‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेने ‘काहीही’ या शब्दाला ग्लोबल अपील दिलं. अंतिम टप्प्यात आलेल्या या मालिकेचा नियमित प्रेक्षक या भूमिकेतून एक टाचण!

श्रीमंत मुलगा आणि गरीब मुलगी हा कोणत्याही पडद्यासाठी हिट फॉम्र्युला असतो. ‘होणार सून मी ह्या घरची’मध्येही हाच गाभा होता. फरक एवढा की श्रीमंतांना माज नव्हता, ते कपटी-कटकारस्थानी नव्हते. तब्बल सहा आया, त्यांचा ‘सामाईक’ मुलगा, समजूतदार मुलगी हे असं आटपाट नगरीला साजेसं होतं. ‘काहीही’ या तशा दुर्लक्षित शब्दाला या मालिकेने ग्लोबल अपील दिलं. दुसरीकडे जान्हवीताईंना बाळ कधी होणार? हा काश्मीरपेक्षा मोठा यक्षप्रश्न मांडला. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आहे. सिरियलचे नियमित प्रेक्षक या भूमिकेतून एक टाचणच तयार केलंय. ते तुम्हा सगळ्यांना सादर. ते वाचून ‘काहीही हं’ असं म्हणण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

’ महाराष्ट्रातल्या कोणत्याही जातीधर्माची, वंशाची, पोटजातीची मुलगी कितीही पुरोगामी विचारांची, फेमिनिस्ट चळवळवादी असली तरी भर लग्नमंडपात सासूसासरे, आईवडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, सासरकडची मंडळी यांच्यासमोर आपल्या नवऱ्याचा ‘रोन्या’ असा उल्लेख करणार नाही. कितीही प्रेमात आकंठ बुडालेली असली तरीही. ‘अहो रोहनराव’ वगैरे फार बुरसटलेल्या विचारांचं वाटेल. बरोबर पण नुसतं ‘रोहन’ म्हणता येतं. ‘रोन्या’ एकांतात, लाडाकोडात म्हटलं तर करेक्टच, पण ज्याच्याशी आयुष्यभराची सोबत जोडली जाणार आहे त्याच्या नावाचा चारचौघात असा उद्धार करतं कोणी? आता बाबांनाही ए बाबा, डॅडा असं संबोधतात. पण तरीही वडलांना शॉटफॉर्मने अजूनही हाक मारली जात नाही. मुळातच यात पुरुषप्रधान किंवा वर्चस्ववादी वगैरे काहीच नाही. ज्याचं जे नाव आहे त्या नावाने हाक मारणं, मुलगी का मुलगा डझन्ट मॅटर. एरव्ही जी मुलगी चहाला ‘चा’ म्हणते तिला रोहन अशा सोप्या शब्दाऐवजी ‘रोन्या’ असं आंग्लवळणी नाव कसं उच्चारता येतं? वडील रिक्षा चालवतात, परिस्थिती बेताचीच आहे हे जरी असलं तरी एखाद्याला आणि विशेषत: नवऱ्याला नीट नावानिशी हाक मारण्याचे संस्कार समाजातल्या कुठल्याही स्तरातल्या, प्रांतातल्या घरी होतात. फार बेसिक आहे हे. गंमत म्हणजे रोहन ऊर्फ पिंटय़ा व्यवस्थित सुनीता असं म्हणतो.

’ कोणी काय कपडे परिधान करावेत हा अगदीच वैयक्तिक प्रश्न. पण हा केसस्टडी बघा, म्हणजे वाचा. संस्कृती जपणारं घराणं अशी गोखले घराण्याची रीत. सुसंस्कृत, कुळाचार पाळणारं घर असं दाखवलंय तरी बुवा आतापर्यंत. डोहाळेजेवणाच्या समारंभात आयांचा षटकार जान्हवीताईंना हॉलीवूड स्टाइल गाऊनमध्ये सादर करतो. डोहाळेजेवण, बारसं हे पुरुषांचे इव्हेंट नव्हेत. पण तरीही या कार्यक्रमांना समस्त महिला मंडळी साडी नेसतात हे सर्वश्रुतच. ओटी भरणे, गाणी, खेळ असा साधारण माहौल असतो. एरव्ही सलवार कमीज अर्थात निमसंस्कृतीपाईक जान्हवीताई साडी लांबच, थेट शुभ्रवस्त्रांवृता गाऊनमध्ये, तोही हॉलीवूडच्या धर्तीवर. कान्स फेस्टिव्हलमध्ये कसं १९ किलोमीटरपासूनच्या रस्त्याची पायघोळ झग्याने पायधूळ झाडत अभिनेत्री येतात आणि कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट होतो, अगदी तसंच वाटलं की. फरक एवढाच हा गाऊनी थाट घरचेच छायाचित्रकार मनीषराव टिपत होते.

