सुनिता कुलकर्णी

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी
म्हणायाचा अन् मनाशिच की
या जागेवर बांधिन माडी…

बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेतला हा गणपत वाणी कवितेत शेवटी मरून जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात छोट्या छोट्या खोपट्यांमधून दुकानं चालवणाऱ्या कवितेतल्या या गणपत वाण्यासारख्या लहानमोठ्या दुकानदारांना ठिकठिकाणी उभारल्या गेलेल्या मोठमोठ्या म़ॉल्समुळे गेल्या काही वर्षात बऱ्यापैकी फटका बसला होता. त्यावर मात करण्यासाठी या लहानसहान दुकानदारांनी फोनवरून येणाऱ्या अगदी अर्धा लीटर दूध किंवा दहा रुपयांच्या बिस्कीटपुड्याच्या ऑर्डर्सही घरपोच करण्याचे धोरण अवलंबले होते. पण चकाचक एसी मॉल्स, तिथल्या एकाच छताखाली मिळणाऱ्या किराणा मालासकट सगळ्या गृहोपयोगी वस्तू, खरेदीवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती हे सगळं ग्लॅमर या छोट्या दुकानांना कुठून येणार? पण ते आणलं आहे करोनानामक एका सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसूही न शकणाऱ्या विषाणूने…

घरपोच किराणा सामान, फळं- भाज्या देणाऱ्या अॅपआधारित सेवांवरदेखील पुण्यामुंबईसारख्या मोठ्या शहरांमधले अनेकजण अवलंबून असतात. आवश्यक गरजांसाठी उठून मॉलमध्ये किंवा जवळच्या दुकांनामध्ये जाण्यापेक्षा थोडे जास्त पैसे देऊन आपल्याला हव्या त्या वेळेत मिळणारी घरपोच सेवा त्यांना जास्त सोयीची वाटते. पण त्यांनाही आपापल्या उंच टॉवर्समधून खाली उतरून दूध, अंडी, ब्रेडच्या शोधात जवळपासच्या किराणा मालाच्या लहानसहान दुकानात यायला भाग पाडलं आहे, करोनाने…

७० च्या दशकापर्यंत हिंदी सिनेमांमधून दिसणारा तथाकथित समाजवाद या करोनाने पुन्हा वास्तवात आणला आहे. अगदी दोन महिन्यांपूर्वी सगळी सुखं हाताशी असणाऱ्यांसाठीही इतर कशापेक्षाही आज महत्त्वाचं ठरलं आहे ते अन्नधान्य, फळं- भाज्या, दूध अशा जीवनावश्यक वस्तू जवळपास, सहजपणे उपलब्ध होणं. किराणा दुकानदार, मेडिकलवाले, घर मदतनीस, स्वच्छता कर्मचारी, ठिकठिकाणचे सुरक्षारक्षक, रस्त्यावर उभं राहून काम करणारे पोलीस…

तिकडे अमेरिकेत तर करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ४० हजार नर्सेस आणि डॉक्टर्सना ग्रीन कार्ड देण्याचं घाटतं आहे. त्याचा सर्वाधिक फायदा एच वन बी किंवा जे टू व्हिसावर अमेरिकेत काम करत असलेल्या भारतीय नर्सेस आणि डॉक्टर्सना होणार आहे म्हणे. हे सगळे घटक समाजात किती महत्त्वाचे आहेत याचा यापूर्वी प्रकर्षाने विचार झाला होता का? आणि…

या सगळ्यापार महत्त्वाचा घटक म्हणजे देशाचा पोशिंदा शेतकरी. तो तिथे उन्हातान्हात, पाऊसपाण्यात जमिनीत गाडून घेऊन उभा होता, उभा आहे म्हणून या करोनाकहरातही आपण आहोत. विकासाची परिमाणं तपासण्याच्या नादात जगण्याची परिमाणंच बिनमहत्त्वाची ठरली होती. शाश्वत विकासाचा मुद्दा कानीकपाळी ओरडून सांगणाऱ्यांकडे कुणी लक्षही देत नव्हतं. आता करोनानंतरच्या काळात तरी श्रमांना प्रतिष्ठा मिळेल, जगण्याच्या मुलभूत गोष्टींना महत्त्व येईल अशी अपेक्षा आहे.