आज आपल्या आसपासचं सगळं जग टीव्ही वाहिन्यांमध्ये हरवून गेलेलं आहे. त्यापुढचा टप्पा म्हणजे आता टीव्हीच्या वेळेत मनोरंजन करून न घेता उलट आपल्या वेळेनुसार युटय़ूबवरून किंवा इतर साइट्वरून इंटरनेट वाहिन्या बघितल्या जातात. लहान मुलंही युटय़ूबवरून त्यांना हव्या त्या मालिका डाऊनलोड करून बघतात. हे सगळं स्वप्नवत वाटावं असा आजचा काळ आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी मनोरंजनाचं साधन म्हणजे सरकारी टीव्ही वाहिनी आणि रेडिओ ऊर्फ आकाशवाणी हेच होतं. या आकाशवाणीवरून लहानांसाठी मोठय़ांसाठी नभोनाटय़, श्रृतिका असे कार्यक्रम सादर व्हायचे आणि लोक रेडिओला अक्षरश: कान देऊन ते ऐकायचे. त्या जोडीला बालरंगभूमीची चळवळ जोरात होती. त्या काळात आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी मुलांच्या कार्यक्रमासाठी सातत्याने लिहिणाऱ्या, सुधा करमरकर यांच्या लिटल थिएटरमार्फत बालनाटय़  रंगभूमीवर वावरणाऱ्या विनायक कुलकर्णी यांनी ‘भुताचा दगड’ हे बालनाटय़ लिहिले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मोठय़ा माणसांचे डोळे लहान मुलांमुळे कसे उघडतात, हे या नाटकात मांडण्यात आलं आहे. मामा, मामी, चिंटू, चिंगी, शंकऱ्या, बाबू, बाळ्या, भगतीण, राम्या, यमू या बात्रांनी त्यांत गंमत आणली आहे. हे नाटक प्रकाशित करणारं आभा प्रकाशन हे फक्त नाटक आणि एकांकिकांचं प्रकाशन करणारी वैशिष्टय़पूर्ण संस्था आहे.
भुताचा दगड, विनायक कुळकर्णी, आभा प्रकाशन, मूल्य : ७० रुपये, पृष्ठे : ५२

आयुष्यात एखादं बरं काम, त्याच्यामुळे मिळालेला एखादा पुरस्कार या भांडवलावर माणसं सगळं आयुष्य रेटतात. आपण कुणीतरी महान आहोत या सुखात आयुष्यभर तरंगत राहतात. पण अवघं जग बदलून टाकतील असे अत्यंत महत्त्वाचे असे किमान चार शोध, त्याशिवाय प्रचंड, संशोधन, दिगंत कीर्ती, जगभर प्रचंड लोकप्रियता, पुढच्या काळातल्या अखिल मानवजातीने कायमच ऋणात रहावं एवढं कर्तुत्व वाटय़ाला आलं होतं ते थॉमस अल्वा एडिसनच्या. स्वत:च्या प्रतिभेने जग बदलणारा किमयागार अशीच टॅग लाइन एडिसनवरच्या या पुस्तकावर दिली आहे ती अगदी सार्थ आहे. कीर्ती परचुरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक डायमंड प्रकाशनाच्या कुमारवयीन मुलांसाठी ‘भन्नाट माणसं’ ही प्रेरणादायी पुस्तकांची मालिका देणाऱ्या ‘कनक बुक्स’तर्फे प्रकाशित करण्यात आलं आहे. थॉमस अल्वा एडिसनची बहुतेकांना शालेय पातळीवरच ओळख झालेली असते ती विजेच्या दिव्याचा शोध लावणारा शास्त्रज्ञ म्हणून. मठ्ठ आणि मंदबुद्धीचा मुलगा म्हणून त्याची त्याच्या शिक्षकांनी अवहेलना केली, ती सहन न होऊन त्याच्या आईने त्याच्यापुढे जगाचं विद्यापीठ खुलं करून दिलं आणि आईचा निर्णय किती योग्य होता हे एडिसनने आपल्या कर्तृत्वाने कसं सिद्ध केलं ते या पुस्तकात ओघवत्या भाषेत मांडण्यात आलं आहे.
थॉमस अल्वा एडिसन, कीर्ती परचुरे, कनक बुक्स, मूल्य : १२५, पृष्ठे : १२९

