‘सुरनई’ या नाटय़संस्थेतर्फे मुंबईत इब्सेनाच्या निवडक नाटकांचा महोत्सव नुकताच सादर करण्यात आला. यावर्षीच्या इब्सेन महोत्सवाचे मुख्य सूत्र होते ‘इब्सेनच्या स्त्रिया’. स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या इब्सेनच्या नाटकांपैकी एक गाजलेलं नाटक म्हणजे ‘ए डॉल्स हाऊस’. ही नाटय़कृती पाहून प्रेक्षक अंतर्मुख तर होतातच, पण त्याचबरोबर विचार करण्यासही प्रवृत्त होतात.

जागतिक रंगभूमीच्या इतिहासात इंग्लंडच्या विल्यम शेक्सपिअर एवढय़ा उत्तंग प्रतिभेचा नाटककार झाला नाही हे सर्व अभ्यासक मान्य करतात. त्याचप्रमाणे शेक्सपिअरनंतर नॉर्वेचा हेनरिक इब्सेन (१८२८-१९०६) महत्त्वाचा नाटककार समजला जातो. अलीकडेच  के. के. रैना व मती इला अरुण यांनी स्थापन केलेल्या ‘सुरनई’ या नाटय़संस्थेतर्फे मुंबईत इब्सेनाच्या निवडक नाटकांचा महोत्सव सादर करण्यात आला होता. गेली काही वष्रे सुरनई ही नाटय़संस्था निष्ठेने मुंबईत ‘इब्सेन महोत्सव’ सादर करत आहेत. याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार. अशा प्रयत्नांमुळेच जाणकार प्रेक्षकांना जागतिक दर्जाची नाटकं बघायला मिळतात. मराठी रंगभूमीवर एकेकाळी इब्सेनच्या नाटकांचे प्रयोग सतत होत असत. गेली अनेक वष्रे तरुण रंगकर्मीनी इब्सेन वगरेसारख्या महान नाटककारांच्या कलाकृती सादर केल्या नाहीत. ही खेदाची बाब आहे. इब्सेनसारख्या नाटककाराच्या कलाकृती सतत सादर होत राहणे हे त्या भाषिक रंगभूमीच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. पण लक्षात कोण घेतो?

सुरनईने यावर्षी सादर केलेल्या इब्सेन महोत्सवाचे मुख्य सूत्र होते ‘इब्सेनच्या स्त्रिया.’ इब्सेनची काही नाटकं स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून लिहिली आहेत. यातील अतिशय गाजलेले नाटक म्हणजे ‘ए डॉल्स हाऊस.’ या महोत्सवात हे नाटक सादर करण्यात आले होते. सुरनईने सादर केलेला ‘ए डॉल्स हाऊस’चा प्रयोग त्यातील सर्व नाटय़घटकांमुळे अतिशय देखणा ठरला.

या नाटकाचा पहिला प्रयोग युरोपात डिसेंबर १८७९ मध्ये सादर झाला होता. तेव्हा या नाटकाने अवघ्या युरोपमध्ये खळबळ माजवली होती. नोरा ही या नाटकाची नायिका. विवाहित, आठ वर्षांच्या वैवाहिक जीवनात झालेली तीन मुलं व गृहिणी असलेली नोरा नाटकाच्या शेवटी या सर्वावर पाणी सोडून धाडकन दार लावून निघून जाते. अभ्यासकांच्या मते नोराने तेव्हा जे धाडकन दार लावले त्याचे पडसाद नंतर साऱ्या युरोपभर उमटले. इब्सेनचे ‘ए डॉल्स हाऊस’ हे नाटक म्हणजे स्वत:चा शोध घेऊ पाहणाऱ्या स्त्रीसाठी पथदर्शक नाटक ठरले. म्हणूनच आजही जगभर या नाटकाचे प्रयोग होत असतात व नाटकावर चर्चा सुरू असते.

