09 December 2019

News Flash

मी वाचले स्वभाव

२६ जुलैच्या पुरामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-वांगणीच्या मध्ये अडकली.

अनुभव
माधवी घारपुरे – response.lokprabha@expressindia.com

२६ जुलैच्या पुरामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-वांगणीच्या मध्ये अडकली. हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पण त्याचबरोबरीने त्यांना संकटसमयी माणसं कशी वागतात याचे अनुभवही आले. हा अनुभव घेताना ‘लेखकाच्या नजरे’ने  टिपलेले मनुष्यस्वभावाचे हे विविध कंगोरे..

माणूस संकटात अडकतो, धडपडतो, सुटतोही पण ही संकटे माणसाला अनेक गोष्टी शिकवतात. माणसांचे स्वभाव कळतात. माणसं वाचतासुद्धा येतात. परवाच म्हणजे २६ जुलै १९ ला बदलापूर-वांगणीच्या मध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात वेढली गेली तेव्हा १७ तासांनी आम्हा प्रवाशांची सुटका झाली. बदलापुरातून टॅक्सीने ठाण्याला येताना चित्रपट तर अख्खा दिसला पण त्या काळात माणसांचे विविध स्वभाव पाहता आले.  वाचता आले, अनुभवतादेखील आले. सुटका कशी झाली, याचे अनेक थरार वाचले पण हा एक अलग पैलू.

दुपारी साडेबाराची वेळ. आता आवश्यक ते सामान घेऊन उतरायचे असा मनाचा हिय्या केला. नाशवंत म्हणजे खाण्याचे बरोबर घेतलेले पदार्थ वाटून टाकायचे मी ठरवले आणि पाहुण्यांकडे द्यायचे गुलाबजाम, चकल्या बाहेर काढल्या. महत्त्वाचे सामान एका पिशवीत घातले. एक बाई खूपच घाबरलेल्या होत्या. त्यांना गुलाबजाम द्यायला गेले तर म्हणाल्या ‘‘आता जायचेच आहे तर गुलाबजाम खाऊन काय करायचे?’’

त्यांना म्हटले, ‘‘जे व्हायचे ते साऱ्यांचे होईल आणि जायचे आहे तर गुलाबजाम खाऊन तरी जाऊ.’’

माझ्या बोलण्यातला विनोद सोडून देऊ पण ‘जीवन आणि मृत्यू’ या मधल्या एका श्वासाच्या अंतराची भीती माणसाला कशी असते याचा जिवंत वस्तुपाठ म्हणजे त्या बाई होत्या. जगात माणूस पापाला घाबरत नाही पण मृत्यूला घाबरतो.

दोन छोटय़ा मुलांनीही गोड खाऊ खाल्ला. परिस्थितीची तीव्रता कळण्याचे त्यांचे वय नव्हते. एक मुलगा पाण्यासाठी रडायला लागला. आमच्या कुणाजवळच साडेबारापर्यंत पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नव्हता. इतकंच काय टॉयलेट बेसिनलाही थेंबभर पाणी नव्हते. तो मुलगा रडायचा थांबेना. दुसऱ्या कंपार्टमेंटला मी जाऊन आले तर तिथेही तोच प्रकार. परतल्यावर पाठीशी एक वाक्य तिरकस कानावर आले,

‘‘इतकी मोठी बाई अजून थोडी नाही राहू शकत पाण्याशिवाय? कळतंय ना?’’ मला वाईट वाटलं पण दु:ख, मानसिक वेदना यासुद्धा क्षणकालच टिकतात याचा प्रत्यय आला. दोन छोटय़ा मुलांतला दुसरा मुलगा पळत पळत आपल्या आईच्या पर्समधून पाण्याची छोटी बाटली घेऊन आला आणि म्हणाला ‘‘हे घे, पाणी पी. आईच्या पर्समध्ये होती. मला पण दे थोडंसं.’ ती आई खूप वरमली पण १०० टक्के चूकही म्हणता येईना. आपल्या मुलाला लागलं तर? हा स्वार्थ म्हणा, प्रेम म्हणा असू शकतं. एक नक्की, ती ‘आई’ होती. ‘माउली’ नाही, कारण आई आपलं मूल पाहते. माउलीला सगळीच मुलं आपली वाटतात. ‘विठोबा’ ‘माउली’ होती. ‘ज्ञानेश्वर’ ‘माउली’ होती. निरागसता कशी असते? तर पाणी देणाऱ्या बालकासारखी.

