13 August 2020

News Flash

आंबा : कुणी, किती, कसा खावा?

‘हर मौसम में आम’ खाण्यापेक्षा ‘मौसम का आम’ खाणं जास्त हितावह ठरू शकतं.

हल्ली वेगवेगळ्या प्रांतामधून आंबे येतात. त्यामुळे बाजारात वर्षभर आंबा उपलब्ध असतो.

खावे नेटके
पल्लवी सावंत – response.lokprabha@expressindia.com

हल्ली वेगवेगळ्या प्रांतामधून आंबे येतात. त्यामुळे बाजारात वर्षभर आंबा उपलब्ध असतो. पण ‘हर मौसम में आम’ खाण्यापेक्षा ‘मौसम का आम’ खाणं जास्त हितावह ठरू शकतं.

आंबा म्हटलं की कोकणच आठवतं आणि आजी-आजोबादेखील!

(इथे मी अजिबात सिनेमॅटिक लिहिणार नाहीये. हा अनुभव आहे आणि त्याचं महत्त्व आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून थोडं उशिरा उलगडलंय इतकंच! )

तर ..

लहानपणी गावी जाण्यासाठीच्या आकर्षणातील महत्त्वाचं कारण म्हणजे आमराईत फिरणे. काजूच्या बागांमध्ये गडद लालसर काजू कुतूहलाने पाहत बसणे. झाडाला लागलेल्या फणसांवर हाताने थाप मारणे आणि वेळ असल्यास डोंगरझऱ्यातील गोड पाणी चाखणे या साऱ्याचे आकर्षण होते. कायम जाणवलेली गोष्ट म्हणजे गावचे आंबे स्वर्गीय चवीचे असतात. त्यांचा गंधदेखील वेगळाच असतो; किंबहुना घरी पाऊल ठेवतानाच आंबा आणि फणसाच्या दरवळानेच मी सुखावून जायचे.

आंब्याबाबत लक्षात राहिलेल्या काही गोष्टी  :

ल्ल    आजी नेहमी आंबे खाण्याआधी ते पाण्यात ठेवायची आणि सांगायची- थोडय़ा वेळाने बसू या बरं का आंबा खायला. आंबा असाच खाल्ला तर पोटाला जड होईल!

  • चिकेरा आंबा आहे तसाच तोंडात टाकू नको. आधी नीट धू आणि पाण्यात ठेव.
  • कोयी नीट खाऊन स्वच्छ करा..आणि नंतर सगळ्या कोयी एका परडीत ठेवल्या जात. काही दिवसांनी बऱ्याच कोयी वाळवायला ठेवलेल्या असत.
  • झाडावरचे आंबे गवतात नीट लावून ठेवले जात आणि पिकल्याशिवाय कोणीही तिथे जायचं नाही ही ताकीद दिलेली असायची.
  • हळूहळू खा पोटात दुखेल.
  • आंब्यावर पाणी पिऊ नका!

या सगळ्यात मला अनेक प्रश्न पडायचे.. आंब्याच्या कोयी धुऊन त्याचं काय करत असतील? आजोबांनी ही झाडं साधारण किती वर्षे आधी लावली असतील? रायवळ आंबा आणि हापूस आंबा यांच्यात इतका फरक का? रायवळ पण रसाळ आहे मग तो हलकासा हिरवट पिवळा असताना का खातात आणि हापूस मात्र पिवळाजर्द होईपर्यंत का थांबायचं इत्यादी इत्यादी..

अलीकडे गावचा आंबा चाखताना त्याचा गंध, चव, रंग आणि पोषणमूल्य हे सगळं जाणवतं, आजी-आजोबांबद्दलचा आदर दुणावतो आणि मन सुखावतं ते वेगळंच!

आपण आहाराबाबत वाचताना आंबा फळ म्हणून किती गुणकारी किंवा अपायकारक आहे हे वाचतो. परंतु आंब्याची कोय, कैरी आणि पाने यांनादेखील आहारशास्त्रामध्ये महत्त्व आहे.

