News Flash

आई जेवू घालिना…

तळागाळातल्या माणसाचा विचार करण्यात आपली निर्णयप्रक्रिया कमी पडली...

संग्रहीत

-वैशाली चिटणीस

आभाळच फाटतं तेव्हा ठिगळ कुठे कुठे लावायचं असा प्रश्न असला तरी अशा वेळी सगळ्यात आधी मायेचं पांघरूण ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यावरच घालायचं असतं. करोनासारख्या अदृश्य शत्रूशी लढताना ज्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही, अशा तळागाळातल्या माणसाचा विचार करण्यात आपली निर्णयप्रक्रिया कमी पडली, असंच खेदाने म्हणावं लागतं.

औरंगाबादजवळ रेल्वे रुळांवर झोपलेल्या मजुरांचा मृत्यू ही तर हृदयद्रावक घटना आहेच, पण ठिकठिकाणी अडकलेल्या, मिळेल त्या मार्गांनी आपापल्या गावी जाऊ पाहणाऱ्या स्थलांतरित मजुरांचे जे हाल होत आहेत, ते पाहता गेले ते सुटले बिचारे असेच विषण्ण विचार बाकीच्यांच्या मनात येत असतील.

टाळेबंदीच्या काळात हाताला काम नाही, पैसे नाहीत, नीट निवारा नाही, दुसऱ्या टोकाला असलेल्या आपापल्या गावी परत जायचं तर कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता चालत जायला निघावं तर पोलीस उडवणार, वाटेत थांबावं तर रेल्वे चिरडणार.

स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी तिकीट काढावं लागेल हा तर सध्याच्या परिस्थितीत दात कोरून पोट भरण्याचा प्रकार होता. स्थलांतरितांना आपापल्या राज्यात परतता येईल हा निर्णय होऊन आठेक दिवस होऊन गेल्यानंतरही देशाच्या वेगवेगळ्या भागात रोजच्या रोज उन्हातान्हाची, भुकेची पर्वा न करता, डोक्यावर गाठोडी ठेवून, कडेवर कच्चीबच्ची घेऊन शेकडो किलोमीटर चालत निघालेल्या मजुरांचे तांडेच्या तांडे दिसत आहेत. गावी पोहोचल्यावर त्यांना त्यांच्या गावात, घरात घेतलं जाणार आहे का? हा तर वेगळाच प्रश्न आहे.
हे सगळं टाळता आलं नसतं का ?

कोणताही प्रश्न उद्भवतो, निर्णय घेतले जातात तेव्हा त्याचे परिणाम काय असू शकतात, त्यातून उद्भवू शकणाऱ्या पेचप्रसंगांची हाताळणी कशी करायची, इथला अगदी सर्वसामान्य माणूस कसा विचार करतो, त्याला काय हवं असू शकतं हे सगळं समजून घेऊन निर्णयप्रक्रिया हाताळण्यासाठी, राबवण्यासाठीच तर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं ना ? सत्ता मिळवणं- राबवणं ही वैयक्तिक महत्वाकांक्षा असली तरी लोकशाहीत तरी तिचा सगळा डोलारा याच माणसाच्या पायावर उभा असतो ना ?

आज हाच तळागाळातला माणूस हमरस्ते टाळून मिळेल त्या मार्गाने देशाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असलेल्या आपल्या घरी पोहोचण्याचा जीवतोड प्रयत्न करतो आहे. करोनातून वाचला तर भुकेच्या तावडीत सापडणार अशी त्याची परिस्थिती आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीची यंत्रणा शिस्तबद्ध पद्धतीने काम करते आहे कारण त्या स्तरातल्या नवमध्यमवर्गाला नेमकं काय हवं आहे, हे यंत्रणेला माहीत असतं. तिची नाळ जोडलेली नसते ती गरिबांशी. करोनाच्या या भयंकर संकटात त्यांना उभारी देण्यात आपण ठार कमी पडलो आहोत. त्यामुळेच त्यांची अवस्था ‘आई जेवू घालिना, बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे, हे कबूल केलं पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 10:52 am

Web Title: mother is not giving food msr 87
Next Stories
1 आज घरबसल्या हडप्पाची सफर
2 निमित्त : चिंटू आणि मी
3 निमित्त : राजकारण ‘आयएफएससी’चं!
Just Now!
X