणेशाची मूर्ती घडवून घ्यायला हवी होती.’ तशी मूर्ती घडवून घेतली जाते हे सांगायला नको.

श्रीगणेशाचे प्राचीनत्व वाङ्मयात इसवीसनाच्या आधीपासून आढळते. मूर्ती नंतर घडविल्या जाणे साहजिकच आहे. तरीसुद्धा असे दिसते की गणेशाला दैवत म्हणून जनमनात स्थान मिळायला बराच काळ जावा लागला. वेदोपनिषदे वा रामायण – महाभारत पुराणे यांचा प्रारंभ गणेशाला वंदन करून झालेला नाही. मात्र कालांतराने श्रीगणेशाय नम:  म्हटल्याशिवाय कार्यारंभ होत नसतो. शुभकार्य, सत्कार्य त्याच्या नमनानेच होते. एवढेच कशाला कोणत्याही देवाची गाभाऱ्यात  प्रतिष्ठापना झालेली असली तरी गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गणेश प्रतिमा असतेच. अशा गणेशाची बहुआयामी ओळख मूर्तीच्याद्वारे घडवावी असा येथे मानस आहे.

गणेशाच्या प्रतिमा

आता आपण पाहतो त्या प्रतिमांत गणेश चतुर्भुज असतो आणि त्याच्या हातात परशू, अंकुश, पद्म आणि मोदकपात्र असते. बृहत्संहितेत तो द्विभुज असल्याचे वर्णन आहे, तर ज्ञानेश्वरीत षड्भुज गणेशाला वंदन केलेले आहे. अशी प्रतिमा देगलूरजवळील होट्टल या गावातील सिद्धेश्वर मंदिरावर आहे. तसेच झांशी येथील राणीमहाल वस्तुसंग्रहालयातही आहेत. महागणपती किंवा हेरंब गणेश दशभुज असतो, तर काही प्रतिमा अष्टदशभुजही असतात.

गणेशाच्या प्राचीन प्रतिमा मथुरा संग्रहालयात असून त्या इसवीच्या तिसऱ्या वा चौथ्या  शतकातल्या आहेत. द्विभुज, एकदंत, सर्पयज्ञोपवित, मोदकपात्र असे त्याचे रूप आहे. बृहत्संहिता सांगते की त्याच्या हातात परशू आणि मुळा असावा. अफगाणिस्थानला जेव्हा गांधार प्रदेश म्हणून ओळखले जात असे त्या वेळच्या इसवीच्या चौथ्या – पाचव्या शतकातील दोन गणेश प्रतिमा इसवी सन १७८०  पर्यंत पुजल्या जात होत्या. यापैकी एकीला दोनच हात असले तरी ती महागणपती नावाने ओळखली जायची, तर दुसरी चतुर्भुज व ऊध्र्वलिंगी आहे / होती.

प्रारंभीचे देव द्विभुजच दाखविले जात. मात्र भक्तांची संख्या आणि अपेक्षा वाढल्या तेव्हा त्यांच्या हातांची संख्या वाढली आणि त्यातील आयुधे व लांच्छनेही वाढली.

श्री गणेशाच्या अनेक मुखे असलेल्या काही मूर्ती आढळतात. मुख हे अवस्थिती (आस्पेक्ट्स) दर्शविणारे असते. वाराणसी  येथील सूर्यकुंडाजवळील गणेशमूर्ती द्विमुखी असून चुतुर्भुज आहे. त्यांची सोंड एकमेकांविरुद्ध दिशेला दाखविलेली आहे. त्रिशुंड गणेश तर पुण्यातच मंगळवार पेठेतील देवळात आहे. याच्या पाच तोंडांच्या मूर्ती तर अनेक  आहेत. त्या महागणपती आणि हेरंब या नावाने ओळखल्या जातात. विशेष म्हणजे नेपाळ येथील पाटण गावी सहा तोंडे आणि दहा हात असलेली गणेशमूर्ती आहे. तीन तोंडांवर आणखी तीन तोंडांचा एक थर आहे आणि हातात आहेत बाण, गदा, अंकुश, पाश, वरदमुद्रा, अक्षमाला, पोथी, सर्प, पद्म नि मोदकपात्र. जशी स्थिती तोंडांची तशीच थोडय़ाफार  प्रमाणात पायांची आहे. कोणत्याही देवता मूर्तीला दोन पाय असतात ही सामान्य स्थिती आहे. अपवाद म्हणून अग्नीला तीन पाय आहेत आणि भृंगीला तीन पाय असतात. पण विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील मंदसोरजवळच्या घोसाई येथे आसनस्थ गणेश चार पायांचा आहे. तो अर्धर्पयकासनात बसला आहे. त्याच्या डाव्या मांडीखाली एक मांडी आहे आणि त्याच्या उजव्या उभ्या मांडीच्या मागून दुसरा पाय डोकावतो आहे.

