26 February 2021

News Flash

महाभारत आणि पुराणांतील रेणुका

परशुरामाचे माता-पिता म्हणून रेणुका आणि जमदग्नी हे दाम्पत्य जनमानसात प्रसिद्ध आहे.

00-navratri-logo-lpजमदग्नीची पत्नी आणि परशुरामाची माता असणारी रेणुकादेवी मरिअम्मा, येल्लम्मा अशा नावांनी दक्षिण भारतातही ओळखली जाते. या देवीचे मूळ स्वरूप नेमके कसे होते आणि तिच्या दैवत्वाचा विस्तार कसा होत गेला हे दैवतशास्त्रीय दृष्टिकोनातून जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

परशुरामाचे माता-पिता म्हणून रेणुका आणि जमदग्नी हे दाम्पत्य जनमानसात प्रसिद्ध आहे. जमदग्नी हा नांवाप्रमाणेच (धुमसणारा अग्नी) अत्यंत तापट असणारा भृगुकुलोत्पन्न ऋषी होता. जमदग्नीचा सर्वात प्राचीन उल्लेख ऋग्वेदात येत असला तरी रेणुकेचा संदर्भ मात्र आपल्याला पहिल्यांदा महाभारतात सापडतो. जमदग्नी आणि रेणुकेचा उल्लेख असणाऱ्या दोन कथा महाभारतामध्ये आल्या आहेत. वनपर्वातील कथेमध्ये जमदग्नी आणि रेणुकेला रुमण्वान, सुषेण, वसू, विश्वावसू आणि परशुराम असे पाच पुत्र असल्याचे वर्णन सापडते. एकदा रेणुकेचे पुत्र फळे इत्यादी खाण्याचे जिन्नस गोळा करून आणण्यासाठी वनात गेले असता ती पतीच्या अनुज्ञेने स्नानाकरिता नदीवर जाते. स्नान करून परत येत असता तिला आपल्या स्त्रियांसोबत क्रीडा करणारा चित्ररथ राजा दिसतो. अशा प्रकारे अचानक नजरेस पडलेले दृश्य पाहून राजाच्या वैभवामुळे त्याच्याशी क्रीडा करण्याची स्पृहा रेणुकेच्या मनात उद्भवते. अशा मनोविकारांनी ग्रस्त होऊन ओलेत्या वस्त्राने आणि म्लानमुखाने आश्रमात परत आलेल्या रेणुकेकडे दृष्टिक्षेप टाकताच जमदग्नीस अन्तज्र्ञानाने सर्व वृत्तान्त समजतो. क्रोधाविष्ट जमदग्नी वनातून परत आलेल्या एकेका मुलाला त्याने रेणुकेचा वध करावा अशी आज्ञा करतो. मात्र मातृप्रेमामुळे पहिल्या चारपकी एकही पुत्र ही आज्ञा पाळण्यास तयार होत नाही. शेवटी जमदग्नी त्यांना पशुयोनीत जन्म घेण्याचा शाप देऊन परशुरामास तशीच आज्ञा करतो. परशुराम मात्र वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून तत्काळ आपल्या परशूने मातेचा शिरच्छेद करतो.

आपल्या पुत्राने आपली आज्ञा मानल्याचे आणि रेणुका मृत्यू पावल्याचे पाहताच जमदग्नीचा क्रोध शांत होतो आणि तो परशुरामावर प्रसन्न होऊन हवे ते वर मागून घेण्यास सांगतो. या प्रसंगी परशुराम अतिशय हुशारीने हे वर मागून घेतो. सर्वप्रथम तो मातेस पुन्हा जिवंत करावे तसेच सर्वाना या प्रसंगाचा विसर पडावा अशी प्रार्थना करतो. त्यानंतर तो स्वत:ची मातृवधाच्या पातकापासून सुटका व्हावी आणि आपल्या भावांची त्यांना हीन योनीत जन्म घेण्याच्या शापापासून सुटका व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो. शेवटी तो स्वत:साठी दीर्घायुष्य आणि युद्धात कधीही पराभव पहावा लागू नये असे वरदान मागतो. त्याच्यावर प्रसन्न झालेला जमदग्नी त्याच्या या सर्व इच्छा तत्काळ मान्य करतो आणि त्यामुळे लगेच रेणुका पुन्हा जिवंत होते.

