04 August 2020

News Flash

सेलिब्रिटी लेखक : जडेल नाते प्रभुशी तयाचे!

१ जानेवारी २००८ रोजी मी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभी राहिले आणि कलाकार म्हणून माझा प्रवास सुरू झाला.

माझी गाडी भरधाव निघाली होती. नजर लांब दिसणाऱ्या रस्त्याचा वेध घेऊ पाहत होती, ती संध्याकाळही नेहमीपेक्षा वेगळी भासत होती. या प्रवासात माझ्या मनाशी, मी भक्कम असण्याचा भाव जागृत झाला होता आणि मी ‘त्यांना’ आधार देणार होते, असा आवच आणला होता मी. गाडीचा वेग माझ्या मनातल्या जिज्ञासेला गाठूच शकत नव्हता. तो ४५ मिनिटांचा प्रवास, जणू मी अख्खा दिवस प्रवासच करतेय इतका लांब वाटायला लागला होता. एखाद्या ठिकाणी पोहोचण्याची उत्सुकता असल्यावर असंच होत असावं. ५.१० ला माझी गाडी वेगाने गेटमधून आत शिरली. गाडी पार्क केली. आता नकळत माझ्या सगळ्या हालचाली मंदावल्या होत्या. मी गाडीचा दरवाजा उघडला आणि बाहेर येऊन स्तब्ध उभी राहिले; दोन क्षण तसेच जाऊ दिले आणि आता पुढे पाऊल टाकणार तोच एका चिमुरडय़ा हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि क्षणात मला कळून चुकलं की डळमळीत मीच झाले हाते. पण त्या चिमुकल्या, एकाकी आयुष्य जगत असलेल्या हातात मात्र परिस्थिताने इतकं बळ निर्माण केलं होतं की कसलीच भ्रांत नसलेल्या, सुखवस्तू आयुष्यात वाढत असलेल्या मलाच ते हात ‘आधार’ देऊन गेले. माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा ‘तो’ पहिला क्षण.

आयुष्यात पहिल्यांदाच अशा एका आश्रमात गेले होते मी. ‘माँ निकेतन’. नावाप्रमाणेच तिथल्या प्रत्येक मुलीच्या स्पर्शात आईचीच माया होती. ह्यचं प्रेमळ उदाहरण नुकतंच अनुभवलं होतं मी. खूप दैवी वाटत होतं मला ते सगळंच. ठाण्याच्या उपवन, पोखरण मार्ग २ या भागातला हा आश्रम. त्याच्या मध्यभागी उपक्रमांसाठी बांधलेला एक प्रशस्त हॉल, बाजूला ऑफिस, भवताली चार हाउसेस. आणि प्रत्येक हाउसमध्ये साधारण ८० मुली. या मुली समभावाने जगत माणुसकी हा एकच धर्म जपतायत. मी त्या आवारातून फिरायला लागले, तसे त्या अनोळखी चेहऱ्यांनी त्यांच्या निखळ हास्यातूनच पावलागणिक आमच्यात एक नातं तयार केलं, ‘‘माणुसकीच्या नात्याला मुळी ओळखीची जोड लागतच नाही.’’ त्या सगळ्या मुलींनी प्रश्नांचा भडिमार चालू केला. मी कुठून आलेय? माझं नाव काय? माझ्या घरी कोण कोण असतं? मधेच एखादा स्पर्श मला सुखावून जात होता, कदाचित त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला जाणून घेण्याचं त्यांना कुतूहल असावं. ही २००७ सालची गोष्ट आहे. त्यामुळे टीव्ही किंवा सोशल मीडियामधून त्यांची माझ्याशी ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता. माझं त्या ठिकाणी, त्या क्षणी असणं हेच त्यांना माझ्याबद्दल कृतज्ञता वाटून देणारं होतं. मला  नवल या गोष्टीचं वाटलं होतं की त्या  प्रश्नमंजूषेत, ‘‘तुम्ही परत आम्हाला भेटायला याल का?’’ हा प्रश्न नव्हता.

