News Flash

गुलाबो सिताबो: माणसांच्या भणंगपणाची अप्रतिम गोष्ट

सिनेमातला एक वेगळा प्रयोग

सुनिता कुलकर्णी

रुढ अर्थाने नायिकाच नाही असे किती सिनेमे आपल्याकडे निघाले असतील? किंवा एखाद्या सिनेमाची नायिका ९५ वर्षांची जर्जर वृद्धा असेल तर? किंवा एखादी हवेली सिनेमाची नायिका असेल तर? तुम्ही बघाल तो सिनेमा?

सिनेमा बघण्याची सर्वसामान्य प्रेक्षकांची एक पद्धत असते. त्यांना सिनेमाला एक गोष्ट हवी असते. तिचा सहसा सुखान्त हवा असतो. त्या सिनेमात काय सुरू आहे ते त्यांना सहजपणे समजेल इतकं सुलभ असावं अशी त्यांची अपेक्षा असते. सिनेमाची प्रत्येक फ्रेम चकचकीत, ग्लॅमरस असावी, तिथली माणसं देखणी असावीत, तिथे दुख, दैन्य काहीही पहायला मिळू नये, तिथलं आयुष्य स्वप्नवत वाटावं अशी त्यांची अपेक्षा असते.

अॅमॅझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेला सुजीत सीरकारचा ‘गुलाबो सिताबो’ या सगळ्या अपेक्षांना फाट्यावर मारत लखनवी जगण्यातला एक तुकडाच आपल्यापुढे काढून ठेवत चांगल्या सिनेमांच्या यादीत आणखी एकाची भर घालतो.

गुलाबो सिताबो ही उत्तर प्रदेश विशेषत लखनौमधली बोलक्या बाहुल्यांच्या खेळाची अस्तंगत होत चाललेली एक परंपरा आहे. गुलाबो आणि सिताबो या एका माणसाच्या दोन बायका. सिताबो ही लग्नाची बायको कामं करून करून थकलेली, सतत करवादणारी तर गुलाबो ही तिची सवत चलाखीने आपल्याला हवं ते मिळवणारी. त्यांची सततची भांडणं, स्थानिक भाषा, स्थानिक संदर्भ वापरून त्यात निर्माण होणारे विनोद हा खेळ वेगवेगळ्या उत्सवांच्या काळात लखनौच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये पहायला मिळतो. आपल्या सिनेमात या अस्तंगत होत चाललेल्या परंपरेचा संदर्भ वापरत सुजीत सीरकार यांनी एक अप्रतिम खेळ रचला आहे.

सुजीत सीरकार आणि जुही चतुर्वेदी यांनी याआधी ‘ऑक्टोबर’, ‘पिकू’ यासारखे सिनेमे दिलेले असल्यामुळे ‘गुलाबो सिताबो’कडूनही अपेक्षा होत्या आणि त्यांनी दर्दी प्रेक्षकांना अजिबात निराश न करता एक अप्रतिम सिनेमा दिला आहे.

अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना या सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये आहेत. ७८ वर्षांचे मिर्झा आणि तिशीचा बांके या त्या भूमिका. मिर्झाची त्याच्याहून १७ वर्षांनी मोठी बेगम ही फातिमा महल या हवेलीची मालकीण आहे. तरूणपणी हवेलीवरच्या प्रेमापोटी ती आपल्या प्रियकराला नाकारून मिर्झासारख्या घरजावई व्हायला तयार झालेल्या भणंग माणसाशी लग्न करते. तर एवढी मोठी हवेली बघूनच मिर्झा तिच्याशी लग्न करतो. आता हवेलीची, बेगमची आणि मिर्झाची, सगळ्यांचीच रया गेली आहे. बेगमला तर आपण मिर्झाबरोबर पळून जाऊन लग्न केलं की सगळ्यांसमोर विधीवत लग्न केलं हेही आठवत नाहीये. मिर्झाचंही शरीर दाद देत नाहीये, पण तो बेगमच्या मरणाची आणि हवेली आपल्या नावावर होण्याची वाट बघतो आहे. पण तो इतका चिंधीचोर आहे की या हवेलीत राहणाऱ्या भाडेकरूंच्या घरासमोरचे बल्ब, सायकलची घंटी काढून विक, त्यांच्या चादरी पळवून वापर असं करून जगतो आहे. एकाच हवेलीत राहून बेगम त्याला जराही धूप घालत नाही.