महाभारतातील जमदग्नी-रेणुकेचा दुसरा संदर्भ छत्र आणि उपानह (छत्री आणि पादत्राणे) यांच्या दानाचे महत्त्व कथन करण्याकरिता आला आहे. अनुशासन पर्वातील प्रस्तुत संदर्भामध्ये धनुर्वष्टिद्धr(२४४)ोचा सराव करणाऱ्या जमदग्नीची कथा आहे. तिरंदाजीच्या सरावाची त्याची पद्धत अशी होती की, जमदग्नी धनुष्याला बाण लावून सोडी आणि रेणुकेला तो जिथे पडला असेल तिथून शोधून काढून परत आणायला लावी. असे करता करता एकदा रेणुकेला बाण परत आणण्यास खूपच उशीर झाला. त्यामुळे नेहमीप्रमाणे लगेच जमदग्नीस राग आला आणि त्याने रेणुकेस उशीर होण्यामागचे कारण विचारले. भयकंपित रेणुकेने त्याला सांगितले की ती बाण शोधून आणतच होती, परंतु वाटेत सूर्याच्या प्रचंड उष्म्याने त्रस्त झाल्याने आणि पाय भाजून निघाल्याने तिला विश्रांतीकरिता झाडांच्या सावलीत थांबणे भाग पडले. तिचा हा वृत्तांत ऐकून जमदग्नी अजूनच क्रोधायमान झाला आणि आपल्या पत्नीस अशा प्रकारे छळणाऱ्या सूर्यासच त्याने खाली पाडायचे ठरविले.

जमदग्नीने सूर्यावर शरसंधान केल्यावर साक्षात सूर्यच पृथ्वीवर येतो आणि जमदग्नीची क्षमा मागतो. शरण आलेल्या सूर्यावर बाण न चालवण्याचे वचन दिल्यावर सूर्यही प्रसन्न होऊन आपल्या उष्म्यापासून डोक्याचे रक्षण करण्यासाठी छत्र आणि पायाचे रक्षण करण्याकरिता चामडय़ाची पादत्राणे देतो. या कथेचा मूळ उद्देश स्वाभाविकपणे दानमाहात्म्य सांगणे हा आहे. छत्री आणि चपलांचे दान किती पुण्यकारक आहे याची माहिती सांगण्याच्या ओघात प्रस्तुत कथा महाभारतात आली आहे. मात्र या कथेमधूनही पूर्वीच्या कथेप्रमाणेच जमदग्नीचा तापट स्वभाव, रेणुकेचे पतीच्या आज्ञेत राहणे आणि प्रसन्न झाल्यावर क्षमा करण्याची जमदग्नीची वृत्ती याचे दर्शन घडते.

महाभारताच्या वनपर्वातील कथेतच काही भर घालून रेणुकेची कथा ब्रह्माण्डपुराणात आल्याचे पुराणकोशात नोंदवलेले दिसते. या कथेनुसार रेणुका पाणी आणण्याकरिता नर्मदातीरी गेली असता प्रथम तिला अर्जुन कार्तवीर्य आपल्या राण्यांसोबत जलविहार करताना आढळतो. तेथून ती पाणी भरण्याकरिता अजून वरील बाजूस गेली असता रेणुकेला शाल्वराज चित्ररथ आणि त्याच्या पत्नीचे दर्शन होते. या सर्व प्रकारात आश्रमात परतण्यास रेणुकेला उशीर झाल्यामुळे तिच्यापूर्वी परत आलेल्या जमदग्नीस राग येतो आणि रेणुकेकडून उशिराचे कारण कळल्यावर तो अजूनच चिडून तिचा वध करण्याची आपल्या मुलांना आज्ञा करतो. यापुठील कथाभाग साधारणपणे महाभारतातील कथेनुसारच आहे. थोडक्यात, या सर्व कथांमधून आपल्याला रेणुकेचा शिरच्छेद आणि तिला पुन्हा प्राप्त झालेले आयुष्य यांविषयी समजते. मात्र या कथांमध्ये जमदग्नी आणि रेणुका हे एक ऋषिदांपत्य असल्याचे दिसून येते. यात रेणुकेला कोठेही, मृत्युपूर्वी किंवा पुनर्जीवित झाल्यावर, देवत्व दिलेले नाही. पुढे पुराणकाळात मात्र रेणुका देवता म्हणून प्रसिद्ध झाली. भारतात काही ठिकाणी रेणुकेची पूजा वारुळाच्या स्वरूपात करण्यात येते. सुफलन आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून भूमीशी एकरूपता साधून स्त्रीदेवतांची पूजा केली जाते. तसेच स्वरूप रेणुकेचे मानल्यास तीदेखील समृद्धीचे प्रतीक आणि भक्तांना मनोवांछित गोष्टी प्रदान करणारी आहे, असे म्हणता येते.