आपल्याला भेटायला आलेल्या माणसाची पुन्हा इथे येण्याची कुठलीही शाश्वती नसताना, त्याच्या ‘आत्ताच्या’ असण्यावर आपल्या प्रेमाचा वर्षांव करत राहणं इतकंच माहीत होतं त्यांना. म्हणजे, ‘‘आत्ताचा क्षण आपला आणि तो पूर्णपणे जगणं, हे आपलं कर्तव्य’’ हे शिकले मी तिथे. मग मी पाठीमागच्या बाजूला असलेल्या एका ‘हाउस’मध्ये गेले. तिथल्या बालमैत्रिणींनी माझं स्वागत केलं. मी त्यांच्यातलीच एक होऊन चटईवर मांडी ठोकून बसले. मग आळीपाळीने एकमेकींमध्ये नि:शब्द करार करून त्या माझ्या मांडीवर येऊन बसायला लागल्या. तेव्हा ‘मायेच्या स्पर्शासाठी त्या साऱ्याजणी किती भुकेल्या होत्या’ या जाणिवेने अस्वस्थ वाटू लागलं, तेव्हाच मी मनाशी ठरवलं. प्रत्येक रविवारचे दोन तास त्यांच्या सहवासात नाच, गाणी, गुजगोष्टी रंगायला लागल्या.

गप्पांमधून एकेक कळी उमलत होती. ती उमलताना बरेचदा मलाच मोहरून टाकत होती. असंच एकदा गप्पांच्या मैफिलीत पाचवीत शिकणारी दीपा तिच्या आई-वडिलांबद्दल ‘वर्तमानातलं’ एक वाक्य बोलून गेली. मी तिला तिच्या आईबाबांबद्दल विचारलं. तेव्हा तिच्या बोलण्यातून माझ्या असं लक्षात आलं की तिचे आई-वडील त्यांच्या मुलांसमवेत, तिच्यापासून लांब जगताहेत, त्या क्षणी माझ्या मनात लोटलेला राग चेहऱ्यावरचे शांत भाव बाजूला सारून उफाळून येऊ लागला. एवढंसं ते पाचवीतलं कोकरू त्याने तत्क्षणी माझे बदललेले भाव तर हेरलेच, पण पटकन त्याच्या जन्मदात्यांच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ केलं, ‘त्यांची काही चूक नाही हो ताई. माझ्यावरपण लई जीव आहे त्यांचा. पण दोन जिवांना वाढवण्याची परिस्थिती नाहीए. भावाला चांगलं आयुष्य मिळायलाच हवं ना. मी काय मुलगी हाय, इथे वाढले काय अन् तिथे वाढले काय?’  स्वत:च्या आयुष्याचं हे कटुसत्यही तिने किती खिलाडूवृत्तीने स्वीकारलं होतं. तिचं शहाणपण मला काही क्षण झेपलंच नाही. तिला पटकन उराशी कवटाळलं मी. त्याक्षणी आधाराची गरज मलाच होती. त्यांच्या सहवासात इतके भाबडे क्षण मी अनुभवले. दीपा आता बारावी झालीय. अजूनही शिकतेय. प्रत्येकाचं मन जिंकतेय.

