काळाच्या पटलावर कलात्मक कस 

गेल्या १७ लाख वर्षांच्या इतिहासात असे लक्षात येते आहे की, ज्या वेळेस जगाच्या एका कोपऱ्यात विशिष्ट प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात होते, त्या वेळेस दुसऱ्या टोकाला त्याच प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात होते किंवा तशाच प्रकारची संकल्पना अस्तित्वात येत होती.

wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
contractor arrest in warehouse wall collapse accident
वसई : गोदामाची भिंत कोसळून दुर्घटना: ठेकेदाराला अटक, अनधिकृत बांधकामे रोखण्यास पालिका अपयशी
Pune Police, Mephedrone Smuggling, Arrest Man, west bengal, crime news, marathi news,
पुणे : ‘मेफेड्रोन’ प्रकरणात पश्चिम बंगालमधून एकजण ताब्यात

पहिला माणूस या भूतलावर अवतरला त्याला आता तब्बल १७ लाख वर्षे होऊन गेली. या भूतलावरील प्रत्येक माणसाला आपल्या पाळामुळांचा शोध घेण्यामध्ये मूलभूत स्वारस्य असतेच. पण जगातील भिन्नविध संस्कृतींमध्ये माणसाचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने झाला असावा, असे आपल्याला उगीचच वाटत राहते. वस्तुस्थिती वेगळीच आहे. ज्या वेळेस आफ्रिकेतील माणूस दगडी हत्यारे तयार करीत होता, त्या वेळेस भारतामध्येही त्याच पद्धतीने दगडी हत्यारे तयार करण्याचे काम सुरू होते. आफ्रिकेतून निघालेल्या माणसाने सुरुवातीच्या काळातील दगडी हातकुऱ्हाड तयार करण्याचे तंत्रज्ञान त्याने जगभर नेले असे तज्ज्ञांना वाटले. मात्र गेल्या १७ लाख वर्षांच्या इतिहासात असे लक्षात येते आहे की, ज्या वेळेस जगाच्या एका कोपऱ्यात विशिष्ट प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात होते, त्या वेळेस दुसऱ्या टोकाला त्याच प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात होते किंवा तशाच प्रकारची संकल्पना अस्तित्वात येत होती. भारतात इसवी सन पूर्व कालखंडात शिलालेख अस्तित्वात आले त्याच वेळेस इजिप्तमध्येही ते अस्तित्वात आले आणि चीनमध्येही कापडावर शिलालेखसदृश नोंदी अस्तित्वात आल्या. हे लक्षात येण्यासाठी आपल्याला भारताचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित पुरातत्त्वीय पुरावे जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये पाहावे लागतात. त्यासाठी या सर्व गोष्टी म्हणजे पुरावशेष आपल्याला बाजूबाजूला पाहायला मिळणे महत्त्वाचे ठरते. अशी संधी देणार कोण? भारतीयांचे हे भाग्यच म्हणायला हवे की, जगातील पुरावशेषांचा चांगला संग्रह असलेले ब्रिटिश म्युझियम आणि

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय यांनी एकत्र येऊन जागतिक इतिहास अशा प्रकारे एका मोठय़ा पटलावर नऊ भागांमध्ये मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळे प्रथमच अभ्यासकांना जागतिक पटलावरील अभ्यास एकाच भेटीत करण्याची अनमोल संधी प्राप्त झाली आहे. ब्रिटिश म्युझियममधून या प्रदर्शनासाठी तब्बल १२४ पुरावशेष मुंबईत आणण्यात आले आहेत. तर भारतातून एकूण १०४ पुरावशेषांची निवड करून त्याची मांडणी प्रदर्शनात करण्यात आली आहे.

प्रदर्शनाचे दोन महत्त्वाचे विशेष आहेत. पहिला विशेष म्हणजे प्रदर्शनाचे डिझाइन आणि प्रकाशयोजना. दुसरा विशेष म्हणजे सर्वच भागांची सुरुवात दोन संवादात्मक कलाकृतींपासून होते. यातील एक कलाकृती किंवा पुरावशेष भारतीय तर दुसरा विदेशी आहे. त्यामध्ये कालखंडाचा एक समान दुवाही आहे. पहिल्या भागात प्रवेश करताना सुरुवातीस पितळखोऱ्याच्या लेणीतील यक्षगणाची कलाकृती पाहता येते. त्यानंतर अंधारलेल्या गुहेत प्रवेश करावा, तशी रचना आहे. दोन्ही बाजूला असलेले दिवे उलटय़ा त्रिकोणी आकारातील आहेत. याच आकारातील अश्महत्यारे पुढे गेल्यावर पाहायला मिळतात. भारतातील अतिरमपक्कममधील दगडी हातकुऱ्हाड तब्बल १७ लाख वर्षे जुनी तर टांझानियातील अल्डुवाईची हातकुऱ्हाड आठ लाख वर्षांपूर्वीची आहे. पुढे लगेचच भारतीय, युरोपीय, मध्य- पूर्व आणि इंडोनेशिया येथील हातकुऱ्हाडी एकत्र पाहता येतात. त्यासाठी वापरलेला दगड मग तो काळापाषाण असेल किंवा मग फ्लिंट किंवा चर्ट त्याच्या गुणवत्तेनुसार या हातकुऱ्हाडी कसा आकार धारण करतात, ते पाहणे व समजून घेणे इथे महत्त्वाचे ठरते.