मरिअम्मा आणि येल्लम्मा

दाक्षिणात्य परंपरेत परशुरामाच्या आईचे नाव मरिअम्मा आणि वडिलांचे नाव जमदग्नी असे सांगितले जाते. तसेच या कथेमध्ये मरिअम्मेचे पातिव्रत्य हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मानल्याचे दिसून येईल. मरिअम्मा महान पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यबलाने ती घटाशिवाय पाणी भरू शकत असे. म्हणजे तिच्या संपर्कात आल्यावर पाणी जणू त्याचे स्यन्दनशीलत्व सोडून स्थिर होई, आणि हातावर, एखाद्या पारदर्शक मडक्यात भरून आणावा, तसा पाण्याचा गोळा ती आणू शके. प्रत्यक्ष घट घेऊन त्यात पाणी भरण्याची तिला आवश्यकता भासत नसे. त्याचप्रमाणे स्नानानंतर तिचे ओले वस्त्र डोक्यावर तरंगत वाळत असे. अधांतरी राहून सुकलेल्या वस्त्रानिशी ती आश्रमात पोहोचत असे. एकदा मात्र ती नेहमीप्रमाणे हातावर पाणी भरून (पाण्याचा गोळा घेऊन) डोक्यावर तरंगत्या वस्त्रानीशी न्हाऊन परत येत असता तिच्या डोक्यावरून काही गंधर्वमिथुने उडत गेली. त्या जोडप्यांच्या हातातील पाण्यात पडलेल्या प्रतिमेकडे पाहून स्खलित झालेल्या मरिअम्मेचे सामथ्र्य या चुकीमुळे संपुष्टात आले. पर्यायाने हातातील पाणी स्वभावधर्माप्रमाणे वाहू लागून जमिनीवर सांडले आणि डोईवरील वसन खाली येऊन ओलेच राहिले.

या अवस्थेत घरी आलेल्या मरिअम्मेला पाहून जमदग्नीने पृच्छा करता तिने त्याला सर्व वृत्तांत कथन केला आणि त्यामुळे क्रोधित झालेल्या जमदग्नीने परशुरामास तिचे डोके उडविण्यास फर्मावले. परशुराम त्यानंतर पित्याची आज्ञा पाळण्याच्या हेतूने आईस घेऊन वनात गेला असता तिथे आपला प्राण वाचावा या हेतूने मरिअम्मेने वनात भेटलेल्या एका चांडालकन्येस घट्ट पकडले. ती चांडालकन्यादेखील मरिअम्मेस सोडेना. त्या दोघी एकमेकींच्या मिठीत आहेत हे पाहिल्यावर शेवटी परशुरामाने तसाच आपला परशू चालवला व परिणामस्वरूप त्या दोघींचीही मस्तके छाटली गेली. ही सर्व घटना परशुरामाने दुखी अंतकरणाने आपल्या पित्यास त्वरित कथन केली असता कोणत्याही परिस्थितीत मुलाने आज्ञाभंग केला नाही म्हणून जमदग्नीने त्यास वर देऊ केला. आपल्या आईस पुन्हा जिवंत करण्याचा वर त्याने मागून घेताच ऋषीने त्यास अभिमन्त्रित जल आणि एक काठी दिली. तुटलेले डोके धडास जुळवून अभिमन्त्रित जल िशपडावे आणि डोक्यास काठीने स्पर्श करावा म्हणजे मृत व्यक्ती उठून बसेल, असा या संबंधीचा विधी जमदग्नीने परशुरामास कथन केला. हे ऐकून परशुराम पुन्हा वनात आला आणि त्याने घाईने सर्व सोपस्कार पार पाडले आणि त्या दोघींना पुन्हा जिवंत केले. या सर्व प्रकारात घाई केल्याने आपल्या हातून दोघींच्या मस्तकाची अदलाबदल झाल्याचे त्या दोघी जिवंत झाल्यावर परशुरामाच्या ध्यानात आले. परस्पर बदललेली मस्तके धारण केलेल्या त्या दोन दिव्य देहधारी स्त्रिया झाल्या. मरिअम्मेचे मस्तक आणि चांडालकन्येचे शरीर जीस लाभले ती देवी मरिअम्मा होय. तसेच जी मरिअम्मेचे धड आणि चांडालकन्येचे शिर मिळून बनली ती देवी येल्लम्मा होय.

