पर्यटन विशेष
मंदिर पर्यटन ही आपल्या देशातली नित्याची बाब. पण ते पर्यटन केले जाते ते धार्मिक अंगाने. मंदिरांमधील शिल्पसौंदर्य, स्थापत्य या दृष्टीने पाहिलीच पाहिजेत अशी भारतातली ही पाच महत्त्वाची मंदिरे-

अवघा भारत देश हा मंदिरस्थापत्याने श्रीमंत आहे. कुठल्याही राज्यात जावे तिथे एखादे तरी देखणे, सुंदर मंदिर आपले स्वागत नक्कीच करेल. प्राचीन भारतात मंदिरस्थापत्य बहराला आलेले होते. प्रत्येक शिल्पसमृद्ध मंदिर उभारणीमागे अनेक कलाकारांनी आपले प्राण ओतलेले आहेत. त्या कलाकारांच्या पाठीशी बलाढय़ राजसत्ता उभ्या होत्या, त्यामुळेच हे देखणे वैभव आजही आपल्यासमोर मोठय़ा दिमाखात उभे आहे. मंदिरामागे दडलेले रहस्य, त्यावर केलेले शास्त्रीय प्रयोग, त्यावरील विविध मूर्ती आणि शिलालेख आणि त्यातून उलगडणारे इतिहासाचे पदर हे सगळे जाणून घेण्यासाठी अभ्यासक असायची गरज नाही. फक्त चौकस दृष्टी आणि फिरायची आवड असायला हवी. असे जमले की हा अवघा देश फिरून संपणार नाही इतका खजिना आपल्या इथे वसलेला आहे. एवढय़ा सगळ्या संपत्तीमधून निवडक पाचच हिरे उचलून काढणे अतिशय अवघड आहे. परंतु त्यातही आपल्या शैलीमुळे, त्यावरील शिल्पांमुळे, काही खास वैज्ञानिक प्रयोगांमुळे जी मंदिरे आयुष्यात एकदा तरी न चुकता पाहायला हवीत अशा पाच मंदिरांची मांडणी चौकस लोकांसमोर मांडायचा हा प्रयत्न.

कोणार्कचे सूर्यमंदिर

केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या बहुतेक देशांतले लोक प्राचीन काळी सूर्योपासक होते. असिरिया व बाबिलोन या प्राचीन देशांतसुद्धा सूर्योपासना होती. फिनिशियन लोक (पणी) सूर्याची बाल या नावाने उपासना करीत असत. इराणी लोक सूर्याला मिथ्रास (मित्र) या नावाने ओळखत. सीरियामध्येसुद्धा सूर्यमंदिराचे अवशेष दिसतात. इजिप्तमध्ये सूर्याला रा किंवा कोसिरीस अशी दोन नावे होती. इजिप्तमध्ये शिलालेखांवर अनेक ठिकाणी सूर्यचिन्ह कोरलेले आढळते. ग्रीस देशात सूर्याला आरेस, होलीओस आणि अपोलो अशी नावे होती. सूर्य माणसाला रोगराईपासून वाचवतो अशी ग्रीकांची ठाम भावना होती. ग्रीक लोक पुढे जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपल्याबरोबर सूर्योपासनाही नेली.

भारतीयांमध्येदेखील सूर्य उपासना पूर्वापार असली तरी सूर्य मंदिरं फारच थोडी आढळतात. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा राज्यात असलेल्या कोणार्कचे सूर्यमंदिर म्हणजे खरे तर एक रहस्यच म्हणावे लागेल. अतिशय देखण्या आणि अत्यंत शिल्पसमृद्ध असलेल्या या मंदिराशी अनेक कथा, दंतकथा निगडित आहेत. अगदी मंदिरबांधणीशी, त्याच्यावर असलेल्या अनेक कामशिल्पांशी आणि मंदिराच्या पडझडीशी निगडित विविध कथा इथे सांगितल्या जातात. त्यातल्या काही ऐतिहासिक आहेत. त्यांचे पुरावे, दाखले आजही मिळतात. तर काही गोष्टी या दंतकथा या सदरात मोडतात. आणि म्हणूनच हे मंदिर म्हणजे खरोखरच एक रहस्यमय वास्तू होऊन जाते. अनेक कथांना पुराणातले दाखले दिले जातात, तर काही कथा या सांगोवांगी आलेल्या जाणवतात. एक गोष्ट मात्र निश्चित की या भव्य मंदिराची निर्मिती करणाऱ्या त्या अनेक कलाकारांनी आपल्या जीवाचे रान करून, आपले पंचप्राण आपल्या कलेमध्ये ओतून ही वास्तू घडवली आणि म्हणूनच आज एवढी पडझड होऊनसुद्धा या मंदिराची भव्यता, देखणेपणा आणि त्यावरील कलाकुसर ही केवळ अद्वितीय आहे हे जाणवते. इतके सुंदर, इतके देखणे आणि इतके भव्य मंदिर अवघ्या भारतवर्षांत सापडणे तसे दुर्मीळच. खरे तर या मंदिराची अधिष्ठात्री देवतासुद्धा सूर्य ही काहीशी निराळीच समजायला हवी. शिव, विष्णू, देवीची असंख्य मंदिरे आपल्याला सर्वत्र आढळतात. परंतु कोणार्कचे सूर्यमंदिर हे अर्थातच दुर्मीळ प्रकारात मोडते. कोणार्क या शब्दाचा अर्थ कोनामधील अर्क असा अगदी सरळसोट आहे. अर्क म्हणजे सूर्य. आणि कोनात अर्थात एका कोपऱ्यात असलेले सूर्याचे मंदिर म्हणून कोणार्क! हे मंदिर कोणी बांधले याबद्दल प्रचलित असलेली पुराणकथा म्हणजे हे मंदिर कृष्णाचा मुलगा सांब याने बांधले. कृष्णाने दिलेल्या शापामुळे सांबाला कुष्ठरोग झाला. त्यांचे परिमार्जन करण्यासाठी त्याला सूर्याची १२ वष्रे उपासना करायला सांगितली होती. सूर्याच्या उपासनेमुळे सांबाचे कुष्ठ गेले आणि त्याचे देखणे रूप त्याला परत प्राप्त झाले. आपल्यावर उपकार केलेल्या त्या सूर्यदेवाप्रति श्रद्धा म्हणून सांबाने इथे सूर्याचे भव्य मंदिर चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर बांधले. एक भव्यदिव्य वास्तू सांबाने उभी केली. मंदिरात मूर्ती सूर्याचीच हवी. सांबाला सूर्यानेच दृष्टांत दिला. त्यानुसार जवळच असलेल्या चंद्रभागा नदीमध्ये दोन हातांत कमलपुष्प घेतलेली देखणी मूर्ती सांबाला मिळाली. तीच सूर्यदेवाची मूर्ती मग सांबाने या भव्य मंदिरामध्ये प्रस्थापित केली. परंतु सूर्यदेवाची पूजा-आराधना कशी करायची याची काहीच माहिती इथल्या ब्राह्मणांना नव्हती. म्हणून सांबाने शाकद्वीपातून म्हणजेच आजच्या इराणमधून सूर्योपासक असलेल्या ‘म-ग’ अथवा मागी ब्राह्मणांना इथे पाचारण केले. नुसते पाचारण केले नाही तर त्यांचे लग्न इथल्या भोजक कन्यांशी लावून दिले. मग ही मंडळी त्यानंतर इथेच स्थायिक झाली.

