प्रतिनिधी –  response.lokprabha@expressindia.com

तृतीयपंथीयांची सखी
कृपाली बिडये  – सामाजिक कार्य

तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी कृपाली बिडये हिचे काम महत्त्वपूर्ण आहे. ‘अनाम प्रेम’ या संस्थेच्या पाठबळाने अवघ्या नऊ  तृतीयपंथीयांना सोबत घेऊन २००९ मध्ये सुरू  झालेली ‘आनंदी आनंद गडे’ ही चळवळ आज १५ राज्यांत पोहोचली आहे. सर्वसमावेशक समाजाचे तिचे स्वप्न आहे.

वर्षांनुवर्षे उपेक्षा, हेटाळणी सहन केलेल्या तृतीयपंथीयांना उशिराने का होईना ओळख मिळाली, हक्क मिळाले. पण, समाजाचा एक भाग म्हणून अद्याप त्यांचा स्वीकार झालेला नाही. त्यांची लैंगिकता अभेद्य भिंत बनून आजही वाट अडवून उभी राहते. ही भिंत पाडून टाकण्यासाठी सतत धडपडणाऱ्यांपैकी एक आहे कृपाली भास्कर बिडये.

टाळ्या वाजवत कोणी समोर आले की त्याला हातावर पाच-दहा रुपये टेकवून मार्गी लावण्याच्या पलीकडे काय करता येईल, याचा विचार कृपालीने केला. त्यांच्याशी मैत्री केली, त्यांचा विश्वास संपादन केला. ‘अनाम प्रेम’ या संस्थेच्या पाठबळाने अवघ्या नऊ  तृतीयपंथीयांना सोबत घेऊन २००९ मध्ये सुरू झालेली ‘आनंदी आनंद गडे’ ही चळवळ आज १५ राज्यांत पोहोचली आहे. बिगरतृतीयपंथी आणि तृतीयपंथीयांमध्ये लैंगिकता सोडता अन्य काहीही भेद नाहीत. ते एकमेकांमध्ये अगदी सहज मिसळू शकतात, हे दोन्ही बाजूंना पटवून देणे हेच या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी कृपाली आणि तिचे सहकारी एखाद्या कुटुंबाची तृतीयपंथीयांशी भेट घडवून आणतात.

कधी तृतीयपंथी एखाद्या कुटुंबाला त्यांच्या घरी आमंत्रित करतात आणि आपले अनुभव त्यांना सांगतात.  विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांतही संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या गटांना सहभागी करून घेतले जाते. समाजातील असा वावर वाढवल्यास दोन्ही वर्गातील त्या अदृश्य अभेद्य भिंतीला तडे जातील, प्रत्येक तृतीयपंथीयाला सन्मानाने जगण्याची संधी मिळेल आणि एक सर्वसमावेशक समाज निर्माण होईल, अशा विश्वासाने कृपाली काम करत आहे.

तृतीयपंथीयांबद्दल समाजाच्या मनात जशी भीती आहे, तशीच भीती त्यांच्या मनातही समाजाविषयी आहे. ती दूर करण्याचा मी प्रयत्न करते आहे. ‘लोकसत्ता’च्या मंचावरून हा विषय समाजासमोर आला. यामुळे लिंग वैविध्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल, अशी आशा आहे.

आश्वासक विज्ञानप्रसारक
अनिकेत सुळे  – सामाजिक कार्य

वैज्ञानिक प्रबोधन हे अनिकेतचे ध्येय बनले आहे. त्याने मुंबईत विज्ञानप्रसार करणाऱ्या समविचारी कार्यकर्त्यांचे जाळे तयार

केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा म्हणून, इंग्रजी आणि मराठीतून तो विपुल लेखन करतो. आश्वासक विज्ञानप्रसारक अशी ओळख त्याने निर्माण केली आहे.

भौतिकशास्त्रात मुंबई आयआयटीमधून अनिकेत सुळे याने पदव्युत्तर पदवी मिळवली होती. जर्मनीतील पोट्सडॅम विद्यापीठातून पीएच.डी. मिळवल्यानंतर परदेशात संशोधनाची, संपन्न आयुष्याची कवाडे त्याच्यासमोर खुली झाली होती, पण त्याऐवजी तो मायदेशी परतला. भारतीय समाजाने कित्येक शतके वागवलेले अंधश्रद्धांचे जोखड झुगारून द्यावे, यासाठी तो सध्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

अनिकेत भारतात परतला तोच अध्यापन आणि वैज्ञानिक प्रबोधन क्षेत्रात कार्य करण्याच्या उद्देशाने. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि समांतर विज्ञानाला मुख्य प्रवाहात मिळत असलेली मान्यता, प्रतिष्ठा पाहून हे चित्र बदलण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला. वैज्ञानिक प्रबोधन हे आता त्याच्या आयुष्याचे ध्येय झाले आहे. ते साध्य करण्यासाठी त्याने मुंबईत विज्ञानप्रसार करणाऱ्या समविचारी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे.