’ गोखलेंच्या गोकुळ बंगल्याचा प्रचंड हेवा वाटतो. काही विचारूच नका- अतोनात हेवा. तिसरीतल्या मुलालाही घराचा दरवाजा उघडण्यापूर्वी आयहोलमधून बघ, ओळखीचा कोणी असेल तर उघड, नाहीतर मोठय़ा माणसाला बोलव असं शिकवलं जातं. शहरात तर सेल्समन, भिकारी, भुरटे चोर, देणगी मागायला येणारे खंडणीबहाद्दर, बिल घ्यायला येणारे असं कोणीही अवेळी टपकतं दारावर. म्हणून लाकडी दरवाजावर साधी कडी, वरची कडी, साखळीचेन, दरवाजाच्या सोबतीला लोखंडी ग्रिल असा जामानिमा असतो. गोखले कुटुंबीयांना हा खर्चच नाही. दिंडीदरवाजा सताड उघडा असतो, अष्टौप्रहर. बरं ऐतिहासिक गृहउद्योग चालवणारं, समाजात नाव असलेलं, पैसाअडका बाळगणारं आणि सहा स्त्रिया असलेल्या घरात माणसं थेट दिवाणखान्यात येतात. बेल वाजत नाही, दारावर टकटक नाही. पूर्वी जान्हवीताईंच्या मागे लागलेले अनिल आपटे थेट स्वयंपाकघरात येऊन संवाद साधायचे. बरं गोखले मंडळी शनिशिंगणापूरलाही राहत नाहीत..महाराजांच्या काळात गडाचा दरवाजाही संध्याकाळनंतर बंद व्हायचा. केवढा मोठा गड तो. त्याचा दरवाजाही तसाच असणार. पण तो असायचा आणि बंदही असायचा योग्य वेळी. पण गोखले कुटुंबीय भलतेच प्रागैतिक!

’ वय आणि समज यांचा रेशो काही ठरावीक नसतो. काहींना लहान वयात येते, काहींचा भूतलावरला मुक्काम आटोपण्याच्या वेळेपर्यंतही येत नाही. ‘श्री’जींच्या आया साधारण चाळिशी-पन्नाशीतल्या. या वयात साधारण पोक्तपण येतं असं म्हणतात. पण आया अपवाद आहेत. घरातली आजी कर्ती आहे आणि मध्यमवयीन स्त्रिया अल्लड आणि वास्तव सांप्रत जगापासून इतक्या दूर की ‘श्री’जींना ३ मिनिटं लेट झाला तरी कासावीस होतात. त्यांचं ‘श्री’जींवर प्रचंड प्रेम आहे- अगदी मान्य. घरी सुबत्ताही आहे, पण प्रसन्न सकाळी उपमा, पोहे, गोडाचा शिरा, डोसे, नारळाची वडी, बायडिफॉल्ट ब्रेड बटर आणि चहा. असं सगळं एकदम एकाच वेळी. ‘श्री’ बकासुराचा अवतार आहे की काय? असा कॉन्टिनेंटल नाश्ता अंबानींच्याही नशिबी नसेल. बरं एरव्ही पर्यावरणाविषयी तळमळीने बोलणारे ‘श्री’ या अन्न नासाडीविषयी काही बोलू शकत नाहीत. शेवटी प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं.

’ आतापर्यंत आमच्या समजानुसार लग्नं रजिस्टर्ड व्हायची, घटस्फोट न्यायालयीन व्हायचे. पण या मालिकेने आमच्या ज्ञानात मोलाची भर घातली. खाष्ट सासूला वेसण घालण्यासाठी बाँडपेपरवर असंख्य कलमी दस्तऐवज तयार होतं. नवीनच राहायला आलेल्या चाळीतली मंडळी एकदिलाने या मौलिक दस्तऐवजावर अ‍ॅटोग्राफ नोंदवतात. आणि काळ्या पांढऱ्या कोटातला रीतसर वकील हजर असतो, सो एकदम सनदशीर, सगळं आरस्पानी. आटपाट नगरातल्या संसारासाठीचा केवढा भन्नाट फंडा हा! सासूसुनेची भांडणं, टोमण्यांवर किती कथा, पटकथा रचल्या, रॉयल्टय़ा मिळाल्या, दिग्दर्शकांनी पुरस्कारांवर नाव कोरलं, लेखक-लेखिका प्रसिद्धी शिखरावर पोहोचले. पण हे सगळं आपल्या मनातल्या अनादी काळातलं. सहस्रबुद्धे काळाच्या पुढच्या विचार करणारे.

