19 February 2019

News Flash

रखरखाटातील सौंदर्य

मनाली सोडल्यानंतर थेट अंगावर येणारा चढ संपला की त्यापुढील आडव्या रस्त्यावरच्या चढाने दमछाक होते.

हिरवळ संपून रखरखाट वाढलेला असतो. मात्र त्या रखरखाटातदेखील एक अनोखे सौंदर्य दडलेले असते.

ट्रेकर ब्लॉगर
मनाली ते लेह भाग २ रा
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2

मनाली सोडल्यानंतर थेट अंगावर येणारा चढ संपला की त्यापुढील आडव्या रस्त्यावरच्या चढाने दमछाक होते. त्यातच हिरवळ संपून रखरखाट वाढलेला असतो. मात्र त्या रखरखाटातदेखील एक अनोखे सौंदर्य दडलेले असते.सुरुवातीचे दोन दिवस भरपूर चढ चढल्यामुळे असेल पण हिमालयानेच आम्हाला तिसऱ्या दिवशी सुरुवातीला चांगलीच विश्रांती द्यायचे ठरवले होते. सिस्सूहून पुढे बहुतांश उतारच होता. वाटेत गोन्दल या छोटय़ाशा गावाजवळ अगदी भरपेट न्याहरी केली. येथे मिळालेले पदार्थच पुढे सर्वत्र मिळत गेले. अपवाद फक्त जिस्पाचा. पोटभर मोमो खायचे हेही सायकिलगबरोबरचे आणखीन एक टाग्रेट होते. त्यातही हॉटेल मालकिणीने सांगितले की, सिर्फ मीट मोमो है.. मग तर आणखीनच धम्माल. आम्हा सहा जणांत मिळून दोन प्लेट मोमो, चार-पाच पराठे, तीन वेळा ब्रेडबटर टोस्ट आणि दहा-बारा कप चहा असं एकदम टम्म होईपर्यंत चापले. सुदैव इतकेच की गोन्दलपासून पार तंडीपर्यंत पायडल फिरवावेच लागले नाही. एकदम सुसाट उतार. सिस्सू सोडताना भागा नदी अगदी तळाला वाटावी इतके आम्ही उंचांवर होतो, ती नदी गोन्दलनंतर थेट बाजूनेच वाहू लागली. आणि आमची तिच्या वेगाशी स्पर्धा सुरू झाली, अर्थात वेगवान उतारामुळे सायकल न चालवताच.

याच वाटेवर एक अवलिया भेटला. डोंगरभटक्यांना किंवा सायकलिस्टना असं कोणी भेटलं की त्यांच्यासाठी पुढची वाटचाल आणखीनच सुकर होऊन जाते. तो आमच्या उलट दिशेने सायकलवरून येत होता. सायकल हाच समान धागा असल्यामुळे आपोआप थांबलो. विचारपूस झाली. तर हा पन्नाशीतला पठ्ठय़ा एकटाच मनालीहून लेहला गेला होता, तिकडून कारगिलला आणि मग झंस्कार व्हॅलीत शिरला. झंस्कारमध्ये तर लेह-मनालीसारखे रस्तेदेखील नाहीत. अगदी कच्चा रस्ता आणि गावंदेखील नाहीत, ना ढाबे. त्यामुळे हा पठ्ठय़ा सायकलीवर सारं सामान लादून वर तंबूदेखील घेऊन भटकत होता. दुर्दैवाने त्याचा तंबू झंस्कार सोडतानाच कुठेतरी पडला. पण हा नेटाने एकटाच सायकिलग करत होता आणि आता परत मनालीला निघाला होता. सोबत नकाशा हेच काय ते माध्यम. इंग्लंडचा रहिवासी असल्याने तशी भाषेचीदेखील अडचण. पण या वयात त्याची जिद्द पाहून खूपच आनंद वाटला. बोलण्याच्या नादात त्याचं नाव मात्र विचारायचं विसरून गेलो, इतकं आमचं बोलणं अनौपचारिक होतं.