विज्ञानातील सिद्धान्तांना जेव्हा आव्हान दिले जाते, प्राचीन कालबा विद्यांचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो किंवा सायन्स काँग्रेससारख्या व्यासपीठावर जेव्हा विज्ञानेतर समजुतींचे प्रदर्शन मांडले जाते, तेव्हा अनिकेत त्याच्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा म्हणून, इंग्रजी आणि मराठीतून विपुल लेखन करतो. एक उच्चशिक्षित वैज्ञानिक कार्यकर्ता अशी स्वत:ची अगदी वेगळी पण, अभिमानास्पद ओळख त्याने निर्माण केली आहे.

‘लोकसत्ता’शी माझे जुने नाते आहे. १९९८ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ‘लोकसत्ता’मध्ये लिहीत होतो. त्याचा फायदा विज्ञानप्रसाराच्या कार्यात होत आहे. लोकांशी सोप्या भाषेत संवाद साधणे सहज शक्य होते. त्यामुळे ‘लोकसत्ता’कडून सन्मान होत असल्याचा एक वेगळाच आनंद आहे.

उपेक्षितांचा आश्रयदाता
विकास पाटील – सामाजिक कार्य

जन्मत:च अनाथपण वाटय़ाला आलेल्या विकासने आपल्यासारख्या वंचितांना संधी मिळाव्यात यासाठी लहानपणीच प्रयत्न केले. विकासने श्रीगोंद्यातच पारधी समाजातील मुलांसाठी वसतिगृह स्थापन केले आहे. तिथे राहून ८० विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीच्या मार्गावर चालत आहेत.

जन्म होताच त्याच्या वाटय़ाला अनाथपण आले. बालपणी अनाथाश्रमात त्याला अनेक पालक मिळाले. आई-वडिलांचे छत्र डोक्यावर नसतानाही आपल्याला मिळालेले प्रेम समाजातील अन्य उपेक्षित मुलांपर्यंत पोहोचावे, त्यांनाही आपल्याप्रमाणेच संधी मिळाव्यात म्हणून लहान वयातच त्याने प्रयत्न सुरू केले. श्रीगोंद्याच्या बाबा आमटे आश्रमात वाढलेल्या विकास बाळू पाटील याने आज श्रीगोंद्यातच पारधी समाजातील मुलांसाठी वसतिगृह स्थापन केले आहे. तिथे राहून ८० विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीचा सोपान चढत आहेत.

विकासचे ध्येय निश्चित होते. त्यामुळे २००८ मध्येच त्याने बाबा आमटेंच्या संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. तालुक्यात पारधी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. या समाजातील मुले गुन्हेगारीचा शिक्का कपाळी घेऊनच जन्माला येतात. समाजात शिक्षितांचे प्रमाण अत्यल्प. समाजाने झिडकारलेल्या या मुलांना समस्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी विकासने २०१२ साली त्यांच्यासाठी वसतिगृह स्थापन केले. तिथे राहणाऱ्या मुलांच्या शिक्षण, जेवण, कपडे या गरजा लोकसहभाग, वर्गणी, देणगीतून भागवल्या जातात. सहा वर्षांपुढील मुले इथे राहतात. काही दहावीत आहेत, दोन मुले सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. या मुलांमध्येही अन्य मुलांएवढय़ाच क्षमता आहेत. केवळ जातिभेदांमुळे त्यांना सन्मानाने जगण्याची संधी नाकारणे, अयोग्य आहे, असे विकासला वाटते. म्हणूनच पारधी समाजाच्या नव्या पिढीसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून देऊन तो त्यांच्या माथी बसलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

माणसाच्या आयुष्यात एकतरी ध्येय असावे. एक असे ध्येय जे तुम्हाला इतरांसाठी काम करायला प्रोत्साहीत करेल. इतरांसाठी काम करण्याच्या ध्येयानेच खरे यश मिळते, असे मला वाटते. ‘तरुण तेजांकित’चा हा पुरस्कार या ध्येयाकडे अधिक जोमाने वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी आहे.

जनहितैषी वकील
युवराज नरवणकर –  सामाजिक कार्य

युवराज नरवणकर मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतो. नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर पोलिसांसाठी तो सायबर गुन्हे, न्यायवैद्यक तपास, माहिती तंत्रज्ञान कायदा या विषयांवर वर्ग घेतो. युवराज याने मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे मोफत विधि सल्ला केंद्र सुरू केले आहे.

कायदेशीर पद्धतीने मोठय़ा कंपन्यांकडून जनआंदोलने दडपून टाकण्याच्या प्रकारांबाबत भारतात फारशी माहिती नाही. त्याविरोधात काम करणाऱ्यांचीही आपल्याकडे कमतरता आहे. युवराज नरवणकर या तरुणाने एकूण ४५० जनआंदोलने दाबून टाकण्याच्या प्रकारांना उच्च न्यायालयात जनहित याचिकांच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. यात कोल्हापूर येथील टोल प्रकरण, तेथील टीडीआर घोटाळा तसेच राज्यातील नर्सिग होम घोटाळा अशा अनेक आंदोलनांचा समावेश आहे.