आश्रमात येणाऱ्यांशी हळूहळू भेटीगाठी होऊ लागल्या, ओळखी वाढत गेल्या. तब्बल ४१ वेगवेगळ्या क्षेत्रांमधली माणसं एकत्र येऊन या आणि अशा बऱ्याच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी १६ मार्च २००८ मध्ये ‘उडान वेल्फेअर फाउंडेशन’ (ं ल्लल्ल- स्र्१ऋ्र३ ड१ॠंल्ल्र२ं३्रल्ल)ची स्थापना झाली. सगळ्यात लहान सदस्य मीच होते. या संस्थेमार्फत शिक्षण, उत्तम आरोग्य, पालनपोषण, जनकल्याण, आजूबाजूचा परिसर अशा आघाडय़ांवर काम करण्याचा विडाचं उचलला. सात वर्षांपासून ‘उडान’ कार्यरत आहे. वाट चुकलेल्या या पाखरांच्या पंखात बळ आणून  प्रत्येकाला गरुडझेप घेण्यासाठी सक्षम करतंय. मला हे असं काहीतरी करावंसं वाटलं ते आपण कुणाचंतरी भलं करू अशा भावनेने मुळीच नाही, मी हे करते ते स्वत:च्या समाधानासाठी, आनंदासाठी, रोजची सुखाची झोप लागावी यासाठी. मुळात माझा या गृहीतकावर पूर्ण विश्वास आहे. जगातला शेवटचा माणूस जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत दु:ख या न त्या कारणाने आपल्यावरही झिरपत राहणारच, म्हणूनच आपल्या देशातले ऐंशी टक्के लोक आज मूलभूत गरजांपासून वंचित असताना, उरलेल्या वीस टक्क्यांमध्ये राहून सुखाचे क्षण जगताना लागणारी बोच कुठेतरी हे करायला लावते. म्हणूनच असेल कदाचित सचिन तेंडुलकर गावंच्या गावं दत्तक घेतो. अक्षयकुमार ‘चेन्नई पूर’ दुर्घटनेसाठी घसघशीत रक्कम देऊ करतो. नानांसारखे आणि मकरंद अनासपुरेसारखे कलाकार ‘नामफाउंडेशन’ची स्थापना करतात. आज इलाइट क्लासमध्येही जागृती झालेली दिसून येते; जितेंद्र गुप्ता नावाचे माझे एका प्रोजेक्टचे प्रोडय़ुसर, त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचा वाढदिवस ‘माँ निकेतन’मधल्या मुलींबरोबर साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. का तर नाण्याची दुसरी बाजू आपल्या मुलीला कळावी. आज तिच्या सगळ्या मागण्या भागवणारे तिचे बाबा. सुरुवातीचा आयुष्याचा खडतर काळ सायकलवरून वणवण करत फिरलेत आणि मुळात एका ‘वेल सेटल्ड्’ घरात तिचं असणं हे काही तिचं कर्तृत्व नाही. ह्य सत्याशी तिची ओळख करून देण्यासाठी! खरं तर, या क्षेत्रात होऊन गलेली छत्रपती शाहूमहाराज, गाडगबाबा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे, मदर तेरेसा यांच्यासारखी नि:स्वार्थी अंत:करणाने समाजाला वाहून घेतलेली माणसे. आजच्या काळात कार्यरत असलेली आमटे, डॉ. अभय बंग, डॉ. तात्याराव लहाने अशी कुटुंबं आणि माझ्याच आत्ममग्न व्यवसायात असूनही मनातला सेवाभाव जागृत ठेवलेली निळूभाऊ, डॉ. लागू, नानांसारखी हिमशिखरांसारखी माणसं पाहिली, की मी मला साधी छोटी टेकडी तर दूरच अगदीच तीन पायांचं डुगडुगतं स्टूल वाटायला लागते, पण म्हणून मी आता कधीच डगमगत नाही. उलट आम्ही सगळे मिळून आमच्या इवल्या हातांनी इकडची दुनिया तिथे ढकलण्यासाठी खारीचा वाटा उचलतोय.

एखाद्याला मानसिक आणि भावनिक आधार देण्यासाठी आपलं मन खंबीर व्हावं लागतं हेही मी इथून शिकले. एकदा संध्याकाळी एका गोंडस तीन-साडेतीन वर्षांच्या मुलीने येऊन माझा हात धरला. नवीन चेहरा होता तो. याची तर आश्रमांना सवयच असते. तिला तिच्या आजीला फोन करायचा होता. भाजी आणण्याच्या निमित्ताने तिला इथल्या कर्मचाऱ्यांकडे तिची आजी सोपवून गेली होती. तिचे इवलेसे डोळे आजीच्या वाटेवर होते. आई-वडील अकाली दगावले, स्वत:ची वयोवृद्धी, आर्थिक दयनीयता यामुळे तिच्या आजीने तिला तिथे सोडलं होतं. कदाचित कायमचीच.