त्यानंतर आपण पुढे सरकतो ते मृद्भांडय़ांच्या विभागामध्ये. बलुचिस्तानातील इसवी सन पूर्व ३५०० कालखंडातील मृद्भांडे पाहण्याजोगे आहे. त्यावरील नक्षीकामामुळे त्यावेळच्या मानवाला ऑक्सिडेशनची रासायनिक प्रक्रिया ठाऊक होती, हे लक्षात येते. चीन, जपान, व्हिएतनाम, इराणमध्ये याच कालखंडात साकारलेली मातीची भांडी पाहता येतात. त्यातून प्रत्येक प्रांताचे मातीची भांडी तयार करण्याचे वैशिष्टय़, त्यासाठी वापरलेले वेगळे तंत्रज्ञान आणि कलात्मकता याचा माणसाने साधलेला मेळही लक्षात येतो आणि थक्क व्हायला होते.

हडप्पा- मोहेंजोदारोच्या पहिल्या नागरीकरणाचे वैशिष्टय़ म्हणजे या कालखंडापासून भाजक्या विटा पाहायला मिळतात. भाजक्या विटा ही ही भारताने जगाला दिलेली देणगीच आहे. त्यातील हडप्पाची एक वीट इथे पाहायला मिळते. संवादक कलाकृतींमध्ये मेसापोटामियामध्ये देवळात सापडलेले स्त्रीमूर्ती आणि मोहेंजोदारोची प्रसिद्ध नर्तिका शिल्पकृती पाहायला मिळते. मेसापोटामियामधली स्त्री शिल्पकृती त्यावेळेस िलगसमानता होती हे सांगते. नर्तिकेच्या शिल्पकृतीबद्दल गेल्या काही वर्षांत अनेक प्रवाद आहेत. या प्रदर्शनाचे संकल्पक असलेले नमन अहुजा प्रश्न विचारतात, की ही तत्कालीन कष्टकरी महिला किंवा वीरयोद्धा का नाही? तिच्या फक्त डाव्या हातात बांगडय़ा आहेत. उजव्या हाताने काम करणार म्हणून तो मोकळा ठेवला आहे, असाही युक्तिवाद केला जाऊ शकतो. हे प्रदर्शन अशा प्रकारे अनेक प्रश्न मनात निर्माण करते आणि आपण पुढे सरकतो. मेसापोटामियामध्ये सापडलेले हडप्पाचे शिक्के या दोन्ही संस्कृतींदरम्यान व्यवहार सुरू होते हेच स्पष्ट करतात. इथेच तांब्यामध्ये इसवी सनपूर्व २०००च्या आसपास साकारलेला वृषभही पाहायला मिळतो. अलीकडे आपण ज्याला समकालीन कला म्हणतो त्याच रूपाकारात हा वृषभ दिसतो. मग त्याकाळीही माणूस समकालीन कलेचा विचार करत होता.. असे म्हणावे का? त्याचे उत्तर हा वृषभ असू शकतो. इथेच पुढे दायमाबादला सापडलेले कांस्यधातूतील गेंडय़ाचे चारचाकी खेळणे पाहायला मिळते. हे इसवीसनपूर्व १५०० या सालातील आहे. दायमाबाद येथेच जगातील सर्वात प्राचीन कांस्यभट्टी सापडली होती हे विशेष. जगातील सर्वात प्राचीन नगरे ही नदीकाठी अस्तित्वात आली होती. म्हणून या विभागाची रचना नदीच्या प्रवाहाप्रमाणे काहीशी नागमोडी करण्यात आली आहे.