युवराज नरवणकर मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतो. तिशीच्या आत म्हणजे २०१८ मध्ये लंडनमधील सगळ्यात जुन्या आणि अग्रणी अशा ‘चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ आर्ब्रिटेशन’ची फेलोशिप मिळवणारा तो एकमेव आहे. सिलिकॉन इंडियाने २०१७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या देशातील दहा वकिलांमध्ये त्याचा समावेश होता. सायबर लॉ मध्ये त्याने विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे.

भारतात सायबर कायद्याचे प्रशिक्षण देणाऱ्या ‘एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ’चा तो ‘टॉपर’ आहे. नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर पोलिसांसाठी तो सायबर गुन्हे, न्यायवैद्यक तपास, माहिती तंत्रज्ञान कायदा या विषयांवर वर्ग घेतो. तसेच लोकांना कुठल्याही अडचणींशिवाय कायदेशीर लढाई लढता यावी म्हणून युवराज याने मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे मोफत विधि सल्ला केंद्र सुरू केले आहे.

सामाजिक स्थित्यंतराचे भान राखणारा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा घटक मी न्यायपालिकेला मानतो. न्यायपालिकेचा अविभाज्य भाग म्हणजे वकील. ‘तरुण तेजांकित’ पुरस्काराने आज माझा झालेला सन्मान हा न्यायव्यवस्थेत निष्ठेने काम करणाऱ्या सर्व वकिलांचा सन्मान आहे, असे मला वाटते.

न्यायवैद्यक लेखा परीक्षक
अपूर्वा जोशी  –  नवउद्यमी

भारतातील न्यायवैद्यक लेखा परीक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे नाव म्हणजे अपूर्वा जोशी. सध्या ती रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीची संचालक आहे. ही कंपनी देशातील बडय़ा कंपन्यांबरोबरच परदेशातील कंपन्यांनाही सेवा पुरवते. परदेशातही शाखा सुरू करण्याचा तिचा मानस आहे.

भारतात न्यायवैद्यक लेखा परीक्षण( फॉरेन्सिक अकौंटिंग) क्षेत्रातील तज्ज्ञांची संख्या अल्प आहे. या क्षेत्रातील महिलांची संख्या तर अत्यल्पच. त्यातलेच एक महत्त्वाचे नाव म्हणजे अपूर्वा जोशी. सध्या ती रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीची संचालक आहे.

वाणिज्य विद्याशाखेची पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर तिने सनदी लेखापाल आणि कंपनी सचिव अभ्यासक्रमाची तयारी सुरू केली होती. फॉरेन्सिक अकौंटिंग क्षेत्रात तज्ज्ञांची वानवा असल्याचे लक्षात आल्यानंतर अपूर्वाने याच क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्टिफाईड फॉरेन्सिक अकौंटिंग प्रोफेशनल (सीएफएपी) आणि सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर (सीएफई) या अभ्यासक्रमानंतर तिने अमेरिकेत सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर अभ्यासक्रम पूर्ण केला. अपूर्वाने २०१२ मध्ये सोलापूर विद्यापीठासाठी फॉरेन्सिक क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमाची रचना करून दिली आहे. त्यानंतर देशभरातील अनेक संस्थांसोबत तिने काम केले. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यंची उकल करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी काम करतानाच तिने सुरू केलेली ‘फ्रॉड एक्स्प्रेस’ ही कंपनी नावारूपाला आली.  ‘फ्रॉड एक्स्प्रेस’ कंपनीच्या विलीनीकरणाचा रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीचा प्रस्ताव अपूर्वाने २०१३ मध्ये स्वीकारला. सध्या ही कंपनी देशातील बडय़ा कंपन्यांबरोबरच परदेशातील कंपन्यांनाही सेवा पुरवते. रिस्क्रप्रोचे कार्यालय बाणेर, पाषाण लिंक रस्ता, पुणे येथे असून, दुसरी शाखा नवी पेठेत आहेत. देशाबरोबरच परदेशातही शाखा सुरू करण्याचा अपूर्वाचा मानस आहे.

वाणिज्य हा विषय घेऊन सनदी लेखापाल किंवा बँकिंग क्षेत्राशी निगडित सरधोपट वाट निवडली जाते. परंतु फसवणूक प्रतिबंध(फ्रॉड प्रिव्हेन्शन)या क्षेत्राकडे फार कमी लोक वळतात. तंत्रज्ञान विकसित झाले तरी अद्याप हे क्षेत्र दुर्लक्षित आहे. या पुरस्कारामुळे या क्षेत्राची माहिती अधिक तरुणांपर्यत पोहोचेल आणि ते याकडे वळतील, अशी माझी आशा आहे. तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक गैरव्यवहार रोखण्यास मी प्रयत्नशील असेन.

