19 February 2020

News Flash

दखल : उत्तम कथासंग्रह

मानवी भावभावनांवर आधारित अनेक कथासंग्रह मराठी साहित्यात उपलब्ध आहेत.

मानवी भावभावनांवर आधारित अनेक कथासंग्रह मराठी साहित्यात उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतकरून स्त्रीकेंद्री कथांचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर नातेसंबंधांवरील कथाही आहेत. असाच एक मनाचा वेध घेणारा कथासंग्रह स्नेहल जोशी घेऊन आल्या आहेत. माणसाचे मन एखाद्या तळ्यासारखे असते. वरून शांत, स्थिर असणाऱ्या तळ्यात तळाशी काय असतं हे फक्त तळंच जाणतं. तसंच मनाचंही असतं. एखादा माणूस वरून कसाही दिसला तरी त्याच्या मनात काय सुरू आहे हे त्यालाच ठाऊक असतं. मनाचा वेध घेणाऱ्या कथा ‘तळं’ या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. या संग्रहातील सर्व कथा कौटुंबिक आशयावरच्या आहेत. माणसाच्या मनात विचारांच्या अनेक लहरी, तरंग असतात. ते उलगडत जाणाऱ्या कथा या संग्रहात आहेत. ‘तिघी’, ‘वाटचाल’, ‘खरं आहे’, ‘मोरपीस’, ‘तळं’ अशा काही कथा माणसाच्या मन:स्थितीचा आढावा घेणारे आहेत तर ‘सोबत’, ‘सावट’, ‘संध्याछाया’, ‘प्रवाह’, ‘देस-परदेस’ या कथा वयस्कर लोकांच्या समस्यांबाबत भाष्य करणाऱ्या आहेत. विविध दृष्टिकोनांतून मनाची अवस्था मांडलेल्या कथांमुळे ‘तळं’ हा संग्रह वाचनीय झाला आहे.
तळं, स्नेहल जोशी, मेहता पब्लिशिंग, पृष्ठे : १९४, मूल्य : १९५ रुपये.

34-lp-bookथोडक्यात, पण महत्त्वपूर्ण

बाबासाहेब पुरंदरे यांचं महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या विविध पुस्तकांतून वाचकांना वाचायला मिळालं आहे. शिवचरित्रावरील त्यांचा अभ्यासही प्रचंड आहे. त्याविषयीही त्यांनी ठिकठिकाणी पुस्तकांतून मांडलं आहे. डॉ. नीला पांढरे ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ या पुस्तकातून बाबासाहेबांच्या आयुष्याविषयी मांडतात. त्यांना बाबासाहेबांचे आलेले अनुभव, त्यांची भेट, त्यांची लेखनप्रक्रिया, व्याखानमाला अशा अनेक इतर गोष्टींबाबत पांढरे यांनी पुस्तकातून मांडले आहे. केवळ १०० पानांच्या या पुस्तकात मोजकी पण महत्त्वपूर्ण माहिती दिल्यामुळे पुस्तक वाचनीय ठरलं आहे. कादंबरीप्रमाणे सलग मांडणी नसून सहा विभागांमध्ये लेख लिहिले आहेत. लेखिकेने मनोगतात म्हटलंय की, बऱ्याच पानांची पुस्तकं आजची तरुण पिढी कधी आणि कसं वाचणार? म्हणून सामान्य वाचकांसाठी छोटं आणि परवडणारं पुस्तक लिहायचं ठरवलं. लेखिकेच्या या विचारांची परिणती पुस्तकात प्रत्येक लेखात जाणवते. प्रत्येक विषयाची माहिती थोडक्यात दिल्यामुळे लेख सुटसुटीत आणि वाचण्यास सोपे झाले आहेत. ‘भेट शिवशाहीरांची’, ‘शिवचरित्र लेखनामागील प्रेरणा’, ‘राजा शिवछत्रपती-ग्रंथ’, ‘शिवचरित्रपर व्याख्यानमाला’, ‘महाराजा प्रतिष्ठान’, ‘पंतप्रधान इंदिरा गांधी-राष्ट्रपती झैलसिंग व बाबासाहेब’ अशा सहा विभागांमध्ये पुस्तक पूर्ण होते. थोडक्यात पण, महत्त्वाचे या फॉम्र्यूलामुळे पुस्तक चांगलं झालं आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नीला पांढरे, उन्मेष प्रकाशन, पृष्ठे : १००, मूल्य :१०० रुपये.
response.lokprabha@expressindia.com

First Published on April 29, 2016 1:18 am

Web Title: marathi book review 24
Next Stories
1 कथा : नवज्योत
2 खसखस : गमती सांगू किती!
3 समर्थस्थापित अकरा मारुती
Just Now!
X