उत्तर आणि दक्षिण भारतातील या कथांमध्ये परशुरामाच्या आईचा मृत्यू आणि पुनर्जीवन हा धागा समान असला तरी आईच्या नावांमध्ये रेणुका आणि येल्लम्मा असा भेद दिसतो. तसेच उत्तरभारतीय परंपरेत रेणुकेत न कल्पिलेले देवत्व या दक्षिण भारतातील कथांमध्ये आलेले आहे. रेणुकेचे महाराष्ट्रातील स्थान माहुर असल्याने माहुरम्मा या शब्दाचाच अपभ्रंश मरिअम्मा असा झाला असावा, असे मत रेणुका आणि मरिअम्मा यांतील एकत्व दाखविण्याकरिता डॉ. रा. चिं. ढेरे यांनी मांडले होते. परंतु भाषाशास्त्रानुसार विचार करता ते फारसे पटणारे नाही. कितीही प्रयत्न केला तरी माहूरचे मरि/मरी करणे फारच कठीण (आणि म्हणूनच अनावश्यक) होईल. माहूरशी मरिअम्मेचा थेट संबंध नसून ती मुळात एक स्वतंत्र दाक्षिणात्य देवता असल्याचे लक्षात घेणे आवश्यक आहे. मात्र रेणुका हीच मरिअम्मा आहे असे जे मत मान्य झाल्याचे दिसते, त्यामागे दोन्ही कथांमधील तुटलेल्या मस्तकाचा समान धागा असावा हेदेखील लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. मरिअम्मेचा मूळ मरी किंवा मारी या रोगराईशी (विशेषत पूर्वीच्या देवी नावाच्या रोगाशी) संबंध असलेल्या देवतेत आहे. या देवतेचे स्थान शीतलादेवीच्या आसपास अनेक गावांच्या हद्दीवर आजही पाहावयास मिळते. आषाढ महिन्यात तिची पूजा करण्याचा आणि तिला नवेद्य दाखविण्याचा प्रघात महाराष्ट्रात आहे. तिच्या उपासनेत रेडय़ाचा बळी देण्याची परंपरा आहे. रेडेजत्रा या नावाने हा महोत्सव ओळखला जातो.

