News Flash

श्रद्धांजली : असे लोक जात नाहीत…

पाडगांवकरांनी वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिली. उत्साहाची, आनंदाची, चिंतनशील..

श्रद्धांजली : असे लोक जात नाहीत…

मंगेश पाडगांवकर गेल्याची बातमी व्हॉट्स अ‍ॅपवर कळली. फेसबुकवरून पसरायला लागली. लगेचच टीव्ही वृत्तवाहिन्यांवर झळकली. वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या. पण पाडगांवकर गेले म्हणजे? कुठे गेले? कुठे जाणार? प्लेटो नावाच्या तत्त्वज्ञाने म्हणे त्याच्या आदर्श राज्याच्या कल्पनेतून कवींची हकालपट्टी केली होती. कवीलोकांची ताकद तो मनोमनी जाणून होता, त्यामुळे पाडगांवकरांसारख्या कवितेचा उत्सव करणाऱ्या कवीला तर तो आपल्या राज्याच्या आसपासही फिरकू देणार नाही. मग पाडगांवकर गेले म्हणजे? कुठे गेले?

अचानक कधी तरी कुठे तरी भेटलेल्या त्यांच्या ओळी ओठांवर आल्या.

जरि तुझिया सामर्थ्यांने

ढळतील दिशाही दाही

मी फूल तृणातील इवले

उमलणार तरीही नाही..

या ओळी कधी तरी कुठे तरी भेटल्या होत्या. त्यांचा अर्थ जाणवला होता आणि अंगावर काटा आला होता. स्वातंत्र्याचा इतका सशक्त आविष्कार मनाला त्या वेळी एक अनोखं वळण देऊन गेला होता. या ओळी लिहिणारे पाडगांवकर खरं तर त्याआधीही बालभारती-कुमारभारतीतून वेळोवेळी भेटले. दर वेळी त्याच रोजच्या जगण्यातल्या घिस्यापिटय़ा शब्दांचीच त्यांनी अशी काही दुनिया उभी केलेली असते की मन एकदम ताजंतवानं होऊन जायचं.

कोसळली सर उत्तर दक्षिण

घमघमले मातीतुनि अत्तर

अष्टदिशांतुनि अभीष्टचिंतन

घुमला जयजयकार

पहिल्या हिरव्या तृणपात्याचा

आज असे सत्कार

अशा ओळी वाचल्या की खरंच असं वाटतं की अरे, बघा बघा हे जग- हे जगणं किती सुंदर आहे. साधं गवताचं पातं रुजणं-उगवणं हीसुद्धा सृजनाची किती जबरदस्त प्रक्रिया आहे. चला, तिचा उत्सव करू या. आनंदानं भरभरून जगू या. या प्रक्रियेच्या आणखी तपशिलात जाताना ते म्हणतात,

कळले ज्या क्षणी अंधाराला

नक्षत्रांशी अपुले नाते

अन् मी भेदुनि भूमीचा थर

रुजलो होऊनि हिरवे पाते

आणि मग ही सगळी प्रक्रिया ज्याला समजते त्याला इथल्या लौकिक जगण्याचं काही अप्रूपच राहात नाही. त्याला वेगळ्याच गोष्टी साद घालायला लागतात. त्याच्या पायाला बांधलेली चाकं त्याला त्याच्यामधून बाहेर ओढायला लागतात.

दिसू लागले डोंगर

जरा मिटता लोचन

तिथे कुणी तरी मला

नेऊ लागले ओढून

मिटलेल्या डोळ्यांसमोर

खळाळणाऱ्या लाटा

सळसळणारी पाने,

दूर पळणाऱ्या लाटा

लाटांसवे त्या पळालो

सारे काही झुगारून

एक जिप्सी आहे

खोल मनात माझ्या दडून..

