21 October 2020

News Flash

पारंपरिक ज्ञानाला परिस्थितीचे आव्हान

आपले पूर्वज आदिकाळापासून कृषी क्षेत्रात प्रवीण होते.

देशाच्या इतर भागांतला मान्सूनचा पाऊस आणि अंदमानात आठ महिने पडणारा पाऊस यात खूप फरक आहे. त्यामुळे देशाच्या इतर भागातून अंदमानात जाऊन स्थायिक झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या पारंपरिक ज्ञानाचा अंदमानात उपयोग होत नाही.

‘प्रोजेक्ट मेघदूत’चा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्थानिक शेतकरी, मच्छीमार, व्यावसायिक यांच्यासह समाजातील सर्व घटकांना भेटणे, त्यांचाशी चर्चा करणे आणि त्यांचे मान्सूनविषयक अनुभव, ज्ञान व इतर माहिती गोळा करणे असे आहे. त्यातही प्रामुख्याने शेतकरी आणि मच्छीमार. कारण त्यांचा मोसमी पावसाशी थेट संबंध असतो आणि त्यांच्याकडे पिढय़ान्पिढय़ा पावसाविषयीच्या पारंपरिक ज्ञानाचा साठा असतो. त्याचसाठी अंदमानमध्ये शेतीबहुल भागात तसेच समुद्रकिनारी मच्छीमारांच्या वस्त्यांमध्ये जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही अंदमानाचा चार बेटांचा प्रवास ग्रेट अंदमान ट्रंक रोडने सुरू केला.

अंदमानात शेती बहुल भाग प्रामुख्याने उत्तर अंदमानात दिगलीपूर येथे असला तरी इतर बेटांवरही काही प्रमाणात शेती होते. खरं तर अंदमानाची भूमी म्हणजे समृद्ध वर्षांवनच. इथे शेतीसाठी सपाट आणि मोकळी जागा नव्हती. पण अंदमानात जेव्हा येथे बाहेरून मानवी वस्त्या वसवल्या गेल्या तेव्हा जवळपासचे थोडे जंगल सपाट करून तिथे शेतीसाठी जमीन तयार करण्यात आली. पण समृद्ध वर्षांवनात शेती करणं हे  एक मोठं आव्हान आहे. प्रत्येक वेळी इथे शेतकऱ्याला पाहिजे तसेच पीक मिळत नाही. आम्हाला अंदमानातील शेतकरी अजूनही इथल्या परिस्थिती आणि मान्सून चक्राशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करताना दिसले. देशाच्या इतर भागांतून इथे वस्तीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचाही काही उपयोग होत नसल्याचे आम्हाला दिसले.

आपला देश कृषिप्रधान आहे. आपले पूर्वज आदिकाळापासून कृषी क्षेत्रात प्रवीण होते. त्यांचा एकंदरीतच स्थानिक परिस्थिती, निसर्ग आणि ऋतुचक्राचा अभ्यास अफाट होता. पिढय़ान्पिढय़ा त्यांच्या ज्ञानात भर पडत गेली आहे. आणि हेच पारंपरिक समृद्ध ज्ञान नवीन पिढय़ांकडे हस्तांतरित होत असे. ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या माध्यमातून देशाच्या इतर भागांत जवळजवळ सगळीकडे फिरल्यानंतर आमच्या हे लक्षात आले, आणि म्हणूनच मान्सूनविषयी पारंपरिक ज्ञान स्थानिकांकडून समजून घेणे हा ‘प्रोजेक्ट मेघदूत’ चा एक महत्त्वाचा भाग झाला. मागच्या पाच वर्षांच्या प्रवासात आम्ही भारताच्या विविध भागांतील स्थानिकांकडून मान्सूनविषयक पारंपरिक ज्ञानाच्या तपशिलांच्या नोंदी केल्या आहेत.

समृद्ध पारंपरिक ज्ञानाचा ठेवा, हे चित्र भारताच्या इतर भागातलं असलं तरी अंदमान आणि निकोबार बेटांवर हे चित्र अगदी विरुद्ध आहे. कारण या बेटांवर मुळात शेती ही परंपराच नाहीये. या बेटांवर राहणारे मूळ लोक म्हणजे इथले आदिवासी जे आजही उदरनिर्वाहासाठी त्यांच्या पारंपरिक साधनांवर म्हणजे जंगलं, प्राणी यांच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे इथे शेती आली कुठून आणि केव्हा पासून, या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण अंदमानच्या आधुनिक इतिहासाकडे जाऊ या.

