गणेशोत्सवाचे अकरा दिवस मोठय़ा उत्साहात, दणक्यात आणि जल्लोशात संपले. सार्वजनिक गणेश मंडळांनी तर प्रति वर्षांप्रमाणे मंडपाची आरास, सजावट, विद्युत प्रकाश आणि एखादा विषय घेऊन अतिशय परिश्रम घेऊन गणेशाची सेवा केली होती. अकरा दिवसांत ढोल (डॉल्बी) ताशांच्या गजरात सारा परिसर दुमदुमत होता. खणखणीत आवाजात आरत्या म्हटल्या, हजारो भाविकांनी निरनिराळय़ा स्थळी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले.

शेवटच्या म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तगण गणेशाचा जयघोष करीत, वाजतगाजत, नाचत गणेशजींना निरोप देत होते, त्यांच्या घरी पर्यायाने सागरात नेत होते. तो विरह कित्येक भाविकांना जाणवत होता, सहन होत नव्हता, अनेकांना गहिवरून येत होते. ‘पुढच्या वर्षी लौकर या’ या जयघोषाने गणेशाला गाऱ्हाणे घालीत निघाले होते. गणेशजी आपल्या भक्तगणांना हास्यवदनाने आणि उजव्या हाताने जणू आशीर्वाद देत निघाले आहेत असे वाटत होते.

गेले अकरा दिवस गणेशोत्सवाचे, प्रसन्न वातावरणातले दिवस संपले होते. गणेशजी येण्यापूर्वी त्यांच्या स्वागतासाठी जो उत्साह होता तो आता ते आपल्या घरी निघाले हे पाहून मावळला होता.

सार्वजनिक मंडळाचे भव्य गणपती विसर्जनानंतर सागरात एकत्र जमले आणि प्रतिवर्षांप्रमाणे त्यांची सागरात सभा भरली होती. डोळय़ाचे पारणे फिटेल अशा सजावटीत विराजमान होणाऱ्या लालबाग राजाला सभेच्या अध्यक्ष पदावर सर्वानी एकमताने निवडून दिले होते.

अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, ‘‘मित्रहो! प्रतिवर्षांप्रमाणे किंबहुना त्याहूनही अधिक देदीप्यमान, नेत्रसुख देणारी सजावट आणि एकंदरीत माझ्या मंडपाचे ऐश्वर्य पाहून मी कधीही भारावून गेलेलो नाही किंवा मोठेपणाही दाखविला नाही, ऐट दाखविली नाही. मी तुमच्यातलाच एक तुमचा स्नेही आहे. आज आपण ज्या सभेचे प्रयोजन केले आहे त्याचा विषय आहे, म्हणजे ज्या कोणाला त्याच्या या वर्षांच्या मंडपातील सान्निध्यात आढळलेल्या गोष्टी आहेत, गमतीजमती आहेत, त्या सांगावयाच्या आहेत. अट एवढीच आहे की, जास्त लांबड न लावता अगदी थोडक्यात सांगण्यात यावी!

एकेक गणपती उभे राहून त्यांच्या मंडपात आढळलेल्या गोष्टी सांगत होते.

’      पहिला गणपती : लालबागचे राजेसाहेब! आत्ताच आपण म्हणालात, आपण सारे एकच आहोत, त्यामुळे मी नमस्कार वगैरे प्रास्ताविक न लावता मुख्य हकीगत सांगतो. माझ्या मंडपाची सजावट आपल्या मंडपाच्या तोडीची नसली तरी खरोखरच सुंदर होती. माझ्या भाविकांनी अतिशय परिश्रम घेऊन माझ्या स्वागताची जय्यत तयारी ठेवली होती.

’      दुसरा गणपती : प्रथमच मी मनापासून सांगतो की, मला माझ्या भक्तगणांचे, माझ्या स्वागतासाठी रात्रंदिवस परिश्रम केलेल्या कार्यकर्त्यांचे मन दुखविण्याची इच्छा नाही; परंतु माझ्या मंडपात एवढी प्रखर विद्युत रोषणाई केली होती, की माझ्या डोळय़ांना त्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे मला सुखकारक निद्रेचे सुख घेता आले नाही; पण माझ्या भाविकांच्या श्रद्धेवरची जाणीव ठेवून मी ते सहन करीत होतो.

’      तिसरा गणपती : अहाहा! काय सांगू राजेसाहेब, अजूनही मुखात नैवेद्याची चव रेंगाळत आहे. नित्य माझ्यासमोर सुग्रास नैवेद्याचे ताट येत होते. त्या नैवेद्याचा स्वादिष्टपणा अकरा दिवस कायम ठेवण्यात आला होता. केशरयुक्त, बदाम, काजू असलेल्या नैवेद्याचा घमघमाट, त्याचा परिमळ साऱ्या मंडपात दरवळत राहायचा. सांगायला जरा संकोच वाटतो, पण असे वाटायचे की, अनंत चतुर्दशीनंतरही काही दिवस येथेच विराजमान व्हावे.