१२.४० ला पाणी जरा ओसरलं. रेल्वे डब्याच्या पायऱ्या दिसू लागल्या. रुळांवर पाणी खूप होतं पण उतरायचंच असं ठरवून ग्रामस्थांच्या आधाराने उतरलो. पैसा, फोटो, नाव, कशा कशाचीही अपेक्षा न करता ते धावून आले होते. खाद्यपदार्थाची जड पिशवी, वाऱ्याने उलटी होणारी छत्री, गुडघ्यापर्यंत पाणी, त्याला असलेला जोर अशा वातावरणात रुळांवरून चालायला सुरुवात झाली. कधी पाय खोल, कधी वाकडा. चालत होते. कधी कुणाचा हातात हात, कधी कंबरेला हात, कधी कुणाच्या खांद्यावर हात. ना तरुण, ना विद्यार्थी, ना वयस्कर प्रत्येकाचा स्पर्श आधाराचा होता. कोणत्याही स्पर्शात शृंगार, वासना, कामुकता यांचा लवलेशही नव्हता. होता तो फक्त आधारस्पर्श. चालताना प्रत्येक पावलाला मुखाने मोठय़ांदा श्रीरामाचं नाव घेतलं जात होतं. तशाही वेळेत पुढून एक आवाज ऐकू आला. ‘‘आता बरं देवाचं नाव तोंडात येतंय. एरवी?’’ अर्थात् एरवी मी काय करते ते सांगायची ती वेळ नव्हती. मुद्दा इतकाच की माणूस वेळेला टोच मारतोच मारतो.

दीड-दोन कि.मी. चालत आलो. तिथून साधारण २० मीटर आम्हाला बोटीने नेलं. बिस्किटाचा पुडा तिथं दिला गेला आणि अ‍ॅम्ब्युलन्समधून बदलापूर स्टेशनला आणून सोडलं. एक दीर्घ श्वास घेतला. त्या मदत करणाऱ्यांना आणि जगन्नियंत्याला हात जोडले.

आता फोनला व्यवस्थित रेंज यायला लागली. पहाटे कसातरी एक फोन घरी आणि एक फोन कोल्हापूरला व्याख्यानाच्या ठिकाणी लागला होता. त्यानंतर जो बंद झाला तो आता सुरू झाला. टॅक्सीत फोन घेता येत होते. घरी कळवलं की, मी सुरक्षित आहे. तोपर्यंत एक फोन ‘‘माधवी,  बरी आहेस ना? पण एक सांगते आता साठी पासष्टीनंतर किती ती व्याख्यानाची हौस? आता पुरे कर.’’

मी ‘हो’ म्हटलं तोवर दुसरा फोन, ‘‘किती वेळा गं फोन केला पण उचलला नाहीस. लागत नसेल तुला रेंज. पण आता तुझा आवाज ऐकला बरं वाटलं.’ एका फोनमध्ये न मागता सल्ला तर दुसऱ्या फोनमध्ये आपलेपणा. फुलांनाच सुगंध असतो असं नाही तर माणसांच्या शब्दांतूनही तो बहरत असतो.

तिसरा फोन ‘‘व्याख्यानाला चालली होतीस ना? बरं झालं सुटलीस. पण किती हजार बुडाले गं आज? तिकीट तू काढलं होतंस की त्यांनी पाठवलं होतं? नाही तर डबल नुकसान!’’

मी म्हटलं, ‘‘तुझ्या शब्दात डबल नुकसान, पण अनुभव किती आले?.. विद्यार्थ्यांचे, सुहृदांचे किती फोन आले म्हणून सांगू? जोडलेली माणसं गं!’’

‘‘करायची काय इतकी नाती?’’

‘‘अगं कित्येक नात्यांचा आर्थिक फायदा असतोच असं नाही पण ही सारी नाती जीवनरस समृद्ध करतात. मी ठेवते फोन..’’

एक ना दोन शेकडो फोन आले. जीवन जगत असताना पावसाच्या प्रत्येक सरीत विविध रंग दिसत होते इंद्रधनूचे! त्या प्रत्येक सरीतून शिकण्यासारखं खूप असतं पण आपलं त्याकडे लक्ष नसतं! आपण दुसऱ्याला शिकवतच अधिक असतो हे खरं!

First Published on August 9, 2019 1:03 am

Web Title: mahalaxmi express stuck heavy rainfalls my experience
Just Now!
X