नोरा व तिचा नवरा टोरवाल्ड म्हणजे एक सुखी कुटुंब. टोरवाल्ड अनेक वेळा तिला प्रेमाने ‘बाहुली’ म्हणत असतो. (म्हणूनच नाटकाचे शीर्षक आहे ‘ए डॉल्स हाऊस’) टोरवाल्ड एका बँकेत अधिकारी असतो. काही वर्षांपूर्वी तो गंभीर आजारी असताना त्याच्या उपचारांसाठी नोराने त्याच्या नकळत निल्स क्रोगस्टॅड या बदनाम माणसाकडून कर्ज काढले असते. आपण हे पसे वडिलांकडून आणले आहेत असे ती टोरवाल्डला सांगते. प्रत्यक्षात तिने या कर्जासाठी आपल्या मृत वडिलांची खोटी सही केलेली असते. त्याकाळच्या युरोपमधील प्रथेप्रमाणे स्त्रीला जर कर्ज हवे असेल तर तिच्या कर्जाच्या अर्जावर एका तरी पुरुषाची स्वाक्षरी असणे गरजेचे होते. नोरा मेलेल्या वडिलांची खोटी सही करून कर्ज मिळवते व वेळ निभावून नेते.

हे कर्ज ती नवऱ्याच्या नकळत हळूहळू व जमेल तसे फेडत असते. नोरा तशी घरखर्चात उधळपट्टी करणारी मध्यमवर्गीय स्त्री. यावरून तिचे व टोरवाल्डचे अधूनमधून खटके उडत असतात. नोराने हे कर्ज गावातल्या निल्स क्रोगस्टॅडकडून घेतलेले असते. हा बदनाम माणूस आता स्वत: एका लफडय़ात अडकतो. त्यामुळे त्याला उरलेले पसे ताबडतोब हवे असतात व टोरवाल्डच्या बँकेत नोकरीसुद्धा. ही नोकरी टोरवाल्डच्या शिफारशीवरून सहज मिळू शकणारी असते. क्रोगस्टॅड नोराला धमकी देतो की तिने टोरवाल्डला सांगून त्याला नोकरी मिळवून दिली नाही तर तो टोरवाल्डला तिने घेतलेल्या कर्जाबद्दल व तिने केलेल्या खोटय़ा सह्य़ांबद्दल सांगेल.

बाहेरच्या जगाचा फारसा अनुभव नसलेली नोरा घाबरते. ती आडूनआडून टोरवाल्डला निल्स क्रोगस्टॅडला नोकरी देण्याबद्दल सांगून बघते. टोरवाल्ड ही गोष्ट ताबडतोब उडवून लावतो. उलट अशा बदनाम माणसाला नोकरी दिली तर माझीच बदनामी होऊन बँकेतील माझ्या पुढच्या पदोन्नतींवर प्रतिकूल परिणाम होईल असेही सांगतो. नोरा कचाटय़ात सापडते. तिच्याजवळ काहीही पर्याय राहात नाही. ती शेवटी टोरवाल्डला घेतलेल्या कर्जाबद्दल व त्यासाठी केलेल्या खोटय़ा सहीबद्दल सांगते. टोरवाल्ड हे ऐकून अवाक होतो. त्याला एवढा राग येतो की तो तिला अद्वातद्वा बोलतो. नोरा त्याला समजून सांगत असते की हे कर्ज तिने त्याच्या आजारपणासाठी काढले होते. पण टोरवाल्डचे एकच पालुपद व ते म्हणजे आता त्याला तिच्या नालायकपणामुळे त्या बदनाम निल्स क्रोगस्टॅडला बँकेत नोकरी द्यावी लागेल. अशा बदनाम माणसाला नोकरी दिल्यामुळे त्याची समाजात बदनामी होईल. यामुळे टोरवाल्ड खूप चिडतो.

या घटनेमुळे त्यांच्या संसारात कमालीचे ताण निर्माण होतात. नोराला सतत ‘तू मूर्ख आहेस’, ‘खुळचट आहेस’ ‘तुला अक्कल नाही’ वगरे टोमणे ऐकावे लागतात. आपण हे सर्व टोरवाल्डसाठी केले हे टोरवाल्ड का लक्षात घेत नाही हे तिला समजत नाही. टोरवाल्ड सतत ‘त्या नालायक माणसाला नोकरी दिल्यास माझी किती बदनामी होईल’ असे सांगत असतो. हळूहळू नोराच्या लक्षात येते की ज्याला आपण आपला नवरा समजत होतो व आपला संसार समजत होतो त्यात आपली भूमिका फक्त शोभेच्या बाहुलीची आहे. येथे आपल्याला काहीही किंमत नाही. तेवढय़ात त्या बदनाम माणसाचे पत्र येते की त्याची अडचण संपली आहे. पत्रात असेही नमूद केलेले असते की त्याला चांगली नोकरी लागली असून आता त्याला पशाची गरज नाही. या पत्रामुळे नोराच्या घरातील वातावरण आमूलाग्र बदलते. टोरवाल्ड खूप खूश होतो. एका झटक्यात सर्व अडचणी संपल्यामुळे त्याला फार आनंद होतो.