आज गणेशमूर्तीजवळ त्याचे वाहन म्हणून उंदीर असायलाच हवा हे खरे, पण त्याची आणखी काही वाहने आहेत. मयूर हे त्याचे त्रेतायुगातील वाहन आहे. या गणेशाला सहा हात असावे लागतात. हा झाला मयूरेश्वर.  तेर (जि. उस्मानाबाद) येथील  रामलिंगप्पा वस्तुसंग्रहालयात मयूरेश्वराची प्रतिमा पाहता येते. पुण्यातला त्रिशुंड गणपती मोरावरच बसलेला आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या डाव्या मांडीवर त्याची गजमुखी शक्ती बसलेली दाखविलेली आहे. तर हेरंब गणपतीचे वाहन असते सिंह. महागणपती आणि हेरंब या दोन्ही प्रकारच्या मूर्ती पंचमुखी आणि दशभुज असतात पण पहिल्याचे वाहन उंदीर तर दुसऱ्याचे असते सिंह. कलियुगात धूम्रकेतू हे गणपतीचे एक नाव. त्याचे वाहन घोडा हे असते. गणेशाचे वाहन म्हणून दोन डोकी (एक बैलाचे तर एक सिंहाचे) आणि आठ भुजा असलेल्या राक्षसाला दाखविलेले आहे. ही काष्टमूर्ती पंचमुखी व दहा हातांची आहे. तिला हेरंब म्हणूनच ओळखतात. दिल्लीच्या  विमलसेठ यांच्या संग्रहात ही मूर्ती आहे.

गणपतीच्या पत्नींसंबंधीही विचार करणे आवश्यक ठरते. सर्वसामान्यतेनुसार रिद्धी आणि सिद्धी या त्याच्या पत्नी समजल्या जातात यांचेशिवाय बुद्धी, सरस्वती याही त्याच्या पत्नी मानल्या जातात. यांचेबद्दलचा विचार कोणी केला असेल की नाही असे वाटते. हे केवळ गणपतीच्याच बाबतीत आहे असे नाही; तर अन्य देवतांच्या बाबतीतही आहे. वस्तुत: कोणाही देवाला दोन स्त्रिया नसतात, असते एकच. दुसरी असते ती त्याची शक्ती. या संबंधीचे सोपे उदाहरण असे – कार्तिकेयाला दोन स्त्रिया आहेत असे मानतात. एक महावल्ली व दुसरी देवसेना. तो देवांचा सेनापती म्हणून त्याची शक्ती सैन्यात असते. तेव्हा देवसेना ही झाली त्याची शक्ती. आणि महावल्ली ही पत्नी. गणेशाचेही असेच आहे. तो बुद्धीचा, ज्ञानाचा देव मानला जातो. बुद्धी ही त्याची पत्नी आणि ज्ञानाचा देव म्हणून सरस्वती ही झाली त्याची शक्ती.

देवतांच्या भक्तांना वाटत असते की इतर देवतांच्या ज्या ज्या प्रकारच्या मूर्ती घडविल्या गेल्या तशा त्या आपल्या दैवताच्याही असाव्यात. शिव – पार्वतीची विवाहाधारित कल्याण सुंदर मूर्ती असते. मग वैष्णवभक्तांनी विष्णू – लक्ष्मीची कल्याण सुंदर मूर्ती घडविली. याप्रमाणे गणेशाच्याही काही प्रकारच्या मूर्ती आढळतात. बाळकृष्ण मडके आडवे करून लोणी खातो. मग गणेशालाही त्या अवस्थेत दाखविले गेले. चिदंबरम येथील शिव – नटराज मंदिराच्या स्तंभावर हे दृश्य दर्शविणारी प्रतिमा आहे. तर श्रीकृष्णकुलम जिल्ह्य़ातील  मुखालिंगम् या ठिकाणी सोंडेने शंख फुंकणारा गणेश आहे, कारण हृषीकेश  पांचजन्य फुंकतो, तर गणेशाला का नको? तर आंध्रमधील पालमपेठ येथे गणेशाला अभिषेक घातला जात असल्याची प्रतिमा आहे.

श्री शैलम येथे गणेश बासरी वाजवीत असलेला दिसतो. अर्थात या मूर्ती नाहीत, ही शिल्पे आहेत. श्रीकृष्ण कालियादमन करीत असल्याचे शिल्प सर्वज्ञात आहेच. हिमाचल प्रदेशातील एका खासगी संग्रहात गणेशाची अशी प्रतिमा आढळते.

