गणेश विशेष
शमिका वृषाली – response.lokprabha@expressindia.com / @shamikavrushali
मानव हा मुळातच पापभीरू आहे. मनाच्या व बुद्धीच्या पटलावर अनुभवाअंती उमटणाऱ्या असंख्य लहरींना तो प्रतिसाद देत, आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतो. ‘देव’ ही संकल्पना माणसाच्या याच लहरींचा परिपाक आहे. देव म्हणजे नक्की काय? अशा प्रकारची कोणती शक्ती अस्तित्वात आहे का? हे समजून घेणे सामान्य माणसासाठी थोडे कठीणच असते. देव हे केवळ माणसाच्या भीतीतून व गरजेतून उत्पन्न झालेले तत्त्व आहे, असे विज्ञान सांगते. मानववंशशास्त्राच्या आधारे देव हे तत्त्व बौद्धिक पातळीवर समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास माणसाच्या प्राथमिक उत्क्रांतीच्या टप्प्यात, ज्या गोष्टी उपयुक्त ठरल्या त्यांना माणसाने आपल्या बुद्धीनुसार कृतज्ञतेच्या भावनेतून देव म्हणून पूजले. भय, उपयुक्तता व आश्चर्य या भावनेतून मानवाने अनेक देव आकारास आणले. मानवाने आकारात आणलेल्या या देव संकल्पनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्यास प्रकर्षांने जाणविणारी गोष्ट म्हणजे मानवाला पंचमहाभुतांचे वाटलेले भय. सभोवतालचा नसíगक उत्पात पाहत व अनुभवत असताना, या प्रचंड शक्तीसमोर आपला निभाव कसा लागणार या भीतीतून माणसाने देव आकारास आणले व त्यांच्या समोर तो नतमस्तक झाला. या जन्माला घातलेल्या देवांना माणसानेच आकारउकार बहाल केले. म्हणूनच कालपरत्वे ‘देव’ ही संकल्पना बदलत गेली. वेद काळातच देवांचे मानवीकरण सुरू झाले आणि मानवाच्या गुणधर्मानुसार देव वागू लागले, तर ब्राह्मणकाळात मानवी नातीगोती देवांना लावून देवतांचे परिवार निर्माण केले गेले. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने आदिमानवापासून मानव जसजसा उत्क्रांत होत गेला, तसतसा देवही मानवासोबत निसर्गातून मनुष्यरूपात विकसित होत गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भयातून निर्माण झालेल्या दैवी तत्त्वाचे एक सुरेख स्वरूप आज आपल्या रोजच्याच जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. हे स्वरूप म्हणजे श्री गणेशाचे! श्री गणेश हा प्रारंभी विघ्नकर्ता म्हणून जाणला जात असे, परंतु कालांतराने या विघ्नकर्त्यांचे स्वरूप विघ्नहर्त्यांत रूपांतरित झाले. श्री गणेशाचे विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता हे उन्नयन मानवी उत्पाताच्या प्रवासातील दैवी संकल्पनेच्या विकासाची साक्षच देणारे आहे. भारतीय संस्कृतीत गणेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विनायक, गणपती, गजमुख, भालचंद्र अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेला हा देव आपल्याला पौराणिक वाङ्मयात अनेक स्वरूपात आढळतो. या भारतभूमीने आपल्या कुशीत अनेक संस्कृतींना जन्म दिला, काहींना आपल्या अंगणात आश्रय दिला. या संस्कृती आपल्या अंगणात नांदल्या, बहरल्या व काळाच्या ओघात नष्टही झाल्या. परंतु, आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा या संस्कृतींनी वेगवेगळ्या मार्गानी मागे ठेवल्या, कधी इतिहासाच्या रूपाने, तर कधी संस्कारांच्या रूपाने. या पाऊलखुणा आपले प्राचीनत्व वेळोवेळी सिद्ध करतात. असेच काहीसे गणपतीच्या बाबतीतही लक्षात येते. आजच्या अस्तित्वात असलेल्या गणेशाच्या रूपावर याच अनेकविध संस्कृतींचा संस्कार झालेला आहे. म्हणूनच गणेशाची उत्पत्ती हा संशोधनाचा विषय ठरला आहे. अनेक अभ्यासकांनी गणेशाच्या मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा शोध प्रामुख्याने पुरातत्त्वीय व वाङ्मयीन साधनांवर आधारित आहे. वाङ्मयीन संदर्भानुसार गणेशाचे अस्तित्व हे वेदकालीन आहे तर पुरातत्त्वीय पुरावे गणेशाचे प्राचीनत्व हे केवळ इसवी सनाच्या चौथ्या शतकापर्यंत मागे घेऊन जातात. असे असले तरी, गणेशाच्या उत्पत्ती विषयी अनेक सिद्धांत उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी गणेशाच्या अस्तित्वाचा शोध आपापल्यापरीने घेण्याचा प्रयत्न केला व त्या पद्धतीने गृहीतके ही मांडण्यात आली. आजपर्यंत झालेल्या संशोधनावरून लक्षात येणारी बाब म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मयात गणपतीचे प्राचीनत्व हे त्याच्या प्रतिमेपेक्षा जुने आहे, असे अभ्यासक मानतात.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord shankar is ganapati
First published on: 07-09-2018 at 01:08 IST