’ जगात जे काही अमंगळ, वंगाळ, विचित्र आहे ते निस्तरण्यासाठी ‘संत श्री’ आणि ‘साध्वी जान्हवी’ यांना पाचारण करण्यात आलं आहे. तीर्थप्राशनी काकाचा संसार मार्गी लावण्यापासून, कुमारी मावशीच्या लग्नापर्यंत सगळं काही हे दोघंच करतात. मनीषदादा आणि गीताताईंची केमिस्ट्री जुळावी यासाठी त्यांनी भौतिकात केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत. जेमतेम शिक्षण, हक्काचं घर नाही, महिनाकाठी बक्कळ पगाराची नोकरी नाही अशा रोहनजींचं लग्नही त्यांनी ‘करून दाखवलं’. सगळं त्या चार खांद्यांवर.. अपार आदर या द्वयीबद्दल.

’ जिथे पैसा असतो तिथे डोक्याला शॉट लागतोच. त्यात जर माणूस बँकेचा मॅनेजर असेल तर बघायलाच नको. थकबाकी वसुली, नवीन कर्जदारांमध्ये भर, मोठे क्लायंट आणणे, खातेदार बँकेत न येता ऑनलाइनच कसे व्यवहार करतील यासाठी प्रयत्न करणे, असे एक ना शेकडो व्याप असतात मॅनेजरच्या डोक्याला. पण इथं उलटच- स्मितुडीशी फोनकॉलचा बालिशपणा, जान्हवीताईंचे कौतुक, मोठा माणूस श्रीजींची भलामण आणि गीताला उपहासात्मक टोमणे एवढंच काम मॅनेजरला देण्यात आलं. असा मॅनेजर पाहून अनेकांना बँक म्हणजे सुखी जॉब असू वाटू लागलं. कित्येकांनी तर बँकभरतीसाठी अर्ज खरडायला सुरुवातपण केली. शीर्षक गीताच्या व्हिडीओत समावेश सोडला तर मनोज जोशींसारख्या अनुभवी कलाकाराचं काही प्रयोजनच नव्हतं. ते परत येतात हा प्लॉट निर्मिण्यात आला. थोडय़ाच दिवसांत त्यांनी एग्झिट घेतली. मोठे कलाकार ताफ्यात असले तरी त्यांना लौकिकाला साजेसं काम मिळेलच याची शाश्वती नाही बुवा.

’ एका गोष्टीसाठी ‘होणार सून’ मालिकेचा चमू अभिनंदनास पात्र आहे. पिक्चर, मालिका, अ‍ॅडचं शूटिंग म्हटलं की मुंबईतल्या पश्चिम उपनगरांची चलती असायची. सेंट्रल म्हणजे अगदीच डाउन मार्केट. हार्बर तर कन्सिडरपण नाही. पण या मालिकेने श्रीस्थानक अर्थात ठाण्यात चित्रीकरणाचा पायंडा पाडला. परवा तर आमच्या ओळखीच्या काकू सांगत होत्या, रोहन आणि सुनीताचा सीन होता. मागे मी होते. पार्लरमधूनच निघालेले. मला परवा पाहा सिरियलमध्ये अशी दवंडी पिटत होत्या. मला सांगा घडलंय असं कधी.. सामान्य ठाणेकरांना स्पॉटलाइटमध्ये आणण्याचं श्रेय या चमूला जातं. ‘ठाणे चित्रीकरण पोषक विकासक’ पुरस्कारासाठी शिफारस झालेय. आहात कुठे! अहो आपलं दादोजी कोंडदेव स्टेडियम- एवढं मोठं प्रांगण पण साधी रणजी मॅचही होत नव्हती. श्री आणि जान्हवीताईंनी एका विशेष गाण्याचं इथे शूट केलं. अख्खं स्टेडियम असं बॅकड्रॉपला- मिळेल अशी पब्लिसिटी स्डेडियमला कधी? रणजी मॅच कधी होईल माहिती नाही, पण लग्नासाठी घाऊक मागणी वाढली ना राव!

’ मराठीतली पहिली ब्रँड कॉन्शस सिरियल अशी इतिहासात नोंद होईल. मोबाइल फोन कंपनीच्या नावापासून ते गाडीच्या बोनेटवरच्या आद्यांक्षरांपर्यंत सगळे ब्रँड ब्लर होतात. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, नुसता इंटरेस्ट, वेस्टेड इंटरेस्ट नकोच ना डोक्याला ताप. तणावच नाही आयुष्यात.

हे असे प्रातिनिधिक मुद्दे. ३७ मुद्दय़ांचं छोटेखानी परिशिष्ट, पण ते नंतर कधीतरी. गुद्देरूपी मुद्दे चांगले-वाईट, बरोबर-चूक ज्याचं त्यानं ठरवावं. रोज रात्री आठ ते साडेआठ आमच्या मनाचा स्क्रीन व्यापून टाकणारा हा चमू आता दिसणार नाही या भावनेने मन कातर झालं आहे. थांबतो..

ऐतिहासिक गृहउद्योग चालवणारं, समाजात नाव असलेलं, पैसाअडका बाळगणारं आणि सहा स्त्रिया असलेल्या घरात माणसं थेट दिवाणखान्यात येतात.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com