पथदर्शी संशोधक
रोहित देशमुख  – नवउद्यमी

रोहितने जगभरातील ३५० हून अधिक जैवशौचालय निर्मितीचा अभ्यास केला. त्यानंतर अभियंता म्हणून कमावलेले कौशल्य पणाला लावत त्याने अवघ्या १२ हजारांत तयार होणाऱ्या जैवशौचालयाची निर्मिती केली. देशातील १५ राज्यांत त्याने निर्माण केलेली जैवशौचालये वापरात आहेत.

छोटय़ा जागेत दरुगधीमुक्त, ८० टक्के पाणीबचत करणाऱ्या जैवशौचालयाची निर्मिती फक्त १२ हजारांत होते, असे सांगितल्यास त्यावर कुणाचा विश्वास बसणे कठीण आहे. पण ग्रामीण भागात जन्मलेल्या रोहित देशमुख याने हे शक्य करून दाखवले आहे.

रोहितचा जन्म अमरावती जिल्ह्यतील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदूरजना गावातला. मुंबईतील फिनोलेक्स अकॅडमी येथे संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो पष्टिद्धr(१५५)म बंगालमधील खरगपूर येथे गेला. मात्र, शिक्षण अध्र्यावर सोडून तो पुण्यात परतला. पुणे एमआयडीसीतील एका कंपनीत तीन महिने काम केल्यानंतर तो गावी परतला. गावी शौचालयाची व्यवस्था नसल्याने जनतेला होणारा त्रास त्याला अस्वस्थ करायचा. त्यातून त्याने शौचालय बांधणीबाबत संशोधन केले. जगभरातील ३५० हून अधिक जैवशौचालय निर्मितीचा अभ्यास केला. अशा जैवशौचालयांची किंमत दीड लाखांच्या आसपास जाते. अभियंता म्हणून कमावलेले कौशल्य पणाला लावले. जैवइंधन प्रणालीवर काम करणाऱ्या तंत्राच्या मदतीने त्याने आणखी संशोधन केले. त्याने चार फायबरच्या भिंती आणि विशिष्ट टँक तयार करून अवघ्या १२ हजारांत तयार होणाऱ्या जैवशौचालयाची निर्मिती केली. हे जैवशौचालयामुळे पाण्याची ८० टक्के बचत होते.

हे जैवशौचालय फक्त पाच मिनिटांत उभे करता येऊ शकते. शिवाय ते सुमारे ४० वष्रे टिकते. त्याने तयार केलेली सुमारे २५ हजार जैवशौचालये राज्यभरात सध्या वापरात आहेत.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा तरुणांच्या पंखामध्ये बळ देणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. युवा तरुणांना यातून नक्कीच त्यांच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळते. हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच, शिवाय या रूपाने पाठीवर कौतुकाची थाप मिळल्याने काम करण्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

अस्थिरुग्णांचा तारणहार
निलय लाखकर  – नवउद्यमी

‘बोन ग्राफ्टिंगचे’ म्हणजेच अस्थिअभिरोपणाच्या तंत्रज्ञानास सध्या कमालीचे महत्त्व आहे. निलयचे या क्षेत्रातील संशोधन आज अस्थिभंग, तोंडाच्या कर्करोगातून बचावलेल्या व्यक्ती, दातांशी संबंधित आजार असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरले आहे. परवडणाऱ्या किमतीत असे उपचार व्हावेत, यावर निलयचा भर आहे.

केमिकल इंजिनीअर असलेल्या निलय लाखकरने संशोधनाला उद्योजकतेची जोड दिली आणि ‘सिंथेरा बायोमेडिकल प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना झाली. आज ‘सिंथेरा’ उच्च दर्जाच्या अस्थिअभिरोपण (बोन ग्राफ्ट) उत्पादनांची निर्मिती करणारी पहिली भारतीय कंपनी म्हणून ओळखली जाते. हाडांमध्ये उद्भवलेले दोष परवडणाऱ्या किमतीत दूर करणे हे या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

लहान-मोठय़ा अपघातामुळे, आघातामुळे अस्थिभंग होणे आणि तडा गेलेले हाड योग्य उपचारांनी पूर्वीसारखे होणे ही तशी सामान्य बाब. पण काही वेळा गंभीर अपघातांमुळे किंवा दुर्धर आजारांमुळे हाडाचे झालेले नुकसान, सहजासहजी भरून निघत नाही. अशा वेळी मदतीला येते ‘बोन ग्राफ्टिंग’चे म्हणजेच अस्थिअभिरोपणाचे तंत्रज्ञान. यात दुखापत झालेल्या जागी आपल्याच शरीरातील वा अस्थिपेढीतील किंवा कृत्रिम हाड बसवून इजा झालेल्या हाडाला पूर्ववत होण्यास मदत केली जाते. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचा पदवीधर असलेल्या निलयचे या क्षेत्रातील संशोधन आज अस्थिभंग, तोंडाच्या कर्करोगातून बचावलेल्या व्यक्ती, दातांशी संबंधित आजार असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरले आहे.

