18 February 2019

News Flash

दीर्घकालीन गुंतवणुकीचा सिप!

अगदी सुरुवातीपासून आणि अगदी लहान रकमेपासून एसआयपीमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली तर त्याचा दीर्घकालीन फायदा होतो.

म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे

प्रा. कौस्तुभ जोशी – response.lokprabha@expressindia.com
आपल्या हातात पैसे असतील तेव्हा गुंतवणूक करू असा विचार न करता अगदी सुरुवातीपासून आणि अगदी लहान रकमेपासून एसआयपीमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली तर त्याचा दीर्घकालीन फायदा होतो.

भारतात १९९१ नंतर नवीन आíथक धोरणामुळे जे बदल झाले, त्यातील एक सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भांडवली बाजाराचा झालेला विकास आणि त्यासाठी योजल्या गेलेल्या सुधारणा. भांडवली बाजाराचा झालेला विकास जसा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरला, त्याचप्रमाणे तो गुंतवणूकदारांसाठीसुद्धा भरभरून लाभ देणारा ठरला. पारंपरिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे आणि भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करणे या दोघांमध्ये असलेला परताव्याचा (Returns) फरक गुंतवणूकदारांना समजला तो याच उदारीकरणाच्या नंतरच्या काळात!

‘भांडवली बाजारामध्ये (Capital Markets) गुंतवणूक करणे म्हणजे नुसतेच शेअर्स विकत घ्यायचे’ हा एक गैरसमज आहे. मात्र म्युच्युअल फंड  सर्वसामान्य गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात घट्टपणे पाय रोवता यावेत, अशी संधी उपलब्ध करून देतो. ज्यांना शेअर्सविषयी ज्ञान आहे किंवा शेअर्समध्ये कशा प्रकारे गुतंवणूक करायची याची पूर्ण माहिती आहे, याच लोकांना भांडवली बाजारात गुंतवणूक करता येते या विचाराला छेद देणारा एक समर्थ पर्याय म्हणजेच म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आपण एक उदाहरण घेऊ या. असं गृहीत धरू की एखाद्या व्यक्तीला शेअर्समध्ये किंवा भांडवली बाजारात गुंतवणूक करायची आहे, मात्र तिच्याकडे असलेलं ज्ञान हे त्यासाठी परिपूर्ण नाही. दुसरी एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला भांडवली बाजाराचं पुरेसं ज्ञान आहे, मात्र तिच्याकडे असलेलं भांडवल हे मर्यादित स्वरूपाचं आहे. तिसरी व्यक्ती अशी आहे की, जिच्याकडे भांडवलही आहे, जिला शेअर बाजाराचं ज्ञान आहे. मात्र त्या व्यक्तीच्या दैनंदिन कामाचं स्वरूप पाहता शेअरबाजाराचा अभ्यास तिला जमणार नाही. वरील उल्लेखिलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्युच्युअल फंड ही एक अत्यंत लाभदायी आणि दीर्घकालीन गुंतवणूक फलद्रूप करणारी योजना आहे.

म्युच्युअल फंडाचा इतिहास हा भारतामध्ये यूटीआय (UTI) पासून सुरू होतो. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (Unit Trust of India) ही सार्वजनिक क्षेत्रातली भारत सरकारची कंपनी पूर्वी अशा प्रकारच्या योजना देत असे. उदारीकरणानंतरच्या काळात म्युच्युअल फंड हा व्यवसाय खासगी कंपन्यांनासुद्धा खुला झाल्यानंतर गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध झाले.

म्युच्युअल फंड्स म्हणजे काय?

म्युच्युअल फंड या नावातच ‘म्युच्युअल’ म्हणजे दोघांना लाभदायक अशा प्रकारचा एक अर्थ येतो. म्युच्युअल फंडाची कामगिरी ही अन्य पारंपरिक गुंतवणूक योजनांपेक्षा सरस ठरण्यामागचं मुख्य कारण म्हणजे भारतीय भांडवली बाजाराचीच कामगिरी ही गेल्या १५-२० वर्षांमध्ये वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. २००८ साली आलेली आíथक मंदी आणि त्यानंतरची काही र्वष हा भांडवली बाजाराचा प्रवास हा थोडा चढउताराचा राहिलेला होता. मात्र १९९१ पासून २०१८ या दीर्घकालीन फायद्याचा विचार केला तर बँक, पोस्ट आणि कंपन्यांचे फिक्स डिपॉझिट यांच्या तुलनेत भांडवली बाजाराने नेहमीच चांगल्या नफ्याचा परतावा दिलेला आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक किती सुरक्षित?

