दरवर्षी जानेवारी महिन्याच्या मध्याला सूर्याचे उत्तरायण सुरू होते तेव्हा साजरी केली जाणारी संक्रांत म्हणजे आपल्या देशातला एक महत्त्वाचा सण. निसर्गचक्राशी आपल्या जगण्याचे चक्र जोडून घेणाऱ्या, एकमेकांमध्ये स्नेहभाव वाढवण्याचा संदेश देणाऱ्या या सणाविषयी..

संक्रांती – हा शब्द संक्रम पहिला गण उभयपद या धातूपासून आला आहे. हे क्रियापद एकत्र येणे, एकत्र भेटणे, जाणे, ओलांडून जाणे, प्रवेश करणे, हजर असणे, आदानप्रदान करणे, विश्वास ठेवणे, हस्तांतरित करणे, सहकार्याचे वचन देणे, सांगणे, पुढे नेणे, एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाणे, सूर्याचे अयन होणे अशा अनेक अर्थानी वापरले जाते आणि म्हणूनच हे सर्व अर्थ संक्रांती या नामालासुद्धा लागू होतात.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…

संक्रांती : सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो त्याला संक्रांती म्हणतात. राशी बारा असून सूर्य प्रत्येक मासात एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा प्रत्येक वर्षांत बारा संक्रांती होतात. मात्र तो जेव्हा ज्येष्ठ मासात कर्क राशीत व पौष मासात मकर राशीत प्रवेश करतो ते दिवस महत्त्वाचे मानले जातात, कारण कर्कक्रमण दक्षिणायनात आणि मकरसंक्रमण उत्तरायणात होते. मकरसंक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो.

संक्रांतीला सूर्याच्या गतीचे प्रतीक म्हणून शक्तिदेवता मानतात. तिला मंदा, मंदाकिनी, ध्वान्क्षी, घोरा, महोदरी, राक्षसी व मिश्चिता अशी सात नावे आहेत. संक्रांतीच्या दिवशी रोहिणी व तीन उत्तरा यापैकी एक नक्षत्र असेल तेव्हा देवीचे नाव मंदा असते; चित्रा, अनुराधा. मृगशीर्ष किंवा रेवती असेल तर मंदाकिनी; अश्विनी, पुष्य, हस्त किंवा अभिजीत असेल तर ध्वान्क्षी; तीन पुरवा, भरणी किंवा माघा असेल तेव्हा घोरा; श्रवण, धनिष्ठ, शततारका, पुनर्वसू किंवा स्वाती नक्षत्र असेल तेव्हा महोदरी; मूळ, ज्येष्ठा, आद्रा किंवा आश्लेषा असेल तर तेव्हा राक्षसी आणि विशाखा किंवा कृत्तिका नक्षत्र असेल तर देवीचे नाव मिश्चिता असते.

वसिष्ठांच्या मते बारा संक्रांतीपैकी दोन अयन संक्रांती, दोन विषुव संक्रांती, चार षडशीती व चार विष्णुपदी आहेत. जेव्हा सूर्य कुंभ, वृश्चिक, वृषभ व सिंह या राशीत प्रवेश करतो, तेव्हा या संक्रांती विष्णुपदी होत; जेव्हा सूर्य कन्या, धनू, मीन व मिथुन राशीत जातो तेव्हाच्या संक्रांती षडशीती; जेव्हा सूर्य कर्क राशीत जातो तेव्हा यामायन, जेव्हा तो मकर राशीत जातो तेव्हा सौम्यायन आणि जेव्हा तो मेष वा तूळ राशीत प्रवेश करतो तेव्हा विषुव संक्रांती असतात.

लौगाक्षी व बोधायन यांच्या मते यामायन व विष्णुपदी संक्रांतींच्या आधीचा काल पुण्यप्रद असतो; विषुव संक्रांतीत संक्रमणकाल पवित्र असतो. षडशीती संक्रांतींच्या नंतरचा काल पवित्र असतो. मकरसंक्रमणाच्या आधीचा वा नंतरचा काल पुण्यप्रद असतो. हेमाद्रीच्या मते हा काल वीस घटिका आधी व वीस घटिका नंतर धरावा; पण देवळाच्या मते तो तीस घटिकांचा धरावा. मात्र रात्रीचा काल पर्वकाळ मानला जात नाही. संक्रमणापासून दिवसाचा जो भाग जवळचा असेल, तो पर्वकाळ मानावा असे सांगितले आहे. मकरसंक्रमण व कर्क संक्रमण रात्री होते तेव्हा मात्र रात्रही पुण्यप्रद मानतात.

lp11कीर्तिसंक्रांतव्रत : हे एक काम्यव्रत आहे. व्रतावधी एक वर्ष. प्रत्येक संक्रांतीला जमिनीवर सूर्याची आकृती काढून तिच्या मध्यभागी सूर्य प्रतिमेची स्थापना व पूजा करणे व दोन शुभ्र वस्त्रांचे दक्षिणेसहित दान करणे हा या व्रताचा विधी आहे. कीर्ती, राज्यभोग, आरोग्य व दीर्घायुष्य यांचा लाभ या व्रतामुळे होतो असे व्रतराज या ग्रंथात म्हटले आहे.