अंदमान आणि निकोबार बेटांवर तिथे राहणारे मूळ सहा जातींचे आदिवासी आहेत. आज इथे राहणारे इतर लोक देशाच्या विविध भागांतून आलेले स्थलांतरित आहेत. १७व्या शतकात अंदमानात फक्तपोर्ट ब्लेअर हे बंदर जहाजांना मोठय़ा प्रवासात दुरुस्ती, विश्रांतीच्या हेतूने बांधले गेले होते. ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरूनच त्याचे नाव पोर्ट ब्लेअर असे ठेवण्यात आले. सन १८५७ च्या क्रांतिसमरानंतर या बेटांवर क्रांतिकारी कैद्यांना ठेवण्यात येत असे, त्या काळात इथे कोणतेही जेल नव्हते. कैद्यांना शिक्षा देण्यासाठी त्यांना इथे आणून सोडलं जात असे. पण त्या नंतर कैदी आणि आदिवासींनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरोधात बंड केलं. त्या संघर्षांत बरेच आदिवासी मारले गेले. आणि नंतर ब्रिटिशांनी इथे सेल्युलर जेल बांधले. त्याच काळात इथले समृद्ध वन आणि उत्तम दर्जाचं लाकूड हे ब्रिटिशांच्या डोळ्यांत भरले. आणि भरपूर लाकूड घेण्यासाठी त्यांनी इथे मोठी सॉ-मील बांधली. तिथे काम करण्यासाठी कामगार देशाच्या इतर भागातून इथे आणले. त्यांच्या वसाहती अंदमानात वसवण्यात आल्या.

स्वातंत्र्यानंतर इथे देशाच्या विविध राज्यांतून लोकांना स्थलांतरित करण्यात आले. प्रामुख्याने ७०च्या दशकात पूर्व पाकिस्तान (आत्ताचा बांगलादेश) स्वतंत्र झाल्यानंतर तेथील स्थलांतरित झालेल्या काही बंगाली लोकांना इथे वसवण्यात आले. तामिळ लोक दक्षिण अंदमानात, झारखंड छत्तीसगड आंध्र प्रदेशचे स्थलांतरित मध्य अंदमानात आणि बंगाली लोक उत्तर अंदमानात वसवण्यात आले. या लोकांमध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि मच्छीमार हा वर्ग मोठा होता.

बाहेरून अंदमानात आलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीविषयक पारंपरिक ज्ञानाचा इथे उपयोग झाला नाही, कारण देशाच्या इतर भागातील  हवामान, शेती आणि बंगालच्या उपसागरातल्या बेटांच्या परिस्थितीत खूप फरक आहे. देशांच्या काही भागात वर्षभरात तीन ते चार महिनेच पाऊस पडतो. तिथला पाऊस हा मोसमी असतो. पण अंदमानात जवळजवळ आठ महिने पाऊस पडत असतो. या बेटांवर नर्ऋत्य आणि ईशान्य दोन्ही मान्सून सक्रिय असतात. मान्सूनच्या आधी येणारा पूर्वमोसमी पाऊस इथे एप्रिल महिन्यापासून सुरू होतो. वर्षभरात या बेटांवर सरासरी तीन हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. इथल्या या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांना इथे मोठा संघर्ष करावा लागत आहे.

अंदमानात आठ महिने पडणाऱ्या पावसात नेहमीच चढ-उतार होत असतात. अशा परिस्थितीत कुठल्याही एका पिकावर अवलंबून न राहता अनेक पिकं आणि पर्याय खुले ठेवणे हाच एक उत्तम पर्याय आहे. इथे शेतकरी प्रत्येक भागात एकाच वेळी अनेक पिकं, भाज्या, फळे आणि तसेच शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन असे अनेक पर्याय आजमावतांना दिसतात. आम्ही मध्य आणि उत्तर अंदमानात झारखंड, छत्तीसगढ, आणि काही बंगाली शेतकऱ्यांना भेटलो तेव्हा आम्हाला हे लक्षात आले. आज इथे राहणारे बहुतेक तरुण शेतकरी आपल्या वडिलांबरोबर इथे आले किंवा त्यांचा जन्मच इथे झाला आहे.

आम्ही मध्य अंदमानात कदमतला येथे स्थायिक असलेल्या मूळच्या छत्तीसगडच्या शेतकऱ्याला भेटलो. अ‍ॅन्थोनी डुंग डुंग हे त्यांच्या लहानपणी म्हणजे साधारण चाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या भावासोबत छत्तीसगढहून इथे आले. आठ महिने सतत असणाऱ्या पावसामुळे ते एका वर्षांत दोनदा भाताचे पीक घेतात. मोठा दाना या ९० दिवसाचे चक्र असणाऱ्या तांदळाच्या जातीची पेरणी ते एप्रिलमध्ये करतात, तीन महिन्यांत हा तांदूळ काढला जातो. हा तांदूळ प्रामुख्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला जातो. जुल महिन्यात ते छोटा दाना हा तांदूळ लावतात आणि तोच वर्षभर खायला वापरतात.

या वर्षी एप्रिलपासून पूर्वमोसमी पाऊस न पडल्यामुळे मोठा दाना हा तांदूळ पेरला गेला नाही. त्यामुळे या वर्षी जनावरांना खायला काय घालायचं हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.