मातंगी

मातंगी ही शाक्तपंथातील एक सुपरिचित देवता आहे. या देवतेच्या उत्पत्तीविषयी विविध कथा प्रचलित आहेत. त्यांपकी एक कथा तिचा रेणुकेशी असणारा संबंध सांगणारी आहे. या कथेनुसार जमदग्नींच्या आज्ञेने परशुरामाने रेणुकेचा शिरच्छेद करण्याकरिता तिच्यावर बाण चालविला. तेव्हा रेणुकेसोबतच तिच्या मागे उभ्या असणाऱ्या तिच्या मादिग (मातंग) दासीचे शिरही तुटले. जमदग्नीचा क्रोध शांत झाल्यावर त्याने रेणुकेला जीवदान देण्याचे मान्य केले आणि त्याला मस्तक धडाला चिकटविण्यास सांगितले. या कृतीमध्ये परशुरामाकडून चूक झाल्याने दोघी जिवंत तर झाल्या, पण त्यांच्या मस्तकांची अदलाबदल झाली होती. शेवटी जमदग्नीने ज्या (मादिग दासीच्या) धडावर रेणुकेचे मस्तक होते, ती आपली पत्नी रेणुका म्हणून तिचा स्वीकार केला. मादिग दासी, जी स्वतचे मस्तक आणि रेणुकेचे धड अशा स्वरूपात जिवंत झाली होती, ती मातंगी या नावाने प्रसिद्ध झाली. मुळात या देवतेचे उपासक जरी मातंग समाजातील असले, तरी तिचे धड ब्राह्मण रेणुकेचे असल्याने ब्राह्मण समाजही मातंगीची उपासना करू लागला.

प्रस्तुत कथेत कर्नाटकातील मादिग लोकांची देवता असणारी मातंगी तंत्रशास्त्रातील देवता म्हणून कशी लोकप्रिय झाली, आणि अनेक ब्राह्मणही तिचे अनुयायी कसे झाले, हे सांगितले आहे. दैवतशास्त्रदृष्टय़ा विचार करता रेणुका ही उत्तर भारतातील, प्रारंभी देवत्व न पावलेली ऋषीपत्नी होती. मरिअम्मा आणि येल्लम्मा या दक्षिण भारतातील देवता तिच्याहून भिन्न होत्या. मात्र त्यांच्या उपासनेतील महत्त्वाचा समान धागा म्हणजे त्यांची केवळ तांदळ्याच्या स्वरूपात पूजा होते. म्हणजेच, मूर्ती म्हणून केवळ त्यांचे मस्तकच असते. परशुरामाने मस्तक रेणुकेचे मस्तक तोडण्याच्या कथेमुळे या दाक्षिणात्य देवतांचा रेणुकेशी एकीभाव कल्पिणे शक्य झाल्याचे संशोधकांचे मत आहे. या सर्व प्रवासात रेणुकेलाही देवत्व प्राप्त झाले, आणि रेणुका आणि येल्लम्मा किंवा मरिअम्मा ही समानार्थी नावे बनली.

एकवीरा

परशुराम हा एक (एकमेव) वीर जिचा पुत्र होता, अशी देवता म्हणजे एकवीरा होय. एकवीरा नावाची ही व्युत्पत्ती मान्य केली, तर एकवीरा हीच रेणुका होय, हे लक्षात येईल. महाराष्ट्रात एकवीरेचे पूजन अनेक ठिकाणी होते. काल्रे येथील बौद्ध लेण्यांच्या परिसरात तिचे सुप्रसिद्ध प्राचीन स्थान आहे. कोळी लोकांची ही आराध्य देवता आहे. तिचा उत्सव चत्र शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा या काळात साजरा होतो. सोळाव्या शतकातील पठणचे प्रसिद्ध संत एकनाथ यांची कुलदेवता एकवीराच होती. संत एकनाथ तिचे गुणगान करताना आपल्या एकनाथी भागवतात म्हणतात –