मकरसंक्रांत : हा भारतातील एक शेती आणि सूर्य-अयनाशी संबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरून पाहिले असता, सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. (अयन=चलन/ढळणे). हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.

संक्रांत समग्र दक्षिण पूर्व आशियामध्ये थोडा स्थानिक फेरफार सोबत साजरी करतात.

उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश- लोहडी अथवा लोहळी, पंजाब- लोहडी अथवा लोहळी; पूर्व भारतात, बिहार – संक्रांती, आसाम – भोगाली बिहु, पश्चिम बंगाल – मकर संक्रांती, ओडिशा – मकर संक्रांती; पश्चिम भारतात, महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यत: १३ जाने.), संक्रांती (सामान्यत: १४ जाने.) व किंक्रांती (सामान्यत: १५ जाने.) अशी नावे आहेत; गुजरात व राजस्थान – उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण).

गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मिठाया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांची खिचडी बनवली जाते.

दक्षिण भारत, कर्नाटक, आंध्र प्रदेश- संक्रांती, तमिळनाडू- पोंगल, केरळ- मकर वल्लाकु उत्सव. भारताच्या अन्य भागात मकर संक्रांती

नेपाळमध्ये, थारू लोक – माघी. अन्य भागात माघ संक्रांती; थायलंड – सोंग्क्रान, लाओस – पि मा लाओ, म्यानमार – थिंगयान.

मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण, दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रांत येते. फार वर्षांपूर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७ वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते. या वर्षी १५ जानेवारीला संक्रांत आहे.

व्रते : निरनिराळ्या पुरस्कारांनी निरनिराळी संक्रांती व्रते सांगितली आहेत आणि त्यांत दानधर्म, जप इ. कर्मे करायला सांगितली आहेत.

संक्रांती देवीच्या पूजेचा विधी असा- लहानशा वेदीवर रक्तवर्ण वस्त्र पसरून त्यावर तांदळाचे अष्टदल कमल काढावे. मध्यभागी सूर्यनारायणाची सुवर्णमूर्ती स्थापून तिची षोडपोचार पूजा करावी. व्रतकर्त्यांने निराहार, एकभुक्त राहावे. संक्रांती व्रत केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो, आधी व्याधींचे निराकरण होते आणि सुखसंपत्तीची वा सुपुत्रांची प्राप्ती होते असे सांगितले आहे.

मकर संक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात. कोकणात मारल येथे मार्लेश्वराची, गंगासागर येथे, कोलकाता शहरानजिक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. केरळच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते.

महाभारतात कुरुवंशाचे संरक्षक भीष्म ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, त्यांनी बाणांच्या शय्येवर पडून राहून या दिवशी देहत्याग केल्याचे सांगितले जाते. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो.

संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगूळ आणि वाण वाटून ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. महिला व नववधू या सणाची आवर्जून वाट पाहत असतात.

महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. पौष महिन्यातील थंडी, नुकतीच झालेली वेळ अमावास्या आणि शेतातील नवीन पिके या पाश्र्वभूमीवर संक्रांती सणातील खाद्यजीवन महत्त्वपूर्ण ठरते. शिशिर ऋतूत स्निग्ध पदार्थ आणि शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा असा संकेत आहे. तीळ, गूळ, खसखस, सुके खोबरे, शेंगदाणा या सर्व स्निग्ध पदार्थाचा भरपूर वापर केलेले तीळाचे लाडू, तिळाच्या वडय़ा, गूळपोळीचा नेवैद्य असतो. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाणघेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे.

संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनलाय. त्याचा अर्थ खाणे, भोगणे. या दिवशी दुपारच्या जेवणात तीळ लावून केलेली गरमागरम टम्म फुगलेली बाजरीची भाकरी, मिरचीचा खर्डा, जळगावी वांग्याचे भरीत आणि भोगीची भाजी म्हणजे सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा गावरान फक्कड बेत असतो. दुपारी एवढे साग्रसंगीत जेवण झाल्यामुळे रात्री मुगाची खिचडी, दही असा साधा बेत असतो. अनेक घरात भोगीला या सर्वाबरोबर खिरीचाही नैवेद्य दाखवतात.