त्या बाबाला मनोमन सलाम करत आम्ही तंडीला पोहोचलो. येथे या वाटेवरचा शेवटचा पेट्रोल पंप आहे. नंतर पुढे थेट लेहलाच. तंडीला भागा आणि चंद्रा नदीचा संगम आहे. चंद्रादेखील चंद्रतालमधूनच उगम पावते. पण वाटेतील डोंगरांच्या रचनेतील बदलांमुळे असेल; दोहोंचे रंग वेगळे आहेत. चंद्राचे पाणी निळ्या रंगाचे तर भागाचे हिरव्या रंगाचे असा फलक तेथे लावला होता. पण तसं दृश्यस्वरूपात मात्र जाणवत नव्हतं. या संगमानंतर तिचं नाव चंद्रभागा होतं. नंतर तीच चिनाब म्हणून ओळखली जाते. तंडीनंतर आम्हाला चंद्रा नदीच्या काठाने केलॉंगला जायचं होतं. आणि हा रस्ता अगदी हळुवारपणे चढत जाणारा होता. तुम्ही जसजसं चढत जाता तसं नदीपात्र खोल दरीत जात राहतं. चार एक किमीनंतर दूरवर डोंगरात, दरीत वसलेलं केलॉंग दिसायला लागतं आणि त्यामागे हिमाच्छादित शिखरं. पण केलॉंग काही केल्या जवळ येत नव्हतं. सकाळच्या उतारानंतर हे प्रकरण वैतागवाणं होतं. शेवटी एकदा पार डोंगराच्या पोटात जाऊन पुन्हा वर चढत आल्यावर दुपार उलटताना केलॉंग आलं. थोडंसं काही तरी खायचं आणि पुढे जायचं एवढय़ासाठीच हा थांबा होता. केलॉंग गाव खाली दरीत होतं, पण त्याचा पसारा वेडावाकडा पसरलेला. आपल्याकडच्या एखाद्या गावाच्या वाडय़ा जशा डोंगरात विखुरलेल्या असतात तसं. तिकडे मात्र सर्वत्र कच्चाच रस्ता. त्या वस्त्या किमान गावाच्या जवळ तरी होत्या. पुढच्या टप्प्यात तर लांबलचक पसरलेल्या डोंगरावर शेतीसाठी एखादं खोपटं बांधून राहिलेली माणसं पाहिली की आश्चर्याचा धक्का बसतो. ग्लेशियर वितळून येणारा प्रवाह आणि त्याच्या बाजूलाच शेती व घर. त्या अवाढव्य डोंगरात ते इवलंसं घर पाहिलं की खडतर जीवन वगरे काय असतं याची लांबूनच कल्पना येते.

केलॉंग आम्ही झटपट सोडलं आणि पुढच्या वाटेला लागलो. पाच किमीवर स्टिन्गरी हे एक छोटं गाव, पण येथे बीआरओची एक अखंड रेजिमेन्टच आहे. प्रोजेक्ट दीपकचं हे मोठं ठाणं (सरचूपर्यंतची सर्व रस्त्याची कामं या दीपक प्रकल्पाखाली चालतात, तर नंतरची कामं हिमांक प्रोजेक्टच्या अंतर्गत.) स्टिन्गरी लक्षात राहिलं ते मात्र या बीआरओच्या ठाण्यानंतरच्या रस्त्यासाठी. सततची हेअर पीन बॅण्ड वळणं असलेला हा रस्ता इतका आनंददायी आहे की त्या रस्त्यावरून निघावंसंच वाटत नाही. खोल दरीत असलेली चंद्रा नदी, समोर उंचच उंच डोंगर आणि आपल्या बाजूच्या डोंगराच्या पोटातून सतत वळण घेत अगदी लांबपर्यंत पसरलेला रस्ता. रस्ता अर्धा कापल्यावर तर एके ठिकाणी मस्त मोकळी जागा आहे. तेथे थांबून तो रस्ता आणि बाजूचं दृश्य दोहो बाजूंनी पाहात बसण्यातदेखील खूप आनंद मिळतो. एखाद्या क्षणी वाहतूक शांत होते आणि डोंगरात हरवून जाण्याचा अफाट आनंद मिळवता येतो.

