13-lp-hanuman-mapसमाजाला बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी समर्थ रामदासांनी सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात हनुमान मंदिरांची स्थापना केली. हनुमानच का तर तो शक्तीचं प्रतीक आहे !

‘शुभमंगल सावधान’ हे शब्द कानावर पडताच राणूबाईंचा नारायण बोहल्यावरून जो पळाला, आणि त्याच्या पायाला जी भिंगरी लागली ती आयुष्यभर! एकाच ठिकाणी कायमची वस्ती करायची नाही, फिरत राहायचे, अख्खा देश पालथा घालायचा या एकाच ध्येयाने तो अक्षरश: भारतभर हिंडला. कालांतराने नारायणाचा रामदास आणि रामदासाचे समर्थ झाले, तरीसुद्धा भ्रमंती, देशाटन चालूच होते. विश्वाची चिंता करणारे समर्थ हिंडत होते, फिरत होते, जनमानस समजून घेत होते. भारतभ्रमण केल्यावर त्यांच्या मनातली देशप्रेमाची ऊर्मी स्वस्थ बसू देईना. सह्यद्रीची ओढ अनावर होतीच. सह्यद्री आहेच असा.. माणूस एकदा त्याच्या प्रेमात पडला की त्याच्या रौद्र, राकट सौंदर्याची भूल माणसावर पडतेच. दऱ्याखोरी, गुहा, लेणी आणि गडकोट किल्ले ही सह्यद्रीची संपत्ती माणसाला मोहवून टाकते. समर्थदेखील अशाच तीव्रतेने सह्यद्रीकडे ओढले गेले. याच सह्यद्रीला साथीला घ्यायचे आणि त्याच्याच कुशीत आपला पंथ स्थापन करायचा. संघटना बांधायची, तरुणांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांना व्यसन लावायचे ते बलोपासानेचे! आणि आपल्या हृदयातला मारुतीराया मूर्तीरूपाने त्यांच्यासमोर उभा करायचा.

aishwarya narkar shares her fitness goals
ऐश्वर्या नारकरांनी दिला आठवणींना उजाळा, शेअर केला लेकाबरोबरचा जुना फोटो; म्हणाल्या, “संतूर आई…”
Aishwarya narkar and avinash narkar dance on south song reel viral
Video: नारकर कपलचा दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स, अविनाश नारकरांची एनर्जी पाहून नेटकरी म्हणाले, “काका, जबरदस्त एकदम…”
Alia Bhatt namaskar vahini video viral
Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ
Aishwarya Narkar And Avinash Narkar Son Amey dance video viral
Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाचा जबरदस्त डान्स पाहिलात का? कलाकार मंडळीही म्हणाले, “खतरनाक…”

नेमके त्याच वेळी सह्यद्रीच्याच साथीने शिवराय आणि त्यांच्या जिवलगांनी आदिलशाहीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. स्वराज्य निर्मितीची भावना जनमनात रुजवली होती. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. यावेळी समर्थ आले महाबळेश्वरी. उंच जागा, रम्य ठिकाण. पाच नद्यांचा उगम होतो इथून. गर्द राई, असंख्य वनस्पती. पुरातन देवालय आणि नीरव शांतता. इथून जर आपल्या कार्याला सुरुवात केली तर आपला संदेश या पाचही नद्या महाराष्ट्रभर पोचवतील. आपली धर्मध्वजा अशी उंचावरून फडकायला हवी. सह्यद्रीने स्फूर्ती दिली. महाबळेश्वराने कौल दिला आणि त्यांच्या साक्षीने समर्थानी गर्जना केली,

‘मराठा तितुका मेळवावा ।

महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’

‘‘जय जय रघुवीर समर्थ’’

साताऱ्याजवळ असलेल्या जरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन समर्थानी आपले कार्य सुरू केले. जरंडेश्वरच्या मारुतीरायासमोर उभे राहिल्यावर त्यांना एकदम स्फुरले.

रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती

जो नरात वानरात भक्तीप्रेम वित्पती

दास दक्ष स्वामिपक्ष निजकाज सारथी

वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती।।

बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात समर्थानी करताना तरुणांसमोर शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली.

सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थानी हे ११ मारुती स्थापन केले. एका दिवसात किंवा दोन दिवसांत या सर्व मारुतींचे दर्शन आपण घेऊ  शकतो. आता रस्ते आणि वाहनांची सुविधा चांगली असल्यामुळे इथे जाणे तुलनेने सोयीचे झालेले आहे. कुठल्या मारुतीचे दर्शन आधी घ्यावे, कोणाचे नंतर घ्यावे असे काहीही नाही. मुळात समर्थानी असे कोणतेही अवडंबर कधीच माजवले नाही. त्या त्या ठिकाणी त्यांनी बलोपासनेसाठी मारुतींची स्थापना केलेली दिसते. तरीसुद्धा भटकंतीसाठी भौगोलिकदृष्टय़ा त्यांचा जिल्हावार असा विचार करता येईल.

सातारा जिल्हा :

चाफळचा वीर मारुती आणि प्रताप मारुती, माजगाव, शिंगणवाडी, उंब्रज, मसूर, शहापूर.

सांगली जिल्हा :

शिराळे, बहे बोरगाव.

कोल्हापूर जिल्हा :

मनपाडळे, पारगाव

02-lp-hanumanचाफळचा वीर मारुती

सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज या गावी चिपळूणकडे जाणारा फाटा आहे. इथे उजवीकडे वळले आणि पुढे गेले की एक रस्ता पुन्हा चाफळला जातो. उंब्रजवरून जेमतेम ११ किमी वर चाफळ आहे. शके १५५९ म्हणजेच इ.स. १६४८ मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थानी चाफळ इथे एक सुंदर मंदिर बांधून केली. याच राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना इस १६४९मध्ये समर्थानी केली. प्रभू रामचंद्रांच्या समोर नम्रभावाने हात जोडून उभ्या असलेल्या या मारुतीच्या मूर्तीची उंची सहा फूट एवढी आहे. जणू काही प्रभूरामाच्या चरणी या मारुतीचे नेत्र स्थिर असल्याचे जाणवते. १९६७ साली कोयनेचा भूकंप झाला त्यात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोचली नाही, असे सांगितले जाते.

03-lp-hanumanप्रताप मारुती/भीम मारुती/वीर मारुती

चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे अंदाजे १०० मीटर चालत जावे. तिथे रामदासस्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर आजही शाबूत आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे. पुच्छ ते मुरडिले माथा, कमरेला सोन्याची कासोटी, त्याला घंटा किणकिणताहेत, नेटका, सडपातळ, डोळ्यातून जणू अग्नीवर्षांव होतो आहे अशा रौद्र मुद्रेत आहेत. मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे.

दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चाफळ हे समर्थ संप्रदायाचे प्रमुख केंद्र असल्यामुळेच कदाचित समर्थानी इथे दोन मारुतींची स्थापना केलेली दिसते.

04-lp-hanumanमाजगावचा मारुती

चाफळपासून फक्त तीन किमी अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्टय़ आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. माजगावच्या वेशीवर एक घोडय़ाच्या आकाराचा दगड होता. गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे समर्थानी शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० मध्ये याच धोंडय़ावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. पाच फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळ
च्या राममंदिराकडे तोंड करून उभी आहे. अंदाजे १०० चौरस फूट लांबी-रुंदीचे, कौलारू, माती-विटांचे मूळ मंदिर आता जीर्णोद्धार केल्यावर अगदी वेगळे दिसते. जमिनीला फरशा, मंदिराशेजारी ध्वज, सुबक असा दरवाजा, रंगकाम असे हे आताचे स्वरूप आहे. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडेच या मंदिराचे व्यवस्थापन आहे. सध्या या मंदिरात एक शाळा भरते.

