गेल्याच आठवडय़ात मराठी राजभाषा दिन साजरा झाला. ठिकठिकाणी त्यासंबंधित सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. प्रसारमाध्यमांमध्येही त्याविषयीचे लेख, माहिती वाचायला मिळाली. याच निमित्ताने मराठी भाषाप्रेमाविषयीचा हा लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘आज मराठीचा होम वर्क नाहीये.. आता या वीकमध्ये मराठीचा काहीच होम वर्क नसणारे..’’ माझ्या चौथीतल्या मुलाने शाळेतून येता येता दरवाज्यातच घोषणा केली.

‘‘का रे ? तुला काय माहीत आठवडाभर अभ्यास नसणार आहे ते?’’ मी.

‘‘मराठीची मॅम स्कूल सोडून गेली. दुसरी येईपर्यंत नो होम वर्क..’’ आनंदाचा पतंग उडत होता.

‘‘तरी तू रोज एक बाराखडी लिही फळ्यावर. नाहीतर काना-मात्रेचा घोळ करत राहतोस.’’ मी मांजा पकडला.

‘‘आई, बाराखडीचा होम वर्क दुसरीत देतात. मला येतंय सगळं.’’

‘‘येतंय खरं, पण विसरतोस ना! ‘गाय’ लिहायचं तर ‘गय’ लिहितोस. मुळाक्षरांची रेघ आणि ‘आ’चा काना यात तुझा नेहमी गोंधळ होतो. बरं, ते सांगावं तर ‘शेण’चं ‘शोण’ होतं. कुठे जास्तीची रेघ येतेय तेही समजत नाही. मुळाक्षरांचाही घोळ आहेच. दोन्हीकडे गोलाकार काढला की ‘क’ आहे की ‘ल’ आहे? ‘लोकसत्ता’चं ‘कोकसत्ता’ वाचता, बाकी पानं वाचायचं तर दूरच. आणि दुसऱ्या पद्धतीनं काढला तर ‘लेक’चं ‘तेक’ होतं.’’ मी मांजा कसून पकडला.

‘‘आई, तू पण काय गं, मी किती हॅपी होतो मराठीची कटकट नाही म्हणून.’’

‘‘कटकट काय? थोडं करत राहा म्हणजे विसरणार नाहीस, इतकंच म्हणते मी.’’ तू मराठीला सापत्न वागणूक देत आहेस वगरे त्याला कळलं नसतं म्हणून मी समजुतीचा स्वर धरला.

‘‘आणि काय रे, सारखी सारखी टीचर का बदलते मराठीची?’’

‘‘अरे बोअर होतं ना शिकवायला पण आणि आम्हालापण.’’ पुढचं ऐकायला तो थांबला नाही.

पुढचे काही दिवस मराठी कपाटबंद झालीच, गणित, इंग्लिश इत्यादी विषयांनी त्यावर कडक पहारा दिला. अधूनमधून मी मुळाक्षरं, बाराखडी वगरे क्षीण आवाजात पुटपुटत राहिले.

मराठीचा आणि माझा ऋणानुबंध आठवत मन मागे मागे गेले. माझे वडील नोकरीनिमित्त कर्नाटकातून पुण्यात येऊन स्थायिक झाले. ते आले तेव्हा कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये नव्हती. मुंबई प्रांत होता. ‘सीमा’ अस्तित्वात नव्हती, त्यामुळे प्रश्नच नव्हता. तसा तो नंतरही आला नाही. आमच्या कुटुंबात मागच्या दोन-तीन पिढय़ांत मराठी आणि कन्नड दोन्ही शिकलेली उच्चशिक्षित माणसे होती. माझ्या आजीला कन्नड आकडय़ांपेक्षा मराठी आकडे लवकर कळत. मराठी पाढे, पावकी, निमकी ती पाठ म्हणे. ‘एकोणविसाचा पाढा म्हण’ ही तिची शिक्षा करायची आवडती पद्धत होती. आम्ही जन्माला यायच्या आधी ‘सीमा’ जन्माला आली. तिने माती, मने आणि माणसे यांच्यावर न पुसता येणारे ओरखडे काढले. जेव्हा आम्ही शाळेत जाण्याच्या वयाचे होतो तेव्हा वडिलांनी आम्हाला मराठी शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांचं म्हणणं होतं, ‘‘ज्या गावात तुम्हाला राहायचं आहे, शिकायचं आहे तिथली भाषा तुम्हाला आली पाहिजे आणि व्यवस्थित आली पाहिजे.’’ पुण्यात आमच्या कन्नड शिकण्याची सोय झाली असती. कर्नाटक हायस्कूल स्थापन करण्यात माझ्या वडिलांचाही सहभाग होता. पण ही भाषा आपली आणि ती नाही हे संस्कार नव्हते. दुसरीकडून तुम्हाला कन्नड नीट लिहिता-वाचता येत नाही म्हणून कधी टिंगलही झाली नाही.