ही झाली दंतकथा. पण इतिहास काय सांगतो ते बघू या. इतिहासातील पुराव्यांनुसार हे मंदिर गंगवंशीय राजा नरसिंहदेव याने इ.स. १२७८ साली बांधले. त्यासाठी १२०० कारागीर सलग १६ वर्षे खपत होते. राजाने ३६ कोटी रुपये हे आपले १२ वर्षांचे उत्पन्न या मंदिरनिर्मितीसाठी खर्च केले. परंतु ‘मादला पांजी’ या जगन्नाथपुरीच्या भूर्जपत्रावर असलेल्या नोंदीनुसार इ.स.च्या नवव्या शतकात पुरंदर केसरी या राजाने कोणार्क देवासाठी म्हणजेच सूर्यासाठी हे मंदिर बांधले. पुढे नरसिंहदेवाने या केसरी राजवटीचा पराभव केला आणि आधीच्या मंदिरासमोर एक नवीन मंदिर उभे केले. आधीच्या मंदिरातली सूर्याची मूर्ती काढून ती आपण बांधलेल्या नवीन मंदिरात प्रस्थापित केली. अशाच आशयाची नोंद अकबराच्या दरबारातील अबुल फजल याने आपल्या ऐने अकबरी या ग्रंथात केलेली आढळते. कोणार्कच्या सूर्यमंदिरात मुख्य गाभारा आता शाबूत नाही. त्याचे काही अवशेष मात्र पाहायला मिळतात. मंदिराच्या बाह्यंगावर दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या तीन दिशांना सूर्याच्या केवळ अप्रतिम, देखण्या मूर्ती कोरलेल्या आहेत. देवाच्या गुडघ्यापर्यंत धोतर दिसत असून पायात बूट आहेत. ते बूट गुडघ्यापर्यंत वर आलेले स्पष्ट दिसतात. मग/मागी ब्राह्मणांच्या सूर्यमूर्तीचा उल्लेख या पूर्वी आलेला आहेच. हीच ती वैशिष्टय़पूर्ण अशी बूट घातलेली सूर्यप्रतिमा ज्याला उदिच्च वेशातील सूर्यप्रतिमा असेही संबोधले जाते. त्यालगत असणारे सभागृह ज्याला ओडिशामध्ये जगमोहन असे म्हणतात, ते मात्र मोठय़ा दिमाखात उभं असलेलं दिसतं. १०० फूट लांबी रुंदी असलेला हा जगमोहन जवळजवळ १३० फूट उंच आहे. जगमोहनासमोरच काही अंतरावर अत्यंत आकर्षक असा भोगमंडप आहे. देवाच्या समोर भजन, कीर्तन, नृत्य आदी कला सदर करून देवाचे मन रमवले जाते. आणि या कलेद्वारे देवाची सेवा केली जाते. त्याला म्हणायचे रंगभोग. हा रंगभोग सादर करण्यासाठी एक अख्खा मंडपच उभारलेला आहे. अनेक कलाकार इथे एकाच वेळी देवाची कलेद्वारे सेवा करू शकतील अशा रीतीने बांधलेल्या या जागेला रंगमंडप किंवा भोगमंडप असे म्हटले जाते. कोणार्क इथला भोगमंडप १३ ते १४ फूट इतक्या उंच पीठावर बांधलेला आहे. याच्या सर्व बाजूंना विविध नृत्यांगना नृत्य करत आहेत, विविध वादक वाद्ये वाजवीत आहेत असे शिल्पांकित केलेले आहे. संपूर्ण मंदिर हा एक भव्य रथ आहे अशी कल्पना करून या सर्व गोष्टींची निर्मिती केली गेली आहे. म्हणूनच इथे रथाची भव्य चाके तसेच घोडेसुद्धा पाहायला मिळतात.

या रथाला उत्तर आणि दक्षिण बाजूंना बारा बारा मोठी चाके आहेत. आणि पूर्वेला सात घोडे जोडले आहेत. बारा चाके हे बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात तर एकूण २४ चाके ही वर्षांत येणाऱ्या चोवीस पंधरवडय़ांचे प्रतिनिधित्व करतात. या मंदिराचे प्रत्येक चाक हे वैशिष्टय़पूर्ण घडविलेले आहे. या प्रत्येक चाकाचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे. भरपूर वेळ या प्रत्येक ठिकाणी दिला पाहिजे. कारण या प्रत्येक चाकावरील शिल्पकाम वेगवेगळे आहे. नऊ फूट व्यास असलेल्या या चक्रांना आठ आरे आहेत. ते दिवसाच्या आठ प्रहरांचे प्रतीक आहेत. एक चक्र म्हणजे पूर्ण दिवस आणि तो दिवस आठ प्रहरांमध्ये विभागाला गेलेला आहे. तीन तासांचा एक प्रहर होतो. आणि म्हणून आठ प्रहरांचा एक दिवस इथे प्रत्येक चाकावर दाखवला आहे. दोन मोठय़ा आऱ्यामध्ये अजून एक छोटा आरा कोरलेला आहे. म्हणजे तो आरा अर्धा प्रहर म्हणजे दीड तास दाखवतो. मोठा आरा आणि छोटा आरा यांना जोडणाऱ्या वर्तुळ खंडावर तीस छोटे मणी कोरलेले आहेत. याचाच अर्थ हा दीड तासाचा म्हणजे ९० मिनिटांचा काल ३० मण्यात म्हणजे तीन मिनिटांच्या एका मण्याने दाखवला आहे. हे सर्व इतक्या बारकाईने का बरे दाखवले असेल, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण त्याचे उत्तरसुद्धा इथेच आहे. या रथचक्राच्या अक्षाशी काठी धरली की तिची सावली ज्या ठिकाणी पडते त्यावरून दिवसाची वेळ समजते. मोठय़ा आकाराच्या त्या ३० मण्यांमुळे अगदी मिनिटापर्यंत वेळ समजते. मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणाभोवती एक उंच तट असून त्याला तीन दिशांना तीन महाद्वारे आहेत. पकी पूर्वेकडील महाद्वाराच्या दोन बाजूंना असलेले दोन अक्राळविक्राळ सिंह हे प्रचंड मोठय़ा हत्तींवर झेप घेतना दाखवले आहेत. तर उत्तरेकडील महाद्वाराजवळ दोन मोठय़ा आकाराचे हत्ती उभे दिसतात. दक्षिण दरवाजाजवळ दोन अतिशय देखणे अश्व उडी घेतानाच्या मुद्रेत आहेत. या सर्व शिल्पांची भव्यता आणि प्रमाणबद्धता पाहून केवळ आश्चर्य वाटते. इथली खासियत अशी की हे शिल्पकाम भव्य असले तरी त्यावरील कलाकुसर ही अत्यंत नाजूक आणि सुंदर केलेली आहे. बास रिलीफ या तंत्राचा मुबलक वापर, भव्य आकाराची देवदेवतांची, अप्सरांची आकर्षक आणि देखणी शिल्पं हे या मंदिराचे ठळक वैशिष्टय़ ठरते.