05-lp-hanumanशिंगणवाडीचा मारुती

यालाच खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती असेही म्हटले जाते. चाफळपासून जेमतेम एक कि.मी. अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे जवळच समर्थाची ध्यान करण्याची जागा असलेली रामघळ आहे. याच ठिकाणी शके १५७१ अर्थात इ.स. १६५० मध्ये समर्थानी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. जेमतेम चार फूट उंचीच्या उत्तरेकडे तोंड केलेल्या हनुमंताच्या मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते. उजवा हात चपेटदान मुद्रेत म्हणजे उगारलेल्या स्थितीत आहे. सहा फूट लांबी-रुंदी असलेले हे मंदिर ११ मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. या मंदिराला सभामंडप नाही परंतु आजूबाजूला दाट वृक्ष मात्र आहेत. टेकडीच्या पश्चिमेला एक ओढा असून त्याच्या काठीसुद्धा वृक्षांची दाटी आहे. उंचावर असलेल्या या मंदिराचा कळस तांबडय़ा रंगाने रंगवलेला असल्याने लांबूनसुद्धा दृष्टीस पडतो. चाफळच्या आधी समर्थाचा मठ इथेच शिंगणवाडीला होता.

एखाद्या स्थानाशी निगडित कुठली तरी कथा असेल तर त्या स्थानाचे महत्त्व अजून वाढते. त्याचे आकर्षण निर्माण होते. शिंगणवाडीबद्दलसुद्धा काहीसे असेच आहे. इथे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शिवराय आणि समर्थाची भेट झाल्याचे सांगतात. त्याचप्रमाणे शिवरायांची तहान भागवण्यासाठी इथे समर्थानी आपल्या कुबडीने एक दगड उलथवून टाकला आणि त्याखाली
असलेला पाण्याचा प्रवाह वाहता केला, त्यामुळे या ठिकाणाला ‘कुबडीतीर्थ’ असे नाव मिळालेय.

06-lp-hanumanउंब्रजचा मारुती/ मठातील मारुती

चाफळचे दोन आणि माजगावचा मारुती पाहून आपण पुन्हा उंब्रज इथे येतो. इथेच जवळ आता तीन मारुती आहेत. त्यातला एक हा उंब्रजचा मठातील मारुती. इथल्या मारुतीमंदिराशी आणि उंब्रजशीच काही कथा जोडलेल्या आहेत. आपल्याकडे कोणत्याही तीर्थक्षेत्री गेले की कोणती ना कोणती कथा जोडलेली असते. त्या कथेमुळे त्या स्थानालासुद्धा रंजकता येते. तिथे गेले आणि ती विशिष्ट कथा आठवली की एक वेगळाच आनंद मिळतो. समर्थ चाफळवरून रोज उंब्रज इथे स्नानासाठी येत असत. एकदा इथल्या नदीत ते बुडायला लागल्यावर मेलो मेलो असे जोरजोरात ओरडू लागले. तेव्हा खुद्द हनुमंताने त्यांना तिथून बाहेर काढले असे सांगितले जाते. त्याच्या पावलाचा एक ठसा तिथे दगडावर उमटल्याचेही दाखवले जायचे. आता तो दगड मात्र वाळूत बुजून गेला आहे. अशी इथली एक आख्यायिका.

समर्थ रामदासांना उंब्रज इथे काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली. शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० साली समर्थानी इथे मारुती मंदिर बांधले. चुना, वाळू आणि ताग हे पदार्थ वापरून अंदाजे दोन फूट उंचीची ही मूर्ती मोठी देखणी आहे. सध्या मात्र या मूर्तीला चांदीचे डोळे बसवलेले आहेत. मारुतीच्या पायाखाली एक दैत्य दिसतो. मूर्तीच्या स्थापनेनंतर १४ दिवस इथे रामदासस्वामींनी कीर्तन गेले. त्यानंतर शिराळ्याचे देशपांडे त्यांना आपल्या घरी घेऊन गेले.