विविध शस्त्रक्रियांत त्याचा वापर केला जात आहे. अस्थिअभिरोपण करणाऱ्या अनेक तज्ज्ञांनी या भारतातच विकसित झालेल्या आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाची वाहवा केली आहे. भारतीय बनावटीची ही उत्पादने आज अनेक रुग्णांच्या हाडांना बळकटी देत आहेत.

‘लोकसत्ता’चा ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. यानिमित्ताने मला विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींसोबत मंचावर उपस्थित राहण्याची संधी मिळाली. या पुरस्कारासाठी मी ‘लोकसत्ता’चा खूप आभारी आहे.

सामान्यांचा न्यायमित्र
ऋषिकेश दातार – नवउद्यमी

२०१० मध्ये ऋषिकेशने बंगळूरु येथील नॅशनल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली. त्याने ‘वकीलसर्च डॉट कॉम’ ही कायदेशीर सल्ला देणारी फर्म सुरू केली. आज अनेकांना परवडणाऱ्या किमतीत कायदेशीर सल्ला ‘वकीलसर्च डॉट कॉम’च्या माध्यमातून ऋषिकेशने उपलब्ध करून दिला आहे.

वकिलीचा वारसा ऋषिकेश दातारला घरातूनच मिळाला होता. त्याचे वडील, आजोबा हे वकील. त्यामुळेच २०१० मध्ये ऋषिकेशने बंगळूरु येथील नॅशनल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आणि वर्षभराने कामाचा अनुभव घेऊन त्याने ‘वकीलसर्च डॉट कॉम’ ही कायदेशीर सल्ला देणारी फर्म सुरू केली. आज अनेकांना तसेच नवउद्यमींना खात्रीशीर, परवडण्याजोगी आणि सोप्या पद्धतीने कायदेशीर सल्ला ‘वकीलसर्च डॉट कॉम’च्या माध्यमातून ऋषिकेशने उपलब्ध करून दिला आहे.

ही ऑनलाइन सेवा असल्याने तात्काळ तसेच कोणत्याही वेळेला तिचा फायदा घेता येतो. केवळ कायदेशीर सल्लाच नव्हे तर सनदी लेखापाल आणि कंपनी सचिव आदींशी निगडित बाबी असोत, कंपनीचे ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट्स, कायदेशीर कागदपत्रं तयार करणे, करारनामा तयार करण्यासाठी कायदेशीर मदत आणि सल्ला देण्याचे कामही ‘वकीलसर्च डॉट कॉम’ करते. हे काम अधिक व्यापक पद्धतीने करण्याचे ऋषिकेशचे लक्ष्य आहे.

चेन्नई, बंगळूरु, हैदराबाद तसेच इतर महानगरांमध्ये आतापर्यंत २ लाखांहून अधिक जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. लहान वयात त्याने उभ्या केलेल्या या कार्याची दखल घेत त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात ‘रिट्ज आंत्रप्रिनर ऑफ द इयर’, तसेच फोब्र्जच्या यादीतील ३० च्या आतील यशस्वी वकील अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.

‘लोकसत्ता’ने माझ्या कामाला दाद दिली, हाच आनंदाचा क्षण आहे. काम करण्याची दिशा ठरवली की यश मिळतेच. त्यामुळे दिशेकडे वाटचाल करण्यासाठी अशा पुरस्कारांमधून प्रेरणा मिळते. प्रत्येक व्यक्तीने आयुष्याचे ध्येय निश्चित करून काम करत राहावे, असे मला वाटते.

बहुआयामी गणितज्ज्ञ
अपूर्व खरे  – संशोधन

अपूर्वने कोलकाता येथील प्रतिष्ठित संस्थेत सांख्यिकीचा अभ्यास केला आहे. येल  युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये कामाचा अनुभव घेतला आहे. जगभरातील सांख्यिकीविषयक परिषदांमध्ये त्यांची उपस्थिती असते. गणिताचा परीघ वाढविण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

गणिताचा बागुलबुवा अनेकांच्या मनात असला, तरी हा विषय प्रत्येकाचे आयुष्य व्यापून उरतो. गणिताची व्याप्ती आणि नानाविध क्षेत्रांतील अपरिहार्यता विचारात घेतल्यास, याचा प्रत्यय येतो. गणितज्ज्ञ अपूर्व खरे याचे संशोधनही अशाच विविध क्षेत्रांना स्पर्श करणारे ठरत आहे.

अपूर्वचे गणितातील संशोधन वित्तीय क्षेत्र, हवामान बदलासंदर्भातील अभ्यास, जैवसांख्यिकी अशा विभिन्न क्षेत्रांत उपयुक्त ठरत आहे. त्याच्या ‘पॉलिमॅथ’ प्रकल्पाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. गणिती पद्धतींचा वापर करून विविध समस्या सोडवण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.

