20 November 2019

News Flash

स्क्रीन टाइम नव्हे, ‘कोकेन’

कुठल्याही घरात गेलो की अगदी सहा महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंतची मुले मोबाइल स्क्रीनशी एकरूप झालेली दिसतात.

दिवसभरात लहान मुले स्क्रीनसमोर जेवढा वेळ असतात, त्याला स्क्रीन टाइम असे म्हणतात.

आरोग्य विशेष
डॉ. अमोल अन्नदाते – response.lokprabha@expressindia.com

कुठल्याही घरात गेलो की अगदी सहा महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंतची मुले मोबाइल स्क्रीनशी एकरूप झालेली दिसतात. हॉटेलमध्येही आई-बाबा शांतपणे जेवत असतात आणि मुले फोनवर कार्टून बघत असतात. वाढत्या ‘स्क्रीन टाइम’मुळे मुले अगदी लहान वयात व्यसनाधीन होऊ लागली आहेत.

दिवसभरात लहान मुले स्क्रीनसमोर जेवढा वेळ असतात, त्याला स्क्रीन टाइम असे म्हणतात. आज हा प्रत्येक घरातील कळीचा मुद्दा झाला आहे. अशा गोष्टींचे दुष्परिणाम मुंगीच्या पावलाने, अगदी नकळत होत असले तरी उत्क्रांतीत माणसाचे शेपूट गायब झाल्यासारखे मानसिकतेत, मेंदूच्या रचनेत आणि कार्यात हमखास बदल दिसून येतील. यातील बरेच अप्रत्यक्ष दुष्परिणाम आता आम्हा बालरोगतज्ज्ञांना दिसू लागले आहेत.

औरंगाबाद येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अभय जैन यांनी आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांचा स्क्रीन टाइम या विषयावर शास्त्रीय अभ्यास केला. त्यात प्रामुख्याने काही गोष्टी आढळून आल्या. वयाच्या सहाव्या महिन्यापासूनच मुलांना स्क्रीनची सवय लागण्यास सुरुवात होते. सहा महिन्यांनंतर बाळाला वरचे अन्न सुरू केले जाते. आईच्या दुधाकडून वरच्या अन्नाकडे वळताना प्रत्येक बाळ थोडेफार त्रास देतेच. पण त्यावर तोडगा म्हणून व बाळ नीट खात नाही म्हणून सगळ्यात आधी आई मोबाइलचा वापर करते. इथेच आई आणि बाळ स्क्रीनच्या जाळ्यात अडकतात. या अभ्यासात असेही दिसून आले की सुशिक्षित पालकांच्या मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. अर्थात स्मार्ट फोनबाबत आता शहरी-ग्रामीण असा काही भेदभाव राहिलेला नाही. ग्रामीण भागातही मोबाइलला चिकटलेली मुले दिसतातच. पण ज्यांचे पालक अशिक्षित आहेत, आई गृहिणी आहे, अशा मुलांमध्ये हे प्रमाणापेक्षा जरा कमी आहे.

‘स्क्रीन टाइमच्या समस्येत टीव्हीपेक्षा मोबाइलचा वाटा जास्त असल्याचेही या अभ्यासात दिसून आले. आमचा मुलगा रात्री लवकर झोपत नाही. एक-दोन वाजले तरी तो खेळतच असतो. आमची मुलगी खूप जास्त चिडचिड करते, खूप हट्टी आहे. कोणत्याच गोष्टीत एकाग्रता साधता येत नाही,’ अशा समस्या घेऊन जेव्हा पालक बालरोगतज्ज्ञांकडे येतात तेव्हा कुठलेही मोठे आजाराचे निदान करण्याआधी आम्ही त्यांना साधा प्रश्न विचारतो. ‘तो किती वेळ टीव्ही किंवा मोबाइलसमोर असतो?’ या प्रश्नाच्या उत्तरातूनच सगळ्या समस्यांचे निदान होते. ‘झोपेचे कर्ज’ ही संकल्पना अजून आपल्या नीट पचनीच पडलेली नाही.

