lp45आपलं लहानपण कुठे आणि कसं जातं त्यावर आपल्या आवडीनिवडी ठरतात. शाळकरी मुलांना लहानपणी चांगली संधी मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मुलांचं लहानपण सांस्कृतिकदृष्टय़ा उत्साही ठिकाणी गेलं, तर तिथे साजऱ्या होणाऱ्या उत्सवांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत त्यांना सहभागी होता येतं. नृत्य, नाटक, वेशभूषा, गायन अशा स्पर्धामुळे तिथे राहणाऱ्या सर्वानाच एकतर या सर्व गोष्टींची आवड निर्माण होते आणि स्टेजवर वावरताना वाटणारी भीती चेपली जाते.
२०-२५ वर्षांपूर्वी फ्लॅट संस्कृती उदयाला येत होती. चाळीत राहणाऱ्यांची संख्या जास्त होती त्यामुळे त्या काळी एकमेकांकडे जायला कसलाच संकोच वाटत नसे. शेजाऱ्यांशी वागण्यात मोकळेपणा होता. नाटकात काम करायचं म्हटलं की वेशभूषा योग्य हवी आणि त्यासाठी शेजाऱ्यांकडून कपडय़ांची, साहित्याची जमवाजमव करावी लागली तरी संकोच वाटत नसे. त्या वेळी नाटकात काम करण्याकरता लागणारे कपडे भाडय़ाने मिळत असले तरी छोटय़ा कार्यक्रमांकरता भाडय़ाने कपडे घेण्याचा पर्याय फारसा वापरला जात नव्हता. माइक सांस्कृतिक उत्सवातील नाटकांकरता वापरत नसत. माइकचे प्रकार माहीत नसले तरी त्यावर बोलण्याची उत्सुकता मात्र चिमुकल्या कलाकारांना खूप होती. नाटक सुरू होण्याआधी माइक स्टँडवर लावला की तो नीट चालतोय का हे तपासण्यासाठी त्यावर काहीही वाक्य बोलून बघण्यात मुलांना फार मजा वाटे. काहीतरी बोलायचं आणि समोर बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे, यात आपण खूप काही छान करतोय अशी भावना त्यांच्या मनात येत असे. नृत्याबद्दलपण असंच होतं. छोटे कलाकार त्यांच्या आवडीच्या गाण्यावर नृत्य बसवत असत. कोरिओग्राफर ही संकल्पनादेखील त्या वेळी नवीनच होती.
या सर्व सांकृतिक कार्यक्रमांचा आस्वाद मुलांना गणपती उत्सवातच घेता यायचा. शाळा सुरू झाल्यावर करमणुकीचं साधन म्हणजे टीव्ही. टीव्हीवर लागणाऱ्या मालिकांबद्दल मुलांना आकर्षण होतं. त्यात दाखवलेले शानदार सेट, रंगीबेरंगी कपडे, दागिने, हेअर स्टाइल, मेकअप या सर्व गोष्टींची बालमनावर भुरळ पडत असे. मालिकांच्या ब्रेकमध्ये लागणाऱ्या जाहिराती, त्याबद्दलचे अनेक विचार छोटय़ा दोस्तांच्या मनात घोळत असत. जाहिरातीतले जिंगल्स, स्लोगन्स ऐकताना हे कसं सुचत असेल, कोण लिहीत असेल असे बरेच प्रश्न त्यांना पडायचे. काही वेळा जाहिरात केलेली वस्तू लक्षात राहायची तर काही जाहिरातींची जिंगल्स. हे असं काही जाहिरातींच्या बाबतीत का होतं असंही त्यांना वाटे. जाहिरातींसारखंच चिमुरडय़ांना कार्टुन्सचं अप्रूप होतं. कार्टुन्सची पात्रं खरी असतात का? त्यांचे आवाज इतर मालिकांच्या पात्रांपेक्षा वेगळे का वाटतात? प्रसारमाध्यमांच्या बाबतीत अशा नानाविध प्रश्नांची जाळी बालमनात विणली जात होती.
लहान मुलांना अजून एका क्षेत्राबद्दलची उत्सुकता वाटते ते म्हणजे टीव्हीवरच्या बातम्या. वृत्तनिवेदक बातम्या सांगताना त्या वाचताना दिसत नाहीत म्हणजे ते रोज बातम्या पाठ करतात का? एवढं पाठ कसं होतं; असे भाबडे प्रश्न त्यांना पडत. प्रसारमाध्यमांच्या सगळ्या क्षेत्रांबद्दल लहानांप्रमाणे मोठय़ांनाही कुतूहल आणि आकर्षण असायचं. रिअ‍ॅलिटी शोमध्ये दाखवले जाणारे चित्तथरारक खेळ हे कलाकार कसे काय खेळतात? एखादा खेळ खेळताना त्यांना भीती वाटते तर ते सहभागी होतातच का? या खेळाकरता ते काही वेगळं प्रशिक्षण घेतात का? डान्स रिअ‍ॅलिटी शोबद्दलही असे प्रश्न पडतात. दर आठवडय़ाला नवनवीन डान्स कधी शिकतात आणि त्याचा सराव कधी करतात. बरं, त्यातले सगळेच स्पर्धक डान्स शिकलेले नसतात. तरी दर आठवडय़ाला एक नवीन डान्स प्रकार सादर करतात. रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धक, मालिकांमधील कलाकार त्यांचं काम आणि स्वत:चं घर यांच्यातला समतोल कसा साधतात? जाहिरात क्षेत्र आणि त्याच्या आसपास असलेलं डबिंगचं क्षेत्र, इथे काम कसं चालतं? खरं तर हे प्रश्न आपल्याही मनात डोकावले असतीलच.
२०-२५ वर्षांपूर्वी रेडिओ कमी ऐकला जात होता. मात्र त्यापूर्वीच्या पिढीला रेडिओने चांगलीच भुरळ घातली होती. या पिढीने बदलते रेडिओ सेटदेखील बघितले होते. रेडिओवर लागणारी गाणी, नभोनाटय़ आणि इतर कार्यक्रमांचा या पिढीने आनंद लुटला आहे. रेडिओवर लागणाऱ्या भुपाळीने सगळ्यांची सकाळ मस्त होत असे. त्या काळची पिढी रोज नित्यनियमाने रेडिओ ऐकत असे. रेडिओ या माध्यमाची सगळ्यांना सवय झाली होती. फक्त रेडिओच नाही तर मीडियाचं कुठलंही क्षेत्र असो, वृत्तपत्र, टीव्ही, चित्रपट या सगळ्याच माध्यमांची कालांतराने आपल्याला सवय होते. बघण्याची, वाचण्याची सवय झाली की या सगळ्या माध्यमांच्या पडद्यामागे दडलंय काय याबद्दलची उत्सुकता वाढते. माध्यमांच्या विविध क्षेत्रांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वानाच वाटते. प्रसारमाध्यमांभोवती असलेल्या वलयाचं आकर्षण आपणही अनुभवतो. माध्यमांच्या या महासागरात नक्की काय दडलंय? जाहिरात क्षेत्र, रेडिओ, मालिका, न्यूज चॅनल्स अशा अनेक माध्यमांतून आपला जगाशी संपर्क होत असतो. माध्यमांच्या या विविध क्षेत्रांबद्दल आपण या सदरातून आढावा घेणार आहोत.