आम्रो ग्राही प्रमेहा स्र् कफ पित्त व्रणाञ्जयेत्

तत्फल्म बालमत्यम्लं रूक्षं दोषत्रयास्र्जित्

म्हणजेच पिकलेला आंबा हा पचनासाठी उत्तम असून भूक शमविणारा आहे. कफ आणि पित्त दूर  करणारा, बळ आणि ऊर्जा देणारा आहे. मधुमेहींसाठी विकार दूर  करणारा असून रक्तातील दोष निवारण करणारा आहे  तर कैरी आंबट आणि अमलयुक्त असून तीनही दोषांचे निवारण करणारी आहे.

या दोनही श्लोकांमध्ये आंबा शरीराला कसा उपायकारक आहे ते सांगितले आहे.

आंबा आणि काजू यांचं मूळ एकच आहे. पण गुणधर्म मात्र वेगळे! यांना इंग्रजीत स्टोन फ्रुटस असेदेखील म्हणतात.

आंब्यातील पोषणतत्त्वे केव्हा जास्त असतात हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. म्हणजे कैरी खाणे योग्य की पिकलेला आंबा?

मेख अशी आहे की आंब्याच्या या दोन्ही रूपांमध्ये वेगवगेळी जीवनसत्त्वे असतात. कैरीमध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते आणि आंबा पिकलेला असताना त्यात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते.

आंब्याची कोय : आंबे खाताना त्यातील कोय अनेकदा टाकून दिली जाते. परंतु हीच कोय त्वचा विकारांसाठी उपयुक्त आहे.

ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आंब्याच्या कोयीची पावडर दररोज खाणे हितावह आहे. वारंवार पोट बिघडत असेल तर तर आंब्याच्या कोयीची पावडर नियमितपणे खावी.

गुजरातमध्ये आंब्याच्या कोयीपासून तयार केलेली पावडर मुखवास म्हणून खाल्ली जाते. जी अर्थातच पचनक्रिया सुकर बनविते.

इतकेच नव्हे तर कैरीची पावडर उत्तम रक्ताभिसरणासाठी उपयुक्त आहे. ज्यांना रक्तदाब आहे त्यांच्यासाठी एक चमचा पावडर दररोज खाणे हितावह आहे.

या पिवळसर पांढऱ्या पावडरमुळे शरीरातील सी -रेअक्टीव प्रोटिनचे प्रमाण नियंत्रणात राहते. ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलदेखील नियंत्रणात राहते.

कोयींच्या आतील गर तारुण्यपीटिकांवर किंवा चेहऱ्यावरील तारुण्यपीटिकांच्या व्रणांवर लावल्याने त्यांचे प्रमाण कमी होते.

कैरी :

कैरीचे पन्हे किंवा कच्ची कैरी खाणे कोणाला आवडत नाही? परंतु कैरी खाताना त्यावर अगदी थोडे मीठ किंवा मिरपूड टाकावी. कैरी खाताना अतिरिक्त मीठ वापरल्यास पचनात अडथळा येऊ शकतो.

कैरीमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. उन्हाळ्यातील कैरीचे पन्हे उष्माघातापासून संरक्षण करू शकते. कैरीमधील अँटीएजिंग गुणधर्म त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात. ज्यांना अर्धशिशीचा त्रास आहे त्यांनी मात्र कैरीचे अतिसेवन टाळावे.

वजन नियंत्रणात आणण्यासाठी कैरी खाणे उत्तम मानले जाते.

यकृताच्या विकारांसाठी कैरी आयुर्वेदामध्ये अनेक वर्षांपासून वापरली जाते. कैरी हे आताच्या भाषेत सांगायचे तर उत्तम डिटॉक्स आहे. कैरीमध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण हे तीन संत्री किंवा नऊ िलबांपेक्षादेखील जास्त असते!

आंब्याचे पान :

आंब्याची पाने वर्षभर उपलब्ध असतात. पचनक्रिया सुधारणे, पोटाचे विकार दूर करणे  यासाठी ती गुणकारी आहेत. सकाळी आंब्याची पाने पाण्यात उकळून त्याचे पाणी प्यायल्यास पोटाचे अनेक विकार दूर होतात. यातील हरितद्रव्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गुणकारी आहेत.