मोठय़ांमध्ये हे कामाच्या व्यापांमुळे होते, तर लहान मुले स्क्रीन टाइममुळे झोपेचे कर्ज घेऊनच कुमारवयात प्रवेश करतात. परिणामी अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. याचाच संबंध पुढे कुमारवयीन मुला-मुलींमधील नराश्याच्या वाढत्या प्रमाणाशी आहे.

स्क्रीन टाइमचा थेट संबंध हा लहान वयापासून वाढणाऱ्या लठ्ठपणाशी व लहान वयातील खाण्यापिण्याच्या सवयींशी आहे. बाळाच्यामागे फिरत, गप्पा मारत, गाणे म्हणत भरवण्याची जुनी पद्धत होती. त्याही आधीची पद्धत म्हणजे खाल्ले नाही तर आईचे धपाटे खात जेवण्याची! ती तर कधीच इतिहासजमा झाली. आता कामात व्यग्र असलेली आई किंवा स्वतलाही मोबाइल पाहण्याची इच्छा असलेली आई बाळासमोर मोबाइल धरते आणि बाळदेखील ते पाहता पाहता पटापट खाणे संपवते. ते खाणे नसतेच. बाळ फक्त ते गिळत असते. खाण्याची चव, जेवणाचा रंग, भाजीचा सुवास यापैकी कोणतीच उत्तेजना त्यामागे नसते. मोबाइलवरील रंग, कार्टूनमधील पत्र हेच बघत ते खात असते. त्याच्या सगळ्या संवेदना मोबाइल स्क्रीनवर केंद्रित झाल्यामुळे पोट भरलेल्याचे त्याला कळत नाही. पोट भरले तरी मूल खातच राहते.

स्क्रीनसमोरच जास्त वेळ जात असल्याने मैदानी खेळ, अंगमेहनत होत नाही आणि मुले लठ्ठ होत जातात. वयापेक्षा मोठी आणि लठ्ठ दिसणारी अनेक मुले मॉलमध्ये फास्ट फूडसाठीच्या रांगेत दिसतील. पुढे नसíगक अन्नाची चवच विकसित न झालेली ही स्क्रीनसमोरची मुले फास्ट फूडवरमध्येच उदरभरणाचा आनंद शोधत राहतात.

आमचे एक वर्षांचे मूल स्वत स्क्रीन लॉक उघडते, स्क्रीन स्वाइप करून स्वत यूटय़ूब लावते हे पालक अनेकदा कौतुकाने इतरांना आणि डॉक्टरांनाही सांगतात. खरेतर ही कौतुकाची नाही तर सवय लागत चालल्याची चाहूल आहे. तसेच मोबाइलवर आम्ही त्याला ए बी सी डी किंवा बालगीते शिकवतो, असे भाबडे समर्थनही अनेक पालक करतात. सतत व रोज मोबाइल स्क्रीन बघून हळूहळू त्याचे रूपांतर व्यसनात म्हणजे सुटायला अवघड असलेल्या सवयीत होते. जितकी लवकर ही सवय लागेल, तितकी ती सोडणे अवघड होते.

दारू, सिगरेट किंवा कोकेन घेतल्यावर मेंदूत जे रासायनिक बदल होतात तेच हळूहळू मोबाइल फोन दिल्यावर लहान मुलांच्या मेंदूत होतात. म्हणून आपण मोबाइल स्क्रीन हाती देतोय म्हणजे लहान मुलाच्या हातात मद्याची बाटली देतोय, स्क्रीन टाइम म्हणजे कोकेनच आहे हे लक्षात घ्यायला हवे!

मार्गदर्शक तत्त्वे

जागतिक आरोग्य संघटनेने ‘स्क्रीन टाइम’चे धोके ओळखून यंदा प्रथमच त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्याप्रमाणे दोन वर्षांपर्यंतच्या लहान मुलांमध्ये ‘स्क्रीन टाइम’ शून्य असावा. दोन ते पाच वर्षांपर्यंत तो एक तासापेक्षा जास्त नसावा. दोन वर्षांनंतरचा पूर्ण ‘स्क्रीन टाइम’ हा पालकांसोबत किंवा घरातील मोठय़ा व्यक्तींसमोर असावा, जेणेकरून मुले काय बघत आहेत याची मोठय़ांना माहिती मिळेल.

First Published on June 21, 2019 1:04 am

Web Title: mobile screen and children
Just Now!
X