X

आठवणीतील गोष्ट : असे हे देवस्थानी दरोडे

महाराष्ट्राची आदरस्थाने असणाऱ्या देवालयांमध्ये महागडे दागिने दरोडेखोरांनी लुटण्याचे प्रकार आधीही घडले आहेत.

महाराष्ट्राची आदरस्थाने असणाऱ्या देवालयांमध्ये महागडे दागिने दरोडेखोरांनी लुटण्याचे प्रकार आधीही घडले आहेत. अशा घटनांचा तपास सुरुच राहतो; तोवर मंदिर पुन्हा नव्या रुपात तयार होते. अशा काही दरोडय़ांचा घेतलेला हा आढावा.

सातारा जिल्ह्य़ातील तुळजाभवानीच्या मंदिरातील दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या सोने, चांदी, माणिक, मोत्यांनी घडविलेल्या दागदागिन्यांची १९८९ पासून २००९ पर्यंतच्या २० वर्षे कालावधीत ठेकेदारांनी, मंदिर संस्थानाच्या पदाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी संगनमत करून अंदाजे १२० किलो सोन्याची कशी लुटालूट केली हे विशेष लेखापरीक्षकांनी उघडकीस आणले. ही लूट एक प्रकारे मंदिराच्या दानपेटीवर टाकलेला दरोडाच आहे. यापूर्वीही महाराष्ट्राची आदरस्थाने असणाऱ्या देवालयांमध्ये कोटी-कोटी किमतीचे दागिने दरोडेखोरांनी लुटले आहेत. साधारण दोनेक वर्षांपूर्वी कोकणातील दिवेआगार येथील भरीव सोन्याची मूर्ती चोरून, वितळवून सोने विकण्यात आल्याचे उघड झाले. यात पुणे येथील पर्वतीवरील गणेश आणि पार्वतीची सोन्याची मूर्ती, खंडोबाच्या जेजुरी संस्थानातील दरोडा आणि सातारच्याच जलमंदिरात झालेल्या चोरीचा समावेश करावा लागेल.

पुण्याच्या पर्वती टेकडीवरील देव देवेश्वराच्या मुख्य देवळातील गणपती व देवी पार्वती यांच्या सोन्यात तयार केलेल्या भरीव मूर्ती ३० सप्टेंबर १९३२ रोजी चोरांनी रात्री चोरल्या. हे खुद्द पेशव्यांचे देवालय. श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांनी त्या सर्व मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. त्यासाठी पर्वती टेकडीवर ७ एप्रिल ते ११ एप्रिल १७४९ हे पाच दिवस धूमधडाक्यात उत्सव साजरा झाला होता.

देव देवेश्वर महादेवाची मूर्ती चांदीत घडविलेली होती, तर गणपती व पार्वतीच्या मूर्ती सोन्यात घडविण्यात आल्या होत्या. बालस्वरूपातील गणपतीची मूर्ती ६८६ तोळ्याची होती. यज्ञोपवित्र जानवे, कमरेवर कमर पट्टा व अंगावर रुळणारा नाग, गंडस्थळावर पिंपळपान अशी ती सजवलेली होती. तर पार्वतीची मूर्ती १२४९ तोळ्याची होती. तिच्या दोन्ही डोळ्यात तसेच कुंकवाच्या जागी माणके होती. बाकीचे दागिने अंगावरच कोरण्यात आले होते. केसांची गोंडे, बाराची वेणी होती. उजव्या हातात कमलपुष्प व डाव्या हातात महादेवाची शाळुंका, कमरपट्टा, तसंच नऊवारी साडीच्या पायघोळ निऱ्या दाखविण्यात आल्या होत्या. गळ्यात, हातात कडीतोडय़ा, पायात तोडे होते. माणिक व पोवळ्यांचे मंगळसूत्र, कानात हिऱ्याची कर्णफुले असा एकूण साज होता. या उत्सवाला त्याकाळी ४० हजारांचा खर्च आला होता. देवळावर एक हजार ८० तोळ्यांचा कळस बसवण्यात आला होता. १७६० मध्ये निजामाने पुण्यावर स्वारी करून तो सोन्याचा कळस काढून नेला. परत सहा वर्षांनी माधवराव पेशव्यांनी परत तेवढय़ाच वजनाचा सोन्याचा कळस बसवला होता.