या हवेलीत राहणारे भाडेकरू आणि त्यांचा म्होरक्या बांके हा या सगळ्या नाट्यातला आणखी एक पैलू. वडील गेल्यामुळे सहावीत शिक्षण सोडलेला बांके गिरणी चालवून आपल्या आई आणि तीन बहिणींचा चरितार्थ चालवतो आहे. तो घरी मायक्रोवेव्ह आणू शकतो पण मिर्झाला भाडं वाढवू देत नाही आणि जे आहे ते भाडं भरतही नाही. उलट मिर्झाला धमकावत राहतो.

मिर्झा आणि बांके यांच्यातलं भांडण वाढत असतानाच या नाट्यात पुरातत्ववाद्याचा बुरखा पांघरून राजकारण्यांचा आणि वकिलाच्या काळ्या कोटाआडून बिल्डरचा प्रवेश होतो. पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याच्या मदतीने स्थानिक राजकारण्याला ती हवेली बळकवायची आहे आणि बिल्डरलाही ती घशात घालायची आहे. मिर्झा आणि बांके या सगळ्यामध्ये असा काही खेळ खेळायला जातात की कोण कुणाच्या बाजूने आहे हेच कळेनासं होतं. या दोन्ही बाजूची मंडळी हवेली ताब्यात घ्यायला येतात तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला वयामुळे काहीच कळत नसल्याचा आव आणणाऱ्या बेगमने सगळ्यांनाच जबरदस्त असा धोबीपछाड दिलेला आहे.

लखनवी अदबशीर वागणं, दरबारी राजकारण या सगळ्याचं प्रतीक आहे ९५ वर्षांची बेगम. ती ज्या पद्धतीने सगळ्या सिनेमाला कलाटणी देते ते पाहता तीच या सिनेमाची नायिका आहे. पण सगळा सिनेमा फिरतो तो तिच्या हवेलीभोवती. त्यामुळे ही हवेलीदेखील सिनेमाची नायिका आहे. इतकी देखणी हवेली आणि तिची तितकीच देखणी मालकीण असलेली बेगम लाभूनही मिर्झासारख्या माणसाची चिंधीचोर वृत्ती काही संपत नाही. बांके तर जन्माचाच भणंग. तो त्या पद्धतीनेच जगत राहतो. त्याच्या नशिबाने धडाडी वृत्तीची एक मुलगी त्याच्यावर जीव लावून आहे. पण त्याला तिलादेखील सांभाळता येत नाही. कायदेकानू नीट माहीत असलेली, धीट, स्पष्टवक्ती अशी गुड्डी म्हणजेच बांकेची बहीण वेगळ्याच जोशात दाखवली आहे. या तीन्ही स्त्री व्यक्तिरेखा फार वेळ पडद्यावर येत नाहीत. पण आपली परिस्थिती बदलण्याची धडाडी त्यांच्यामध्ये आहे. आपल्याला काय हवं आहे हेही त्यांना नेमकं माहीत आहे. पुरूषी राजकारणाला पुरून उरण्याची धमकही त्यांच्यात आहे, हे दिग्दर्शक अतिशय तरलपणे मांडतो. इथे या नोटवर अभिषेक चौबेच्या ‘देढ इष्किया’ सिनेमाची आवर्जून आठवण येते.

‘गुलाबो सिताबो’ची पटकथा जुही चतुर्वेदी यांनी मस्त लिहिली आहे. सिनेमामधले संवाद अतिशय जिवंत आहेत. हे संवाद आणि तोडीसतोड अभिनय या दोन गोष्टींमुळे खरं तर हा सिनेमा नाही तर या सर्वसामान्य माणसांचं जगणं आपल्यासमोर उलगडत चाललं आहे असं वाटत राहतं. एका प्रसंगात बांकेला दिसतं की मिर्झाच्या खोलीत त्याच्या अंगावर आपली चादर आहे. तो खसकन ती ओढून घेतो आणि म्हणतो की ही तर माझी चादर आहे. तर शांतपणे मिर्झा म्हणतो जा, घेऊन वैसे तो दिनभर हम इसमें पादे है…हे असे संवाद कधी असतात का सिनेमात? सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यात मात्र ते सहजपणे असतात.