अलेक्झान्द्र द्युमास हा एकोणिसाव्या शतकातला एक लोकप्रिय लेखक. त्याच्या कादंबऱ्या जगातल्या जवजवळ शंभरेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत, असं सांगितलं जातं. त्याच्या बहुतेक सगळ्या कांदबऱ्या नेपोलियनच्या धकाधकीच्या कारकीर्दीच्या पाश्र्वभूमीवर घडतात. ‘द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ या कादंबरीलाही ती पाश्र्वभूमी आहेच. सुष्ट आणि दुष्टांच्या संघर्षांत परिस्थिती आपल्याला हवी तशी वाकवून सुष्ट माणसं दुष्टांना कसं शासन घडवतात हे या कादंबरीतून मांडण्यात आलं आहे. भावभावनांचं नेमकं चित्रण, नाटय़मयता, मानवी स्वभावाचं लेखकाला असलेलं आकलन यातून ही कादंबरी गुंतागुंतीची बनत जाते आणि ही गुंतागुंत लेखक लीलया उकलूनही दाखवतो. कितीही संकटं आली तरी आशावादी राहा आणि तुमचं जीवन तुम्हाला हवं तसंच घडवा असा संदेशच एक प्रकारे ही कादंबरी वाचकांना देते. साधा सरळ मनाचा, उत्साही, आनंदी डान्टे त्याच्या अंगभूत गुणांमुळेच विशीतच जहाजाच्या कॅप्टनपदावर बसणार असतो. पण त्याचा साधेपणा, सरळपणा हे त्याचे गुणच त्याचे शत्रू बनतात आणि बघता बघता तो एका गुप्त तुरुंगाच्या काळकोठडीत जाऊन पडतो. तिथून मृत्यूच त्याची सुटका करेल एवढीच शक्यता असते. पण तुरुंगात खितपत पडूनही तो आशावाद सोडत नाही आणि एक दिवस तुरुंगातून स्वत:ची सुटका करून घेतो. योगायोगाने अचानक प्रचंड श्रीमंत होतो आणि मग त्याला या परिस्थितीत लोटणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकवतो. त्याला एकेकाळी मदत करणाऱ्या प्रत्येकाला विपरीत परिस्थितीतून बाहेर काढतो. म्हटलं तर ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ वाटेल अशी ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते.
द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो, आलेक्झान्द्र द्युमास, अनुवाद : प्रणव सखदेव, डायमंड पब्लिकेशन, मूल्य : २५० रुपये; पृष्ठे : २५२

रोजच्या धबडग्यात अचानक एखाद्या आजाराला सामोरं जावं लागतं आणि दैनंदिन जगण्याचा ताल-तोल बिघडून जातो. वेगवेगळ्या उपचारपद्धतींचे प्रयोग केले जातात, पण काही वेळा गुण पडतो, तर काही वेळा पडत नाही. कधी कधी शरीर कोणत्याच उपचारपद्धतीला दाद देत नाही. त्यामुळे योग्य उपचारांचा शोध सुरू होतो. अशा वेळी कुणीतरी अ‍ॅक्युप्रेशर ही उपचारपद्धती घेऊन बघा असं सुचवतं, हेही करून बघू असं म्हणून माणसं त्याकडे वळतात आणि थोडय़ाच काळात त्यांचं शरीर अ‍ॅक्युप्रेशरच्या उपचारांना दाद द्यायला लागतं. आपल्या आसपास असं घडताना आपण अनेकदा बघतो. आजाराच्या मुळाशी जात, आपल्याला त्या आजाराशी लढायला आंतरिक बळ देत अ‍ॅक्युप्रेशर ही उपचारपद्धती आपल्याला वेदनामुक्त करू शकते. ही उपचारपद्धती नेमकी काय आहे, तिची मूलभूत तत्त्वे कोणती, ती आपल्या शरीरावर कशी काम करते, अ‍ॅक्युप्रेशरच्या दृष्टिकोनातून आपली शरीररचना कशी आहे, अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्युपंक्चर यात फरक काय आहे, अ‍ॅक्युप्रेशरच्या दृष्टिकोनातून शरीरातल्या विविध बिंदूंची ओळख, कोणकोणत्या आजारात अ‍ॅक्युप्रेशर पद्धतीचा वापर केला जातो, तो कसा केला जातो, अशी सगळी तपशीलवार माहिती या पुस्तकात आहे.
मिरॅक्युलस इफेक्ट्स ऑफ अ‍ॅक्युप्रेशर, डॉ. ए. के. सक्सेना, डॉ. एल. जी. गुप्ता, मेहता पब्लिशिंग हाऊस, मूल्य : २२५, पृष्ठे : २४८
प्रतिनिधी