त्याला मग रोजच्या रुटीनमध्ये अडकल्यावर त्यापलीडचं जग खुणावायला लागतं. वाटायला लागतं की

बरेच दिवस

शीळ घालत िहडलो नाही

बरेच दिवस

माझ्यात मी बुडालो नाही

स्वत:बाहेर पडून त्याला स्वत:शी संवाद साधायचा असतो., मौनातून स्वत:शी बोलायचं असतं. त्याचं मौन नुसतं मौन नसतं तर त्या मौनाचा गंध दरवळत असतो.

संथ निळे हे पाणी

वर शुक्राचा तारा

दरवळला गंधाने

मौनाचा गाभारा

असं भटकलं की मग पुन्हा फार काळ एकटं राहवत नाही. मग पुन्हा हवीहवीशी सोबत आठवायला लागते.

तू असतीस तर झाले असते

उन्हाचे गोड चांदणे

मोहरले असते मौनातुन

एक दिवाणे नवथर गाणे

म्हणजे गाणं काय, कविता काय, सतत सोबतीला हवीच आणि ती असतेच. पाडगांवकरांचं म्हणणं असं की मला कविता नेमकी कशी आणि कधी सुचते ते काही मला सांगता येत नाही. तशीच मनाच्या कोणत्याही अवस्थेत त्यांची कविता अशी अचानक समोर येते,

टपटप पडती अंगावरती

प्राजक्ताची फुले

भिरभिर भिरभिर त्या तालावर

गाणे अमुचे जुळे

अशा ओळी आपण गुणगुणायला लागतो किंवा मग

प्रकाशाचा उत्सव

अंधाराच्या रात्री

आनंदयात्री

मी आनंदयात्री

अशा ओळी ओठांवर येतात आणि सगळा शीण कुठल्या कुठे जातो. अशा पाडगांवकरांच्या असंख्य कविता, असंख्य ओळी आपल्या मनात कायमच्या वस्तीला येऊन राहिलेल्या असतात. कोणत्या तरी वळणावर त्या बाहेर येतात आणि ताजेपणाचा, आनंदाचा उत्सव साजरा करायला भाग पाडतात.

पाडगांवकरांनी वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिली. उत्साहाची, आनंदाची, चिंतनशील.. त्यांच्या कवितेला ना विषयाचं वावडं होतं, ना वृत्तीचं. पहिल्या हिरव्या तृणपात्याचा सत्कार करण्याची तलम कल्पना करतानाच त्यांनी सलामसारख्या कवितेतून आपल्याला जे म्हणायचं आहे ते रोखठोकपणे म्हणून घेतलं. जिप्सीची वृत्ती नेमक्या शब्दात पकडताना प्रेमाच्या नाजूक नात्याची गुंतागुंतही त्यांनी सहजपणे उलगडून दाखवली. नुसती कविता लिहिली नाही, तर ती तेवढय़ाच ताकदीने विविध व्यासपीठांवरून लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनाही कवितेचा भरभरून आनंद दिला. त्यांच्या कवितांसंग्रहाच्या सतत आवृत्त्या निघाल्या. त्या अर्थाने ते मराठीतले एकमेव सेलिब्रिटी कवी. पाडगांवकरांच्या कविता त्यांच्या तरुणपणी तेव्हाच्या तरुणांना जशा भुरळ घालत तशाच त्या आजच्या तरुणालाही भुरळ घालत. मग ते

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे प्रेम असतं,

तुमचं आणि आमचं

अगदी सेम असतं

या ओळी असोत किंवा

मनातल्या मनात

मी तुझ्यासमीप राहतो

तुला न सांगता तुझा

वसंत रोज पाहतो

या ओळी असोत. शेवटी या ओळी  म्हणजे तरी काय आहेत?  त्या म्हणजेच मंगेश पाडगांवकर आहेत ना ? मग सांगा पाडगांवकर कुठे गेले? कुठे जाणार?

असे लोक कुठेच जात नसतात. ते आपल्यातच असतात. आहेत. असणार आहेत.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2016 1:10 am

Web Title: mangesh padgaonkar
Next Stories
1 इंटिरियर : बिंदूपासून सुरुवात
2 स्मार्ट कूकिंग : पाउंड केक
3 पोटपूजा : पिठलं..