संक्रांतीला गूळपोळीचा नैवेद्य असतो. या दिवशी स्त्रिया मृत्तिका घटाचे वाण देतात. वाण देण्याच्या सुगडात नुकतेच आलेले ताजे कोवळे हरभरे, मटार, तुरीचे दाणे, गाजर, उसाचे करवे, बोरे, मूगडाळ, तांदूळ आणि तिळगूळ-हलवा असे पदार्थ दिले जातात.

किंक्रांत : मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला देवीने मारले. हा दिवस अशुभ मानला जातो. या दिवशी स्त्रियांनी शेणात हाट घालू नये, भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती खावी, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी, दुपारी हळदी-कुंकू करावे असा आचार महाराष्ट्रातील पारंपरिक स्त्री समाजात रूढ आहे.

त्याचप्रमाणे संक्रांत अशुभ असते असाही एक समाज आहे. या काळात सूर्य-स्नान आणि समुद्रस्नान करण्याचीही प्रथा आहे. कडाक्याच्या थंडीत शरीराची आणि मनाची स्नेह-क्षुधा शमवणारा हा सण आहे. आपले सर्व सण हे पर्यावरणपूर्वक आहेत. ऋतुमानानुसार आहार-विहार हा पारंपरिक जीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. हळदी-कुंकू समारंभ यातून गावागावांतील, वस्तीतील स्त्रियांचे सामाजिक अभिसरण होत असते. यातून एकोपा, भगिनीभाव जागृत होतो; कामातील ताण-तणावांचे विरेचन होते. संक्रांतीचं तिळगूळ आणि काटेरी पण गोड हलवा आयुष्यातील चढउतारांची, कडू-गोड प्रसंगांची आठवण करून देतात. काटेरीपणा आहे तसा घेऊन त्यातला गोडवा लक्षात ठेवावा हेच तर हलवा सांगत असतो. संक्रांतीनिमित्त स्नेहमेळावे आयोजित केले जातात. पर्व-स्नानानिमित्त; सूर्य-स्नान, समुद्र-स्नान यातून शरीर धारणेसाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्ये जसे डी व्हिटामिन, सोडियमसारखी क्षार द्रव्ये मिळतात. समाजाचे विराट रूप अनुभवता येते. आर्थिक उलाढाल होते. सामूहिक जगण्याचे आविष्कार अनुभवता येतात. कुठल्याही धार्मिक सणामागे धार्मिक कारण वरवरचे असते. खरे तर त्यामागील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आयाम महत्त्वपूर्ण असतात. संक्रांतीचा सणही त्याला अपवाद नाही.

आजच्या काळात आपण एका संक्रमणावस्थेतून जात आहोत. आज सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संक्रमणावस्थेमुळे कुटुंब जो सामाजिक व्यवस्थेचा मुलभूत पाया आहे त्यातही अनेक बदल घडत आहेत. नात्यांमधील संक्रमणावस्थेमुळे निर्माण झालेले प्रश्न सामाजिक आणि मानसोपचारतज्ज्ञ यांना बुचकळ्यात टाकतात. भाव-भावनांचा गुंता, नात्यांचा गुंता त्यातील संक्रमणतेचा अतिवेग यामुळे आज सामाजिक आणि कौटुंबिक जीवन ढवळून निघत आहे. एक अनामिक भीती बुजुर्गाच्या, समाज हितैषींच्या मनात असू शकते. पण त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. ही एक संक्रमणावस्था आहे. संक्रमण हे कायम चांगल्यासाठीच होत असते. होणाऱ्या बदलांचे स्वागत करणे, शाश्वत, चिरंतन मानवी मूल्ये जपून ठेवत, कालानुरूप बदल स्वीकारत सतत पुढे चालत राहणे हे महत्त्वाचे. निसर्ग आणि हे सण आपल्याला हेच शिकवत असतात. तेव्हा संक्रांतीचा स्नेह संदेश देणारा सण, त्यातील काही रूढी जशा किंक्रांत किंवा आता कोणावर संक्रांत आली ही म्हण, त्यामागचे तत्कालीन सामाजिक/ सांस्कृतिक नकारार्थी भावना दूर सारून त्यातील केवळ तिळगुळाची गोडी आणि स्नेहभावना मनात ठेवावी हेच श्रेयस्कर नाही का? कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी माणसामाणसातील स्नेहभाव, माणुसकी कालातीत असते आणि ती या ना त्या रूपात व्यक्त होत असते, हेच अंतिम सत्य आहे.

‘तीळगूळ घ्या आणि गोड बोला’ हा संदेश देणाऱ्या मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
प्राची मोघे – response.lokprabha@expressindia.com