कोणार्कच्या सूर्यमंदिरावर अगणित शिल्पे कोरलेली आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अशी कोणतीही जागा मोकळी सोडलेली दिसत नाही की ज्यावर शिल्पकाम केलेले नाही. आणि शिल्पांमध्ये विविधता तर एवढी आहे की अनेक विषयांवर इथे शिल्पकाम केलेले दिसते. पशू, पक्षी, झाडे, पाने, फुले हे तर आहेतच. परंतु त्याचबरोबर युद्धप्रसंग, विविध मिरवणुका, माणसाच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील प्रसंग हे सुद्धा इथे कोरलेले आढळतात. यात्रेकरूंना घेऊन धावणाऱ्या बलगाडय़ा इथे दिसतात तर कोणी थकलेले पांथस्थ झाडाखाली विश्रांती घेत असल्याचे दाखवले आहे. त्याचसोबत पायात उंच टाचांचे सॅण्डल घातलेली स्त्री, खांद्याला पर्स लटकवलेली स्त्री अशी सध्या आधुनिक वाटणारी शिल्पेसुद्धा त्या काळात कोरली गेली आहेत. समुद्रमाग्रे होणारा व्यापार आणि त्यासोबत येणारे देशोदेशीचे व्यापारी, प्रवासी यांचे अंकन मूर्तीच्या रूपाने केलेले इथे बघायला मिळते.

अनेकदा ही भव्यदिव्य मंदिरे कोणी बांधली यांचा काहीही पुरावा कुठेही सापडत नाही. परंतु या मंदिराच्या उभारणीत ज्यांनी योगदान दिले त्या थोर कलाकारांची नावे उपलब्ध आहेत. मंदिरासंबंधी उपलब्ध झालेल्या काही भूर्जपत्रांवरील हस्तलिखितांमध्ये हे उल्लेख सापडतात.

‘मादला पांजी’ या पुरीच्या भूर्जपत्रावरील नोंदी आणि ‘बय चकडा’ हे ७३ पाने असलेले भूर्जपत्रावरील हस्तलिखित यावर मोठा प्रकाश टाकते. सर्व स्थापत्याचा आणि रचनेचा जो कर्ता होता त्याचे नाव सदाशिव सामंतराय महापात्र. यानेच मुख्य मंदिराच्या पश्चिम कोष्ठामधील पूषण सूर्याची प्रतिमा घडवली आणि महत्त्वाचे म्हणजे मुख मंदिरातील उपास्य देवता महाभास्कराची प्रतिमासुद्धा यानेच स्वत:च्या हाताने घडवली. दुसरे नाव स्थपतीचे येते आणि ते म्हणजे गदाधार महापात्र. त्याला शिल्पीनायक अशी पदवी होती. तर गंगा महापात्र हा मूर्तीचा प्रमुख होता. त्याला पदवी होती पथरिया पर्याग कुलनायक. नारायण महापात्र हा प्रख्यात मूíतकार होता तर विश्वनाथ महापात्र हा इतर शिल्पे आणि कथनशिल्पे घडवण्यात वाकबगार होता.

विरूपाक्ष मंदिर हम्पी

हम्पीमधील भव्यदिव्य आणि महत्त्वाचे ठिकाण म्हणजे विरुपाक्ष मंदिर. महाकूट पर्वताच्या बाजूने आपण येत असताना एकदम आपल्या डोळ्यासमोर या मंदिराचे भव्यदिव्य गोपूर नजरेस पडते. तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तीरावर बांधलेले हे रमणीय शिवालय. पर्यटक आणि श्रद्धाळू अशा दोन्ही संप्रदायांच्या लोकांची इथे गर्दी असते. हम्पी हे तीर्थक्षेत्र असल्याचे जे सांगितले जाते, ते या मंदिराच्या प्राचीनत्वामुळे. प्राचीन मंदिर म्हटले की त्या स्थानाबद्दल दंतकथा आल्याच. अशीच एक सुंदर कथा या ठिकाणाबद्दल सांगितली जाते. देवी पार्वती या ठिकाणी जन्माला आली तिचे नाव होते पम्पा. हम्पी हे नावसुद्धा पम्पा या प्राचीन नावाचाच अपभ्रंश आहे. तसेच इथे वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीचे पूर्वीचे नावदेखील पम्पा असेच होते. तर देवीला शिवाशी लग्न करायचे होते परंतु महादेव आपल्या तपश्चय्रेत मग्न. त्यांना प्रसन्न करण्यासाठी तेवढीच कठोर तपश्चर्या केली पाहिजे, असे ठरवून देवी पम्पा (पार्वती) या नदीच्या पलीकडील तीरावर तपश्चय्रेला बसली. त्या ठिकाणी आजही पम्पा देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. शिवाला जेव्हा या पार्वतीच्या कठोर व्रताचा बोध झाला तेव्हा महादेव प्रसन्न झाले आणि याच ठिकाणी शिव-पार्वतीचा विवाह पार पडला. तो विवाह ज्या ठिकाणी पार पडला त्याच ठिकाणी हे विरूपाक्ष ऊर्फ पम्पापतीचे मंदिर बांधले गेले, अशी ठाम समजूत स्थानिक लोकांमध्ये आजही आहे. आजही स्थानिक लोक विवाह करण्यासाठी या पवित्र स्थानी येतात. या मंदिरामध्ये आजही विवाह समारंभ केले जातात. शिव आणि पम्पाचा विवाह सोहळा दर वर्षी डिसेंबर महिन्यात इथे खूप मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. देशभरातून भक्तमंडळी या उत्सवासाठी हम्पी इथे येतात.

हम्पी इथे मिळालेल्या काही शिलालेखानुसार हे मंदिर इ. स. च्या ९-१० व्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. विजयनगर साम्राज्य इथे स्थापन होण्यापूर्वीपासून अगदी छोटे असे हे मंदिर होते. कालांतराने भरभराटीला आलेल्या विजयनगर साम्राज्याच्या विविध राजांनी या मंदिराला सध्याचे हे भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करून दिले. हा विस्तार करताना विविध मंडप, गोपुरे, स्तंभ, अनेक स्तंभ असलेली सभागृहे, ध्वजस्तंभ, दीपस्तंभ आणि मोठे असे भोजनालय इथे बांधले गेलेले पाहायला मिळते. होयसळ तसेच चालुक्य राजांनीसुद्धा इथे काही प्रमाणात बांधकाम केल्याचे सांगितले जाते. बरेचसे जीर्णोद्धाराचे काम हे इ.स. च्या १९ व्या शतकात केले गेले. मंदिराच्या छतावरील रंगकामसुद्धा १९ व्या शतकात केल्याचे सांगतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे येताना आपण रुंद अशा रथमार्गावरून प्रवेश करतो. सध्या याला हम्पी बाजार असे म्हटले जाते.

पूर्वाभिमुख असलेल्या उत्तुंग अशा गोपुरातून मंदिरात प्रवेश करता येतो. १६० फूट उंच आणि नऊ मजल्यांचे हे गोपूर म्हणजे हम्पीची शान आहे. नऊ थरांपकी पहिले दोन थर दगडी असून वरचे थर हे विटांचे बांधलेले आहेत. याच्या प्रत्येक भागावर मूर्तिकला सादर केलेली दिसते. भरभराटीला आलेले मंदिरस्थापत्य आणि अत्यंत सुबक अशी मूर्तिकला या गोपुरावर आपल्याला पाहायला मिळते. कृष्णदेवराय या हम्पीच्या लोकप्रिय राजाने या गोपुराचा जीर्णोद्धार १६ व्या शतकात केला. गोपुरावर पहिल्या दोन थरांत अतिशय देखणी शिल्पे पाहता येतात. अत्यंत सुबक आणि सुंदर अशी मिथुनशिल्पे या ठिकाणी शिल्पित केलेली पाहायला मिळतात. सबंध गोपूर पाहायचे असेल तर काही अंतर लांब जावे लागते तेव्हाच संपूर्ण गोपूर दिसू शकते. खास द्राविड पद्धतीचे उंच उंच होत जाणारे गोपूर, कितीही वेळ पाहिले तरी समाधान होत नाही असे आहे.