पण असं खूप वेळ घालवणं शक्य नव्हतं, कारण दिवसाच्या उजेडातच जिस्पा गाठायचं होतं. शेवटी एक लांब वळसा घेऊन बऱ्यापकी वर चढलो आणि पुढे मग सुसाट उतार. दिवस मावळता मावळता तो उतार पार करून आम्ही गिमुरला पोहोचलो. येथे एक अनोखं पेय आमची वाट पाहात होतं. सिंबकथू नावाचा चहा. मध घातल्यावर रंग यावा असं ते पेय. गरम पाण्यात उकळवलेली सिंबकथू ही वनौषधीची पावडर आणि चवीला साखर, मध. स्टिन्गरी ते गिमुपर्यंतचा सारा थकवा त्या पेयाने पुरता पळवून लावला. आत्ता हेडटॉर्च, बॅकलाइट असं सारं सुरू करून आम्ही चौघे एका रांगेने सायकल चालवू लागलो.

आत्ता गिमुर ते जिस्पापर्यंत एक बदल अगदी ठळकपणे जाणवत होता. येथे नदीकाठची सर्वच्या सर्व जागा अनेक प्रकारच्या तंबूंनी व्यापली आहे. तर काही ठिकाणी हॉटेल्सदेखील आहेत. जिस्पा हे लेह-मनाली अंतर मोटरसायकलने कापणाऱ्यांसाठीचं मुक्कामाचं ठिकाण.  या तंबूंची मालकी बाहेरून आलेल्या लोकांची. तर गावातील लोकांनी पक्की हॉटेल्स बांधली आहेत. या व्यवसायात चांगलाच फायदा असल्यामुळे जिस्पात आत्ता कोणीही शेती करत नाही. सर्वानी जमिनी एकतर भाडय़ाने दिल्या आहेत किंवा हॉटेल्स बांधली आहेत.

जिस्पात आम्हाला मुक्काम करायचा होता तो रिजनल माऊंटेनिअिरग सेंटरमध्ये. त्यांची एक डॉम्रेटरी आहे आणि काही खोल्यादेखील. साहसी क्रीडा प्रकारासाठी येथे राहायची सोय अगदी हमखास होते. पण त्या दिवशी आमच्या ते नशिबातच नव्हतं. कारण जिस्पाला तीन दिवसांचा लाहौल-स्पिती फेस्टिव्हल सुरू होता. त्यामुळे सगळीकडेच हाऊसफुल्ल होतं. एका मदानावर त्या फेस्टिव्हलचे कार्यक्रम सुरू होते. पंचक्रोशीतून लोक येथे आले होते. जिस्पाला एक मोनास्ट्री असल्यामुळे बौद्ध धर्मगुरूदेखील आले होते, सरकारी अधिकारी, फेस्टिव्हलमधील कलाकार असं संपूर्ण जिस्पा अगदी गजबजलेलं होतं. शेवटी आम्ही जरा लांबवरच एक हॉटेल मिळवलं आणि एकाच खोलीत सहाही जण घुसलो.