‘उडाण’चं कार्य रुंदावत जात होतं, तसं ठाण्याबाहेरच्या शहरांमध्येही आमचे मदतीचे हात पोहोचावेत म्हणून आम्ही धडपडायला लागलो, एखाद्या ठिकाणाचा अभ्यास करून, त्या गावच्या गरजा समजून घेऊन कधी आर्थिक रूपात, कधी धान्य वाटप करून, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन, तर कधी शैक्षणिक मदत करणं सुरू केलं. या प्रवासात काही देवमाणसंसुद्धा संपर्कात आली. त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. वर्षां परचुरे (टिटवाळा), धीरज डोंगरे (शहापूर) यांनी आज समाजाच्या विकासासाठी स्वत:ला पूर्णपणे अर्पण केलंय. वर्षांताईंच्या शिबिरांना गावोगावी मुलं गमतीने ‘मेंदू स्वच्छता अभियान’ म्हणतात. ‘‘मनरेगा’’ महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरेंटी अ‍ॅक्टबद्दल मला वर्षांताईंकडून कळलं. या कायद्याद्वारे गावात बांधकाम, विहीर बांधणे, रस्ते सुधारणा, किमान रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी सरकारने दिली आहे. आपल्याकडूनही योग्य पाऊल उचललं जाणं गरजेचं असल्यामुळे ही माहिती. धीरज यांनी शहापूरजवळच्या बेलवली गावाला शिक्षित करण्याचा विडाच उचललाय. ‘‘मला एक लाख रुपये देणारा एक माणूस नको, एक रुपया देणारी एक लाख माणसं जोडायची आहेत’’ हे त्यांचं ब्रीदवाक्य. ‘माझ्या मुलांना शिकायचंय. त्यांना मदत करा’’ असं म्हणत आज १५०० पेक्षा जास्त मुलांना शिक्षण, स्वयंसिद्ध योजनेमार्फत अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देतोय तो. एखादी ट्रस्ट काढण्याआधी लोकांचा ‘ट्रस्ट’ संपादन करण्यासाठीची त्याची धडपड.

‘‘लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं,’’ हे ऐकत आपण लहानाचे मोठे होतो. मला आठवतंय, नोव्हेंबर २००७ मध्ये आमच्या लहान मुलींच्या वाढत्या वयात येऊ शकणाऱ्या समस्या लक्षात घेऊन मी त्यांच्यासाठी एक नाटक लिहिलं होतं आणि त्यातलं महत्त्वाचं पात्र साकारलं होतं. मघाशी उपक्रमांसाठी असलेल्या प्रशस्त हॉलचा उल्लेख केला होता ना! त्याच हॉलच्या स्टेजवर मला वाटतं आमच्या ह्य छोटय़ा परमेश्वरांना माझी ती कला भावली असावी. असं म्हणतात, मोठय़ा माणसांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असावेत, पण माझ्या पाठीवर त्या इवल्याशा हातांच्या शाबासकीची थाप पडली आणि त्यांचे आशीर्वाद लाभले. म्हणूनच आजही माझा विश्वास कायम आहे की त्यांच्या आशीर्वादानेच दीड महिन्यानंतर १ जानेवारी २००८ रोजी मी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभी राहिले आणि कलाकार म्हणून माझा प्रवास सुरू झाला. जो आजही चालू आहे. आणि पुढेही चालू राहील. फक्त या प्रवासात आत्ताच्या वळणावर साने गुरुजींच्या दोन ओळी आठवतात..
करि मनोरंजन जो मुलांचे,
जडले नाते प्रभुशी तयाचे.
तेजश्री प्रधान –
response.lokprabha@expressindia.com
twitter – @tejupradhan88

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2016 1:24 am

Web Title: maa niketan ashram
Next Stories
1 चित्रपट : वेगळ्या भूमिकेत मृण्मयी
2 चित्रवार्ता : मैत्री, कुटुंब आणि बरंच काही…
3 टीव्हीचा ‘पंच’नामा : ‘काहीही’च्या पलीकडलं!
Just Now!
X