गोपुरातून प्रवेश केल्यावर आपण पहिल्या प्रांगणात येतो. इथेच आत १०० खांब असलेला भव्य असा सभामंडप दृष्टीस पडतो. तसेच एक मोठी बावडी (विहीर), कल्याणमंडप या वास्तू इथे उभ्या असलेल्या दिसतात. १०० खांबी सभामंडपाच्या जवळूनच जाणारा एक छोटा रस्ता मंदिराच्या स्वयंपाकघराच्या दिशेला जातो. गोपुरातून आत आले की डाव्या बाजूला किंचित खाली एका छोटय़ाशा खोलीत एक अप्रतिम शिल्प ठेवलेले आहे. सूर्याचे ते शिल्प मुद्दाम थांबून पाहण्याजोगे आहे. दोन्ही हातात कमळ धारण केलेले, मस्तकी करंडक मुकुट, गळ्यात विविध हार, वैकाक्षक हा दागिना, जानवे, कमरेला मेखला, पायात पादांगद अशी अतिशय देखणी चार फूट उंचीची सूर्याची मूर्ती आपल्याला जागीच खिळवून ठेवते. खास दक्षिणी शिल्पकलेचा हा अजोड नमुना मंदिरात प्रवेश केल्या केल्याच आपल्याला पाहायला मिळतो. तिथेच शेजारी तीन डोकी असलेल्या नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. ती सुद्धा वैशिष्टय़पूर्णच म्हणायला हवी. तीन डोकी असलेला नंदी हा काहीसा दुर्मीळच नव्हे काय? मंदिरात असलेली छोटीशी पोलीस चौकी इथेच उजवीकडे आहे. परदेशी पर्यटकांना या ठिकाणी जाऊन नोंदी कराव्या लागतात. दुसऱ्या गोपुराच्या दिशेला तिकीट खिडकी, पादत्राणे ठेवण्याची जागा असून तिथेच पुस्तक विक्रीचा विभागही आहे. हम्पी आणि परिसराचे नकाशे, पुस्तके, पुरातत्त्व विभागाने छापलेली पुस्तके इथे विकायला ठेवलेली असतात.

इथेच पुढे तीन थरांचे गोपूर आपले लक्ष वेधून घेते. हेच गोपूर विजयनगरचा सम्राट कृष्णदेवरायाने बांधलेले आहे. इथून आत आपला प्रवेश दुसऱ्या अंगणात होतो. पुढे आपल्याला मुख्य मंदिराच्या समोर एक उंच दीपस्तंभ, एक बलिस्तंभ आणि नंदीमंडपात विराजमान झालेल्या दोन नंदी प्रतिमा सामोऱ्या येतात. इथे चहूबाजूंना अनेक खांबांनी नटलेल्या ओवऱ्या दिसतात. त्या खांबांच्या तळाशी सिंह किंवा व्याल प्रतिमा कोरलेल्या आहेत. जणू काही या सिंहांच्या माथ्यावरच तो खांब तोलून धरला आहे, असा भास बघणाऱ्याला होतो. खांबांवर विविध प्राणी तसेच निरनिराळे प्रसंग कोरलेले पाहायला मिळतात. या सर्वाच्या मधे मधे छोटी छोटी देवकोष्ठं केलेली आहेत. हत्ती प्रतिमांनी सुशोभित अशी कक्षासने, आणि मध्ये एक मोठी चौरसाकृती भुयारी मार्गासारखी जागा इथे दिसते. या ठिकाणी एक नंदी प्रतिमा ठेवलेली आहे. इथे जमिनीखाली एक गाभारा असून तिथे जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. जवळच एक दगडी भांडे आणि मोठे वाद्य ठेवलेले दिसते.

या प्रांगणात मोठी देखणी आणि भव्यदिव्य अशी वास्तू म्हणजे इथे असलेला रंगमंडप. विविध खांबांनी नटलेला हा मंडप इ.स. १५१० मध्ये सम्राट कृष्णदेवरायाने बांधला. इथे असलेल्या शिलालेखात कृष्णदेवरायाचे या मंदिराप्रति असलेले योगदान नोंदवून ठेवलेले आहे. दोन भव्य अशा व्याल प्रतिमा दारातच आपले स्वागत करतात. पाच खणांचा आणि ३८ खांब असलेला हा मंडप मंदिराशी संबंधित विविध पूजाविधी करण्यासाठी बांधला असावा. खांबांच्या पायाशी मकर आकृती, त्यावर आरूढ असलेले योद्धे आणि त्यावर व्याल अशी काहीशी आगळीवेगळी शिल्परचना या ठिकाणी केलेली आढळते. खास विजयनगर शैलीमध्ये शिल्पांकित कोरलेली ठसठशीत उठावाची शिल्पे इथे पाहायला मिळतात. शिवाची विविध रूपे त्याचबरोबर विष्णूचे दशावतार इथे कोरलेले आहेत. मंडपाच्या मध्यभागी विविध शिल्पपट कोरलेले आहेत. पुराणातील विविध कथांवर आधारित हे शिल्पपट दिसतात. महाभारतातील एक सुंदर प्रसंग इथे कोरलेला आहे. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी अर्जुनाने घेतलेला माशाच्या डोळ्याचा वेध या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने कोरलेला दिसतो. त्यातच एक शिल्प मात्र आपले लक्ष वेधून घेते. हरिहर आणि बुक्क या विजयनगर साम्राज्याच्या संस्थापकांचे गुरू असलेले विद्यारण्यस्वामी या ठिकाणी शिल्पित केलेले आहेत. विद्यारण्यस्वामींची मिरवणूक या ठिकाणी शिल्पांकित केलेली आढळते.

नंतर आपला प्रवेश मुख्य मंदिरात होतो. मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूला चार हातांचे उंच द्वारपाल दिसतात. गाभाऱ्यात देव श्रीविरूपाक्ष शिविलग स्वरूपात विराजमान झालेले आहेत. मंदिराला सांधार प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडपाच्या दोन बाजूला दोन मुखमंडप आहेत. मंदिर परिसरात विरूपाक्षाची पत्नी पम्पादेवी आणि इतर काही लहान देवळे आहेत. मुख्य मंदिराच्या उत्तरेला पम्पा अथवा भुवनेश्वरी या विरूपाक्षाची पत्नी असलेल्या देवीचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर छोटेसे असले तरीसुद्धा शिल्पसमृद्ध आहे. मंदिराचे स्तंभ, द्वारशाखा, वितान (छत) हे अत्यंत सुबकतेने आणि विविध मूर्तीनी शिल्पांकित केलेले आहे. बाजूला काही पायऱ्या उतरून जमिनीच्या खाली एक गाभारा असून तिथे पाताळेश्वर म्हणजे शिवाचेच मंदिर आहे. तसेच दुसरीकडे नवग्रहांचे एक छोटे मंदिर दिसते.