मधुमेहाची लक्षणे दूर करण्यासाठी आंब्याची पाने रात्रभर भिजवून ठेवावीत. सकाळी हेच  पाणी गाळून प्यावे. यातील द्रव्ये शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राखतात. ज्यांना मधुमेहामुळे डोळ्यांचे विकार आहेत त्यांनी आंब्याचा पानांचा चहामध्ये वापर करावा. यातील अँथोसायनिन मधुमेहींमद्य्ो डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

आंब्याची पाने चघळून खाल्ल्यास हिरडय़ा मजबूत होतात तसेच आंब्याच्या पानांच्या पाण्याने गुळण्या केल्यास दातांचे विकारदेखील होत नाहीत. दात स्वच्छ ठेवण्यासाठीच्या बऱ्याच उत्पादनांमध्ये आंब्याच्या पानांच्या पावडरचा वापर केला जातो.

हे सगळे फायदे असतानाच या पानांमधील अतिरिक्त पोटॅशिअमचे भान राखणे आवश्यक आहे. त्यामुळे पानांचा वापर प्रमाणात करणे कधीही योग्य!

आंब्यामध्ये मुबलक जीवनसत्त्वे आहेत हे आपण वाचले आहे.

दिवसभरात साधारण किती आंबे खावेत?

एका आंब्यामध्ये किमान १०० ते १५० कॅलरीज असतात. म्हणजे आंबा शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा देऊ शकतो. सोबत जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स आहेतच! मात्र तो स्वतंत्र आहार म्हणून खावा. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुस्त होईपर्यंत काहीही खाऊ नये. दिवसभरातील दोन-तीन फळे खाण्याच्या नियमात आंब्याचा समावेश जरूर करावा

गरोदर स्त्रियांनी आंबे खावेत का?

गरोदर स्त्रियांसाठी महत्त्वाची जीवनसत्त्वे आहेत – अ, ब, क तसेच लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड! आंबा या जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहे. पहिल्या तीन महिन्यांमध्ये आंब्याचे सेवन केल्याने पोटाचे त्रास बळावत नाहीत. अनेकदा कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे स्त्रियांना गोड खावेसे वाटते, अशावेळी इतर कोणताही साखरयुक्त पदार्थ खाण्यापेक्षा आंबा हा उत्तम पर्याय आहे.

आंब्यातील पोटॅशिअम शरीरासाठी उपयुक्त आहे. मात्र पिकवलेले आंबे खाणे कटाक्षाने टाळावे. तसेच ज्यांना जेस्टेशनल डायबिटिस म्हणजेच गरोदरपणात मधुमेहाची निदान झालेले आहे. त्यांनी मात्र आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कोणतेही गोड पदार्थ खावेत आणि आंबा याला अपवाद नाही.

लहान मुलांसाठी आंबा उपयुक्त आहे का?

लहान  मुलांच्या वाढीसाठी आंबा हे उपयुक्त फळ आहे. आंबा सर्व वयोगटातील मुलांनी खावा.

कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे कसे ओळखावेत?

बाजारात उपलब्ध असलेल्या आंब्यांपकी कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे कसे ओळखावेत हा प्रश्न अनेकदा पडतो. काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे:

  • आंब्याचा गंध : आंब्याचा गंध हे पिकवलेले आंबे ओळखण्यासाठी उत्तम परिमाण आहे. कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याला उग्र गंध असतो. असे आंबे खाणे कटाक्षाने टाळावे.
  • आंब्याचा रंग : या आंब्यांचा रंग केशरी असतो आणि त्यावर हिरवे डाग असतात. तसेच त्यातील आद्र्रतेचे प्रमाणदेखील कमी असते .
  • आंब्याची चव : कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याला गोड चव नसते.

अलीकडे हापूस या नावाने वर्षभर बाजारात आंबा विकला जातो.  हे आंबे वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले आंबे आहेत. वर्षभर बाजारात उपलब्ध असलेला आंबा स्थानिक आंब्याचे सगळेच गुण सोबत घेऊन येतो असे नाही. त्यामुळे ‘हर मौसम आम’पेक्षा ‘मौसम का आम’ हे धोरण आंबा खाताना लक्षात ठेवायला हवे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 1:03 am

Web Title: mango how much who and how to eat
Next Stories
1 आसाममधलं बांबूचं जग (आसाम)
2 डी-व्होटर दुर्लक्षितच (आसाम)
3 राजकारणातील आर्थिक सुधारणांचा विचार कधी?
Just Now!
X