या कवितासंग्रहात एकूण ६६ कविता आहेत. कवयित्रीला असलेली सत्य, शिव आणि सुंदराबरोबरच असलेली निसर्ग, ईश्वर आणि प्रेम यांची ओढ या कवितांमधून व्यक्त होते. निसर्गातले तारे, इंद्रधनुष्य, पाऊस, कोकिळगान, वसंत हे विषयही तिला वेढून टाकतात. राधेन केलं तसं नि:स्वार्थ आणि संपूर्ण समर्पण असलेलं प्रेम तिला महत्त्वाचं वाटतं. म्हणून ती स्वत:ला कृष्णमयी म्हणवून घेते आणि कवितेतून त्या प्रेमाचा शोध घेते.
कृष्णमयी (कवितासंग्रह), नलिनी दर्शने, नीहारा प्रकाशन, मूल्य : ६० रुपये, पृष्ठसंख्या : ८०

‘टवाळा आवडे विनोद’ असं समर्थ रामदासांनी लिहून ठेवलं असलं तरी विनोदी लिखाण करणं अवघड असतं. ते उसंतवाणीतून सहजपणे प्रकटतं. शेतकरी संघटकच्या अंकात रवी तांबोळी यांनी थंडा महाराज देगलूरकर या टोपणनावाने लिहिलेले खुसखुशीत लिखाण या पुस्तकात आहे. बदललेल्या जीवनमानाविषयी, राजकीय घटना घडामोडींविषयी अतिशय तिरकस शैलीत केलेले हे लिखाण वाचकाला खिळवून ठेवते.
उसंतवाणी, रवी तांबोळी, डिंपल पब्लिकेशन, मूल्य : १२० रुपये, पृष्ठसंख्या : १२०,

या कवीची कविता अतिशय मितभाषी आणि अल्पाक्षरी अशी आहे. साहजिकच थोडय़ा शब्दांतून ती जास्तीतजास्त आशय मांडू पाहते. झाडाचं पान या रुपकाचा वापर करून या सगळ्या कविता रचलेल्या आहेत. सुरुवातीला कवी म्हणतो की संकेतांमधून अनेक अर्थाचे सूचन हे कवितेचं व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे या पानांच्या कविता आहेही आणि नाहीही, हे अगदी सार्थ आहे.
पर्णसूक्त (कवितासंग्रह), संजय बोरुडे, जनशक्ती वाचक चळवळ, मूल्य : ८० रुपये, पृष्ठसंख्या : ७२

१९१७ ते १९४२ या काळात गांधीजींचे सचिव म्हणून काम केलेल्या महादेवभाईंच्या आयुष्यावर आणि त्यांच्या रोजनिशीतल्या नोंदीवर आधारित आहे. अनेकांना महादेवभाई ही नाटककाराच्या प्रतिभेची निर्मिती वाटते. पण ती एक खरोखरची व्यक्ती होती, याबद्दल हे नाटक सांगतं. नाटकाचा फॉर्म एकदम वेगळा आहे. नाटककार चेतन दातारला या नाटकाचे प्रयोग करायचे होते. त्यासाठी त्यांनी माया पंडित यांना त्याचा अनुवाद करायला सांगितले होते.
महादेवभाई, रामू रामनाथन, अनुवाद- माया पंडित, पॉप्युलर प्रकाशन, मूल्य : ९५ रुपये; पृष्ठसंख्या : ५१

‘कालच्या शतकानं तर घेतला दऱ्याखोऱ्यांतून वाहणाऱ्या गाण्याचा घोट, मूठभरांच्या भल्यासाठी बेवारस केलं कंदमुळ्यावर जगणारं पोट’ या शब्दांत सुरू होणारा लहू कानडे यांचा हा तिसरा कवितासंग्रह धगधगत्या कवितांचा आहे. कष्टकरी वर्ग, नाही रे समाज, स्त्रिया, शोषित अशा सगळ्यांच्या जगण्यातल्या वेदना, त्यांची दु:ख या कवितांमधून शब्दबद्ध झाली आहेत.
तळ ढवळताना (कवितासंग्रह), लहू कानडे, लोकवाङ्मय गृह, मूल्य : २०० रुपये, पृष्ठसंख्या : १०२

फेसबुक हा आता अनेकांच्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. या फेसबुकवर टवाळक्या करणाऱ्यांची टोळी म्हणजे बेम्भाटे मास्तरांची शाळा. उंडारणारी कार्टी, फरार गुर्जी, भिंती नसलेली इमारत आणि टाईमटेबल नसलेले वर्ग अशा या शाळेतल्या मुळात बुद्धिमानच असलेल्या २६ विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ११६ कवितांचा हा दुसरा संग्रह आहे.  त्यात कवितांचं वैविध्य पाहायला मिळतं.
ऋतु शब्दांचे (कवितासंग्रह), बेम्भाटे मास्तरांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपादित कविता, संपादक : नवनाथ पवार, स्वाती धर्माधिकारी, दगडू लोमटे, रेणुका प्रकाशन, मूल्य : २०० रुपये, पृष्ठे : १९२ 

