20 March 2019

News Flash

आधुनिक बलुतेदार

माणूस स्वत:पेक्षा दुसऱ्यावर अवलंबून राहूनच जगू शकतो.

आधुनिक काळातील पहिला अत्यावश्यक बलुतेदार आहे मोबाइलवाला!

निरेन आपटे
एकेकाळच्या समाजरचनेत वेगवेगळ्या कामांसाठी गाव बारा बलुतेदारांवर अवलंबून असायचं. आता तसं गाव राहिलं नाही आणि तसे बलुतेदारही उरले नाही. पण आपण ज्यांच्यावर अवलंबून असतो असे नवे बलुतेदार मात्र आहेत.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनेक वक्ते, संन्यासी किंवा पंडित ‘स्वयंपूर्ण’ व्हा असं कितीही सांगत असले तरीही माणूस स्वत:पेक्षा दुसऱ्यावर अवलंबून राहूनच जगू शकतो. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याशिवाय त्याला स्वयंपूर्ण होताच येत नाही. आधी माणसाला वैयक्तिक जीवनात स्वयंपूर्ण होण्याचा संदेश देण्यात आला, मग गावे स्वयंपूर्ण करून पाहिली. पाठोपाठ शहरेही स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याशिवाय जगता येत नाही हेच वास्तव हाती उरलं. भारताचा प्राचीन इतिहासही त्याची साक्ष देतो. पूर्वी गावागावांत बलुतेदार असत. एकमेकांच्या गरजा पूर्ण करून ते जगत असत. आता काळ ‘फोर जी’चा आला तरीही बलुतेदारी संपलेली नाही. फक्त काळाच्या ओघात त्यांचं स्वरूप बदललं. आजही बलुतेदार अस्तित्वात असून आपल्याला त्यांच्याशिवाय आपलं जीवन जगता येत नाही.

आधुनिक काळातील पहिला अत्यावश्यक बलुतेदार आहे मोबाइलवाला! मोबाइलचा वापर यत्र-तत्र-सर्वत्र झाला आहे. उद्या बोहल्यावर चढलेल्या वधू-वरासकट भटजींच्या हाती मोबाइल दिसला तर नवल वाटायला नको. किंवा आग लागलेल्या इमारतीत अग्निशामक दलाचा जवान एखाद्या स्त्रीला बाहेर काढतोय आणि ती मोबाइलवर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ पाहत बाहेर आली आहे असं दृश्य दिसल्यास नवल वाटायला नको. माणूस शेजारी बसलेल्या माणसाला एकवेळ विचारणार नाही, पण मोबाइलवर ऑनलाइन आलेल्याला विचारल्याशिवाय राहणार नाही. मोबाइलचा इतका वापर असल्यामुळे मोबाइलवाला हा आधुनिक बलुतेदार जीवनात हवाच. एकतर हल्लीच्या युगात फक्त मोबाइल असणे पुरेसे नसते. तो मोबाइल सतत अपडेट झाल्याशिवाय तुम्ही आधुनिक होत नाही. अपडेट होण्यासाठी प्रसंगी मोबाइल बदलावा लागतो. अशा वेळी मोबाइल दुकानदार कामाला येतो. हातभर मोबाइलमध्ये तो काय करामती करून दाखवत नाही? मराठी कीपॅड लागत नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडे जाता आणि तो क्षणभरात काहीतरी किमया करून मराठी कीपॅड लावतो. त्या आनंदात तुम्ही घरी येता आणि घरी आल्यावर मराठी कीपॅड दिसेनासे होते. पुन्हा त्याच्या दुकानात जावे लागते. त्याचा हात लागला की मोबाइल पाहिजे तसा सुरू होतो! या मोबाइलवाल्याला बहुधा देवाने वरदान दिलेलं असतं. मोबाइल सतत अपडेट होत असतात, पण या पठ्ठय़ाला लगेच सगळं समजतं. नारळ विकणारे नारळ नासका निघाला तर त्याची जबाबदारी घेत नाही. मोबाइलवालाही वॉरंटी, गॅरंटी असे बरेच शब्दप्रयोग करून मोबाइल देतो, पण खराब निघाला की त्याची जबाबदारी नसते. मग तुम्ही मोबाइलच्या कंपनीकडे फेऱ्या मारायच्या. मोबाइल विकणारा कंबरेला लावायचे पट्टेही का विकतो हा प्रश्न डेंटिस्ट गळ्यात टेथेस्कोप का घालतो तसा न सुटणारा आहे.

संपूर्ण लेख वाचण्यासाठी ‘लोकप्रभा’ दिवाळी अंक आपल्या नजीकच्या स्टॉलवर उपलब्ध.

First Published on November 2, 2018 1:06 am

Web Title: modern traders