सकाळी जिस्पापासून सहा किमी पुढे जाऊन दारच्चाला न्याहारी उरकायचं ठरवलं. दारच्चा तसं छोटंसंच गाव. पण १९९५ साली येथे प्रचंड मोठी दरड कोसळली होती आणि संपूर्ण गावच उद्ध्वस्त झालं होतं. पडलेली दरड आजही रस्त्याच्या बाजूला नदीपात्रात दिसते. आणि नदीच्या पल्याड नव्याने वसलेलं दारच्चा. दारच्चापासून ढाबे सुरू होतात. गोल किंवा आयताकृती असा मोठा तंबू, आतल्या बाजूस बेड, समोर जेवणाखाण्यासाठी टेबल अशी टिपिकल रचना असलेले ढाबे हे या वाटेवरचं वैशिष्टय़. दोनशे रुपये राहण्याचे, सव्वाशे रुपयात पोटभर शाकाहारी जेवण. नाष्टय़ाचे पदार्थ ठरावीकच. जवळपास सर्वत्र एकसारखेच पदार्थ आणि एकसारखाच दर. पण दारच्चाला शेवटचं मांसाहारी खाण मिळतं. नंतर थेट लेहलाच. दारच्चापाशी चंद्रा नदी आपण ओलांडतो, येथे चंद्रा झंस्कारमधून येताना दिसते. दारच्याच्या वरच्या डोंगरात एक किमीनंतर झंस्कारकडे जाणारा रस्ता लागतो.

दारच्चा ते दीपकताल असा पहिला टप्पा आणि दीपकताल ते िझगिझगबार असा दुसरा टप्पा हा त्या दिवसाचा प्रवास होता. दारच्चा सोडल्यावर एक-दोन किमीनंतर मात्र सारा रस्ता एकदम कच्चा होऊन जातो. या वाटेवर भरपूर कामं सुरू आहेत. चढाईचा पूर्ण रस्ता हा कच्चाच आहे. त्यामुळे धुळीने माखून घेत पुढे जाणं एवढंच काय ते काम असतं. एकदा का कच्चा रस्ता संपला की मग फक्त तुम्ही, रस्ता, डोंगर आणि खोलवरून वाहणारा पाण्याचा प्रवाह एवढीच काय ती एकमेकांची सोबत असते. रस्त्याच्या समोर पल्याडच्या डोंगरात एखाददुसरं घर दिसत राहतं. पण ते सोडल्यास येथे वाहतूक कमी आणि वस्ती तर नाहीच. दमूनभागून दीपकतालला पोहोचलात तरी मानवी वस्तीच्या कसल्याच खुणा दिसत नाहीत. नाही म्हणायला पुढे एक किमीवर एक जुनाट आणि मोठं सरकारी विश्रांतिगृह आहे, पण सध्या तेथे कोणीच नसतं. दीपकताल तसं एकदम नयनरम्य वगरे म्हणता येईल असं ठिकाण. छोटासाच तलाव. निळंशार असं नितळ आणि थंडगार पाणी पाहून डोळे शांत होतात. सोबत आणलेले ब्रेड ऑम्लेट खाऊन क्षणभर डोळे मिटायलादेखील हरकत नाही. पण पुढचा टप्पा डोक्यात ठेवूनच ते करावं लागेल.

एकदा दीपकतालजवळील पॅटसिओ सोडलं की िझगिझग बार येईपर्यंत नुसता रखरखाटी डोंगर आणि त्यामधून जाणारा लांबसडक रस्ता हेच पाहावं लागतं. अंतर तसं फार नाही. हा लॅण्डस्केप पाहणंदेखील सुखावह असलं तरी सतत चढत जाणाऱ्या रस्त्यामुळे दमायला होत राहतं. त्यातच वाटेत काही ठिकाणी ग्लेशियरचं पाणी रस्त्यावरून वाहतं. त्या थंडगार पाण्यात एरवी पाय सोडून बसायला बरं वाटलं असतं पण पायातील बूट भिजल्यावर ते घेऊन सायकल चालवणं शक्य नव्हतं. भरीस भर म्हणजे वारं पण चांगलंच वाहात होतं. वाटेत आर्मीच्या वाहनांसाठीचा थांबा असलेलं मोठं ठिकाण आहे. या रस्त्यावरून जाताना एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. रस्त्याच्या बाजूने लांबवर वाहणारा प्रवाह आणि दोहो बाजूस पसरलेलं वाळवंट आणि त्यामधून चालत चाललेला एकच माणूस. त्या संपूर्ण रखरखाटात तो एकटाच जात होता. त्याला पाहून खरं तर नक्की कळतच नव्हतं, हा असा का चाललाय, कोठून आला, कुठे चाललाय? जवळपास कुठेही वस्ती नाही. रस्त्याने गेला तर एखादा ट्रक थांबवून आरामात जाऊ शकला असता, पण तो एकटाच त्या वाळवंटातून जात होता. त्या रखरखाटी आणि भव्य डोंगरांच्या पाश्र्वभूमीवर त्याचं असं एकटय़ाने तंगडतोड करणं जरासं विचित्रच वाटणारं होतं.