३० सप्टेंबरच्या रात्री चोरटय़ांनी गाभाऱ्याच्या उत्तरेकडील खिडकीच्या लाकडी दाराला गिरमिटच्या सहाय्याने तीन भोके पाडून आत हात घालून कडी काढून सर्व मूर्ती पळवून नेल्या. पहाऱ्याचे शिपाई देवळाच्या दक्षिणेला झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघड झाला. त्या मूर्ती अद्याप पोलिसांना शोधून काढता आल्या नाहीत, की चोर सापडले नाहीत. त्या जागी जुन्या मूर्तीप्रमाणे पितळीत मूर्ती घडवून तेथे बसवण्यात आल्या आहेत.

२७ जुलै १९४४ रोजी रात्री खंडोबारायाच्या जेजुरी देवस्थानावर असाच दरोडा पडला होता. नेहमीप्रमाणे रात्री १२ वाजता देवस्थानाचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता. खंडोबाच्या देवळाचे सेवेकरी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काठय़ांचा मारा सुरू झाला. पाहतात तो समोर उंचपुरे दहा-बारा जण तोंडाला काळी फडकी बांधून समोर उभे. त्यांच्या हाता काठय़ा, बंदुका होत्या. त्यांनी सगळ्यांना एकत्र करून लांबवर बसवले. पुजाऱ्याकडून तिजोरीच्या किल्ल्या घेऊन खजिना उघडला. तिजोरीत इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे व इतर धनिकांनी खंडोबाला दिलेल्या सोन्याच्या, रत्नांच्या कुडय़ा, माणिकाचे खडे, पानडय़ा, लाकडय़ा, कंठी, मोत्याचे तुरे, छऱ्यां, शिरपेच, देवाचे मुखवटे, जडजवाहीर, सोन्याच्या मूर्ती असे कोटय़वधी किमतीचे सोन्याचे दागिने होते. तो घेऊन दरोडेखोर पळून गेले.

त्या काळात (१९४२) दुसरे महायुद्ध सुरू होते. साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पत्री (प्रति) सरकार स्थापन झाले होते. ‘छोडो भारत’ची चळवळ जोरात सुरू होती. सारे पोलीस खाते कामाला लागले. पण जेजुरी दरोडय़ाचाही पत्ता लागत नव्हता. एके दिवशी बेचाळीसच्या चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांची गुप्त बैठक सदाशिव पेठेत, टिळक रोडजवळच्या ‘मंगल भुवनात’ असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. रात्री ११ वाजता पोलिसांनी धाड टाकली. हा छापा राजकीय होता. पण झडतीत पत्रव्यवहार हाती लागला तो जेजुरी दरोडय़ासंबंधीचा. त्यावरून नगर, सोलापूर, कोल्हापूर, या ठिकाणी धाडी टाकून संबंधितांना अटक करण्यात आली. जानेवारी १९४५ मध्ये पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. तेव्हा साक्षी पुराव्यावरून लक्षात आले की राजकीय कारणासाठी देवस्थानाची लूट करण्यात आली होती.

१७ जानेवारी १९४६ रोजी न्यायाधीश दलाल यांनी मे. कृ. पटवर्धन, शं. द. माने, य. म. कुलकर्णी, द. गो. तांबट, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ आदी बारा जणांना तीन वर्षे अधिक एक वर्ष अशी शिक्षा ठोठावली. एक आरोपी शि. गो. उपाळेकर सराफ यांचा दरोडय़ाशी काही एक संबंध नसल्याचे आढळून आल्याने त्यांना दोषमुक्त ठरवून सोडून देण्यात आले.