मी आणि माझी बहीण पहिली ते दहावी हुजूरपागेत शिकलो. तिथे मराठीचं नुसतं बाळकडूच मिळालं नाही तर भाषेची चांगली मशागत झाली. उत्तम, जाणकार शिक्षक, पोषक वातावरण, पुस्तकांची रेलचेल असे शाळेचे दिवस होते. मोठय़ा वर्गात संदर्भासाहित स्पष्टीकरण आणि रसग्रहण आमच्या शिक्षकांनी फार सुंदर शिकवले. मला नाही आठवत कधी ‘बोअर’ झालेलं. भाषेच्या लहानसहान छटा आणि कोणता शब्द कधी वापरावा यावर वर्गात चर्चा होत. शब्द आणि त्यांच्या छटा यावरून अनेक प्रासंगिक विनोद होत, कोपरखळ्या मारल्या जात.

पुढे तंत्रज्ञानाच्या मार्गाने गेल्यावरही मराठी वाचन सुरू राहिले. इरावती कर्वे, दुर्गा भागवत मनाला भावल्या तशी गौरी देशपांडे आणि सानियांनीही साद घातली. कथा, कादंबऱ्या, नाटक, ललित, कविता,अनुवाद काही सोडलं नाही. लिहिणाऱ्यांच्या मनातले विचार आमच्यापर्यंत अचूक पोहोचले. त्यांनी आमचं वैचारिक आणि भावविश्व समृद्ध केलं. त्या आनंदलहरी उठत राहिल्या. कामाच्या व्यापात काहीही न वाचता थोडा काळ गेला की वाचनाची एक भूक लागायची. कुठलाही अर्ज भरताना ‘मातृभाषा’ या रकाना आला की आम्ही विचारही न करता ‘मराठी’ लिहीत असू. ज्या भाषेत आपण सूक्ष्म विचारही नीट मांडू शकतो, ती मातृभाषा..मायबोली. आईशी नाही का, आपण सगळं काही बोलू शकतो, तसंच.

मुलांना शाळेत घालताना ‘मराठी शाळा’ हा पर्यायदेखील दुर्दैवाने समोर आला नाही. शाळा जवळ असण्याची मुंबईतली निकड, हा एकच निकष होता. ज्या गावात राहायचं, तिथल्या लोकांशी संवाद साधता आला पाहिजे हा वडिलांचा विचार मनात होताच. पण मग या ‘गावा’ची, इथल्या लोकांची भाषा कोणती? पुन्हा एकदा दुर्दैवाने याचे ‘मराठी’ असे उत्तर नि:संदिग्धपणे मिळाले नाही. याच ठिकाणी ही मुलं किती दिवस राहतील, शिकतील हाही प्रश्न जोडूनच आला. त्याचंही उत्तर मिळेना. ‘गावा’चं, ‘संवादा’चं क्षितिज फार विस्तारलं होतं. इंग्रजी माध्यमाची शाळा हा परिस्थितीजन्य निर्णय होता. तरी मुलांना मराठी विषय आहे, हेही कमी नव्हतं. असो, माझ्या मुलांना मीच मराठी शिकवीन, त्यांनाही भाषेचा, साहित्याचा रसास्वाद घेता आला पाहिजे, त्या आनंदलहरी अनुभवता आल्या पाहिजेत, असा माझा प्रामाणिक आणि साधा विचार होता.

लहान वर्गात मी मुलांची मुळाक्षरे, जोडाक्षरे, बाराखडी नियमितपणे करून घेत असे. त्यामुळे वर्गात अमराठी मुलांपेक्षा त्यांना जास्त समजत असे. लवकरच त्यांचा असा समज होऊ लागला की आपल्याला मराठी चांगलं येतंय. त्यामुळे अक्षरांच्या पुढे ती मला जाऊ देईनात. चिकाटी मीही सोडली नाही. त्यातून अनेक गमतीशीर प्रसंग निर्माण होत. धडे, कविता मी नीट समजावून सांगत असे. त्यावर चर्चा करत असे. त्याच्याशी संबंधित आणखी काही माहिती, लेखकाबद्दल, कवीबद्दल जास्त माहिती सांगत असे. त्यामुळे साहजिकच जास्त वेळ लागे. मुलं तक्रार करायची.