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीच्या आधीन असते, असं वाक्य प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या जाहिरातीमध्ये आपण बघतो! मात्र तसं असलं तरी त्यामध्ये असलेली पारदर्शकता तसेच सेबी आणि अन्य यंत्रणांचं त्यांच्यावर असलेलं नियंत्रण यामुळे म्युच्युअल फंड हा नियमित आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळला जाणारा व्यवसाय आहे. यामध्ये एरवी जसे शेअर्स विकत घेतले जातात तसं काही विकत न घेता तुम्हाला तुमचे पसे हे म्युच्युअल फंड कंपनीच्या एका फंडात गुंतवायचे असतात. उदा. एखाद्या फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक केलीत आणि त्याची एनएव्ही (NAV) ५० रुपये असेल तर तुम्हाला एनएव्ही आणि तुम्ही केलेली गुंतवणूक याच्या तुलनेत युनिट्स दिले जातील. म्हणजे त्या फंडाची एनएव्ही ही ५० रुपये आहे आणि तुम्ही पाच हजार रुपये गुंतवलेत तर पाच हजार भागिले ५० एवढे युनिट्स तुमच्या नावावर जमा होतील. तुम्ही जसजसे त्या फंडात पसे गुंतवाल तसतसे तुमचे युनिट्स वाढतील. त्या फंडाने ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या शेअर्सचं मूल्य वाढल्यानंतर आपोआपच त्या फंडाचंदेखील मूल्य वाढेल. म्हणजे तुमची एनएव्ही ही कदाचित दोन वर्षांनंतर ५०ची वाढून १०० झालेली असेल. याचा अर्थ तुमचे पसेसुद्धा दुप्पट झाले. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या फंडाचा परतावा म्हणजेच तुमच्या फंडाच्या एनएव्हीमध्ये असलेला फरक.

एसआयपी आणि एकरकमी गुंतवणूक

सर्वसामान्यपणे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केलात तर तुमची जोखीम कमी होते. कारण भांडवली बाजारामध्ये होणारे चढउतार हे रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजमुळे पचविले जातात. ते कसे तर अत्यंत सोपा मार्ग म्हणजे पसे म्युच्युअल फंडात एकरकमी न गुंतवता ते पसे तुम्ही दरमहा त्या फंडामध्ये गुंतवले पाहिजेत. ज्याप्रमाणे बँकेमध्ये आपण रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट उघडतो, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडामधलं रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच तुमचं एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) हे नवीन टूल होय.

एसआयपीमध्ये तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही जो फंड निवडता त्या फंडामध्ये तुम्हाला एक ठरावीक रक्कम महिन्याच्या एका ठरावीक तारखेला भरावी लागते. याची पद्धत अत्यंत सोपी आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता (एसआयपीद्वारे) त्यावेळेला फॉर्म भरताना तुम्हाला दर महिन्याला पसे भरायचे आहेत, की तीन महिन्यांनी भरायचे आहेत यातला पर्याय निवडायचा असतो. साधारणत: एसआयपी ही महिन्या महिन्यालाच केलेली उत्तम. त्यामध्येसुद्धा तुम्हाला तारखांचा पर्याय मिळतो. काही म्युच्युअल फंड कंपन्या तुम्हाला हव्या त्या तारखेला एसआयपी करू देतात तर काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी ठरावीक तारखा दिलेल्या असतात, त्यातील एक तारीख निवडून त्या दिवशी तुमच्या बँक खात्यातून पसे आपोआप वळते होतात (ईसीएस) आणि तेवढय़ा रुपयांचे त्या दिवशीच्या एनएव्हीच युनिट्स हे तुमच्या नावावर जमा होतात.

एसआयपी किती रुपयांची करावी?

बऱ्याचदा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना असं वाटतं की त्यांच्याकडे जास्त पैसे असतील तरच ते म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र असं नाहीये. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला ठरावीक, छोटी का होईना रक्कम गुंतवायची असेल तर ती रक्कम तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून गुंतवू शकता. एसआयपीचा उद्देश हा म्युच्युअल फंडामध्ये दरमहा ठरावीक गुंतवणूक करून तुमची म्युच्युअल फंडातली बचत ही नियमितपणे व्हावी हा उद्देश आहे.