वि. स. खांडेकर यांच्या साहित्याविषयक अनेक पुस्तके आहेत. पण त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा इतिहास काहीसा मागे राहिला. त्यांच्या पटकथांची अनुपलब्धता हे त्याचं प्रमुख कारण आहे. ही कमतरता भरून काढण्याचा ‘अंतरीचा दिवा’ या पुस्तकाचा हेतू. या पुस्तकात खांडेकरांच्या पटकथांचा संग्रह डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केला आहे. मराठी वाचकांसाठी ही पर्वणीच आहे. त्यांच्या पटकथांच्या संग्रहाचं हे पहिलंच पुस्तक असून ते संग्रही ठेवावं असं आहे.
अंतरीचा दिवा, लेखक : वि. स. खांडेकर, संपादक : डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रकाशक : सुनील अनिल मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस, मूल्य : ५५० रुपये, पृष्ठसंख्या : ५८८

स्त्रियांच्या आयुष्यावर बेतलेल्या कथा, कादंबऱ्या, काव्यसंग्रह यांची संख्या बरीच आहे. त्यात ‘स्त्री सूक्त’ या पुस्तकाचीही आता भर पडेल. स्त्रियांचं आयुष्य बदलायला हवं, त्यांच्याविषयीचे विचार, मत यातही बदल हवा, हे सांगणारं हे पुस्तक आहे. नव्या स्त्रियांनी हे बदल करणे आवश्यक आहे, असं सांगणारे लेखक श्याम खांबेकर स्त्री सन्मानार्थ ‘स्त्री सूक्त’ लिहितात.
स्त्री सूक्त, लेखक : श्याम खांबेकर, प्रकाशक : राधामोहन प्रकाशन, मूल्य : २४ रुपये, पृष्ठसंख्या : ३२

हेमंत गोगटे यांचा ‘मुक्तमेघ’ हा तिसरा काव्यसंग्रह. यातील कवितांमध्ये वास्तवाचे भान आहे. तसंच या कवितांमध्ये सामाजिक विषयांचीही जाण असल्याचे आढळते. या काव्यसंग्रहात २१ कविता आहेत. प्रत्येक कवितेचा विषय वेगळा आहे. कवितांची भाषाही अतिशय साधी-सोपी आहे. विषयांमधील वैविध्यामुळे काव्यसंग्रह वेगळा ठरतो. कवितांची भाषाही अतिशय साधी-सोपी आहे.
‘मुक्तमेघ’, लेखक : हेमंत गोगटे, मूल्य : ५० रुपये, पृष्ठसंख्या : २८

अपार मेहनत करणाऱ्यांसाठी यश फारसं दूर नसतं. तिथवर पोहोचण्याचं अंतर कमी कसं करावं याची मात्र नेमकी दिशा कळत नाही. ते एका पावलावरचं अंतर कमी करण्यासाठी पद्धतशीर व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे नेमकं काय, हे माहीत असणं गरजेचं आहे. व्यक्तिमत्त्व विकास, स्वयंविकास घडवण्यासाठी आत्मसात करावयाच्या मूलभूत गोष्टी याविषयीचं अरविंद खानोलकर यांचं ‘यश एका पावलावर’ हे पुस्तक उपयुक्त आहे.
‘यश एका पावलावर’, लेखक : अरविंद खानोलकर, प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिकेशन, मूल्य : १५० रुपये, पृष्ठसंख्या : १८३

वा. रा. गाणारलिखित ‘अशोक के अभिलेख’ या हिंदी पुस्तकात विविध लेखांचा समावेश आहे. मौर्य साम्राज्याची ओळख, सम्राट अशोकाची अन्य राजांशी तुलना, सम्राट अशोकाचे मुख्य चौदा शिला अभिलेखांची माहिती असे विविध उपयुक्त माहितीपूर्ण लेख या पुस्तकात आहेत. पुस्तकात असलेले दोन्ही परिशिष्ट अतिशय महत्त्वाचे आणि उपयोगी आहे.
अशोक के अभिलेख, लेखक : वा. रा. गाणार, प्रकाशक : नाथे पब्लिकेशन प्रा. लि., मूल्य रु. : १०० /-, पृष्ठसंख्या : ११५