‘‘जे करायला टीचर दोन तास घेते, त्याला तुला अर्धा दिवस पुरत नाही. वर जाता येता काय काय सांगत बसतेस.’’ मी अजिबात स्वत:चा हिरमोड करून घेतला नाही. एकदा मुलांनीच एक नवीन कल्पना सांगितली.

‘‘आई, मराठीत ना अध्र्यापेक्षा जास्त उत्तर प्रश्नातच असतं. एखादाच शब्द नसतो. तेवढाच आपण करू या (म्हणजे एक-दोनदा लिहू या) मग झाला अभ्यास. फास्ट ना?’’

‘‘म्हणजे?’’

‘‘म्हणजे बघ, ‘मिठूला खायला काय आवडते?’ असा क्वेश्चन असेल तर ‘मिठूला खायला मिरची आवडते’ हे त्याचं आन्सर. मग आपण ‘मिरची’ लिहायची प्रॅक्टिस करू या. बाकी मी वरच्या लाइनमधून कॉपी करीन.’’

‘‘कर तुला काय हवं ते.’’ मी वैतागले.

परीक्षेत प्रश्न आला ‘मिठूला काय करायला आवडते?’ याने उत्तर लिहिलं ‘‘मिठूला िपजऱ्यात उडय़ा करायला आवडते.’’ कारण ‘िपजऱ्यात उडय़ा’ एव्हढीच प्रॅक्टिस केली होती.

‘राजा चातकासारखी साधूची वाट पाहात होता’ असं एक वाक्य होतं. मी ‘चातक’ ही उपमा अनेक उदाहरणे देऊन समजावू पाहात होते. पण माझ्या मुलीच्या मनाचे दरवाजे काही उघडत नव्हते. तिचं म्हणणं काय तर, ‘चातक’ कशाची आणि का वाट पाहतो त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे? राजा चातकासारखी वाट पाहात होता म्हणजे र्अजट होतं काहीतरी, एव्हढंच! ही काव्यात्म उपमा तिला समजावी म्हणून मी पालथ्या घडय़ावर पाणी घालत राहिले. दोन-चार िशतोडे तरी आत जातील या आशेने. बरं, वासरात लंगडी गाय या न्यायाने मार्क्सही बरे मिळत अशा उत्तरांना. त्यामुळे माझ्या माहितीला किंवा आग्रहाला अजिबात वजन नव्हतं. तरी भाषा शिक्षणाचे प्रयोग चालूच राहिले.

एकदा वर्षांच्या मधल्याच एका ओपन डेला मला वर्गशिक्षिकेनं सांगितलं, ‘‘तुम्हाला मराठी टीचरनी स्टाफ रूममध्ये बोलावलं आहे. मी विचार केला, चला काय दिवे लावले आहेत मुलांनी ते पाहू. काहीतरी चांगले ऐकण्याची आशा होतीच. गेले भेटायला.

‘‘मुलांना मराठी कोण शिकवतं?’’

‘‘मी! म्हणजे सगळे विषय मीच शिकवते.’’

‘‘मराठी चांगलं आहे तुमच्या मुलीचं. पण जरा जास्तच चांगलं आहे.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘पुस्तकातली एक-दोन वाक्यं हवीत तिथे ती स्वत:ची दोन वाक्यं लिहिते.’’

‘‘म्हणजे चुकीचं लिहिते का?’’

‘‘नाही. बरोबरच लिहिते, पण ती छापील उत्तरं नसतात.’’

‘‘मग ते चांगलच आहे ना? तिला कळलेलं असतं ना?’’

‘‘तसं नाही. तिचंही उत्तर बरोबर आणि छापील उत्तरही बरोबर. मग नक्की बरोबर उत्तर कोणतं? मुलांचा गोंधळ उडतो. तुम्ही दिलेली उत्तरं पाठ करायला लावा.’’

‘‘पण भाषा समजायला नको का?’’

‘‘काही विशेष फरक पडत नाही. हा आपला एक विषय आहे. तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकलात का?’’

‘‘हो.’’

‘‘बघा, तेच तर सांगते.’’

‘‘का? माझं काय वाईट झालंय? माझ्याकडे इंजिनीयिरगची फर्स्ट क्लास डिग्री आहे. मी एका उत्तम कंपनीत उच्च पदावर काम करते आहे. माझ्या कंपनीचे बहुतेक ग्राहक परदेशातले आहेत. त्यांच्याशी मी इंग्लिशमधून बोलते. माझे कुठेच अडत नाही.’’

ती निरुत्तर.

‘‘मग इतर देशांतले लोक बोलतात का त्यांची भाषा?’’ तिने रूळ बदलले.

