14 December 2017

News Flash

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही

आमच्या काळात खेळामध्ये पैसा नव्हता. करिअर करण्याचे फारसे स्वातंत्र्य नव्हते.

मिल्खा सिंग | Updated: August 11, 2017 9:21 PM

मिल्खा सिंग

आपल्या अगोदरच्या पिढीने नि:स्वार्थी वृत्ती ठेवीत जीवनाची आणि संसाराची राखरांगोळी केली. त्यामुळेच देशास स्वातंत्र्य मिळाले. माझ्या सुदैवाने मी देशासाठी असीम बलिदान करणाऱ्यांना जवळून पाहिले आहे. आजच्या युवा पिढीने त्यांच्या या त्यागाचे ऋण फेडण्याची गरज आहे.

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मदनलाल धिंग्रा, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेकांनी देशाला इंग्रजांच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी आपले सारे आयुष्य वेचले. स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी झाली. या फाळणीमुळे पाकिस्तानमधून भारतभूमीत परत येणाऱ्यांना किती नरकयातना भोगाव्या लागल्या आहेत, याचा मी जिवंत साक्षीदार आहे. माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईवडिलांसह सर्व जण मारले गेले. रक्ताच्या चिळकांडय़ा उडविणारा तो प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. तो प्रसंग मला अजूनही रडायला लावतो. भारतात जाऊन तू मोठा हो व देशाचा नावलौकिक उंचाविण्यासाठी प्रयत्न कर, हे माझ्या वडिलांचे अखेरचे शब्द मला सतत प्रेरणा देत असतात. त्यामुळेच मी अ‍ॅथलेटिक्समध्ये करिअर करण्याचे ठरविले.

आमच्या काळात खेळामध्ये पैसा नव्हता. करिअर करण्याचे फारसे स्वातंत्र्य नव्हते. आपण व आपल्या कुटुंबीयांची गुजराण करण्यासाठी नियमित उत्पन्न मिळावे एवढीच अपेक्षा ठेवीत आमच्या काळातील बहुतांश लोक नोकरीचाच पर्याय निवडत असत. केवळ देशाचे नाव व्हावे यासाठी लाला अमरनाथ, मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्यासारख्या महान खेळाडूंनी सतत संघर्ष करीत खेळात यश मिळविले. आपल्याला काय मिळेल यापेक्षाही देशास काय मिळेल, हीच भावना ठेवीत त्यांनी क्रीडा क्षेत्रात करिअर केले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, आधुनिक सुविधा व सवलती, पोषक आहार आदी गोष्टींचा अभाव असूनही त्यांनी खेळात देशाची प्रगती केली.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळावे यासाठी मी खूप प्रयत्न केले. त्याकरिता खूप संघर्ष केला. दुर्दैवाने माझे हे स्वप्न साकार झाले नाही. मात्र आशियाई, राष्ट्रकुल आदी विविध प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये देशास भरपूर पदकांची कमाई करून दिली. खेळातून निवृत्त झाल्यानंतरही अ‍ॅथलेटिक्सच्या प्रगतीचा ध्यास ठेवीतच जीवनाची दुसरी इनिंग केली. अनेक खेळाडूंच्या विकासाकरिता प्रयत्न केले. माझ्या मुलास करिअर करण्याचे स्वातंत्र्य दिले. अ‍ॅथलेटिक्समध्ये त्याने करिअर करावे असे बंधन मी लादले नाही. गोल्फ खेळात त्याने उत्तुंग करिअर केले आहे. तेथेही संघर्ष करावा लागतो.

आता खेळामध्ये भरपूर पैसा आला आहे. क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन आदी खेळांमध्ये भरपूर पैसा, सुविधा, सवलतींचा वर्षांव होत आहे. करिअर निवडण्याचे भरपूर स्वातंत्र्य आहे. असे असूनही झटपट यश मिळावे यासाठी नवोदित व युवा खेळाडू उत्तेजक, निकालनिश्चिती आदी कटू प्रसंगांचा स्वीकार करतात हे क्रीडा क्षेत्राचे दुर्दैव आहे. मैदानावर व मैदानाबाहेर बेशिस्त वर्तनाचे अनेक प्रसंग पाहावयास मिळतात. हे पाहिल्यावर मन खूप दु:खी होते. आपल्याला मत व भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे याचा अर्थ आपण कसेही वागले तरी चालते अशी कोणाची भावना असेल तर ते चुकीचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही.

आमच्या वेळी प्रशिक्षक म्हणजे आपले वडीलच आहेत अशी भावना ठेवीत आम्ही दबकूनच त्यांच्याशी वागत असतो. त्यांच्यापुढे एक ब्र काढण्याची आमच्यात हिंमत नव्हती. आता प्रशिक्षकाला फारसे कुणी जुमानत नाही. अ‍ॅथलेटिक्स हा माझा श्वास आहे. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला आपल्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करावे हीच माझी इच्छा आहे. मला जे शक्य झाले नाही ते ध्येय युवा धावपटूंनी साध्य करावे.

मिल्खा सिंग

शब्दांकन : मिलिंद ढमढेरे 

First Published on August 11, 2017 9:21 pm

Web Title: milkha singh special article on independence day 2017