’      चौथा गणपती : आपले सर्वाचे आवडते पक्वान्न म्हणजे मोदक. कित्ती प्रकारचे मोदक माझ्या पुढय़ात ठेवले जायचे. काजू मोदक, पिस्ता मोदक, वेलची मोदक- किती प्रकार सांगू? अर्थात दरवर्षी मी भाविकांचा मान ठेवून भक्षण करीत असे; पण या वर्षी मला मात्र त्रास जाणवला. माझ्या पोटाचा घेर मात्र थोडा वाढलाय; पण तो पूर्ववत होईल याची मला खात्री आहे.

’      पाचवा गणपती : माझ्या मंडपातील या वर्षांची गंमत जरा वेगळीच आढळली. अधिकाधिक परिश्रम घेऊन त्यांनी एक सुंदर जनोपयोगी विषय घेऊन सजावट केली होती; पण त्या अकरा दिवसांत त्यांनी मला सहा चित्रपट दाखवले. ते पाहाताना माझे डोळे पेंगायचे, डोळे अलगद मिटले जायचे; पण नशीब, कुणाचेही माझ्याकडे लक्ष नव्हते. म्हणून मनात म्हणालो, ‘‘बरं झालं, झाकली मूठ सवा लाखाची.’’

’      सहावा गणपती : माझ्या मंडपात माझे अकरा दिवस अगदी मजेत गेले. मला काही गैर असे आढळले नाही; पण शेवटच्या दिवशी मी सर्वाचा निरोप घेत घेत रस्त्यावर आलो. पाहातो तर मला पाहण्यासाठी रस्त्यात भाविकांची रीघ लागली होती. त्या अवाढव्य ढोलाच्या आणि कान फुटणाऱ्या ताशाच्या आवाजात मिरवणूक निघाली होती. खरं सांगतो, त्या आवाजाने माझे कान सुन्न झाले होते. माझ्या मिरवणुकीत भाविक सैरावैरा रोंबासोंबा नाच करीत, गुलाल उधळीत मनसोक्त मौज करीत होते. ‘हळू हळू चाला मुखाने गजानन बोला’- माझा जयघोष करीत होते, पण मध्येच थांबत होते, कानावर मोबाइल धरत होते.

’      सातवा गणपती : माझ्या मंडपाच्या सजावटीबद्दल काही प्रश्नच नव्हता इतकी निसर्गयुक्त झाडे, वेलींनी सजविली होती; पण मला मंडपात नेताना आणि विसर्जनासाठी बाहेर काढताना मात्र मला सारखी भीती वाटत होती. माझा तोल जाऊन मी भक्तांच्या अंगावर पडेन की काय, अशी भीती वाटण्याचे कारण म्हणजे माझी उंचीच तशी ठेवली होती; पण तसे काही घडले नाही. मी सुखरूप सागरतळाशी पोहोचलो. हीच माझ्यावरची त्यांची श्रद्धा.

’      आठवा गणपती : नेहमीप्रमाणे माझे यथासांग स्वागत करण्यात आले. माझ्यासाठी आणि इतरांसाठी जे अकरा दिवस कार्यक्रम होते तेही सर्व उल्लेखनीय झाले; पण या वर्षी उत्सवाला किंचित गालबोट लागले. शेवटच्या दिवशी मंडपाच्या मागे जोरजोराने चार-पाच कार्यकर्त्यांची कुजबुज चालू होती. छोटेसे भांडणही ऐकू आले. ते म्हणजे जमलेली वर्गणी आणि खर्च याचा ताळमेळ जमत नव्हता.

’      नववा गणपती : या वर्षी मला सागरात लवकर पोहोचावे असे वाटत होते. म्हणजे तसा मला मंडपात कंटाळा आलेला नव्हता,   पण का कुणास ठाऊक लवकर घरी पोहोचावे असे वाटत होते, पण निराशा झाली. माझी मिरवणूक सायंकाळी सहा वाजता निघाली ती नाचत, जयघोष करीत. दुसऱ्या पहाटे चार वाजता समुद्रावर पोहोचली, पण कुणाला दोष देणार? तमाम भाविकांची श्रद्धा आणि माझ्यावरचे प्रेम.

अध्यक्ष : थांबा! नऊ गणपतींनी आपल्या मंडपातल्या हकिगती सांगितल्या त्यावरून मला त्यांच्या अनुभवाची कल्पना आली. इतरांच्या हकीगती आपण नंतर ऐकू; पण यावरून आपणास समजले की, प्रत्येक वर्षी आपल्याला निरनिराळी सजावट पाहायला मिळते, निरनिराळे अनुभव येतात, पण भाविकांकडून काही चूक झाली तरी त्याचा आपण रोष करीत नाही. उलट त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवतो, त्यांना आशीर्वाद देतो. ते आपल्या स्वागतासाठी अतोनात मन:पूर्वक परिश्रम घेतात. म्हणूनच आपण त्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून पुढल्या वर्षी त्यांच्या घरी लौकर जातो. हो की नाही? आता आपणही म्हणू या.

‘‘गणपती बाप्पा मोरया। पुढल्या वर्षी लौकर या.’’
जयवंत कोरगांवकर – response.lokprabha@expressindia.com