एसआयपीचा आणखी एक फायदा म्हणजे छोटय़ाशा रकमेपासून सुरुवात करता येते. दरमहा अगदी ५०० रुपयांपासून एसआयपी सुरू केली तरी चालते. त्यामध्ये एक फायदा असा होतो की मार्केटमध्ये (सेन्सेक्स, निफ्टी) जे चढउतार येतात त्या चढउताराचा नेमका फायदा आपल्या गुंतवणुकीला होतो. तुम्हाला दीर्घकालीन आíथक उद्दिष्ट साकार करायचं असेल तर तुम्ही ते एसआयपीच्या माध्यमातून जरूर साकारू शकता. उदा. एखाद्या व्यक्तीला तिच्या मुलीच्या देशांतर्गत किंवा परदेशातील शिक्षणासाठी एक मोठी रक्कम १० ते १५ वर्षांनंतर हवी आहे. तिने एक ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवली तर त्यामधून निश्चितच मोठा फायदा होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही तुमची रक्कम नेमकी कुठे गुंतवली जातेय यासंबंधी सर्व माहितीही म्युच्युअल फंडांच्या वेबसाइटवर उपलब्ध असल्यामुळे त्यातला धोका कमी होतो.

टाइम आणि मार्केट

भांडवली बाजाराच्या निर्देशांकातील चढउतार नेमके कसे आणि कधी होतात याचा नेमका अंदाज व्यक्त करणं हे निव्वळ अशक्य आहे ! तुम्ही  सर्वसामान्य गुंतवणूकदार असाल किंवा तुमचा भांडवली बाजाराचा अभ्यास तगडा नसेल, तर तुम्ही भांडवली बाजार वर जाऊ शकतो किंवा कधी तो खाली येऊ शकतो याविषयी निश्चित अनुमान काढू शकत नाही. आणि अशा वेळेला तुमच्या मदतीला धावून येणारं जे अस्त्र म्हणजे एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान.) म्हणजेच बाजाराचा कल नकारात्मक असतो तेव्हाही तुमचे पसे मार्केटमध्ये येत असतात आणि बाजार तेजीत असतो तेव्हाही तुमचे पसे मार्केटमध्ये येत असतात. समजा तुम्ही एखाद्या मिडकॅप फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि समजा मिडकॅप कंपन्यांचे समभाग घटले तर त्या मिडकॅप फंडांची एनएव्हीसुद्धा कमी होते. तसेच शेअर बाजार तेजीत असतो त्यावेळी तुमच्या मिडकॅप फंडाची कामगिरीही दमदार होऊ शकते.

सोबत दिलेल्या कोष्टकावरून तुम्हाला याचा अंदाज येईल. यालाच साध्या भाषेमध्ये रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेज असं म्हणतात. रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंगचा फायदा हा दीर्घकाळात किती होतो हे फंडांच्या कामगिरीवरून लक्षात येईल.

तरुणांसाठी एसआयपी

दीर्घकालीन फायद्यासाठी तरुणांना आपण पसे कुठे गुंतवले पाहिजेत, याचा विचार करायचा असेल तर एसआयपी हा राजमार्ग आहे, असं आपल्याला म्हणता येईल. एखाद्या नुकत्याच कमवायला लागलेल्या, नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू केलेल्या पंचविशीतल्या तरुणाने पुढच्या २० ते २५ वर्षांचा कालावधी समोर ठेवून एसआयपीमध्ये दरमहा ठरावीक गुंतवणूक केल्यास त्याला निश्चितच अत्यंत लाभदायक परतावा मिळू शकतो. हे तरुणांसाठी मुद्दाम यासाठी सांगायचं की, गुंतवणूक सुरू करायची वेळ आली की बहुधा लोक दोन गोष्टींचा विचार करतात. नुकतेच पसे कमवायला लागल्यामुळे आता लगेच कुठे गुंतवणूक करायची किंवा जास्त पसे जमले की करू गुंतवणूक सुरू. पण असा विचार न करता अगदी छोटय़ा माफक रकमेपासून गुंतवणूक सुरू केली पाहिजे. आणि अशी गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी म्हणजे चांगली संधी आहे.
(या लेखात दिलेली फंडांची नावे प्रातिनिधिक आहेत, गुंतवणूक करताना वित्तनियोजकाचा सल्ला घ्यावा.)
(लेखक गुंतवणूक सल्लागार आहेत आणि अर्थशास्त्राचे अध्यापन करतात.)

First Published on July 27, 2018 1:09 am

Web Title: long term investment 2