वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. पण असं असलं तरी कशासाठी वाचायचं, कसं वाचायचं आणि काय वाचायचं हे कुणी सांगतंच असं नाही. त्याचबरोबर वाचनातून आनंद कसा मिळवायचा, स्वत:ला समृद्ध कसं करत न्यायचं हेसुद्धा अनेकांना समजतच असं नाही. या सगळ्या सवयी लहान मुलांना जाणीवपूर्वक लावल्या तर त्यांच्यामध्ये वाचनाची, पुस्तकांची आवड निर्माण होऊ शकते. त्याचा आनंद ती घेऊ शकतात. नवेनवे विषय समजणं, लेखकाशी जोडलं जाणं, लेखकाशी होणाऱ्या संवादाचा आनंद त्यांना मिळू शकतो. या सगळ्यांमधून त्यांचं व्यक्तिमत्त्व संपन्न होऊ शकतं. फक्त हे कुणी तरी मिशन म्हणून करायची गरज असते. या पुस्तकाचे लेखक नरेंद्र लांजेवार यांनी मिशन म्हणून ते केलं. ते भारत विद्यालय नावाच्या शाळेत ग्रंथपाल म्हणून काम करत असल्यामुळे मुलांवर वाचनसंस्कार घडवणं त्यांना शक्यही झालं. हे संस्कार घडवण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांविषयी आणि त्यातून निर्माण झालेल्या फलिताविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. त्यामुळे पुस्तकाचं नावच ‘एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा’ असं आहे. त्यांच्या शाळेतली मुलं पुस्तकांच्या जगात कशी वावरायला लागली, त्यांनी लेखकांना लिहिलेल्या पत्रांना लेखकांची उत्तरं आली की ती कशी भारावून जायला लागली हे सगळं या पुस्तकातून वाचायला मिळतं तेव्हा मुलांच्या मनात एखादी ठिणगी प्रज्वलित करण्याचं काम किती महत्त्वाचं असतं हे जाणवतं. घरचे लोक आता वाचन पुरे झालं म्हणून सांगतात तेव्हा एक वाचनवेडी मुलगी शाळेच्या ग्रंथालयात बसून आपली वाचनाची भूक भागवते. दरम्यानच्या काळात तिची एक कविता आनंद मासिकात पूर्ण नावाने प्रसिद्ध होते. तिच्या कवितेमुळे आपलं नाव छापून आलं हे बघून आनंदलेले वडील मग तिला कितीही वेळ पुस्तकं वाचायची परवानगी देतात. तीच मुलगी नंतर शाळेत ‘उत्तम वाचक’ पुरस्काराची मानकरी ठरते. पुस्तक आवडलं तर लेखकाला आवर्जून पत्र पाठवलं पाहिजे हा संस्कार झाल्यावर पत्रं जातात आणि चक्क डॉ. अब्दुल कलाम आझाद यांचं उत्तर येतं. आकाशवाणीवर डॉ. जयंत नारळीकरांची मुलाखत घेण्यासाठी नारळीकरांची सगळी पुस्तकं वाचून काढतात. एका मुलाच्या हातून ग्रंथालयातल्या कपाटाची काच त्याच्या हातातला बॉल लागून फुटते तेव्हा त्याला ओरडा बसत नाही तर नीट समजून घेतलं जातं. त्यामुळे नी दुसऱ्या वर्षीचा ‘उत्तम वक्ता’ ठरला. शाळेतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्काराची सगळी प्रक्रियाही मुलांतर्फेच उत्साहाने राबवली जाते. त्यासाठी बोलावलेल्या लेखकाशी संवाद साधणे ही त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणी असते. आपल्या वाढदिवसाला शाळेच्या ग्रंथालयाला एक पुस्तक भेट द्यायचं या उपक्रमालाही विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद कसा दिला, त्यामुळे त्यांनी ते ग्रंथालय शाळेचे ग्रंथालय न वाटता आपलेच कसे वाटायला लागले याविषयी लेखकाने लिहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत ज्ञानविज्ञान समुदाय आणि केरळ शास्त्र साहित्य परिषदेतर्फे शाळकरी मुलांसाठी सगरेत्सव नावाचा उत्सव केला जातो. लेखकाने आपल्या शाळेतल्या काही मुलांना तो उत्सव पाहायला नेलं. केरळी घरात राहिलेली मराठी मुलं, केरळमधील साहित्य चळवळीचा त्यांच्या बालमनावर झालेला संस्कार, तिथल्या एकूण वातावरणाचा मुलांवर झालेला परिणाम, त्याबद्दल त्यांनी परत आल्यावर केलेलं लिखाण ही सगळी माहिती आवर्जून वाचण्यासारखी आहे.
एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा, नरेंद्र लांजेवार, साकेत प्रकाशन, मूल्य – १०० रुपये, पृष्ठे – ११७

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review
First published on: 27-05-2016 at 01:08 IST