हा टप्पा पार करून िझगिझग बार शून्य किमीचा दगड आला, पण तेथे असलेल्या ढाब्यात राहण्याची सोय नाही, त्यासाठी आणखीन सहा किमी तेही थेट डोंगरात चढून जावं लागणार होतं. माझी स्वत:ची तर सायकल चालवायची इच्छाच नव्हती, चांगलाच दमलो होतो. त्यामुळे मी म्हटलं, मी ट्रक शोधतो नाही तर सायकल ढकलत चालत येतो. ते तुलनेने सोपं होतं. ट्रक येण्याची चिन्हं नव्हती, त्यामुळे मी एकटाच सायकल ढकलत निघालो. बाकीचे सवंगडी पुढे चालवत गेले. सुमित एक-दोनदा मागे येऊन चौकशी करून गेला. सूर्य मावळला होता, पण अजून अंधार पडायचा होता. त्या प्रकाशात हेड टॉर्च न लावतादेखील जाणं सहज शक्य होतं. अंधार पडता पडता निम्म्याहून अधिक डोंगर चढून झाला होता. पुढील सायकलींचे लाल बॅकलाइट दूरवर दिसत होते आणि माझ्या हेड टॉर्चचा पन्नास फुटांपर्यंत गेलेला प्रकाश. भीती वाटण्यासारखं आणि अन्य कोणता धोका होईल असं या डोंगरात फारसं नाही हे आधीच माहीत होतं. त्यामुळे एकटा असलो तरी अगदी आरामात जात होतो. शेवटी एके ठिकाणी बीआरओची चौकी लागली. तेथून ढाबा एक किमीवर होता.

ढाब्यापाशी पोहोचलो तेव्हा मोकळ्यावर आणि उंचावर आल्यामुळे प्रचंड वारा वाहत होता. ढाब्याचे प्लास्टिक जोरजोरात फडफडत होते. ढाब्यात जाऊन गादीसदृश जाडजूड रजई अंगावर घेऊन बसल्यावर थंडी पळून गेली, दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजताच उठायचे होते. माझा आणि सचिनचा वेग थोडा कमी असल्यामुळे मी आणि सचिन सहा वाजताच सायकिलग सुरू करणार होतो.

भल्या पहाटे उठणं जिवावर आलेलं तरी उठलोच आणि भल्या पहाटे ब्रेड ऑम्लेट खाऊन सायकलीवर टांग टाकून बारालाचा ला (ला म्हणजे खिंड) कडे निघालो. बारालाचा ला हे १५ हजार ३५ फूट उंचीवरचं ठिकाण. लांबच लांब वळसे घेत आम्ही हळूहळू डोंगर चढत होतो. उजाडता उजाडता तेलाचे टँकर, सैन्यदलाच्या गाडय़ांची वर्दळ वाढू लागली. सुरुवात केली तेथून बारालाचा ला २० किमीवर होते. पण १५ एक किमी गेल्यावर आपण एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जातो. वालुकाश्म डोंगरांतून जाणारा रस्ता नागमोडी वळणं घेऊन पडलेला असतो. तेवढय़ात सेनादलाचा ताफा आला. त्या नागमोडी रस्त्यावर सर्वत्र त्याच गाडय़ा दिसू लागल्या होत्या. हा टप्पा पार केल्यावर सूरजताल हा तलाव लागतो. दीपकतालपेक्षा हा तलाव चांगलाच मोठा आहे. त्या लॅण्डस्केपचा मोह मात्र टाळावा लागला. कारण बारालाचा ला लवकर गाठायचं होतं. नंतर पुढे सरचूपर्यंत आणखी ३० किमीची राईड बाकी होती. तरीही थोडा उशीर झालाच. फार वेळ न दवडता भरतपूरकडे निघालो. आता सारा उतारच होता, त्यामुळे पेडलिंगला तेवढीच विश्रांती. पण भरतपूरला वेगळंच संकट सामोरं आलं.