‘‘बऱ्याच जणांची मातृभाषाच इंग्लिश आहे. आम्ही त्यांची भाषा बोलतो याचं त्यांना विशेष वाटतं.’’

‘‘बघा इंग्लिश बोलणं किती महत्त्वाचं आहे.’’

‘‘चिनी, जपानी लोकांची कागदपत्रं बऱ्याचदा त्यांच्या भाषेत असतात. त्यांचं काम करताना आम्हाला अनुवादक लागतो. ती भाषा येणाऱ्या लोकांना मग आम्ही ती कामं देतो.’’

‘‘पण मराठीचं तसं नाही ना.’’

‘‘इंग्लिश यावं की नाही हा मुद्दाच नाही. भाषांची चढाओढ हाही मुद्दा नाही. मराठी नाहीतर िहदी आपली एक तरी भाषा नीट यायला हवी. ती आपण नाही शिकवली तर कोण शिकवणार हा मुद्दा आहे.’’

माझं तिला किती पटलं माहीत नाही, पण पुन्हा तिनं मला बोलावलं नाही. मी मात्र अधूनमधून छापील उत्तरांचा आग्रह धरू लागले. अकरावीत माझ्या मुलीने मराठी विषय सोडून आय. टी. घेण्याचा निर्णय जाहीर केला.

‘‘ते स्कोिरग आहे.’’

माझी तलवार आता म्यान झाली. भाषेशी नाळ तुटलीच का? असं वाटत राहिलं. सगळ्या संवादाच्या आशा, आनंदाच्या लहरी मनातल्या मनात जिरल्या. नंतर एक नवीन शक्कल सुचली. मुलांना आवडेल असा एखादा मराठी लेख किंवा उतारा मी त्यांना वाचून दाखवत असे. मुलं ऐकायची, प्रश्न विचारायची. तो धागा पकडून मग मी एखाद्-दोन नवीन शब्द किंवा माहिती त्यांच्या गळी उतरवत असे.

पुढे माझी मुलगी शिक्षणासाठी पुण्याला जायला निघाली. माझ्या ‘आई’ छाप सल्ल्यांमध्ये मी तिला हेही सांगितलं, ‘‘पुण्यात व्यवस्थित मराठी बोल. र्अध इंग्लिश, र्अध बम्बईया िहदी त्यात घालू नको. पुणे आहे ते.’’ प्रत्यक्षात तिचं तिथलं बोलणं ऐकायचा प्रसंग आला नाही. सुट्टीत घरी आली की फोनवर मत्रिणींशी तासन्तास इंग्लिश गप्पाच ऐकू येत.

‘‘कोण गं बोलत होती.’’

‘‘अगं ती सायली. सहकार नगरमध्ये राहते.’’

‘‘मराठी येत नाही का तिला?’’

‘‘येतं ना! पण आई, आता सगळे इंग्लिशमध्येच बोलतात. तुमच्या पुण्यातपण!!’’

टोमणे बरे मारायला शिकली होती. माझ्या लक्षात यायला लागलं होतं, नव्हे कळून चुकलं होतं की त्या ‘गावा’ची क्षितिजंही आता विस्तारली होती, वैश्विक झाली होती. ते ‘गाव’ आता ‘हब’ म्हणवून घेऊ लागलं होतं. याचा अभिमान वाटायला हवा, की तिथेही आता मराठी शोधावी लागेल की काय ही भीती वाटायला हवी, असा संभ्रम मनात होऊ लागला.

अशाच एका सुट्टीत, आळसावलेल्या दुपारी माझी मुलगी म्हणाली, ‘‘आई, मराठी वाचतेस ना अजून?’’

मी चपापले. ‘‘का गं?’’

‘‘काहीतरी वाचून दाखव ना.’’

मराठी वाचायची नाही तर ऐकायची भूक तरी लागलीच म्हणायची. मग नुकतेच वाचलेले काही लेख आठवले. ते वाचायला घेतले. वाचून झाल्यावर म्हणाली, ‘‘मस्त वाटलं. कुणीही लिहिलेलं असलं ना तरी मराठी वाचलं किंवा ऐकलं की तूच बोलते आहेस असं वाटतं.’’

चला, अगदीच काही नाळ तुटलेली नाही. आनंद लहरी नाहीत तर आनंद स्पंदनं तरी आहेत. मराठीत वाचलेलं, ऐकलेलं तिला आईची आठवण करून देतंय, हा केव्हढा मोठा पुरस्कार होता.

व्याख्या बदलली तरी ‘मायबोली’, ‘माय’बोलीच होती.
नंदिनी महाजन – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother tongue
First published on: 04-03-2016 at 01:12 IST