पिनहोल कॅमेरा तंत्र

मंदिराच्या मागच्या बाजूला बाहेर पडण्यासाठी जे द्वार आहे त्याच्या अलीकडे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला अगदी न चुकता बघायची आहे. उजव्या बाजूला एक छोटीशी अरुंद खोली असून त्या खोलीच्या िभतीला चुन्याचा गिलावा दिलेला दिसतो. एका बाजूच्या समोरच्या िभतीला एक भोक पडले असून त्याच्या पलीकडे या मंदिराचे १६० फूट उंचीचे भव्य गोपूर आहे. गोपुरावरून आलेले सूर्यकिरण त्या छिद्रातून समोर असलेल्या िभतीवर पडतात. किरण छिद्रातून जाताना समोरच्या गोपुराची उलटी प्रतिकृती या पांढऱ्या िभतीवर पडलेली दिसते. भौतिकशास्त्रात असलेल्या पिन होल कॅमेरा तंत्रज्ञानाचा इथे मोठय़ा खुबीने वापर केलेला दिसतो. हे केवळ आश्चर्यच म्हणावे लागेल. तत्कालीन स्थपतींना या तंत्राची माहिती होती आणि त्यांनी ते मंदिरात वापरले आणि येणाऱ्या लोकांनी आवर्जून पाहावे अशी व्यवस्थासुद्धा करून ठेवलेली दिसते. इथे आल्यावर अगदी आवर्जून हा शास्त्रीय आविष्कार प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे असा आहे.

मंदिराच्या बाहेर आल्यावर विजयनगर साम्राज्याचे गुरुवर्य श्रीविद्यारण्यस्वामींचे एक छोटेसे मंदिर इथे आहे. या विद्यारण्यस्वामींच्या मंदिरातही पिनहोल कॅमेरा तंत्रज्ञान वापरून आतमध्ये असलेल्या एका चिंचोळ्या िभतीवर अशीच उलट प्रतिकृती पडलेली पाहायला मिळते. खूप आगळावेगळा असलेला हा शास्त्रीय चमत्कार प्रत्येकाने पाहायलाच हवा.

कोप्पेश्वर महादेव मंदिर, खिद्रापूर

कोल्हापूर जिल्ह्य़ातील खिद्रापूरचे कोपेश्वर महादेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक अजोड नमुना आहे. हे मंदिर म्हणजे वास्तुकला आणि शिल्पकला यांचा मनोहारी संगम म्हणावे लागेल. कृष्णानदीच्या तीरावर पंचगंगा-कृष्णा संगमानंतर राजतीर्थ, शुक्ल तथा मुक्तीतीर्थ असल्याचा निर्देश ‘कृष्णमाहात्म्य’ या ग्रंथात केलेला आढळतो. मुक्तीतीर्थ इथे स्वयंभू कोपेश्वराचे मंदिर असल्याचा निर्देशही या ग्रंथात केलेला आहे. याच ठिकाणी इस. ११०९ ते ११७८ या कालावधीमध्ये कोल्हापूर येथील शिलाहार राजे गंडरादित्य, विजयादित्य आणि दुसरा भोज यांनी अप्रतिम शिल्पकलेने नटलेल्या कोपेश्वर मंदिराची निर्मिती केली.

आपल्या अद्भुत अशा वैशिष्टय़ांमुळे हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वेगळे उठून दिसते. इथे गाभाऱ्यात शिविपडीशेजारीच अजून एक शाळुंका दिसते. तिची उंची किंचित शिविपडीपेक्षा उंच आहे. तिला विष्णूची प्रतीकात्मक प्रतिमा असे संबोधले जाते. याबद्दल एक आख्यायिका सांगतात. भगवान शंकरांनी आपल्या भक्तांना एक वर दिला. जो भक्त संकेश्वर इथला शंखनाथ, रायबागचा बकनाथ आणि खिद्रापूरचा कोपनाथ या तीनही शिविलगांचे दर्शन एकाच दिवसात करील त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल!! शिवाच्या भक्तांची संख्या स्वर्गात वाढायला लागली. अर्थातच देवांना याची अडचण जाणवू लागली. त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी श्रीविष्णूंची आराधना केली. विष्णू खिद्रापूरला शाळुंकेच्या रूपात येऊन राहिले आणि त्यायोगे शिवाने भक्तांना दिलेला वर निकामी झाला. सर्वसामान्यपणे शंकराचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. परंतु इथे नंदीच नाही. शंकराने दक्षाच्या यज्ञात भाग घेण्यासाठी जाणाऱ्या सतीच्या सोबत नंदीला पाठवले म्हणून इथे नंदी नाही असे सांगितले जाते.

स्वर्गमंडप

या मंदिराचे वेगळेपण म्हणजे सभामंडपाला लागून असलेला स्वर्गमंडप होय. नेहमी गाभाऱ्याला लागूनच अंतराळ आणि त्याला लागून सभामंडप असतो. याला रंगमंडपही म्हणतात. पण इथे स्वर्गमंडप आहे. हा स्वर्गमंडप ४८ खांबांवर उभारलेला असून त्याच्या चार दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. स्वर्गमंडपाच्या मधोमध १३ फूट व्यासाचे मोकळे वर्तुळ असून त्याच्या खाली त्याच १३ फूट मापाची रंगशीला आहे. तिच्या बाजूने १२ खांब वर्तुळाकृतीत उभे आहेत. या खांबांच्या माथ्यावर अष्टदिक्पाल आपापल्या पत्नी आणि वाहनासोबत आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गमंडपाच्या रचनेत गोलाईला विशेष महत्त्व दिल्याचे दिसते. सगळ्या स्वर्गमंडपाची रचना ही वर्तुळाकार आहे. सभामंडपात मात्र चौकोनी रचना आहे. बारा खांबांभोवती तसेच रांगेत २० खांब आहेत. स्वर्गमंडप आणि गाभारा यांच्या मधे अंतराळ आहे. इथे जवळजवळ आठ फूट उंचीचे द्वारपाल दिसतात. ते अगदी नखशिखांत आभूषणांनी नटलेले आहेत.

शिल्पकलेने नटलेले हे खिद्रापूरचे मंदिर विविध प्रकारच्या मूर्तीनी नटलेले आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूने देवदेवता आणि स्त्री-पुरुषांची शिल्पपट्टी आहे. त्याला नरथर म्हणतात. त्या नरथराखाली गजथर आहे. जो एक वैशिष्टय़पूर्ण असा प्रकार आहे. गजावर आरूढ देवदेवता इथे प्रामुख्याने पाहायला मिळतात. गजथराखाली नक्षीदार पट्टीची मालिका आहे. गजथर हा आपल्या नजरेच्या पातळीत येत असल्याने मोठा मोहक दिसतो. हत्तीवर बसलेल्या देवता, त्यांची आभूषणे, त्यांच्या हातातील आयुधे, त्याचसोबत हत्तीच्या गळ्यातील अलंकार, बठक, सोंडेवरील आभूषणे यांचे अगदी बारीकसारीक तपशीलवार शिल्पांकन इथे केलेले दिसते. गाभारा आणि सभामंडपाच्या बाहेरील बाजूवर एकूण ९२ हत्ती कोरलेले दिसतात. महाराष्ट्रात तरी हत्तींचे एवढे मोठय़ा प्रमाणावर अंकन केलेले क्वचितच कुठे पाहायला मिळेल. गजथराच्या वर नरथर असून त्यावर नर्तकींच्या विविध मुद्रा शिल्पांकित केलेल्या आहेत. स्त्री सौंदर्याचे विविध बारकावे इथे दगडातून कोरून काढलेले पाहून अचंबित व्हायला होते. काही अत्यंत दुर्मीळ अशा मूर्ती खिद्रापूरच्या मंदिरावर कोरलेल्या आहेत, त्यातलीच एक आहे धन्वंतरीची. हातात कलश घेतलेल्या धन्वंतरीची मूर्ती महाराष्ट्रात तरी इतरत्र कुठेच पाहायला मिळत नाही. रती-मदन, भीम-द्रौपदी यांच्या पण देखण्या मूर्ती इथे बघायला मिळतात. त्याचसोबत वाद्य वाजवणाऱ्या विविध कलाकारांची शिल्पे अगदी जिवंत असल्याचे भासते.