तसेच उत्तर अंदमानात दिगलीपूर येथे आम्ही हलधार या बंगाली शेतकरी कुटुंबाला भेटलो. ३० वर्षांच्या या तरुण शेतकऱ्याने आपल्या १५ फूट खोल शेततळ्यात मत्स्यपालनही केले आहे. शेतात भात, भाज्या आणि सुपारी हे तिन्ही पर्याय होते. या वर्षी एप्रिलपासून पाऊसच नसल्यामुळे सुपारीचे मोठे नुकसान झाले, तरीही शेततळ्यातील माशांनी त्यांचे भागले. भेंडी आणि कोबी या भाज्या त्याच्या शेतात होतात. या वर्षी ऊन जास्त होते आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई होती असेही त्यांनी सांगितले. असेच चित्र तिथल्या बहुतेक शेतकऱ्यांचेही होते.

दिगलीपूर येथील एका शेतकऱ्याने ‘कॅरी’ (उकअफक – सेंट्रल आयलँड अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिटय़ूट) चे शेतीविषयक संशोधन आणि त्याचा त्यांना होणारा फायदा याविषयी सांगितले.

शेतकऱ्यांकडून सरकारी कामाचे कौतुक आणि त्यांना होणाऱ्या फायद्याबद्दल ऐकायला खूप छान वाटले. आपण बहुतेक वेळा शेतकऱ्यांकडून सरकारी कामांबद्दल त्यांची नकारात्मक प्रतिक्रियाच ऐकत आलो आहोत, अशात असे कौतुक ऐकणे हा आमच्यासाठी एक सुखद धक्काच होता.

डी रिस्किंग मॉडेल

आपल्याला उत्तम गुंतवणूक करायची असल्यास एकच पर्याय न निवडता अनेक पर्यायांमध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजेच आपण आपल्या गुंतवणुकीतील धोके कमी करतो. अगदी तसेच अंदमानातल्या शेतकऱ्यांचेही आहे. (गुंतवणुकीच्या भाषेत डी रिस्किंग)

एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा एकाच वेळी अनेक पिकें घेणे हा पर्याय शेतकरी निवडतात म्हणजे मान्सूनच्या चढ-उतारामुळे एखाद्या पिकाचं नुकसान झालं तरी दुसऱ्या पिकांमधून उत्पन्न होऊ शकतं. देशाच्या इतर भागात जिथे पाऊस एकसारखा नाही त्या भागांना अंदमानच्या शेतकऱ्यांकडून हे डी-रििस्कग मॉडेल शिकण्यासारखे असेल.

अंदमानात शेतकऱ्यांना ‘कॅरी’ची साथ

सेंट्रल आयलेंड अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिटय़ूट (उकअफक) म्हणजेच ‘कॅरी’तर्फे गेली चाळीस वर्षे अंदमानच्या हवामानावर आणि या हवामानात अनुकूल ठरेल, अशा शेती आणि शेतीच्या पद्धतींचे संशोधन सुरू आहे. शेतीप्रमाणेच, पशुपालन आणि मत्स्यपालन या विषयांवरही त्यांचे संशोधन आहे. ‘कॅरी’च्या पोर्ट ब्लेअर येथील संस्थेत शेती प्रकल्पाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एस. के. जमीर अहमद आणि ‘कॅरी’चे संचालक डॉ. शिबनारायन दाम रॉय भेटले. डॉ. राय यांनी सांगितले की अंदमानात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी त्यातील चढ-उतार वाढले आहेत. अशा परिस्थितीत शेतीचे कमीत कमी नुकसान व्हावे तसेच इथल्या माती आणि हवामानाचा विचार करता जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर ‘कॅरी’चे संशोधन सुरू आहे. पावसाच्या चढ-उताराने होणारे नुकसान कमी व्हावे या साठी एकाच वेळी अनेक पिके घेणे, माती आणि हवामानाचा विचार करून ती कोणकोणती घ्यावी, हे ‘कॅरी’ शेतकऱ्यांना सुचवते.

‘कॅरी’ने तिथल्या हवामान आणि मातीचा अभ्यास करून भात आणि डाळींच्या जातीही विकसित केल्या आहेत. तिथल्या वातावरणात चांगले उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणाऱ्या ‘गायत्री’, ‘सावित्री’, ‘धान नं ६’, ‘धान नं ७’ अशा भाताच्या जाती त्यांनी विकसित केल्या आहे. या नवीन जातींची बियाणे शेतकऱ्यांना संस्थांकडून मिळतात. पिकं लावताना त्याचे वेळापत्रक, पद्धती आणि इतर सूचना ते शेतकऱ्यांना दिल्या जातात. नवीन जातींची पिकं संस्थेकडूनच विकत घ्यायची हमीही दिली जाते. ‘कॅरी’ने डाळ आणि भाताप्रमाणेच भाज्या आणि फळांच्या ही जाती विकसित केल्या आहेत, यात वांगी, बटाटे आणि नारळाचाही समावेश आहे.

कमीत कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न देणाऱ्या तसेच पर्यावरण पूरक अशा पद्धतीही शेतकऱ्यांना शिकवल्या जातात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
नितीन ताम्हनकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:24 am

Web Title: monsoon diary 6
Next Stories
1 पाऊस विशेष : पान लागले नाचू
2 इ. स. ६६६६ मध्ये कलियुगाची समाप्ती?
3 कथा : क्रूर पाऊस
Just Now!
X