24 November 2017

News Flash

गणेश विशेष : विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता

कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणेशपूजन केले जाते.

डॉ. सीमा सोनटक्के | Updated: August 18, 2017 1:02 AM

कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणेशपूजन केले जाते. गणपतीच्या विघ्न निर्माण करणारा आणि विघ्ने नाहीशी करणारा या अशा दोन्ही परस्परविरुद्ध प्रतिमा कशा निर्माण झाल्या, याचा घेतलेला शोध –

असे मानले जाते की, फार फार वर्षांपूर्वी एकदा सर्व देव शंकराकडे गेले आणि म्हणू लागले की, ‘हे शंकरा, तुझी प्रार्थना करून असुर, दैत्य आदी मंडळी तुला प्रसन्न करवून घेतात आणि तुझ्या कृपेमुळे त्यांची देवविरोधी हीन कर्मेही सिद्धीस जातात. तेव्हा आम्हाला तू वर प्रदान कर. ज्यायोगे त्यांच्या कार्यामध्ये विघ्न येईल असे कारण उत्पन्न कर.’

प्रसीदतात् भवान् सुविघ्नकर्मकारणम,
सुरापकरिणामिहैष एव नो वर: (लिङ्गपुराण)

त्या वेळी शंकराने पार्वतीकडे पाहिले आणि तिच्या उदरातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. समुत्त्पन्न झालेल्या त्या पुत्रास महादेव म्हणाला की, ‘तुझा अवतार हा दैत्यांच्या विनाशासाठी आहे. पृथ्वीतलावर जो कोणी दक्षिणाहीन यज्ञ करेल, त्याच्या यज्ञात तू विघ्न उत्पन्न कर. तिन्ही जगात तू ‘विघ्नगणेश्वर’ म्हणून पूजनीय आणि वंदनीय होशील.’

जगत्त्रयेऽत्र सर्वत्र त्वं हि विघ्नगणेश्वर:
संपूज्यो वन्दनीयश्च भविष्यसि न संशय:

विघ्नेश्वर गजाननाच्या जन्माची ही कथा लिंग पुराणात येते. वराह पुराणातील अशाच स्वरूपाच्या कथेनुसार सज्जनांच्या कार्यात विघ्ने येतात आणि दुष्टांची कार्ये निर्विघ्न पार पडतात हे पाहून, त्यावरील उपाय शोधण्यासाठी देव आणि ऋषी शिवाकडे गेले. त्या वेळी शिवाने उमेकडे कटाक्ष टाकताच त्याच्या मुखातून अतिशय सुंदर, तेजस्वी जणू काही दुसरा रुद्रच असा पुत्र समुत्पन्न झाला. त्या वेळी पार्वती ही अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा शंकराने क्रुद्ध होऊन आपल्या पुत्राला मोठय़ा उदराचा, सर्पवेष्टित आणि गजमुख होण्याचा शाप दिला. तरीसुद्धा शिवाचा क्रोध शांत होईना, जेव्हा त्याने आपला देह रागाने हलविला, तेव्हा त्याच्या रोमारोमांतील जलबिंदूंपासून अक्राळविक्राळ निळ्या-काळ्या रंगांचे अनेकविध विनायक समुत्पन्न झाले. ते पाहून देव, ऋषी घाबरले. तेव्हा ब्रह्मदेवाने येऊन शंकरास विनंती केली की, तुझ्या मुखातून जो कुमार उत्पन्न झाला आहे त्याच्या अधिकारात हे गण राहू देत. त्यावर शंकर आपल्या पुत्रास म्हणाला,

विनायको विघ्नकरो गजास्यो
गणेशनामा च भवस्य पुत्र:
एते च सर्वे त्वपायन्तु भृत्या:
विनायका: क्रूरदृश: प्रचण्डा:
(वराहपुराण- विनायकोत्त्पत्ति:)

तुला गजमुख, विनायक, विघ्नकर, गणेश अशी नावे प्राप्त होतील. हे सर्व क्रूर विनायक गण तुझे सेवक होतील, यापुढे यज्ञ आणि इतर कार्यात तुझी अग्रपूजा होईल, तसे न झाल्यास तू कार्यसिद्धीत विघ्ने आणू शकतोस.