असे म्हणतात की कोणतीही कला ही तत्कालीन समाजाचे प्रतीक असते. तत्कालीन समाजजीवनाचे प्रतििबब त्या त्या कलेत पडलेले अगदी प्रकर्षांने जाणवते. अंदाजे हजार वर्षांपूर्वीच्या समाजजीवनाचे आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतििबब कोपेश्वर देवालयाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे गज आणि नरथराबरोबरच अश्व, वराह, मेष आदी प्राणी तसेच आंबा, काजू, केळी, द्राक्षाचे घड अशी विविध फळेसुद्धा या मंदिरावर पाहायला मिळतात. ध्यानस्थ योगी आहेत, उत्तान सौंदर्य दाखवणाऱ्या ललना आहेत, ढगळ पोशाख परिधान केलेले विविध प्रवासी इथे दिसतात, त्याचसोबत दिगंबर साधकसुद्धा इथे कोरलेले आहेत. त्या काळच्या शिल्पकारांना जे जे काही दिसत असेल ते ते त्यांनी मंदिरावर कोरून ठेवलेले जाणवते.

सभामंडपाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. पहिले प्रवेशद्वार हे स्वर्गमंडपातून आहे. तर इतर दोन ही दक्षिण आणि उत्तर बाजूने आहेत. इथे दरवाजांना पाच द्वारशाखा कोरलेल्या दिसतात. त्या द्वारशाखांच्या पायाशी पाच द्वारपाल आहेत. ललाटबिंबावर विविध देवतांची अंकने केलेली दिसतात. दक्षिण द्वारावरील ललाटबिंबावर गणपती आहे. तर पूर्वेकडच्या ललाट िबबावर शक्ती देवता दिसते. प्रत्येक द्वारपालाच्या पायाशी एका स्वतंत्र चौकटीत व्याल कोरलेले दिसतात. व्याल आणि कीíतमुखे यांची अगदी रेलचेल या मंदिरावर पाहायला मिळते. कोपेश्वर मंदिर आणि परिसरात एकूण १२ शिलालेख मिळाले आहेत. त्यापकी एक शिलालेख संस्कृत भाषेत असून देवनागरी लिपीमध्ये आहे. देवगिरीचे यादव नृपती सिंघण याचे हे आज्ञापत्र असून कोपेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार  करून कुडलदामवाड (कुरुंदवाड), जुगुळ आणि शिरगुप्पी ही मिरज प्रांतातली गावे कोपेश्वराच्या पूजेला दान दिल्याचा यात उल्लेख आढळतो. दुसरा शिलालेख अंतराळाच्या उत्तर िभतीवर कोरलेला आहे. या लेखात कोपेश्वराची स्तुती असून त्याला कोपेश्वर, कुसुमेश्वर आणि कुटकेश्वर या नावांनी संबोधले आहे.

विविध लोककथांमधून या मंदिराचे प्राचीनत्व प्रकर्षांने जाणवते. खूप भव्यदिव्य निर्मिती केली गेली आहे, जी आज आपल्या बुद्धीला झेपतसुद्धा नाही. इतके प्रगट तंत्रज्ञान त्या काळात लोकांना अवगत होते. याचीसुद्धा प्रकर्षांने जाणीव हे मंदिर पाहताना होते. इतके सुंदर शिल्पसमृद्ध मंदिर मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे. इथे जाण्यासाठी नरसोबाच्या वाडीवरून जाणे सोयीचे ठरते. नरसोबाच्या वाडीला मुक्काम करून नंतर एका दिवसात हे मंदिर पाहून परत येता येते. हा सगळाच परिसर पाहण्याजोगा आहे.

बृहदीश्वर मंदिर तंजावूर

चोल राजघराणे ही दक्षिण भारतातली एक प्रबळ राजसत्ता होती. इ.स.च्या दहाव्या शतकात वैभवशाली असलेल्या या राजसत्तेने दक्षिण भारतावर सत्ता तर गाजवलीच पण त्याचसोबत प्रथमच आग्नेय आशियातील देशांवरसुद्धा आपल्या सत्तेचा अंमल प्रस्थापित केला. या राजघराण्यातील अतिशय कर्तृत्ववान राजा म्हणजे राजराजा चोल हा होय. त्याने दक्षिण दिग्विजय करून चेर  आणि पांडय़ यांची राज्ये तर जिंकलीच, पण त्याचबरोबर लंकेवर स्वारी करून त्यांची राजधानी अनुराधपूर उद्ध्वस्त केली आणि पोलोन्नारुव इथे नवी राजधानी स्थापली. इ.स. ९९१ च्या सुमारास राजराजाने गंग राजांचा काही प्रदेश हस्तगत केला. भारताबाहेर नौदलाच्या साहाय्याने स्वारी करून तेथील राज्ये पादाक्रांत करणारे चोल हे पहिलेच राजघराणे असावे.

चोलांच्या काळात मंदिरस्थापत्य कलादेखील बहराला आलेली होती. त्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे तंजावूर इथले बृहदीश्वर मंदिर. यालाच राजराजेश्वर मंदिर असेही म्हणतात. हल्ली तंजावूरचा उल्लेख तंजावर असा केला जातो, पण तामिळ भाषेत ते तंजावूर आहे. वूर म्हणजे गाव. इ.स. १०१० साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले. दक्षिण भारतातील तमिळ स्थापत्यकलेचा नमुना असलेले हे सर्वोत्कृष्ट मंदिर म्हणावे लागेल. चोल राजे शिवभक्त होते. त्यांनी बांधलेले हे देखणे शिवालय एका मोठय़ा प्राकारयुक्त परिसरात मोठय़ा डौलाने उभे आहे. याची गोपुरे, मंडप, आतील भव्य कळस असलेले मंदिर, त्यावर असलेले विविध शिलालेख या सर्व गोष्टींनी हे मंदिर नटलेले आहे. मंदिराचे शिखर हे भारतातील मंदिरांमधील सर्वात उंच शिखर समजले जाते. तसेच गाभाऱ्यातील शिविलग हे सुद्धा भारतातील कुठल्याही मंदिरातील शिविलगापेक्षा मोठे शिविलग आहे. चेन्नईच्या दक्षिणेला ३५० कि.मी. अंतरावर कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात वसले आहे तंजावूर. तंजावूरचा एक धागा मराठी माणसाशीसुद्धा जुळलेला आहे. तंजावूरचे भोसले घराणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचेच घराणे होय. शिवरायांचे सावत्र बंधू एकोजीराजे यांचे वास्तव्य तंजावूरला होते. आजही भोसले घराण्याचे वंशज तंजावूरला राहतात. त्यांच्या राजवाडय़ात वसलेले सरस्वती महाल ग्रंथालय हे तिथे असणाऱ्या तमिळ, तेलगु, संस्कृत आणि मराठी हस्तलिखितांसाठी प्रसिद्ध आहे. भारतातल्या प्राचीन ग्रंथालयांपकी एक असलेले हे ग्रंथालय तंजावूरचे वैभव आहे. राजराजा चोल याने आपले आराध्य दैवत असलेल्या शंकराचे बांधलेले हे मंदिर मुद्दाम पाहण्याजोगे आहे. इ.स. १०१० मध्ये पूर्णत्वाला गेलेल्या या मंदिरावर ७५० पेक्षा जास्त शिलालेख कोरलेले दिसतात. या शिलालेखांच्या वाचनातून अनेक नवनवीन गोष्टी उजेडात येण्यास मदत झालेली आहे. त्यातलेच एक म्हणजे इथे असलेल्या शिलालेखांच्या नोंदीवरून हे मंदिर बांधणाऱ्या स्थपतीचे ‘कुंजरमल्ल राजा राजा राम पेरुंथचन’ असे नाव उजेडात आले. मंदिराची उभारणी झाल्यानंतरसुद्धा अनेक वष्रे या मंदिरात काही नवीन बांधकामे केली गेल्याचे दिसते. तसेच काही पडझड पुन्हा दुरुस्त केल्याचे सुद्धा बघायला मिळते. मंदिर परिसरात असलेल्या काíतकेय, पार्वती आणि नंदीची मंदिरे ही अंदाजे १६ व्या शतकात बांधली गेली. इ.स. १८०१ च्या एका शिलालेखानुसार भोसले राजांनी सुद्धा इथे काही मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम केल्याचे समजते.