07-lp-hanumanमसूरचा मारुती

उंब्रजपासून जेमतेम दहा किमी वर असलेल्या मसूर इथे समर्थानी मारुतीची स्थापना केली आहे. मसूर या गावाशी निगडित एक कथा आहे. आणि ती कथा आहे कल्याणस्वामी या समर्थाच्या पट्टशिष्याशी संबंधित. कल्याण या शिष्याची प्राप्ती समर्थाना मसूर इथल्या उत्सवात झाली आणि पुढे तो समर्थाचा अत्यंत लाडका शिष्य झाला. कल्याणस्वामींचे मूळ नाव अंबाजी. चार वर्षे मसूर इथे समर्थानी रामनवमीचा उत्सव मोठय़ा धूमधडाक्यात साजरा केला. एके वर्षी श्रीरामचंद्रांच्या मिरवणुकीदरम्यान एका झाडाची फांदी मिरवणूक मार्गात आडवी येत होती. तेव्हा समर्थानी अंबाजी नावाच्या तरुणाला त्या फांदीच्या शेंडय़ावर बसून कुऱ्हाडीने बुंध्याच्या बाजूने ती फांदी तोडायला सांगितले! अंबाजीने काहीही न विचारता तसे केले. फांदी तुटली आणि अंबाजी त्या फांदीसकट सरळ खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. समर्थ त्या विहिरीपाशी आले आणि आत डोकावून त्यांनी विचारले, ‘अंबाजी कल्याण आहे ना?’ विहिरीतून प्रत्युत्तर आले, ‘सर्व कल्याण आहे स्वामी.’ तेव्हापासून अंबाजीचे नाव कल्याण असे पडले.

पाच फूट उंचीची, चुन्यापासून तयार केलेली, पूर्वाभिमुख असलेली ही मारुतीची मूर्ती खरे तर सर्व ११ मारुतींमध्ये देखणी म्हणायला हवी. शके १५६८ अर्थात इ.स. १६४६ साली याची स्थापना समर्थानी केली. अतिशय सौम्य आणि प्रसन्न मुद्रा असलेल्या हनुमंताच्या मस्तकी मुकुट असून, गळ्यात माळा, जानवे, कमरेला मेखला असा सगळा थाट आहे. हाताची बोटे तसेच लंगोटाचे काठ मोठे आकर्षकरीत्या रंगवलेले दिसतात. पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थाचे चित्र काढलेले आहे. गाभाऱ्याच्या एका भिंतीवर याच गाभाऱ्याचे चित्र काढलेले दिसते. मंदिराचा सभामंडप १३ फूट लांबी-रुंदीचा आहे. सहा दगडी खांबांवर मंदिराचे छत तोलून धरले आहे. देवळाच्या शेजारीच नारायणमहाराजांचा एक मठ आहे. या मंदिराचे व्यवस्थापन श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडे आहे.

या ठिकाणाबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे मुसळराम नावाचा एक पहिलवान नेहमी मुसळ खांद्यावर घेऊन फिरत असे. समर्थानी या मुसळरामालाच इथला मठाधिपती केला. मुसळरामाची हत्या करण्याची इच्छा मनी धरून असलेल्या यवनी अधिकाऱ्याला समर्थानी इथेच यथेच्छ बदडून काढले होते, असे सांगितले जाते.

08-lp-hanumanशिराळ्याचा मारुती

जागा लक्ष्मीची शिराळे,

तेथे निघती नागकुळे ।

श्रावणमासी मुलेबाळे,

खेळविती।।

सांगली जिल्ह्यतले नागांसाठी प्रसिद्ध असलेले हे शिराळे गाव. इथे समर्थानी स्थापिलेल्या मारुतीमुळेसुद्धा प्रसिद्ध आहे. एस.टी. स्टँडजवळच हे मंदिर आहे. अतिशय भव्य अशी मूर्ती असलेले हे मारुती मंदिर खरोखर अतिशय देखणे असे आहे. शके १५७६ म्हणजे इ.स. १६५५ साली समर्थानी इथे मारुतीची स्थापना केली. सात फूट उंचीची चुन्यात बनवलेली हनुमंताची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिरसुद्धा उत्तराभिमुखच आहे. कंबरपट्टय़ामध्ये घंटा बसवलेल्या आहेत. कटिवस्त्र आणि त्याचा गोंडासुद्धा खूप सुंदर आहे.

मूर्तीच्या डोक्याच्या डावी-उजवीकडे झरोके ठेवले आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. मंदिराच्या प्राकाराला दक्षिणेकडे अजून एक दार आहे. शिराळ्याचे महादजी साबाजी देशपांडे हे समर्थशिष्य म्हणून प्रसिद्ध होते.