मात्र याच काळात नोरा सतत विचार करत असते की या घरात आपले स्थान काय? येथे आपल्याला काही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही? नसेल तर घरकाम करणारी बाई व आपण यात काय व कितीसा फरक आहे? या प्रश्नांतून तिच्यात वेगळीच जाणीव निर्माण होते व ती घर सोडण्याचा निर्णय घेते. आता टोरवाल्ड मनापासून हबकतो व तिला परोपरीने समजून सांगून या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. पण व्यर्थ. नाटकाच्या शेवटी नोरा धाडकन दार लावून बाहेर पडते. येथे नाटक संपते. हे नाटक म्हणजे ‘स्व’ची जाणीव झालेल्या स्त्रीची कहाणी आहे असे म्हणतात ते उगीच नाही.

सुरनईने सादर केलेल्या ‘ए डॉल्स हाऊस’मध्ये काही फेरफार केले आहेत. म्हणून नाटकाचा प्रयोग अवघ्या दीड तासांत संपतो. मात्र हे फेरफार करताना त्यांनी नाटकाच्या मूळ आशयाला धक्का लागू दिला नाही. या नाटकाचे दिग्दर्शन पुशन कृपलानी या तरुण रंगकर्मीने केले आहे. हे नाटक पृथ्वी थिएटर्सच्या रंगमंचावर सादर झाले होते. हा उल्लेख यासाठी महत्त्वाचा ठरतो की रंगभूमीचा अवकाश तसा मर्यादित असून दिग्दर्शकाने किती कल्पकतेने प्रयोग बसवला, याचा अंदाज यावा. पृथ्वी थिएटर्सचा अवकाश मर्यादित असला तरी प्रकाशयोजना, नेपथ्य व पाश्र्वसंगीत वगरे नाटय़घटक योग्य प्रकारे वापरता येतील अशी रचना आहे. या सर्व नाटय़घटकांचा कृपलानीने उत्तम उपयोग केला आहे.

या नाटकात फक्त दोन पात्रं आहेत. ईरा दुबे या नटीने नोराची भूमिका साकार केली आहे. ही तरुण नटी फार गुणी आहे. तिने नोरासारख्या पात्राच्या मनातील आंदोलनं व्यवस्थित व्यक्त केली आहेत. नाटकाच्या सुरुवातीला स्वत:च्या संसारात रमलेली व नंतर नंतर घाणेरडय़ा जगाचा अनुभव येत गेलेली व त्यामुळे बदलत गेलेली नोरा ईरा दुबेने मन:पूर्वक सादर केली आहे. खास उल्लेख करावा लागेल जॉय सेनगुप्ताचा. या नटाने एकूण तीन भूमिका सादर केल्या. यातील प्रमुख भूमिका म्हणजे नोराच्या पतीची टोरवाल्डची, दुसरी भूमिका नोराच्या मत्रिणीची जी अगदी थोडय़ा काळासाठी रंगमंचावर येते. तिसरी भूमिका निल्स क्रोगस्टॅडची. या तीनही भूमिका जॉय सेनगुप्ताने फार ताकदीने सादर केल्या आहेत. नोराच्या पतीच्या भूमिकेत त्याने एका मध्यमवर्गीय माणसाचा भेकडपणा सफाईने व्यक्त केला आहे. दिग्दर्शकाने या तीनही भूमिकासाठी वेशभूषा बदलायला जॉयला िवगेत न जाऊ देता रंगमंचाच्या एका कोपऱ्यात कपडे बदलायला सांगितले. यामुळे प्रेक्षक जॉयच्या बदलांना साक्षीदार ठरतात. या नाटकाच्या प्रकाशयोजनेचा खास उल्लेख करावा लागेल. पृथ्वी थिएटर्स हे नाटकांसाठी बांधलेले असल्यामुळे येथे प्रकाशयोजनांसाठी खास तरतुदी आहेत. यामुळे येथे ‘प्रकाशयोजना’ या नाटय़घटकाची ताकद जाणवते. सुरनईने सादर केलेले इब्सेनचे ‘ए डॉल्स हाऊस’ बघताना प्रेक्षक अंतर्मुख तर होतातच पण आजही स्त्रियांच्या स्थितीत किती बदल झाला याचा विचार करत बाहेर पडतात.
प्रा. अविनाश कोल्हे – response.lokprabha@expressindia.com