याशिवाय गणेशाच्या नृत्यमूर्ती अनेक आहेत. कारण शिवाच्या अशा मूर्ती जगविख्यात आहेत. बंगालमध्ये उंदरावर नाचणारा गणेश दिसतो जसा नंदीवर शिव दिसतो. नृत्यरत नृत्यगणेशाच्या बऱ्याच मूर्ती आढळतात. त्या द्विहस्त, (कनोज), चतुर्हस्त (मुंबई), षड्भुज (नांदेडजवळील होट्टल), अष्टभुज (फतेहगड) दशभुज आणि द्विदशभुज (मध्य प्रदेश) आढळतात.

मंत्रमार्गीचा गणेश :

श्रीगणेशाच्या रिद्धी-सिद्धीसह  वर्तमान असलेल्या अनेक मूर्ती आहेत, जशा विष्णू-लक्ष्मीच्या वा उमा – महेश्वराच्या असतात. पण तंत्रमार्गीनी गणेशाचे शिल्पांकन काहीशा वेगळ्या पद्धतीने केल्याचे आढळते. यातली एक अगदी साधी प्रतिमा म्हणजे ओडिशाहून प्राप्त झालेली पाठीवर तीन वेण्या सोडलेली आसनस्थ गणेशमूर्ती. सव्य ललितासनात बसलेली, माथ्यावर केसांचा भार असलेली ही चतुर्भुज  मूर्ती आहे. हातात स्वदंत, पाश, अंकुश आणि मोदकपात्र घेतलेली ती आहे. तर एकच वेणी असलेली बैठी पण भग्न मूर्ती कल्याण येथे साठे यांच्या वाडय़ात आहे.

मला वाटते गणेश अशा स्वरूपातली (भुलेश्वर, महाराष्ट्र)  येथे असलेली वा अन्य ठिकाणी आढळणारी गणेशाची मूर्ती याच प्रकारच्या  गटातली असावी.

यापेक्षा वेगळी पण तंत्रमार्गाची  प्रतिमा म्हणजे उच्छिष्ट गणेशाची. अशा अनेक प्रतिमा आढळल्या आहेत. अशा मूर्तीत गणपतीचा यौवनोन्माद दिसतो. अशा मूर्तीत गणेशाची सोंड मांडीवर बसलेल्या वा शेजारी उभ्या असलेल्या पत्नीच्या गृह्य़भागी वा स्तनमध्यात असते. अशा मूर्ती खजुराहो, अंबरनाथ, औंढा, तमिळनाडू इत्यादी ठिकाणी आहेत. औंढानागनाथ मंदिरावर अशी एक स्थानक मूर्ती आहे. गणेशाच्या दोहो अंगास  एकेक स्त्री उभी आहे. उजवीकडील  स्त्रीला त्याने आलिंगन देऊन जवळ घेतले आहे. तिचे दोन्ही हात गणेशाच्या छातीवर आहेत. तर डावीकडील  स्त्रीचे स्तन तो सोंडेने कुरवाळतो आहे. अशीच पण तिघेही आसनस्थ असलेली मूर्ती हिंगोली जिल्ह्य़ातील उटीब्रह्मचारी गावी आहे. ‘पंचम’कारयुक्त पूजा करणाऱ्यांसाठी अशा मूर्ती घडविल्या जातात हे सर्वज्ञात आहे.

मूर्तीतून प्रकटणारे दैवत असे आहे. यांचा फार प्राचीन काळाचा मागोवा घेता येत नसला तरी जेव्हा मूर्तिशास्त्रात ते आले तेव्हापासून त्यांचे  महत्त्व वृद्धिंगत झाल्याचे दिसते. अनेक रूपे, अनेक वेषे ते प्रकट झाले. भक्तप्रियता वाढत गेली. त्यांच्या मनात, हृदयात आणि ध्यानात  त्याला ध्रुवस्थान मिळाले. त्याने मग गर्भगृहाच्या ललाटपट्टी पटकावले. गाभाऱ्यातील देवतेचे दर्शन घेण्याआधी या दैवताचे दर्शन घ्यावे लागते. मग त्याने पंचायतनात जागा मिळवली.  गाभाऱ्यातूनच ते प्रतिष्ठापित झाले. शैव, वैष्णव इत्यादी संप्रदायांप्रमाणे  त्यांचा गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला.

वाराणसीचे ख्यातकीर्त विद्वान पंडित राजेश्वरशास्त्री  द्रविड यांना विचारले की गणेशालाच पूजा करायची झाल्यास प्रारंभी त्याने कोणाची पूजा केली पाहिजे? उत्तर मिळाले श्री गणेशाची, आणि उद्या महेश्वर पूजेला बसले तर? उत्तर आले तरीही गणेशाचीच.  असे आहे गणेशमाहात्म्य.
डॉ. गो. बं. देगलूरकर – response.lokprabha@expressindia.com