अग्रे तु पूजां लभतेऽन्यथा च
विनाशयिष्यस्यथ कार्यसिद्धिम्।

स्वत: गणपतीलाही बालपणी विघ्नाला सामोरे जावे लागल्याची कथा ब्रह्मवैवर्त आणि भविष्यत् पुराणांत येते. बालगणेशावर शनीची दृष्टी पडली आणि त्यामुळे त्याचे मस्तक धडावेगळे झाले. त्यानंतर गजाचे मस्तक मागाहून लावण्यात आले असे या कथेत म्हटले आहे.

स्कंद पुराणातील कथेनुसार पृथ्वीतलावरील अनेक माणसे यज्ञयाग करून स्वर्गप्राप्ती करवून घेऊ  लागली. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी देवांनी शंकराला ‘विघ्नकर्त्यां’ची विनंती केली.

मर्त्यलोके नरा ये च स्वर्गमोक्षपरा: सदा
तेषां विघ्नं त्वया कार्ये शुभकार्येषु चैव हि
(स्कन्द पुराण)

अशा तऱ्हेने गणपतीची उत्पत्ती ही विघ्ने निर्माण करण्यासाठी झालेली दिसते.

विघ्नकारी, उपद्रवकारी, क्रूर अशा गणांच्या साहाय्याने विघ्नेश्वर विनायक हा विघ्ने निर्माण करू लागला. मित, संमित, शालकंटक, कुष्मांड अशी विनायकांची नावे गृह्य़ सूत्र ग्रंथामधून आली असली तरी या गणांचा ‘विशिष्ट’ असा ‘नायक’ म्हणून एकच विनायक अर्थात गणपती दिसतो. विनायकाची बाधा झालेल्या मनुष्याला कोणते उपद्रव होऊ  शकतात याचे वर्णन याज्ञवाल्क्यस्मृतीमधील आचाराध्यायामध्ये येते.

विमना विफलारम्भ: संसीदत्यनिमित्तत:
तेनोपसृष्टो लभते न राष्ट्रं राजनन्दन:
कुमारी च न भर्तारमपत्यं गर्भमङ्गना
आचार्यत्वं श्रोत्रियश्च न शिष्योऽध्ययनं तथा
वणिलाभं न चाऽप्नोति कृषिं चैव कृषीवल:।
(याज्ञवल्क्यस्मृती)

विनायकाची अवकृपा झाली तर प्रारंभ केलेले कार्य सिद्धीस जात नाही. मनामध्ये उद्वेग निर्माण होतो. काही दुष्ट निमित्त होऊन कार्य लयास जाते. कन्येस पती, गर्भवतीस पुत्र प्राप्त होत नाही. आचार्याला श्रुतींचा अधिकार प्राप्त होत नाही. विद्यार्थ्यांकडून अध्ययन पार पडत नाही. व्यापाऱ्याला लाभ होत नाही आणि शेतकऱ्याचेही नुकसान होते. या लक्षणांसोबतच निद्रावस्थेमध्येदेखील मनुष्याला दु:स्वप्ने पडू लागतात असे या स्मृतीत म्हटले आहे.

वेळोवेळी विघ्न समुत्पन्न करण्याचे कार्य गणेशाने कसे केले, याच्या कथा पुराणांमधून येतात. स्कंद पुराणातील काशी खंडातील एका कथेनुसार वाराणसीमध्ये ‘दिवोदास’ नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या शासनकाळात प्रजा अत्यंत सुखी, समृद्ध झाली होती. त्याच्या आदर्श शासनामुळे देवांनाही काशीत स्थान नव्हते. आपल्या पित्यास- शंकरास काशीत स्थान मिळवून देण्यासाठी गणेशाने प्रजेमध्ये विघ्ने निर्माण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर ज्योतिषाच्या रूपात चिंतेत असणाऱ्या राजाकडे जाऊन त्याला शिवलिंग उपासना करण्यास सांगितले.