सातारा जलमंदिर चोरी प्रकरणही जुलै महिन्यात २४ तारखेला घडले आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचे भवानीदेवीचे मंदिर हे जलमंदिर म्हणून ओळखले जाते. हे छत्रपतींचे कुलदैवत. साहजिकच मंदिराची एकंदर व्यवस्था ऐश्वर्ययुक्त असणारच. भवानीदेवीची मूर्ती सोन्यात घडवलेली होती. २३ जुलै १९५२च्या उत्तररात्री या मंदिरात चोरी झाली. सोन्याची मूर्ती व इतर चांदीची भांडी वगैरे मिळून त्या काळातील मूल्यांकनाप्रमाणे साठ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. ३० जुलै रोजी पोलिसांनी बापूसाहेब आपटे, भावे, जोशी, कुलकर्णी अशा चार ब्राह्मण, साळवे, काने आणि काशिनाथ व भानाजी तसेच अडसूळ बंधू आणि चार महार समाजातील व्यक्तींना संशयावरून अटक करून पुढे तपास चालवला.

पोलीस संशयित आरोपींचा छळ करून कबुली मिळविण्याची खटपट करीत होते. परिणामी जोशी आणि कुलकर्णी यांनी पोलिसांना हवे तसे जबाब लिहून दिले. पोलिसांबद्दल प्रचंड दहशत गावात निर्माण झाली होती. शेवटी सातारचे तत्कालीन आमदार रामभाऊ मंडलिक शहरात फिरले. त्यांनी आपल्या परीने चौकशी करून दै. केसरीत स्वत:च्या सहीचे एक निवेदन प्रसिद्ध करून पोलिसांचे अत्याचार वेशीवर टांगले. त्यावेळी मुंबई प्रांताचे गृहमंत्री मोरारजी देसाई होते. त्यांनी गृहमंत्रालयाला आमदार मंडलिक व त्या वर्तमानपत्रावरच खटला भरायचे आदेश दिले. उच्च न्यायालयात खटला सुरू झाला.

मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्या. एम. सी. छागला यांच्या समोर हा खटला चालला. त्यांनी आपल्या निकालपत्रात आमदार मंडलिक व दै. केसरीचे अभिनंदन करून त्यांची प्रशंसा केली, पण तांत्रिकदृष्टय़ा दोघांकडून गुन्हा झाल्याने त्यांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड केला. पोलिसांनी संशयित आरोपींवर खटला भरला. पण त्यांच्या साक्षीपुराव्यांचा न्यायालयात अक्षरश: फज्जा उडाला. न्या. आठल्ये यांनी आठही आरोपींना निदरेष सोडून दिले आणि पोलिसांच्या पाशवी अत्याचारावर जोरदार ताशेरे ओढले.

आश्चर्याचा भाग म्हणजे मध्य प्रदेशातील इंदूर येथे महेश्वरी मंदिरातही १९५५ मध्ये याच पद्धतीने चोरी झाली. त्यावेळी मंदिराच्या काचेच्या तावदानावर उठलेले हाताचे ठसे जलमंदिरात मिळालेल्या हातांच्या ठशांबरहुकूम होते. ते ठसे हणमंता बावरी या पारधी जमातीतील पूर्वीच्या गुन्हेगाराचे होते, हेही सिद्ध झाले. हणमंताने साताऱ्याची चोरी कबूल केली. दादर येथील दरेकर सराफाला त्याने भवानीची मूर्ती विकल्याचे व सराफाने ती वितळवल्याचेही सप्रमाण सिद्ध झाले. हा खटला नव्याने उभा राहिला. न्या. जेस्ते यांनी आरोपीला सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पोलिसांची अरेरावी, दडपशाही आणि अत्याचार यावर कडक ताशेरे ओढले. छत्रपतींचे राजघराणे आणि साताऱ्यातील निरपराध नागरिकांना सोसाव्या लागलेल्या क्लेशाबद्दलही त्यांनी निकालपत्रात हळहळ व्यक्त केली. दुर्दैवाचा भाग म्हणजे ज्यांना केवळ पोलिसांच्या मूर्खपणामुळे जीवनातून उठवले गेले त्यांची भरपाई मात्र कोणालाच करता आली नाही.

सुहास सोनावणे – response.lokprabha@expressindia.com

First Published on: March 4, 2016 1:09 am
  • Tags: robbery,