साम्राज्यांचा एक विभाग लगेचच सुरू होतो. त्याच्या सुरुवातीस भाजाच्या प्राचीन लेणींमधील स्तंभशीर्ष चित्ररूपात दोन्ही बाजूला पाहायला मिळतात. येथील स्तंभांची कल्पना ही कदाचित पस्रेपोलीसहून आलेली असली तरी स्तंभशीर्ष मात्र पक्के भारतीय शैलीतील आहेत. अलेक्झांडर, हैड्रीयन आणि कुशाण राजांच्या चेहऱ्यांच्या शिल्पकृती हे पुढील भागाचे महत्त्वाचे वैशिष्टय़. इतिहास नेमका कसा असतो आणि एकाच वेळेस जगात किती विरोधाभासी घटना इतिहासाला आकार देत असतात, ते इथे पाहायला मिळते. अलेक्झांडरची शिल्पकृती तो गेल्यानंतर तब्बल २०० वर्षांनी साकारण्यात आली आहे. कारण त्याच्या नावाने राज्य करण्यात तत्कालीन राज्यकर्त्यांना स्वारस्य होते. तर हैड्रीयनविरोधातील संतापाने त्याची शिल्पकृती फोडून थेम्स नदीत फेकण्यात आली होती. ती संशोधकांनी नदीतून परत मिळवली. कुशाण राजाची शिल्पकृती तत्कालीन अप्रतिम कलात्मकतेचे प्रतीकच आहे.

नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिलालेखांचा वापर जगभरात सर्वत्र झाला. त्यातील चिनी नोंद, रोमन आणि मुंबईजवळच्या सोपाऱ्यातील अशोकाचा शिलालेख या दालनात पाहायला मिळतात. मात्र या दालनातील सर्वाधिक लक्षवेधी कलाकृती आहे ती फणिगिरीची. संगमरवरामध्ये कोरलेले हे अमरावती शिल्प गौतमबुद्धाच्या सर्वसंगपरित्यागाचे प्रतीक आहे. साम्राज्य म्हणजे सत्तेची आस आणि याच दालनात विरोधाभासात्मक सर्वसंगपरित्यागाची ही शिल्पकृती पाहायला मिळते. गौतमाचा राजमुकुट काढल्यानंतर तो तुषित स्वर्गात देवतांतर्फे नेला जातो, असे चित्रण असलेली ही शिल्पकृती मुकुटाच्या आकारातच साकारण्यात आली आहे. भारतीय शिल्पकलेचा हा अप्रतिम नमुनाच म्हणायला हवा.

तत्कालीन राजांनी आपल्या प्रचार- प्रसारासाठी धर्माचा किंवा श्रद्धांचा कसा वापर केला ते राज्य आणि धर्म किंवा श्रद्धा या विभागात अनुभवता येते. मौर्य राजांच्या कालखंडात एका बाजूला राजाचे चित्रण तर दुसऱ्या बाजूस बुद्ध, लक्ष्मी, विष्णू यांचे चित्रण पाहायला मिळते. कमी-अधिक फरकाने जगभरातही तोच ट्रेण्ड होता. तत्कालीन बायझन्टाइन, ससेनिअन आणि रोमन नाणी इथे पाहता येतात. तर इस्लामच्या राज्यकर्त्यांनी कुराणातील अक्षरांना ते स्थान दिलेले दिसते आणि तिथे ईश्वर म्हणजेच अल्ला निराकार आहे.

जे दैवी किंवा शक्तिशाली आहे, त्याला रूपाकार कसा प्राप्त झाला हे पाहणे जगाच्या इतिहासात सर्वाधिक रोचक ठरावे. ते समजून घेतले तर माणसाची मानसिकता आणि धर्म व त्याचा प्रसार याची कोडी उलगडत जातात. ख्रिस्त आणि इंडोनेशियातील गणपतीची शिल्पप्रतिमा या भागातील संवादात्मक कलाकृती आहेत. गणपतीला जगभर पोहोचताना तेथील स्थानिक तोंडवळा प्राप्त झाला, तसाच तो बुद्ध प्रतिमेलाही प्राप्त झाला. चिनी बुद्ध चिनीच वाटतो किंवा तिबेटिअन.