09-lp-hanumanशहापूरचा मारुती

कराड-मसूर रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर आणि मसूरपासून तीन कि.मी. अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे. इथून फक्त एक कि.मी.वर रस्त्यापासून आत हे मारुती मंदिर आहे. समर्थानी स्थापिलेल्या ११ मारुतींमध्ये हा मारुती सर्वात आधी स्थापन केल्याचे समजले जाते. शके १५६६ म्हणजेच इ.स. १६४५ साली समर्थानी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते. गावाच्या एका टोकाला नदीच्या काठावर मारुतीचे मंदिर आहे. मंदिर आणि मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. अंदाजे सात फूट उंची असलेली हे मारुतीची मूर्ती काहीशी उग्र दिसते. मूर्तीच्या मस्तकी गोंडय़ाची टोपी आहे. इथेच पुढे छोटीशी पितळी उत्सव मूर्ती ठेवलेली दिसते. शहापूरचे अजून एक महत्त्व म्हणजे शहापूरच्या आग्नेयेला दोन कि.मी.वर रांजणखिंड आहे. इथे दोन मोठे दगडी रांजण दिसतात. या खिंडीजवळच असलेल्या टेकडीवर समर्थाचे वास्तव्य असायचे.

शहापूर.. समर्थ.. बाजीपंत कुलकर्णी यांची एक सुंदर कथा इथे प्रसिद्ध आहे. आदिलशाही मुलखात असलेल्या शहापूरजवळच चंद्रगिरी नावाचा डोंगर आहे. समर्थ रामदास या डोंगरावर तपश्चर्या करायला जात असत. त्यावेळी ते तिथून भिक्षा मागायला शहापूर गावात नेहमी जात असत. गावात बाजीपंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन देवभक्त राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई. समर्थ भिक्षा मागायला आले की सईबाई नेहमी आला गोसावडा भिक्षा मागायला.. असे चिडून बडबडत असे आणि भिक्षा वाढत असे. एके दिवशी समर्थ भिक्षा मागायला आले तेव्हा घरात दु:खी वातावरण दिसले. चौकशी करता असे समजले की बाळाजीपंतांवर फसवणुकीचा आरोप ठेवून पकडून विजापूरला घेऊन गेले होते.

आजपासून पाच दिवसांनी बाजीपंत परत घरी येतील असा दिलासा समर्थानी सईबाईंना दिला. दासोपंत (म्हणजे समर्थच) विजापुरी जाऊन हिशेब मिटवून दिले व बाजीपंतांसह शहापुरी परत आले!! त्यानंतर गावाच्या सीमेवरून समर्थ अदृश्य झाले. कुलकर्णी पती-पत्नींनी तीन दिवस कडकडीत उपास केले. चौथ्या दिवशी समर्थ भिक्षा मागायला आल्यावर त्यांना आपल्या घरी जेवायला ठेवून घेतले. त्या दिवसापासून सईबाईंनी एक व्रतच घेतले, ते म्हणजे समर्थदर्शनाशिवाय जेवायचे नाही. एकदा तर आठ दिवस उपास घडला. त्यावेळी हे दांपत्य समर्थाना शोधायला चंद्रगिरीच्या डोंगरावर गेले. तिथे समर्थाना त्यांनी जेवण रांधून वाढले. जेवण वाढताना वरती पाहू नकोस असे समर्थानी सईबाईला निक्षून बजावले होते. तरीही अनवधानाने सईबाईंचे लक्ष वरती गेले तर काय.. त्यांचे डोळेच दिपले. समर्थाच्या जागी त्यांना प्रत्यक्ष मारुतीराया बसलेला दिसला, असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे समर्थानी इथे चुन्याच्या मारुतीची स्थापना केली आणि मंदिर बांधले. कुलकर्णी नावाचे एक सद्गृहस्थ आजही इथे अत्यंत मनोभावे सेवा करीत आहेत. मंदिराच्या शेजारीच त्यांचे घर आहे.