पद्म पुराण, भागवत पुराण इत्यादी अनेक पुराणांमधून येणारी गोकर्ण महाबळेश्वराची कथा सुप्रसिद्ध आहे. त्या कथेनुसार शंकराने प्रसन्न होऊन दिलेले आत्मलिंग दुष्ट रावण लंकेस घेऊन जात होता. त्याच्या या कार्यात विघ्न आणण्यासाठी श्रीविष्णूने गणपतीला पाठवले. ब्राह्मण कुमाराच्या वेशात येऊन गणपतीने शिवलिंग जमिनीवर ठेवून रावणाच्या कार्यसिद्धीत विघ्न उत्पन्न केले.

अशा या ‘विघ्नेश्वर, विनायकाची योजना मुळात विघ्नकर्ता म्हणून झालेली असली तरी भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन तो विघ्नांचे हरण करणारा ‘विघ्नहर्ता’ झाला.

नमस्ते विघ्नराजाय भक्तानां विघ्नहारिणे
अभक्तानां विशेषेण विघ्नकर्त्े नमो नम:।

मुद्गल पुराणांर्तगत या गजानन स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे हा विघ्नेश्वर अभक्तांसाठी ‘विघ्नकर्ता’ आणि भक्तांसाठी ‘विघ्नहर्ता’ झाला. प्रो. ढवळीकर यांच्या मते हे स्थित्यंतर इ.सनाच्या सहाव्या शतकात झाले असावे. गणेश पुराण, मुद्गल पुराण इत्यादीमधून प्रामुख्याने दैत्यांचे हनन करून विघ्न नाहीसे करण्यासाठी गणपतीच्या विविध अवतार कथांचे वर्णन येते. विनायक, गणेश, गजानन आणि धूम्रवर्ण या त्याच्या चार युगांतील, चार भिन्न रूपांतील अवतारांकडून प्रामुख्याने दैत्यांचा वध आणि विघ्नांचा नाश हे कार्य दिसून येते. मुद्गल पुराणातील एका कथेनुसार, अभिनंदन नावाचा एक राजा होता. त्याने यज्ञप्रसंगी इंद्राला हविर्भाग न देण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंद्राने त्याच्या यज्ञात व्यत्यय आणण्यासाठी ‘विघ्नासुर’ नावाच्या राक्षसाला पाठवले. परंतु या विघ्नासुराने उन्मत्त होऊन पृथ्वी तलावरील सर्वच यज्ञांचा विध्वंस करण्यास सुरुवात केली. त्या वेळी या विघ्नासुराचा नि:पात गणेशाने ‘विघ्नराज’ अवतार घेऊन केला.

विघ्नांचे हरण होऊन कार्य सिद्धीस जावे म्हणून गणपतीच्या पूजेला महत्त्व प्राप्त झाले.

जातकर्मादिसंस्कारे गर्भाधानादिकेऽपि च
यात्रायां च वणिज्यादौ शुद्धे देवार्चने शुभे
संकष्टे कर्मसिध्द्य्र्थे पूजयेद्य्ो गजाननम्
तस्य सर्वाणि कार्याणि सिद्धय़न्त्येव न संशय:
(ब्रह्माण्ड पुराण)