अपूर्वने कोलकाता येथील प्रतिष्ठित संस्थेत सांख्यिकीचा अभ्यास केला. येल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये कामाचा अनुभवही घेतला. ‘सायन्स अँड इंजिनीअिरग रिसर्च बोर्ड’, अमेरिकेतील ‘द डिफेन्स अ‍ॅडव्हान्स रिसर्च एजन्सी’ आणि ब्रिटनमधील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर मॅथमॅटिकल सायन्स’ने त्याच्या अभ्यासाची दखल घेतली आहे. कॅनडामधील मॉन्ट्रियल, पेरूमधील कुस्को येथे आणि जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये त्याने मांडलेले विचार उल्लेखनीय ठरले आहेत. ब्राझिलमधील रिओ येथे अशाच एका परिषदेत त्याचे बीजभाषण होणार आहे. या परिषदेसाठी जगभरातून निवडण्यात आलेल्या दहा तज्ज्ञांमध्ये त्याचा समावेश आहे. गणिताचा परीघ केवळ संशोधनापुरताच मर्यादित नसून या विषयाचा अभ्यास पुढील पिढय़ांमध्ये विश्लेषणात्मक वृत्ती वृद्धिंगत करतो, असे अपूर्वला वाटते.

गणित हा एक जगण्याचा भाग आहे. गणित विषयाचा मला सार्थ अभिमान आहे. गणिताची अतिशय आवड असल्याने याच क्षेत्रात काम करण्याचे मी ठरवले आणि आज याच कामाला पुरस्काराच्या रूपाने पोचपावती मिळाल्याचा अधिक आनंद आहे.

बहुपेडी कलावंत
चिन्मय मांडलेकर – कला / मनोरंजन

चिन्मय मांडलेकर याने अभिनयाबरोबरच दिग्दर्शक, लेखक म्हणूनही स्वत:चा ठसा उमटवला आहे. चिन्मयने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मधून पदवी मिळवली. संत तुकारामांवरील ‘तू माझा सांगाती’ मालिकेतील मुख्य भूमिका चिन्मयचे अभिनय कौशल्य अधोरेखित करणारी ठरली.

चतुरस्र कलावंत म्हणून ओळख असलेल्या चिन्मय मांडलेकर याने दिग्दर्शक, लेखक म्हणूनही स्वत:चा ठसा उमटवला आहे.

चिन्मयने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मधून पदवी मिळवली. सुरुवातीला ‘आविष्कार’ नाटय़संस्थेबरोबरच अन्य प्रायोगिक नाटय़संस्थांमधून नाटकांत काम केले. सध्या तो ‘जुगाड’ या प्रायोगिक नाटकात काम करत आहे. ‘बेचकी’, ‘व्हॅक्युम क्लिनर’, ‘समुद्र’ या नाटकांचे लेखन-दिग्दर्शनही त्याने केले आहे.

‘अलबत्या-गलबत्या’चे दिग्दर्शन आणि ‘वाडा चिरेबंदी’ नाटय़त्रयीत त्याची भूमिका आहे. अनेक व्यावसायिक नाटकांतून अभिनेता म्हणून काम केले आहे. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये लेखन, तसेच त्यांतून अभिनय केला आहे. संत तुकारामांवरील ‘तू माझा सांगाती’ मालिकेतील मुख्य भूमिका चिन्मयचे अभिनय कौशल्य अधोरेखित करणारी ठरली. त्याने अनेक चित्रपटांसाठी लेखन केले आहे.

‘तेरे बिन लादेन’, ‘शांघाय’, ‘मोक्ष’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे. ‘झेंडा’, ‘क्रांतिवीर राजगुरू’, ‘मोरया’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘लोकमान्य-एक युगपुरुष’ आदी मराठी चित्रपटांत त्याने काम केले आहे. त्याच्याकडे उत्तम लेखन कौशल्यही  आहे. चिन्मयचे वृत्तपत्रीय सदरलेखनही वाचकप्रिय ठरले होते. राज्य सरकारच्या अनेक पुरस्कारांचा तो मानकरी आहे.

‘लोकसत्ता’शी वाचक म्हणून जोडलेला आहेच. आता या पुरस्काराच्या निमित्ताने हे नाते अधिक घट्ट झाले आहे. माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी ‘लोकसत्ता’चा कृतज्ञ आहे. तरुण वयात अशी कौतुकाची थाप मिळाली की अधिकाधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. भविष्याकडे पाहायला लावणारा पुरस्कार आहे. आपले काम निष्ठेने करत राहा, कधी ना कधी त्याची पोचपावती मिळतेच, याची प्रचिती या पुरस्काराने आली.

चतुरस्र अभिनेत्री
नंदिता पाटकर – कला / मनोरंजन

एकाच प्रकारच्या भूमिका साकारण्यापेक्षा दरवेळी नव्या व्यक्तिरेखा साकारण्यावर नंदिताचा भर आहे. पूर्णवेळ नाटय़-चित्रपट क्षेत्राचीच निवड करण्यापूर्वी काही काळ रेडिओ जॉकी म्हणूनही तिने काम केले. ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावरही तिने छाप पाडली.