‘जैन हिल्सवरील जागरण’ या भवरलाल जैन यांच्या पुस्तकात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. त्यांचा मुख्य भर हा समाजधारणेवर आहे. त्यांची मतं स्पष्टपणे या पुस्तकातील काही लेखांमध्ये त्यांनी मांडली आहेत. काही लेख ही त्यांची मुळची भाषणे आहेत. त्यांचे महत्त्वपूर्ण विषयांवरील अनुभवपूर्ण लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. त्यांचे अनुभव हे प्रत्येक विषयातून झळकतात. समाजाच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणारं हे पुस्तक वाचनीय आहे.
जैन हिल्सवरील जागरण, लेखक : भवरलाल जैन, प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मूल्य : १२० रुपये, पृष्ठसंख्या : १४९

भवरलालजी जैन यांच्या आत्मकथनपर ‘ती आणि मी’ या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादांचं पुस्तक म्हणजे ‘ती आणि मी प्रतिसाद’. त्यांच्या या मूळ पुस्तकावर त्यांना अनेक पत्र आली, परीक्षणे लिहिली गेली, चर्चा-परिसंवाद-पत्रसंवाद झाले, दृक्श्राव्य नाटकंही झाली. अशा सगळ्यांचा संग्रह ‘ती आणि मी प्रतिसाद’ या पुस्तकात करण्यात आला आहे. याबरोबरच वाचकांचे अभिप्राय यानिमित्ताने या पुस्तकात वाचायला मिळतील. मूळ पुस्तकातील काही छायाचित्रेही या पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत.
ती आणि मी प्रतिसाद, संपादन: ज्ञानेश्वर शेंडे, प्रकाशक:- भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन, मूल्य : २०० रुपये, पृष्ठसंख्या : २०३

उत्तम कांबळे यांचं लिखाण वाचकाला नेहमीच काहीतरी सांगून जात असतं. साध्या भाषेतून वास्तवाचं भेदक चित्रण करत हा लेखक समाजाची सद्य परिस्थिती स्पष्टपणे मांडतो. त्यांच्या अशाच लेखनाचा प्रत्यय ‘खूप दूर पोहोचलोत आपण’ या पुस्तकातूनही येतो. या पुस्तकातील पद्यरचना विचार करायला लावणाऱ्या आहेत. उत्तम कांबळे यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही वाचनीय आहे.
खूप दूर पोहोचलोत आपण, लेखक : उत्तम कांबळे, प्रकाशक : सुरेश एजन्सी, मूल्य : ११० रुपये, पृष्ठसंख्या : ११२ 

अरुण शौरी हे देशातल्या चोखंदळ वाचकांच्या दृष्टीने एक आवर्जून दखल घ्यावी असं नाव. पत्रकारिता ते राजकारण असा त्यांचा प्रवास आणि त्याचा दांडगा अनुभव. त्यामुळेच ते काय लिहितात याकडे जाणत्यांचे लक्ष असते. प्रशासनाचा अभाव आणि त्याचा अंतर्गत सुरक्षेवरील परिणाम, पाकिस्तानातील घडामोडींमुळे आपल्याला मिळालेला शह, चीनची कामगिरी, आण्विक करार, नवी पत्रकारिता, अर्थसंकल्पांमधील खोटेपणा अशा अनेक मुद्दय़ांवरील लिखाण ‘हे सर्व आपल्याला कोठे नेणार’ या पुस्तकात आहे. ‘व्हेअर विल ऑल धिस टेक अस?’ या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. देशाच्या सध्याच्या परिस्थितीत वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.
हे सर्व आपल्याला कोठे नेणार?, मूळ लेखक : अरुण शौरी, अनुवाद : अशोक पाथरकर, प्रकाशक:- सुनील अनिल मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस, मूल्य : ६०० रुपये, पृष्ठसंख्या : ५८२

स्त्रियांच्या समस्या नेहमी पुरुषप्रधान समाज, शारीरिक दुर्बलता, कायदे यांच्याभोवतीच फिरत असतात. पण याशिवाय सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक धार्मिक परिमाणंही त्यांच्या समस्यांना तितकीच जबाबदार आहेत. भारतातील मुस्लिम स्त्रिया हा आणखी एक गंभीर विषय आहे. परंपरा, रुढी यांच्यापलीकडे जाऊन सत्य शोधू पाहणारं ‘बिहाइंड द वेल’ हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. अतिशय महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रतिभा रानडे यांनी या पुस्तकातून भाष्य केलं आहे.
बिहाइंड द वेल.. इ सर्च ऑफ ट्रथ,       लेखक : प्रतिभा रानडे, प्रकाशक: परम मित्र पब्लिकेशन्स, मूल्य : १७५ रुपये, पृष्ठसंख्या : १३४
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com