भारत हा समृद्ध सागरी परंपरा लाभलेला देश आहे. त्याचे प्रतिबिंब येथील संस्कृतीमध्ये पाहता येते. कोल्हापूरच्या ब्रह्मगिरी येथे सापडलेली पोसायडन ही ग्रीक सागरी देवतेची मूर्ती सागरीसंबंधांचाच पुरावा ठरते. तसेच अजिंठा लेणींमध्ये सापडलेले इसवी सनाच्या ३८५ व्या कालखंडातील नाणेही तेच सांगत असते. काळी मिरी ही त्या काळी सोन्याइतकीच महाग होती म्हणून तिची पावडर ठेवण्यासाठी साकारलेल्या छोटेखानी सोन्याच्या डबीवर ख्रिश्चन पद्धतीची सजावट असली तरी ती केरळमध्ये साकारलेली असते. तसेच भारतात १२५० साली साकारलेले गुजरातमधील ब्लॉक पिंट्र कापड इराणमध्ये तर कधी इजिप्तमध्ये सापडते. इजिप्तमध्ये सापडलेली ही प्राचीन भारतीय वस्त्रकला- तिचे नमुने या प्रदर्शनात आहेत. हे नमुने केवळ इजिप्तमध्येच नव्हे तर आग्नेय आशियातही सापडतात. इंडोनेशियामध्ये सापडलेले राजवस्त्र जे भारतात साकारले गेले होते, तेही या प्रदर्शनाचाच भाग आहे.

भारतातील विविध छोटेखानी राज्ये आणि संस्थानिकांनी कला जोपासली. खासकरून चित्रकला. मुघल काळातील बाबरनाम्यातील अप्रतिम चित्रकला इथे आहे. पण रेम्ब्राने साकारलेले जहांगीरचे चित्र आणि हाती मरिअम असलेले जहांगीरचे चित्र ही दोन्ही चित्रे या दालनाचे भूषण आहेत. विख्यात चित्रकार रेम्ब्राने जहांगीरचे चित्र केवळ वर्णनावरून साकारले होते हे विशेष. हे लक्षात आल्यानंतर तर केवळ थक्क व्हायला होते. त्यानंतरचे दालन आपल्याला ब्रिटिश राजवटीपर्यंत नेते. इथे स्वातंत्र्य चळवळ, तत्कालीन जगात झालेल्या स्वातंत्र्य चळवळी यांची सांगड चांगल्या पद्धतीने घालून विषय समकालीन कलेपर्यंत आणला आहे. २६ जानेवारी १९५० साली अस्तित्वात आलेल्या भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेची पहिली प्रत हे या दालनाचे वैशिष्टय़. तर कुठे जगात बंडखोरांच्या समर्पणानंतर त्यांनी समर्पण करताना दिलेल्या मशिनगन्समधून एखादी शिल्पकृती उभी राहिलेली दिसते. हातकुऱ्हाडीपासून ते मशिनगन्सपर्यंतचा हा मानवी प्रवास थक्क करणारा आहे. अखेरचे दालन हे काळ या संकल्पनेविषयीचे आहे. जगातील विविध संस्कृतींमध्ये काळाची संकल्पना तेवढय़ाच वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे. कुणाच्या लेखी तो चक्राकार आहे. कुणाच्या लेखी तो उर्ध्वअधो असा जातो तर कुणाच्या लेखी त्याला आकार उकारच नाही. समकालीन तसेच प्राचीन कलेच्या माध्यमातून चित्रकार- शिल्पकारांनी घेतलेला काळाचा वेध या अखेरच्या दालनात पाहता येतो. नटराजाच्या मूर्तीमध्ये सिमेंट आणि त्यावर डकवलेल्या नाण्यांमध्ये झाकून गेलेला नटराज ही शिल्पकृती आधुनिक काळात भानावर आणणारी ठरावी.

प्रदर्शन व्यवस्थित पाहिले तर लक्षात येते की, त्याला बरीच अंतस्थ सूत्रेही आहेत. म्हणजे सुरुवातीस आपण गेंडय़ाची शिल्पकृती पाहतो ती दायमाबादची असते. नंतर पोर्तुगीजांनी गेंडा भेट दिल्यानंतर त्याला प्रत्यक्ष न पाहिलेल्या एका चित्रकाराने साकारलेले त्याचे चित्र- त्याच्या जगभरात गाजलेल्या पिंट्र्स आपण पाहतो आणि त्याच दालनात गेंडा अस्तंगत होत असताना त्याच्या चामडय़ातून साकारलेली एका राजाची ढालही पाहतो. या प्रवासात गेंडय़ाचे अस्तित्व कुठे होते आणि तो कसा ऱ्हासापर्यंत पोहोचला आणि आता केवळ काझिरंगापुरताच मर्यादित कसा राहिला त्याचीही उकल होते. प्रदर्शन सर्व संवेदना जागृत ठेवून पाहिले तर ते अधिक उकल करणारे ठरेल!

(चुकवण्याचा विचारही करू नये असे हे अनोखे प्रदर्शन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये १८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पाहता येईल. वेळ मुबलक आहे, चुकवू नका किंवा परत परत पाहा!)