अविक मुखोपाध्याय यांची सिनेमॅटोग्राफी सुंदर आहे. त्यांचा कॅमेरा आपल्याला हवेलीबरोबर लखनौच्या गल्ल्या दाखवत फिरतो. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी लखनवी उर्दू कानाला अतिशय गोड वाटते. वेगवेगळ्या प्रसंगी वाजणारं शंतनू मोईत्रांचं पार्श्वसंगीत अतिशय मोहक आहे.

बेगमच्या भूमिकेत फारूख जफर, पुरातत्व अधिकाऱ्याच्या भूमिकेत विजय राज, वकिलाच्या भूमिकेत ब्रिजेंद्र काला, गुड्डूच्या भूमिकेत सृष्टी श्रीवास्तव यांनी खरोखरच धमाल केली आहे. बेरकी, भणंग, किरकिऱ्या मिर्झाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन मस्त वावरले आहेत. पण प्रोस्थेटिक मेकप करून उभं रहायचं असेल तर अमिताभ बच्चनच कशाला हवेत हा प्रश्न अलिकडच्या काळात सतत विचारला जातो, तो बरोबर आहे, असं जाणवत राहतं.  लुच्च्या, लुब्य्रा गिरणीवाल्याचं बेअरिंग आयुषमानने मस्त पडकलं आहे.

बेगमच्या वाढदिवसाचा शेवटाकडचा एक प्रसंग वगळता हा सगळा सिनेमाच नॉन ग्लॅमरस आहे. ही सगळी पात्रं नॉन ग्लॅमरस आहेत. घरातून उतरून रस्त्यावर गेलं तर अशीच्या अशी भेटतील अशी आहेत.

परिस्थितीने बेजार झालेली, मिळेल ते ओरबडून घेऊ पाहणारी, आपलं नसेल तेही आपल्याला मिळावं अशी अपेक्षा बाळगणारी, सतत दुसऱ्याला फसवू पाहणारी, वरचढ होण्यासाठी सतत संधीच्या शोधात असणारी, लालची, हावरी, लबाड अशी ही सगळी माणसं आहेत. या सगळ्या गुणांमध्ये मिर्झा आणि बांके त्या सगळ्यांपेक्षा कांकणभर जास्तच  आहेत. मिर्झा हा बेगमचा नवरा आहे, पण आयुष्यभर सिताबो बनून तिच्याच जीवावर जगला आहे तर बांके तिचा भाडेकरू पण चलाखीने आपले भाडकरूचे हक्क सांगत जम बसवू पाहणारा गुलाबो आहे. ते सतत एकमेकांना पुरून उरायला बघतात. एकमेकांना संपवायला बघतात. पण त्या सगळ्यात ते स्वतच संपतात. बेगम आणि हवेली मिळूनही मिर्झा करंटाच राहतो. बांकेचंही आयुष्य त्याहून फार वेगळं नाही.

बेगमने मिर्झाला हवेली सोडून जायला सांगताना त्याची आवडती एक खुर्ची घेऊन जायची परवानगी दिलेली असते. मिर्झा ती खुर्ची जुन्या बाजारा १५० रुपयांना विकतो आणि नंतर तीच खुर्ची अॅण्टिक वस्तूंच्या दुकानात लाखो रुपयांना विकली गेलेली दाखवली आहे. हातात असलेल्या परीसाचं मूल्य जाणून न घेता लोखंडाच्या शोधात भटकणाऱ्या माणसाची गोष्टच सुजीत सीरकार वेगळ्या पद्धतीने सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 6:25 pm

Web Title: movie review gulabo sitabo movie scj 81
Next Stories
1 ऋतुचक्र : द्यावा-पृथ्वी वैश्विक युगुल
2 प्रासंगिक : अमेरिकेतील हिंस्र वास्तव
3 निमित्त : लॉकडाऊन – एक अनुभव
Just Now!
X