भरतपूर हे असंच डोंगराच्या खोलगटीत वसलेलं ढाब्यांचं गाव. पण भरतपूर नावाची वस्ती नाही. येथे मागच्याच डोंगरातून ग्लेशियर वितळून तयार झालेल्या प्रवाहावर एक पूल बांधलाय. पण त्या दिवशी ते ग्लेशियरच फुटलं होतं. त्यामुळे ढाब्यापासून पुढे जणू काही महापूरच आला होता. दोन्ही बाजूस शे-दोनशे गाडय़ा खोळंबल्या होत्या. ढाब्यात बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे येथील चवदार राजमा-चावलचा आस्वाद घेता आला. तेथील ढाबेवाल्यांना त्यांच्या या डिशचा खूपच अभिमान आहे, हे प्रकरण खरंच चवदार होतं. पाणी ओसरेपर्यंत आता ताणून देण्याशिवाय पर्याय नव्हता. सगळेच आडवे झालो. मी आदल्या दिवशीप्रमाणेच दमलो होतो. मी मागेच थांबलो आणि पाचच्या दरम्यान पाणी ओसरल्यावर इतरांनी चिखलातून रस्ता पार केला.

भरतपूरचे ढाबेवाले सगळेच जण दारच्चा गावातील महाविद्यालयीन विद्यार्थी होते. पर्यटनाच्या मोसमात तीन-चार महिने ही जागा वनखात्याकडून महिना सात हजार रुपये भाडय़ाने घ्यायची आणि हे ढाबे लावायचे हा त्यांचा व्यवसाय. हे ढाबे तुलनेने चांगलेच प्रशस्त आहेत. फक्त चारही बाजूंनी डोंगर आणि समुद्रसपाटीपासून उंचीदेखील चांगलीच असल्याने मुक्कामाला तसे पूरक म्हणता येत नाही. ढाब्यातील मुलं चांगलीच बोलकी होती. मुंबईहून आलेला म्हटल्यावर त्यांच्या गप्पा जरा जास्तच वाढल्या. बाळासाहेब ठाकरे वगैरे राजकारणावर त्यांना प्रश्न होते. हिमाचलच्या त्या कोपऱ्यातल्या गावातील मुलांचं हे औत्सुक्य पाहून जरा आश्चर्यच वाटलं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच एका सरदारजीच्या ट्रकने लिफ्ट दिल्याने पुढील साथीदारांच्या जवळ सरचू या ठिकाणी लगेच जाता आलं. सरचू हे हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये विभागलं आहे. येथून जम्मू-काश्मीरची हद्द सुरू होते. येथूनच बीआरओचा हिमांक प्रकल्प सुरू होतो. सरचूतल्या साथीदारांना भेटून थोडे पुढे जाऊन गटा लूप्सवर जाणं हे टार्गेट होतं. गटा लूप्स म्हणजे अगदी जवळजवळ वळणं असलेला रस्ता. हे खास बीआरओने दिलेलं नाव. येथे एकूण २१ लूप्स आहेत. आडव्या पट्टय़ावर तुलनेने कमी चढ, वळणावर उंची गाठायची पुन्हा आडवा पट्टा. सुरुवातीचे दहा एक लूप्स एकदम जोशात चढले जातात. मग लूप्समधील अंतर वाढतं आणि आडव्या टप्प्यावरील उंचीदेखील. जसजसं वर जाऊ तसं खाली वेटोळं घालून बसलेला रस्ता आणखीनच आकर्षक वाटायला लागतो. बाकी आजूबाजूला सारा रखरखाटच असतो. पण त्याच रखरखाटात लांबवरच्या डोंगरातील एक ठळक पायवाट खुणावते. ही अगदी जुन्या लेह-मनाली वाटेची खूण. जेव्हा महामार्ग नव्हता तेव्हा वापरात असलेली ही वाट पुढे लांबवरूनच आपल्यासोबत असते.