लवचीक आवाज आणि सक्षम वाचिक अभिनय असलेल्या नंदिता पाटकरचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास हा महाविद्यालयापासूनच सुरू झाला. एकाच प्रकारच्या भूमिका साकारत आपली पठडी तयार करण्यापेक्षा दरवेळी नव्या व्यक्तिरेखा साकारण्यावर तिचा भर आहे. आविष्कार संस्थेत उर्मिला पवार यांचे ‘आयदान’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘इराक’, ‘जंगल मे मंगल’, ‘भेकड’, जयवंत दळवी यांच्या पुरुष नाटकावर आधारित ‘वर-खाली दोन पाय’ या प्रायोगिक नाटकांमध्ये तिने भूमिका साकारल्या. ‘इदं न् मम’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातील तिच्या भूमिकेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले.

आतापर्यंत प्रामुख्याने गंभीर भूमिका साकारलेल्या नंदिताची विनोदाची जाणही ‘आमच्या हिचं प्रकरण’ या नाटकात साकारत असलेल्या भूमिकेतून रसिकांना भावली आहे. पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या ‘दीपस्तंभ’ या नाटकातूनही त्या भूमिका साकारत आहेत. ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावरही तिने छाप पाडली. ‘पाशबंद’, ‘रंगा-पतंगा’, ‘डब्बा ऐस-पैस’, ‘लालबागची राणी’ आदी चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेने तिला घराघरात पोहोचवले. पूर्णवेळ नाटय़-चित्रपट क्षेत्राचीच निवड करण्यापूर्वी काही काळ रेडिओ जॉकी म्हणूनही तिने काम केले. अनेक शैक्षणिक कार्यक्रमांसाठी ती ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणूनही काम करते. अभिनय आणि इतर क्षेत्रांतील तिच्या जाणकारीची छाप समाजमनावर कोरली गेली आहे.

‘लोकसत्ता’च्या या पुरस्काराने कौतुकाची थाप मिळाल्याचा आनंद आहेच, परंतु त्यासोबतच कामाची जबाबदारी वाढल्याची भावनाही मनात निर्माण झाली आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या समवयस्क व्यक्तींच्या कामाची माहिती मिळाली. कार्यक्रमामध्ये संगीत आणि विचारांची पर्वणीही अनुभवली.

संवेदनशील कलाकार
जितेंद्र जोशी – कला / मनोरंजन

जितेंद्रचा कलासृष्टीतील प्रवास प्रेरणादायी आहे. ‘तुकाराम’, ‘दुनियादारी’, ‘पक पक पकाक’, ‘माझी माणसं’, ‘गोलमाल’, आदी मराठी चित्रपटांतील आणि ‘सिंघम रिटर्न्स’, ‘द अ‍ॅक्ट्स ऑफ २६/११’, ‘पंगा ना लो’ या हिंदी चित्रपटांबरोबरच दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखांना रसिकांची दाद मिळाली. सामाजिक भान जपणारा कलावंत म्हणून त्याची ओळख आहे.

‘मु. पो. बोंबिलवाडी’ या लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या नाटकातून जितेंद्र शकुंतला जोशीचा कलासृष्टीतील प्रवास सुरू झाला. अनेक वळणे घेत नाटक, चित्रपट, मालिका यांपासून ते अलीकडे नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजपर्यंत हा प्रवास पोहोचला आहे. ‘हम तो तेरे आशिक है’, ‘नकळत सारे घडले’, ‘प्रेम नाम है मेरा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘दोन स्पेशल’ या व्यावसायिक नाटकांतून त्याने विविधांगी भूमिका साकारल्या.

‘लोकसत्ता संपादक शिफारस’ मिळालेल्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाची निर्मितीही त्याने केली होती. अनेक गुजराती नाटकांमधील त्याच्या भूमिकाही गाजल्या. ‘तुकाराम’, ‘व्हेंटिलेटर’, ‘दुनियादारी’, ‘पक पक पकाक’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘माझी माणसं’, ‘गोलमाल’, ‘आयला रे’, ‘घर दोघांचं’, ‘सुंबरान’, ‘शाळा’, ‘म्हैस’, ‘पोस्टर गर्ल’, ‘भारत माझा देश आहे’, या मराठी चित्रपटांतील आणि ‘सिंघम रिटर्न्स’, ‘द अ‍ॅक्ट्स ऑफ २६/११’, ‘पंगा ना लो’ या हिंदी चित्रपटांबरोबरच दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखांना रसिकांची दाद मिळाली.

गेल्या वर्षी भारतीय मनोरंजन उद्योगाची गणिते बदलायला लावणाऱ्या नेटफ्लिक्सवरच्या ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेत त्याची मनस्वी पोलिसाची भूमिका अफाट गाजली. अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनातून तो दर्शकांशी जोडला जात आहे. संवेदनशील

कवी ही त्याची आणखी एक ओळख. सामाजिक भान जपत ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळी गावांमध्येही त्याने काम केले.