जातकर्म, गर्भाधान इत्यादी संस्कारांच्या वेळी, प्रवास, वाणिज्य अशा लौकिक कार्याच्या प्रारंभी विघ्नहरण व्हावे म्हणून गणेशपूजा करण्यात येतेच; परंतु विघ्नेश्वर हा केवळ बाह्य़ जगातीलच नव्हे तर मनुष्याच्या अंतस्थ षड्रिपूरूपी विघ्नांचेही हरण करताना दिसतो. काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर या षड्रिपूंचा वध विघ्नहर्त्यांने कसा केला याच्या विविध कथा मुद्गल पुराणात येतात. त्यातील एका कथेनुसार शंकर सर्वस्वी आपल्या स्वाधीन आहे आणि आपल्यासारखी धन्य स्त्री त्रिभुवनांत नाही असा गर्व पार्वतीला झाला. त्या विचारातच पार्वती हसली. तेव्हा तिच्या या हास्यातून ‘ममासुर’ नावाचा पुरुष निर्माण झाला.

तस्या हास्यात् समुत्पन्न: पुरुष: कामसन्निभ:।
मम नामा महाभागो महान् पर्वतसन्निभ:।।

पुढे तो त्रलोक्याला उपद्रव देऊ  लागला, त्याला मारण्यासाठी गणेशाने ‘विघ्नेश्वर’ हा अवतार घेतला.

मनोविकार रूपी विघ्नाचे हरण करणारा हा विघ्नेश्वर योग्यांच्या योगसाधनेतील विघ्नही दूर करतो. गणेश हा मूलाधार चक्राच्या ठिकाणी स्थित असून योगशांतीसाठी त्याची आराधना केली जाते.

माया विघ्नात्मिका प्रोक्ता भ्रान्तिदा बिम्बभावत:
तां जयन्ति जना ईशा विघ्नराजस्य सेवया
(योगिशान्तिप्रद गणेशस्तोत्र)

मायास्वरूपी विघ्नाचे हरण करण्यासाठी विघ्नराजाची सेवा करावी असे साक्षात शंकर देवांना आणि ऋषींना सांगतो.

तांत्रिक ग्रंथामध्ये गणेशाच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणपतीची निरनिराळी नावे मूर्ती आणि शक्तीसमवेत असणारे त्याचे ध्यान इत्यादीचे वर्णन शारदातिलक आदी तंत्रग्रंथांमध्ये येते. बिंदूयुक्त गकार गं हा विघ्नराज गणेशाचा बीजमंत्र असून विघ्नशांती हा त्याचा विनियोग तंत्रग्रंथांमध्ये सांगितला जातो.

अनेक अभ्यासकांच्या मते गणपती ही मुळात आर्येतर लोकदेवता असावी. ‘गणानां त्वां गणपतिं हवामहे’ या वैदिक ऋचेतून तिचा समावेश वैदिक संस्थेत केला गेला. भूत, पिशाच्च, यक्ष इत्यादीसोबत संहारक अशा विनायक गणांचे उल्लेख आढळतात. ‘‘भूतप्रेतपिशाचाश्च यक्षरक्षो विनायका:’’ (भागवत पुराण) या विनायक गणांचे स्वामित्व गणपतीला दिले गेले. म्हणूनच ‘विघ्नकर्ता’ हे मूलस्वरूप बदलून तो ‘विघ्नहर्ता’ झाला आणि भक्तांच्या हृदयात त्याला स्थान प्राप्त झाले. अशा या विघ्नेश्वराला त्रिवार वंदन.

नमस्ते गजवक्त्राय नमस्ते गणनायका
विनायक नमस्तेऽस्तु नमस्ते चण्डविक्रम
नमोऽस्तु ते विघ्नकर्ते् नमस्ते सर्पमेखल
नमस्ते रुद्रवक्त्रोथ प्रलम्बजठराश्रित
सर्वदेवनमस्कारात् अविघ्नं कुरू सर्वदा
(वराह पुराण)
डॉ. सीमा सोनटक्के – response.lokprabha@expressindia.com

First Published on August 18, 2017 1:02 am

Web Title: lokprabha gash vishesh 2017 vighnakarta and vighnaharta