गटा लूप्सवर सायकलिंगचा आनंद भरपूर मिळतो. तुम्ही सायकल हळूहळू चालवत असता आणि अगदी प्रत्येक लूपला वर चढत जात राहता. तुलनेने थकवादेखील कमी असतो. ही मज्जा गटा लूप्सवरच अनुभवता येते. त्यामुळे मध्येच अधिक वेळ विश्रांती घेणं शक्य होतं. गटा लूप्सवर लक्षात राहण्यासारखी एक गोष्ट घडली ती येथे सांगणं अप्रस्तुत ठरणार नाही. एका वळणावर जरासा रेंगाळलो तेव्हा वरून सेनादलाच्या चार-पाच जिप्सी गाडय़ा येत होत्या. अशा जिप्सीत शक्यतो अधिकारीच असतात. तीन-चार मिनिटांत त्यातील पहिली जिप्सी समोर आली. पाठोपाठ दुसरी पण. दुसऱ्या जिप्सीतील अधिकाऱ्याने अतिशय उत्स्फूर्तपणे दोन्ही अंगठे उंचावून चिअरअप केलं. महाविद्यालयात बरीच वर्षे एनसीसीत असल्याचा परिणाम असेल कदाचित, पण नागरी वेशात असताना लष्करी अधिकाऱ्यांना मान द्यायचा असेल तर सावधानची पोझिशन घेतात त्यामध्ये मी क्षणात उभा राहिलो. त्यावेळी लष्करी अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचं स्मित जाणवणारं होतं. जिप्सीतील अधिकाऱ्याच्या खांद्यावरील पदचिन्हं पाहता तो नक्कीच ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी होता. लष्कराची सायकलिस्टबाबत असलेली ही आत्मियता नक्कीच सुखावणारी आणि सायकलबद्दलचा अभिमान वाढवणारी होती. त्याच आनंदात पुढचा टप्पा पार करायला घेतला.

खरं तर सचिन आणि समिधा दोघांनीही माझ्या बऱ्याच नंतर गटा लूप्स चढायला सुरुवात केली होती. पण समिधा एव्हाना मला पार करून लूप्सच्या शेवटाच्या दिशेने गेली होती. पुढे असणाऱ्या एका गोलाकार शेडमध्ये तिच्या आईने आमच्यासाठी चहा आणि खिचडीचा घाट घातला होता. त्या घरगुती खाण्याच्या ऊर्जेने आम्ही नकीला पासच्या दिशेने सुसाट गेलो. नकीलाचा टप्पा चढाचा असला तरी लांबलचक वळणं घेत जाणारा आहे. संध्याकाळ जवळ येता येता नकीला पास आलाच. येथून पुढे थेट उतार होता. समोरच्या डोंगरात दुसऱ्या दिवशी चढायचा लाचुंग ला कडे जाणारा वळणदार रस्ता दिसत होता. आणि खाली पार दरीत पाच-सहा गोलाकार तंबू. भालजींच्या चित्रपटात गनिम या दरीत लपला आहे असे सांगताना दिसावं तसंच ते दृश्य होतं. पण तो गनिम नव्हता तर आमचं विश्रांतीस्थान होतं, व्हिस्कीनाला. सायंकाळ होता होता आम्ही तेथीलच एका तंबूजवळ जाऊन थडकलो.
(क्रमश:)

First Published on August 31, 2018 1:02 am

Web Title: manali to leh by bicycle