माझ्या जडणघडणीमध्ये ‘लोकसत्ता’चा मोठा वाटा आहे. निसर्ग आणि समाज माझ्या आयुष्यातील गोष्टी जुळवून आणतोय. मीही उत्साहाने आणि ऊर्जेने पुढे वाटचाल करत आहे. अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी हा पुरस्कार नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

प्रतिभावान ग्रँडमास्टर
विदित गुजराथी – क्रीडा

२००९ मध्ये विदित आंतरराष्ट्रीय मास्टर आणि २०१३ मध्ये ग्रँडमास्टर झाला. २०१७ मध्ये त्याने आइल ऑफ मान स्पर्धेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला झुंजवले होते. विश्वनाथन आनंद नंतर भारतीय बुद्धिबळ जगज्जेता होण्याची क्षमता त्याच्यात आहे, असे विश्लेषकांचे मत आहे.

विश्वनाथन आनंद आणि पेंटाल्या हरिकृष्णन यांच्यानंतर एलो २७०० गुणांच्या वरचे मानांकन असलेला तिसरा भारतीय ग्रँडमास्टर म्हणजे विदित गुजराथी. २८ वर्षीय विदित सध्या जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानी आहे. नुकत्याच नेदरलँड्स येथे झालेल्या ‘टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत’ विदितने जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि भारताचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद यांना बरोबरीत रोखले, तर माजी जगज्जेता व्लादिमीर कॅ्रमनिक आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शाखरियार मामेद्यारॉव यांच्यावर मात केली.

२००९मध्ये विदित आंतरराष्ट्रीय मास्टर आणि २०१३ मध्ये ग्रँडमास्टर झाला. यापूर्वी १४ वर्षांखालील मुलांच्या गटात त्याने भारताच्या वतीने पहिले जगज्जेतेपद पटकावले. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात तो संयुक्त विजेता ठरला होता.

२०१७मध्ये त्याने आइल ऑफ मान स्पर्धेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला झुंजवले होते. कार्लसन नशिबाने वाचला. जगातील एक उत्कृष्ट बुद्धिबळपटू नेदरलँड्सचा अनीश गिरी याचा साहाय्यक म्हणूनही विदितने काही काळ काम केले आहे.

विदितला बुद्धिबळजगतात त्याच्या अभ्यासपूर्ण ट्वीट्ससाठीही ओळखले जाते. विश्वनाथन आनंद नंतर भारतीय बुद्धिबळ जगज्जेता होण्याची क्षमता त्याच्यात आहे, असे विश्लेषकांचे मत आहे. त्याची कामगिरी पाहता तो त्याच मार्गावर वाटचाल करत असल्याचे दिसते.

या पुरस्काराच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने माझ्या कामाची दखल घेतली, याबद्दल मी आभारी आहे. या पुरस्कार सोहळ्यामुळे  जनतेला अनेक कर्तृत्ववान तरुणांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. त्यामुळे  अनेक तरुणांना त्यांच्या क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी नक्कीच बळ  मिळेल.

लक्ष्यवेधी सुवर्णकन्या
राही सरनोबत – क्रीडा

विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला, म्हणून राही ओळखली जाते. राही सरनोबतचा प्रवास या सुवर्णपदकाएवढाच झळाळता आहे. राही राज्य शासनाच्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी आहे. टोकियो ऑलिम्पिक हे तिचे पुढचे लक्ष्य आहे.

कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतचा खेळ पाहून तिच्याच जिल्ह्यतील आणखी एका मुलीने नेमबाजीत कारकीर्द घडवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. आज विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला, म्हणून ती ओळखली जाते. कोल्हापूरच्या राही सरनोबतचा प्रवास या सुवर्णपदकाएवढाच झळाळता आहे.

पुण्यात २००८ साली झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत राहीने २५ मीटर पिस्तूल गटात सुवर्णपदक पटकावले आणि नेमबाजीच्या क्षेत्रात गरुडभरारी घेण्यास प्रारंभ केला. २०१०मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदके पटकावली. २०११ साली विश्वचषकात कांस्य पदक मिळवत ती लंडन ऑलिम्पिक्ससाठी (२०१२) २५ मीटर पिस्तूल प्रकारात पात्र ठरली. या प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिली महिला नेमबाज ठरली. २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पुन्हा सुवर्ण कामगिरी केली. २०१५मध्ये तिला मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले.

२०१६ मध्ये तिला हाताच्या दुखापतीने ग्रासले. दुखणे वाढत गेले आणि शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. यात तब्बल दीड वर्ष वाया गेले. पण, त्यातून सावरताच तिने पुन्हा जोमाने सराव सुरू केला. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. राही राज्य शासनाच्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी आहे. तिचे पुढचे लक्ष्य आहे टोकियो ऑलिम्पिक. या लक्ष्यवेधासाठी ती सध्या सज्ज होत आहे.

‘लोकसत्ता’चे स्थान माझ्या आयुष्यात फार मोठे आहे. त्यामुळे इतर पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे. पुरस्काराच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’शी नाते जोडण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. तरुणांनी नि:स्वार्थ भावनेने क्रीडा क्षेत्रात यावे. त्यांना मी नक्कीच मदत करेन.