मंदिर परिसराचा विचार केला तर जवळजवळ पूर्व-पश्चिम २५० मीटर आणि उत्तर दक्षिण १३० मीटर इतके क्षेत्र या मंदिराने व्यापलेले आहे. मुखमंडप. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना. गाभाऱ्यावर असलेले डौलदार शिखर हे या मंदिराचे मुख्य सौंदर्यस्थळ म्हणावे लागेल. २०१८ फूट उंचीचे शिल्पजडित शिखर त्याला असलेल्या १६ मजल्यांमुळे कायमच आपले लक्ष वेधून घेत असते. तसेच इथे असलेली गोपुरेसुद्धा बघत बसावीत अशी आहेत. गाभाऱ्यात २९ फूट उंचीचे जवळजवळ दोन मजले व्यापतील एवढे उंच बृहद्शिविलग आहे. मुख्य गाभाऱ्याच्या बा िभतीवर विविध देवकोष्ठे असून त्यात देखण्या मूर्ती बघायला मिळतात. पूर्वेकडील िभतीवर िलगोद्भव शिव, पश्चिमेकडे विष्णू आणि शिवाची संयुक्त मूर्ती म्हणजे हरिहराची प्रतिमा, चंद्रशेखर शिव, दक्षिण िभतीवर भिक्षाटन शिव, दक्षिणामूर्ती, तर उत्तरिभतीवर अर्धनारीश्वर, गंगाधरशिवाच्या अत्यंत देखण्या मूर्ती पाहायला मिळतात. गाभाऱ्याच्या वर एक दालन असून त्यात केलेले शिल्पकाम तितकेच देखणे आहे. शिवाच्या १०८ नृत्यमुद्रा ज्याला ‘करण’ म्हटले जाते त्या त्यांच्या नावासकट कोरलेल्या आहेत. भारतीय नृत्याच्या ११ व्या शतकातील अस्तित्वाची प्रचीती या मूर्ती आपल्याला देतात. प्रगत असे नृत्य-नाटय़ शास्त्राचे जणू हे पुरावेच म्हणायला हवेत. या मंदिराचे शिखर हे वैशिष्टय़पूर्ण आहेच पण त्याचे अजून एक खास आकर्षण म्हणजे यावर सर्वात वर असलेली स्तुपी. या स्तुपीचे वजन २५ टन एवढे आहे. २५ टनाची स्तुपी २०८ फूट उंचीवर चढवायची म्हणजे निव्वळ आश्चर्य नव्हे काय? क्रेन्स नसलेल्या त्या युगात तत्कालीन स्थपतींनी घडवलेला हा चमत्कार थक्क करून सोडतो. आणि तो कसा घडवला गेला हे समजल्यावर तर त्यांच्या बुद्धिमत्तेला शरण जावेसे वाटते. हा एवढा प्रचंड दगड इतक्या उंचावर बसवण्यासाठी तीन किलोमीटर लांबीचा मातीचा भराव (रॅम्प) तयार केला गेला. आणि त्या भरावावरून हत्तीच्या साहाय्याने हा दगड तिथे नेऊन बसवला. या दगडाच्या वजनाने हे संपूर्ण मंदिर आजही अविचल उभे आहे. उपलब्ध साधनांचा अगदी उत्तम उपयोग करून काय चमत्कार घडून येऊ शकतो हे बघण्यासाठी तंजावूरला जायलाच हवे.

बृहदीश्वर मंदिरावर असलेले शिलालेख हा आणखी एक सुंदर विषय आहे. जवळजवळ ७५० शिलालेख म्हणजे जणू एक खजिनाच आहे. जसे जसे हे शिलालेख वाचले गेले तसतशी नवनवीन माहिती उजेडात येऊ लागली. उत्तर िभतीवरील इ.स. १०११ च्या एका शिलालेखानुसार तर हे मंदिर बांधण्यासाठी लागलेल्या मनुष्यबळ आणि खर्चाची जंत्रीच वाचायला मिळते. धर्मगुरू, दिवा लावणारे लोक, सुतार, नृत्यकलाकार, गायक, शिल्पकार अशा ६०० लोकांची यादी मिळते. या मंदिरावर असलेला अजून एक शिलालेख उल्लेख करण्यासारखा आहे. या शिलालेखानुसार या भागात प्रसिद्ध असलेल्या ब्राँझच्या मूर्तीच्या निर्मितीचे तंत्र कोरून काढलेले आहे! इ.स. १०१० सालच्या या शिलालेखात ब्राँझच्या या मूर्ती ‘मधुच्छिश्ट विधान’ पद्धतीने म्हणजेच लॉस्ट वॅक्स मेथड वापरून तयार केल्या जातात, असा उल्लेख आढळतो. हा शिलालेख जेव्हा वाचला गेला तेव्हा अभ्यासकांची बोटे आश्चर्याने तोंडात गेली. इतकी आधुनिक पद्धत ११व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला आपल्याकडे सर्रास वापरली जायची याचा हा पुरावा निश्चितच अभिमानास्पद आहे.

कला, स्थापत्य, मूíतकाम, शिलालेख अशा सगळ्या दागिन्यांनी नटलेले तंजावूरचे बृहदीश्वर मंदिर वैशिष्टय़पूर्ण आहे. दक्षिण भारतातील एक भव्यदिव्य मंदिर आणि आपल्या खास स्थापत्य शैलीने नटलेले हे शिवालय वेळ काढून बघण्याजोगे असे आहे.

कंदारिया महादेव मंदिर, खजुराहो.

भारतवर्षांतील एक अत्यंत देखणं मंदिर म्हणल्यावर ज्याचं नाव डोळ्यासमोर येईल ते म्हणजे मध्य प्रदेशमधल्या खजुराहो इथलं कंदारिया महादेव मंदिर! खजुराहो इथे इ.स. च्या ११ व्या शतकात चंदेल घराण्याची सत्ता होती. या राजघराण्यात एकाहून एक पराक्रमी राजे होऊन गेले. त्यातलाच एक राजा होता विद्याधर. अतिशय शूर आणि सामथ्र्यशाली राजा म्हणून त्याचा लौकिक होता. हा विद्याधर राज्यावर असताना सन १०१९ साली गझनीच्या महंमदाने याच्यावर आक्रमण केले. पण हे आक्रमण या शूर विद्याधर राजाने परतवून लावलं. महंमदाला परत गझनीला निघून जावं लागलं. परंतु पुढे तीनच वर्षांनी म्हणजे १०२२ साली महंमद पुन्हा चालून आला. विद्याधर तेव्हा कालींजर इथल्या किल्ल्यात होता. गझनीच्या महंमदाने या किल्ल्याला वेढा घातला, पण अतिशय शूर अशा विद्याधराने हा वेढा तर मोडलाच परंतु पुन्हा या महंमदाचा पराभव केला. आपले कुलदैवत असलेल्या महादेवाच्या कृपेमुळेच आपण या लढाया जिंकू शकलो, असा राजा विद्याधराचा ठाम विश्वास होता. या सर्व लढायांमध्ये मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ विद्याधराने खजुराहो इथे हे सुंदर असे कंदरिया महादेवाचे देवालय बांधले.

