-जय पाटील
करोनाला दूर ठेवायचं असेल, तर मास्क ही प्राथमिक अट. सध्या तुम्ही-आम्ही सगळेच मास्कधारी झालो आहोत. पण त्यामुळे एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे. निम्माअधिक भाग झाकलेल्या चेहऱ्यांपुढे फेशियल रेकग्निशनचं तंत्रज्ञान निष्प्रभ ठरू लागलं आहे. अतिशय अत्याधुनिक प्राणालीतही त्यामुळे चुकांचं प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. अमेरिकेत झालेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

फेशियल रेकग्निशनच्या तंत्राचा आणि सर्वसामान्यांचा अगदी थेट संबंध येतो तो फोनच्या बाबतीत. आपलाच फोन आपल्यालाच ओळखेनासा झाला, तर चांगलीच तारांबळ उडू शकते. म्हणूनच फेस आयडीशिवाय फोन अनलॉक करण्याची प्रक्रिया आय फोनने वर्षाच्या सुरुवातीलाच सुलभ करून दिली. ही झाली तुमच्या-आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या आयुष्यातली छोटीशी समस्या. पण त्यामुळे सुरक्षा यंत्रणांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. म्हणूनच अर्धवट झाकलेल्या चेहऱ्यांच्या संदर्भात फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान कशा प्रकारे काम करतं, हे जाणून घेण्याचे प्रयत्न सध्या द नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी (एनआयएसटी) करत आहे. कायदा आणि सुरक्षेची धुरा वाहणाऱ्या विविध यंत्रणांसाठी कार्यरत असलेल्या कंपन्यांनीही मानवी डोळे आणि भुवयांवर लक्ष केंद्रीत करणारी प्रणाली तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

उत्तम दर्जाच्या फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानातही चुकांचं प्रमाण ०.३ टक्के एवढं असतं. विविध वंश, लिंग आणि वयानुरूप चेहऱ्याची ठेवण वेगवेगळी असल्यामुळे या चुका होतात. पण मास्क घातल्यानंतर अत्याधुनिक आणि अत्युत्तम तंत्रज्ञानातही चुकांचं प्रमाण ५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतं, असं एनआयएसटीच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. एरवी नीट काम करणाऱ्या प्रणालींमध्ये हेच प्रमाण मास्कमुळे तब्बल २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढतं, असंही यातून निदर्शनास आलं आहे.

गुन्हे करताना किंवा मोर्चे आंदोलनांत सहभागी होताना अनेकदा कायदेशीर कारवाईत पळवाट शोधण्याची सोय म्हणून मास्कचा वापर केला जातो. त्यामुळे अमेरिकेत सार्वजनिक कार्यक्रम किंवा सभा-मोर्चा इत्यादींमध्ये चेहरा झाकण्यावर गतवर्षी बंदी घालण्यात आली. पोलिसांनी मास्क काढण्यास सांगितल्यानंतर त्यांना विरोध केल्यास ६ महिने शिक्षेची तरतूदही करण्यात आली. लंडनमध्ये काही कलाकारांनी या तंत्रज्ञानाला चकवा देण्यासाठी आंदोलनादरम्यान चेहऱ्यावर विविध भौमितिक आकार रंगवले होते. पण आता करोनाच्या कहरामुळे मास्क काढा, असं म्हणण्याची सोय राहिलेली नाही. त्यामुळे तंत्रज्ञानापुढील हे आव्हान परतवून लावण्याचा खटाटोप सध्या सुरू आहे.