आतां वंदूं कुळदेवता।

जे एका एकी एकनाथा।

ते एकीवांचून सर्वथा।

आणिक कथा करूं नेदी।

एक रूप दाविलें मनीं।

तंव एकचि दिसे जनीं वनीं।

एकचि कानीं वदनीं।

एकपणीं ‘एकवीरा’।

ते शिवशक्तिरूपें दोनी।

नेऊन मिरवे एकपणीं।

एकपणें जाली गुर्वणिी।

प्रसवे एकपणीं एकवीरा।

तें एकरूपें एकवीरा।

प्रसवली बोध-फरशधरा।

जयाचा कां दरारा।

महावीरां अभिमानियां।

तेणे उपजोनि निवटिली माया।

आज्ञा पाळूनि सुख दे पितया।

म्हणोनि तो जाहला विजया।

लवलाह्य़ां दिग्मंडलीं।

जो वासनासहस्रबाहो।

छेदिला सहस्रार्जुन-अहंभावो।

स्वराज्य करूनियां पहा हो।

अर्पी स्वयमेवो स्वजातियां।

तेणें मारूनि माता जीवविली।

तेचि कुळदेवता आम्हां जाहली।

परी स्वनांवें ख्याति केली।

एकात्मबोली एकनाथा।

ते जैंपासोनि निवटिली।

तंपासोनि प्रकृति पालटली।

रागत्यागें शांत झाली।

निजामा उली जगदंबा।

तया वोसंगा घेऊन।

थोर दिधलें आश्वासन।

विषमसंकटीं समाधान।

स्वनामस्मरण केलिया।

ते जय जय जगदंबा।

‘उदो’ म्हणे ग्रंथारंभा।

मतीमाजी स्वयंभा।

योगगर्भा प्रगटली।

या एकनाथांच्या स्तुतीवरून त्यांना एकवीरा म्हणून जमदग्निपत्नी आणि परशुराममाता रेणुकाच अपेक्षित आहे, हे सिद्ध होते. एकवीरेचे ध्यान काही ठिकाणी चतुर्भुज आणि हातांत खड्ग-चर्म-परशु धारण करणारी असे दाखविले जाते.

या विवेचनावरून असे ध्यानात येते की, महाभारतकाळी जमदग्नी आणि रेणुकेची कथा प्रसिद्ध होती, जिचे मस्तक पित्याची आज्ञा पालन करण्याच्या हेतूने परशुरामाने तोडले, मात्र पित्याचा राग शांत झाल्यावर त्याच्याकडून तिला पुन्हा जिवंत करण्याचा वर मागून घेतला. परंतु तेव्हा बहुधा देवता म्हणून तिची पूजा करण्यात येत नसावी. दाक्षिणात्य परंपरेत असणाऱ्या मरिअम्मा आणि येल्लम्मा यांसारख्या देवता, ज्यांच्या केवळ मुखाचीच पूजा करण्यात येत होती, त्यांच्याशी असणाऱ्या समानधर्मामुळे रेणुका, मरिअम्मा, येल्लम्मा आणि तांत्रिक मातंगी या सर्व देवता एकच मानल्या जाऊ लागल्या. त्याचप्रमाणे रेणुकेचे एकवीरा या नावानेही पूजन करण्यात येऊ लागले. मस्तकाचे प्रतीक म्हणून तांदळा या स्वरूपात तिची पूजा केली जाते. अमूर्त (ंल्ल्रूल्ल्रू) स्वरूपात कोणी वारूळ म्हणजे रेणुका कल्पून तिची पूजा करतात. तसेच एकवीरा म्हणून चतुर्भुज देवीच्या स्वरूपातही तिची स्थापना अनेक ठिकाणी केली जाते. अशा प्रकारे विविध प्रकारे विविध ठिकाणी प्रदीर्घ इतिहास असणाऱ्या रेणुकादेवीची श्रद्धेने पूजा होताना दिसते.

कितीही प्रयत्न केला तरी माहूरचे मरि/मरी करणे फारच कठीण (आणि म्हणूनच अनावश्यक) होईल. माहूरशी मरिअम्मेचा थेट संबंध नसून ती मुळात एक स्वतंत्र दाक्षिणात्य देवता असल्याचे लक्षात घेणे आवश्यक आहे.

दाक्षिणात्य परंपरेत असणाऱ्या मरिअम्मा आणि येल्लम्मा यांसारख्या देवता, ज्यांच्या केवळ मुखाचीच पूजा करण्यात येत होती, त्यांच्याशी असणाऱ्या समानधर्मामुळे रेणुका, मरिअम्मा, येल्लम्मा आणि तांत्रिक मातंगी या सर्व देवता एकच मानल्या जाऊ लागल्या.
डॉ. अंबरीष खरे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:27 am

Web Title: mahabharat and renuka
Next Stories
1 बौद्ध धर्मातील स्त्रीदेवता
2 स्मरण पंचकन्यांचे…
3 दुर्गरुपेण संस्थित:
Just Now!
X