10-lp-hanumanबहे बोरगावचा मारुती

सांगली जिल्ह्य़ातल्या वाळवे तालुक्यात बहे किंवा बाहे हे गाव आहे. कराड-कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पेठवरून जेमतेम बारा कि.मी. वर हे ठिकाण आहे. शेजारच्या बोरगावमुळे त्याचा उल्लेख बहे-बोरगाव असा केला जातो. याठिकाणी प्रसिद्ध असलेली आख्यायिका रामायणाशी निगडित आहे. रावणाचे निर्दालन करून अयोध्येला परत जाताना प्रभू रामचंद्र कृष्णा नदीच्या काठी असलेल्या बोरगावला थांबले होते. तिथे कृष्णेच्या वाळवंटात प्रभू रामचंद्र स्नानसंध्या करायला गेले असताना कृष्णा नदीला उचंबळून आले, आणि त्यामुळे तिला अकस्मात पूर आला. मारुतीरायाने नदीपात्रात मधोमध बसून आपले दोन बाहू आडवे धरून तो प्रवाह आपल्या दोन्ही बाजूंनी प्रवाहित केला त्यामुळे मध्ये एक बेट तयार झाले. हनुमंताने दोन बाहूंनी नदीचा प्रवाह विभागला गेला म्हणून बहे/ बाहे/ बहुक्षेत्र असे नाव या स्थानाला प्राप्त झाले, असे मानले जाते.

या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घडेल अशा आशेने गेलेल्या समर्थाना मारुतीने मूर्तीरूपात दर्शन दिले नाही. त्यामुळे समर्थानी मारुतीरायाचा धावा सुरू केला. त्यांना त्यावेळी पाठीमागे डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. समर्थानी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली. या मूर्तीकडे पाहताच समर्थाना एक रचना सुचली..

हनुमंत पाहावयालागी आलो,

दिसेना सखा थोर विस्मीत जालो।

तयावीण देवालये ती उदासे,

जळातूनी बोभाइला दास दासे।।

ही गोष्ट शके १५७३ अर्थात इ.स. १६५२ सालची. प्राचीन काळी इथे राममंदिर होते. त्याच्या पुढय़ात शिवलिंग. या राममंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे. मारुतीचे दोन हात पाणी अडविण्याच्या पवित्र्यात दिसतात. दोन्ही मांडय़ांच्या बाजूला धरलेले आहेत. डोक्यावर मुकुट असलेली अशी ही भव्य मूर्ती. इथे जाण्यासाठी कृष्णेवरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावर जाणाऱ्या वाटेने जावे लागते. नदीला पूर आल्यावर मात्र ही वाट बंद होते. त्यावेळी इथे जाता येत नाही.

11-lp-hanumanमनपाडळेचा मारुती

मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्य़ात पन्हाळगड-ज्योतिबाच्या परिसरात आहेत. पन्हाळगड म्हणजे जणू दक्खनचा दरवाजाच होता. विजापूरच्या आदिलशाहीवर वचक ठेवण्यासाठी पन्हाळा हे शिवकाळात अगदी मोक्याचे ठिकाण होते. या परिसराचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊनच की काय समर्थानी या ठिकाणी ही दोन शक्तिकेंद्रे निर्माण केली असावीत असे दिसते. कोल्हापूर ते वडगाव वाठार हे अंतर २२ कि.मी. आहे. तर वडगाव वाठारवरून पुढे अंबपमार्गे मनपाडळे हे अंतर १४ कि.मी. आहे. ११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थानी शके १५७७/इ.स.१६५२ मध्ये केली. अंदाजे पाच फूट उंचीची साधी सुबक अशी मारुतीची मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहेत. मूर्तीजवळ दीड फूट उंचीची कुबडी ठेवलेली दिसते. आसपास झाडी असलेल्या ओढय़ाकाठी एक सुंदर कौलारू मंदिर आहे. सात फूट औरसचौरस गाभारा असलेल्या या मंदिराचा नवीन बांधकाम केलेला सभामंडप चांगला मोठा आहे.

वारणेच्या खोऱ्यात असलेल्या मनपाडळे गावाच्या जवळच पाडळी नावाचे एक गाव आहे. इथेही एक मारुतीची मूर्ती आहे. कोल्हापूरपासून जेमतेम २० कि.मी.वर ज्योतिबाच्या ऐन पायथ्याशी मनपाडळे हे गाव वसलेले आहे. इथून जवळच सात कि.मी.वर असलेल्या पारगावला अजून एक समर्थ स्थापित मारुती आहे.

