20 October 2020

News Flash

आईची स्थित्यंतर

बाळाच्या जन्माबरोबर आईचा जन्म होतो.

बाळाच्या आगमनापूर्वी ‘एक’ व्यक्ती असणारी स्त्री आई झाल्यावर केवळ एकटी राहात नाही, ती व्यापक होते.

स्त्री उपनिषद

डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

मॅक्झिम गॉर्कीच्या ‘आई’ या कादंबरीला स्पर्श केल्याशिवाय स्त्रीच्या ‘आई’ या रूपाचा विचार पूर्ण होऊ शकणार नाही. जनमानसावर विलक्षण गारूड करणारी जागतिक वाङ्मयातील ही अत्यंत प्रभावशाली साहित्यकृती आहे. क्रांतिकारक मानवतावादाचा उद्गार असणाऱ्या या कादंबरीतील नायकाची साधीसुधी आई-अतिशय सरळ मनाची, प्रेमळ, दयाद्र्र व न्यायी. पण या सामान्य स्त्रीचे असामान्यत्व असे की तिची सदसद्विवेकबुद्धी, चांगुलपणा, योग्यायोग्यतेबद्दलच्या कल्पना, जीवनविषयक नितळ दृष्टिकोन यामुळे ती आपल्या मुलाचा नतिक आदर्श ठरते. क्रांतीचे नेतृत्व करणारा नायक मोठा होत जातो व त्याच्या आईमधील असामान्यत्वही आभाळाएवढे होत जाते. या वाढीत तिला एक लखलखीत सत्य जाणवते ‘ते माझा आत्मा चिरडू शकत नाहीत..’ मुलाच्या व आईच्या वाढीच्या सहप्रवासाची ही कथा जगद्विलक्षणच आणि ‘आई’चे लक्षावधी कंगोरे प्रकाशमान करणारी आहे. ‘बाळाच्या जन्माबरोबर आईचा जन्म होतो’ हे वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारे दाखवून देणारी, आईच्या स्थित्यंतरांची वैश्विक कथा आहे ती.

स्त्रीजीवनाकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर असे दिसते की बालवयापासूनच तिला किती बदलांना सामोरे जावे लागते!

‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ असे उघडपणे म्हटलं नाही तरी प्रत्यक्षात त्याच उक्तीनुसार जगरहाटी सुरू असते. एखादा बदल तिला हवा आहे की नाही, याचा विचारही न होता तो तिच्या आयुष्यात रुळून जातो.

पण मातृत्वामुळे तिच्यात होणारा बदल हा सर्वसामान्य नसतो, तर ते एक मोठे स्थित्यंतर असते. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक व अगदी आध्यात्मिकदृष्टय़ाही स्त्री आमूलाग्र बदलते. तिच्या शरीरात वाढणारा जीव तिच्या उदरातून जन्म घेऊन एक स्वतंत्र आयुष्य जगू लागतो. त्या जिवाशी तिचे शारीरिक नाते तर असतेच, पण त्यापलीकडेही अत्यंत घनिष्ठ असे अमूर्त नाते असते. बाळाच्या आगमनापूर्वी ‘एक’ व्यक्ती असणारी स्त्री आई झाल्यावर केवळ एकटी राहात नाही, ती व्यापक होते. बाळाबरोबर तिचीही वाढ होऊ लागते. त्याच्या शारीरिक गरजा भागवताना तिचे शरीर कणखर होते, त्याच्या भावनिक गरजांना पुरे पडताना स्वतचे भावनिक समायोजन करायला ती आपसूक शिकते. त्याच्या मनातली इवलीशी स्पंदनेही तिच्या मनात आरशासारखी उमटतात. त्याच्या बौद्धिक वाढीला योग्य वळण लागावे, यासाठी तिचीही बुद्धी पुढे झेप घेऊ लागते. आणि हे सर्व ती ठरवून करत नाही. निसर्गतच तिच्यात स्वतत असे बदल घडवून आणण्याचे सामथ्र्य आहे.

देवीभागवतात देवीच्या विविध रूपांचे व गुणांचे वर्णन करताना वापरलेली विशेषणे शाब्दिक अर्थापेक्षा प्रतीकात्मक अर्थाने घेतली तर आईचेच चित्र उभे राहते. देवी ही किमान चतुर्भुजा तर असतेच. त्याहीपुढे अष्टभुजा, दशभुजा, अष्टादशभुजा.. देवीला एवढे हात आहेत याचा अर्थ तिच्या एवढय़ा क्षमता आहेत. आणि कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात इतक्या विविध प्रकारे काय्रे करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आईच. ती जन्मदा, ती शिक्षा देणारी, संस्कार करणारी, रडवणारी, हसवणारी, ऐकणारी व ऐकवणारी, आणि कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहणारी. आपल्या लाडक्या अपत्याला शिक्षण किंवा इतर निमित्ताने दूर पाठवायचा प्रसंग आला की वडील हळवे होतात, पण आई मन घट्ट करते. कोमल मनाचे क्षणात वज्रासारख्या कठीण मनात रूपांतर होते. एखाद्या बहुरूप्यासारखी क्षणाक्षणाला रूपे बदलण्याची कला आईकडे अंगभूतच असते. फरक इतकाच की बहुरूप्याचे सर्व नकली असते, आईतील बदल प्रत्येकक्षणी अस्सल असतो. कारण स्थित्यंतर स्वीकारून पुढे जाणे, हा आईचा स्थायीभाव असतो. ते तिचे वैश्विक विशेषत्व आहे. म्हणजे जगभरातील आई मातृत्वाबरोबर अगदी कार्यकल्प म्हणावेत अशा स्थित्यंतरांना अंगीकारत असते. आपल्या अपत्याबरोबर प्रत्येक आईची किती वाढ होईल हे व्यक्तिपरत्वे बदलत असते, पण प्रत्येक आईत ती क्षमता असतेच.

मात्र कितीही स्थित्यंतरे आली, तरी आपल्या अपत्याशी तिचे अगदी आतडय़ाचे नाते असते. त्याच्यापासून, भावनिकदृष्टय़ा अलग होणे हे तिच्या ‘प्रणाली’मध्ये नसते.

गंमत म्हणजे अपत्याच्या ‘प्रणाली’मध्ये हे भावनिक विलगीकरण असते. तेही स्वाभाविकच आहे. मूल मोठे होते तसतसे ते आईपासून मानसिकदृष्टया स्वतंत्र होते. किंबहुना, त्याने असे स्वतंत्र होण्यावरच त्याची वाढ अवलंबून असते. याचा प्रेमाशी संबंध जोडणे ही मोठी चूक ठरेल. मानसिकदृष्टया स्वतंत्र होणे म्हणजे प्रेम कमी होणे असे नव्हे, तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रस्थापित होणे. अपत्याच्या बाबतीत ही प्रक्रिया व्हावीच लागते. आईलाही तिच्यातील वाढीमुळे याची चांगलीच जाणीव असते. त्यामुळे मूल दूर जाऊ लागणे हे एकापरीने वेदनादायक असले तरी ते मोठे होत आहे हे समाधानही त्यामध्ये असते.

आई आणि मूल या दोघांच्या वाढीतील ताíकक व मूलभूत फरक जाणून घेतला तरच दोघांमधील नाते निकोप राहते व आईचे स्थित्यंतर आनंददायी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:02 am

Web Title: mother and her baby
Next Stories
1 खबर राज्यांची : तांडा स्थिरावतोय… (तमिळनाडू)
2 स्क्रीन टाइम नव्हे, ‘कोकेन’
3 बदलती जीवनशैली व आहार
Just Now!
X