17 November 2019

News Flash

मराठीचे मारेकरी!

मराठीतून शिक्षण घ्यायला-द्यायला मराठी माणूसच तयार नाही.

महाराष्ट्राची राज्यकारभाराची अधिकृत भाषा मराठी असली तरी तिथे तिला नगण्य स्थान आहे. सर्व सरकारी परिपत्रके, न्यायालयांची निकालपत्रे आधी इंग्रजीतून विचार करून इंग्रजीत तयार केली जातात आणि नंतर मराठीत भाषांतरित केली जातात. खरे तर ती मराठीतून विचार करून मराठीतच तयार केली गेली पाहिजेत आणि गरजेनुसार नंतर त्यांचे अन्य भाषेत भाषांतर केले पाहिजे.

मराठीतून शिक्षण घ्यायला-द्यायला मराठी माणूसच तयार नाही. ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकतात त्यांना सामाजिक प्रतिष्ठा आणि ज्यांची मुलं मराठी माध्यमातून शिकतात त्यांची उपेक्षा. महाजनांचे अनुकरण बहुजन करत असतात. त्यामुळे बहुजनांना दोष देता येत नाही. ‘‘या वर्षांपासून आम्ही इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करणार आहोत’’ असे भल्या भल्या नामांकित शिक्षण संस्था अभिमानाने जाहीर करतात. यात समाज हिताची कळकळ किती आणि आर्थिक लाभाचा मोह किती, हे उलगडून सांगायला नको!

मराठीवर सर्वात जास्त आघात घराघरांत पोहोचलेल्या दक्श्राव्य आणि मुद्रित प्रसारमाध्यमांकडून होत आहेत. कुठलेही वर्तमानपत्र उचला आणि त्यात देवनागरी लिपीत छापलेले इंग्रजी शब्द मोजा. मी मोजले होते आणि संबंधित वर्तमानपत्रांकडे पाठवलेही होते. ना उत्तर आले, ना त्यांच्यात काही फरक पडला! सरकारी-खासगी लघू-मध्यम-उच्च ध्वनीलहरींवर चालणारी आकाशवाणी केंद्रे; दृक्श्राव्य वाहिन्यांवरून प्रसारित होणारी बातमीपत्रं, चर्चासत्रं, मालिका, जाहिराती इत्यादींमधून मायमराठीची प्रचंड मुस्कटदाबी आणि तीही मायमराठीच्याच लेकरांकडून सुरू आहे. हिंदी-इंग्रजीतल्या जाहिरातीची भाषांतरित मराठी आवृत्ती ऐकताना तर शिसारीच येते. बऱ्याच वेळा ‘ऐकूया’ ऐवजी ‘एकूया’ म्हटले जाते. असंख्य उदाहरणे देता येतील. हे सर्व थांबवायचे असेल तर मराठीप्रेमींनी त्यांच्यावर सामुदायिक बहिष्कार घातला पाहिजे. तामिळनाडूत हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे. याला म्हणतात जाज्ज्वल्य मातृभाषाप्रेम! आमच्याकडे ते आहे का?

समाजावर सर्वात जास्त इष्ट-अनिष्ट परिणाम तारे-तारका, खेळाडू, राजकीय नेते आणि  प्रसारमाध्यमांकडून होत असतात. मातेला ‘आई’, पित्याला ‘बाबा’, पत्नीला ‘बायको’, पतीला ‘नवरा’ म्हणणारे गावंढळ आणि त्याऐवजी ‘मॉम’, ‘डॅड’, ‘मिसेस्’, ‘मिस्टर’ म्हणणारे मॉडर्न? ही विकृती आली कुठून? आचार-विचार, आहार-विहार, भाषाशुद्धी इत्यादी बाबींचा आग्रह धरणाऱ्यांना आम्ही बहिष्कृत केले, अडगळीत टाकले. तथाकथित प्रतिष्ठेच्या भंपक मोठेपणाच्या मागे धावत सुटलो. आमच्याकडे आहे ते निकृष्ट आणि बाहेरून येते ते उत्कृष्ट म्हणून स्वीकारत गेलो. त्यामुळेच संस्कृत लयाला गेली आणि मराठीही त्याच मार्गाने निघाली आहे. ज्या मातेची सख्खी लेकरंच तिच्या जिवावर उठली असतील तिला वाचवणार कोण? आणि तिने तरी जगावं कुणासाठी?
सोमनाथ देशमाने – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 26, 2016 1:28 am

Web Title: marathi language 36