12-lp-hanumanपारगावचा मारुती

यालाच बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती असे म्हटले जाते. कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे. इथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे. त्याच्या उत्तरेला जुने पारगाव आहे. या जुन्या पारगावात हे मारुती मंदिर आहे. शके १५७४ म्हणजे इ.स. १६५३ साली स्थापना केलेला हा मारुती, ११ मारुतींपैकी सर्वात शेवटी स्थापलेला आणि सर्वात लहान मूर्ती असलेला आहे. इथली मूर्ती सपाट दगडावर कोरलेली जेमतेम दीड फूट उंचीची आहे. यावर शेंदूर नाही. मारुतीच्या केसाची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याच्या आविर्भावात ही मूर्ती कोरलेली आहे. आठ फूट लांबी-रुंदीचा मूळ गाभारा. १९७२ मध्ये इथे ४० फूट लांब आणि १६ फूट रुंदीचा सभामंडप बांधला. मनपाडळे ते पारगाव हे अंतर फक्त पाच कि.मी. पण सरळ रस्ता नाहीये. वळसा घेऊन इथे यावे लागते.

या अकरा मारुतींशिवाय समर्थानी गोदावरी काठी टाकळी इथे गोमयाचा मारुती स्थापन केला. शिवाय सज्जनगड, शिवथरघळ, मिरज, महाबळेश्वर, वाई, टेंभू, शिरगाव, सिंहगड, तंजावर आणि अगदी हिमालयातील प्रसिद्ध असलेल्या बद्रिनाथाच्या मंदिरातसुद्धा मारुतीची स्थापना केलेली आहे. विपरीत काळ आलेला असतानासुद्धा ‘धीर्धरा धीर्धरा तकवा..हडबडू गडबडू नका।।’ असा संदेश देणाऱ्या समर्थानी तरुणाईमध्ये बलोपासनेचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी सह्य़ाद्रीच्या कुशीत हे अकरा मारुती स्थापन केले. समर्थ शिष्या वेण्णाबाई या अकरा मारुतींचे वर्णन आपल्या एका कवनात करतात. त्या म्हणतात..

चाफळामाजी दोन, उंब्रजेसी एक,

पारगावी देख चौथा, तो हा।।

पाचवा मसुरी, शहापुरी सहावा,

जाणा तो सातवा, शिराळ्यात।।

शिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा,

दहावा जाणावा, माजगावी।।

बा’ात अकरावा, येणे रीती गावा,

सर्व मनोभाव पुरविला।

वेणी म्हणे स्वामी, समर्थ रामदास,

कीर्ति गगनात, न समाये।।

इ.स. १६४५ ते १६५५ अशा दहा वर्षांच्या काळात समर्थानी या ११ मारुतींची स्थापना केलेली दिसते. तात्कालीन देशपरिस्थिती, समाजस्थिती यांचे योग्य आकलन करून समर्थानी प्रजेपुढे शक्तीचे, तेजाचे प्रतीक असलेले हे मारुती उभे केले. त्यांच्यायोगे बलोपासना आणि कोणत्याही संकटासमोर ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा समर्थानी लोकांना दिली. दळणवळणाची साधने अगदी तुटपुंजी असलेल्या त्या कालखंडात कदाचित संपर्ककेंद्रे म्हणून सुद्धा या समर्थ स्थापित मारुती स्थानांचा उपयोग होत असावा. संपर्काचे एक जाळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा असे वाटते. आजघडीलासुद्धा या ठिकाणांचे महत्त्व कणभरही कमी होत नाही. आपल्या भटकंतीमध्ये ही वेगळ्या उद्देशाने केलेली भटकंती नक्कीच स्मरणीय ठरेल. सह्य़ाद्रीच्या कुशीत असलेल्या या ११ मारुतींना कोणत्याही ऋतूमध्ये भेट द्यावी. सरत्या पावसाळ्यात गेले तर सर्वात उत्तम. या वेगळ्या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी. दोन घटका इथे शांत बसावे. इतिहासाची आठवण ठेवावी. हनुमंताची प्रभूरामाप्रति असलेली अनन्यसाधारण निष्ठा आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाण्याची प्रेरणा आपल्याला या ठिकाणी आल्यावर मिळावी.. आपली भटकंती समृद्ध व्हावी..!!!
आशुतोष बापट – response.lokprabha@expressindia.com