खजुराहो हे खरे तर मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्य़ातले एक लहानसे गाव. परंतु इथे असलेल्या एकापेक्षा एक देखण्या मंदिरांमुळे हे गाव आज जगाच्या नकाशावर आलेले आहे. चंदेल राजवटीच्या काळात इथे ८५ मंदिरे होती असे सांगितले जाते. परंतु सध्या मात्र २५ मंदिरे उभी आहेत. इथे असलेल्या मंदिर समूहाला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. कंदरिया महादेव मंदिर हे त्यातलेच एक देवालय. अतिशय देखणे आणि मंदिर स्थापत्याच्या सगळ्या खाणाखुणा आपल्या अंगावर अभिमानाने मिरवणारे हे मंदिर एकूण १०२ फूट उंच आहे. खजुराहोमध्ये असलेल्या पश्चिमेकडील मंदिर समूहातले हे सर्वात मोठे मंदिर समजले जाते. १५ फूट उंच जोत्यावर हे मंदिर उभे आहे. त्यामुळे अर्थातच मंदिरापर्यंत जाण्यासाठी एकसलग उंचच उंच पायऱ्या चढून जावे लागते. मुखमंडपावर म्हणजे पोर्चवर पाषाणातून कोरून काढलेले अतिशय सुंदर असे तोरण आपले स्वागत करते. नाजूक कलाकुसर केलेली नक्षी या तोरणावर बघायला मिळते. तोरणाच्या रूपाने शिल्पांकित केलेला देखणा कलाविष्कार बघून मंदिर पाहायची आपली उत्सुकता अजून वाढते. या तोरणासोबतच प्रवेशद्वारावर केलेली पानाफुलांची आणि काही भौमितिक रचना असलेली नक्षी मुद्दाम थांबून बघावी अशी आहे. या मंदिरसमूहात असलेल्या इतर मंदिरांपेक्षा इथले प्रवेशद्वारावरील नक्षीकाम जास्त उठावदार आणि प्रेक्षणीय आहे.

भगवान शंकरांचे वास्तव्य हिमालयातील उंच कैलास शिखरावर असते असे समजून कंदरिया महादेव मंदिरावर असलेले शिखर म्हणजे जणू काही कैलास पर्वताची प्रतिकृती करण्याचे प्रयोजन असावे असे वाटते.  कमी उंचीच्या इतर शिखरांच्या गराडय़ात असलेले हे उंच शिखर म्हणजे जणू कैलास पर्वतच, अशी भावना मंदिर बांधताना तत्कालीन स्थपतींची असावी. या मंदिरावर शिखराच्या छोटय़ा छोटय़ा अशा जवळजवळ ८५ प्रतिकृती केलेल्या आहेत. त्या सगळ्या प्रतिकृती मुख्य शिखराभोवती सर्व बाजूंनी निमुळत्या होत वर वर चढत गेलेल्या बघायला मिळतात. अशा पद्धतीच्या शिखरांना मंदिर स्थापत्यामध्ये ‘शिखरशेखरी’ अशी संज्ञा आहे.

तोरण असलेल्या मुखमंडपातून मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्यासमोर एकापेक्षा एक उंचीवर असलेले तीन सभामंडप दिसतात. आणि त्यानंतर दिसते ते गर्भगृह किंवा गाभारा. गाभाऱ्यात शिविपड बघायला मिळते. आपण जेव्हा महाराष्ट्रात शंकराची मंदिरे बघतो तेव्हा असे दिसते की गाभारा हा जमिनीच्या पातळीखाली चार ते पाच फूट आहे. पण इथले स्थापत्य काहीसे निराळे आहे. गाभारा हा मुख्य सभामंडपापेक्षाही जास्त उंचीवर आहे. गाभाऱ्याचे प्रवेशद्वारसुद्धा अतिशय नाजूक कलाकुसर असलेल्या द्वारशाखांनी मढवलेले आहे. गाभाऱ्याच्या उंबरठय़ावर सुबक असे नक्षीकाम केलेले दिसते. या ठिकाणी अजून एक विशेष बाब बघायला मिळते. ती म्हणजे गाभाऱ्याला असलेला प्रदक्षिणा मार्ग. हा मार्ग मंदिराच्या आतल्या बाजूनेच केलेला आहे. याला ‘सांधार प्रदक्षिणा मार्ग’ असे म्हटले जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात असा सांधार म्हणजे मंदिराच्या आतूनच गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालण्यासाठीचा मार्ग केलेला दिसतो. तसाच सांधार प्रदक्षिणा मार्ग इथे कंदरिया महादेव मंदिराला केलेला आहे. या मार्गावरून जाताना गाभाऱ्याच्या बाहेरच्या िभतीवर अनेक देवदेवता, नर्तक-वादक आणि अप्सरांची शिल्पे कोरलेली दिसतात. उजेड येण्यासाठी दोन बाजूंना चौकोनी गवाक्ष म्हणजे झरोके केलेले आहेत. या झरोक्यातून येणारा प्रकाश एखाद्या अप्सरेच्या अथवा देवतेच्या चेहऱ्यावर पडलेला असतो. आणि त्या नसíगक प्रकाशात त्या देवतेचा उजळलेला चेहरा बघताना तत्कालीन स्थापत्यकारांच्या कल्पनेपुढे आपण नतमस्तक होतो. कुठलीही जागा रिकामी सोडायची नाही, तिथे सुंदर अशा देखण्या मूर्ती कोरायच्या आणि मंदिर अंतर्बाह्य़ देखणे करायचे या एका ध्यासापायी त्या कलाकारांनी केलेले प्रयोग आपल्याला थक्क करून सोडतात.

मंदिर स्थापत्यासोबत त्या मंदिरावर असलेले मूíतकाम हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. इतके देखणे आणि मोठय़ा प्रमाणावर असलेले मूíतकाम दुसरीकडे कुठे क्वचितच बघायला मिळेल. कंदरिया महादेव मंदिराच्या बाह्य़भागावर अतिशय देखणे मूíतकाम केलेले आहे. या मंदिरावर असलेल्या देवकोष्ठात म्हणजेच कोनाडय़ात विविध देवदेवता, अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असे म्हणतात, अशांच्या मूर्ती आहेतच पण मुद्दाम बघाव्यात अशा अग्नी, ब्रह्मा यांच्या मूर्ती, तसेच गणपती आणि वीरभद्र यांच्यासमवेत सप्तमातृकांच्या मूर्ती हे इथले खास आकर्षण. मंदिर ही एक सामाजिक संस्था आहे. समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे प्रतििबब आपल्याला मंदिरावर बघायला मिळते. त्यामुळे खजुराहोच्या मंदिरांवर मिथुनशिल्पे, कामशिल्पे यांचे अंकनसुद्धा केलेले दिसते. कामजीवन हा मानवाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे या मंदिरांवर कामशिल्पे असावीत असा तज्ज्ञांचा अंदाज. तसेच काही तांत्रिक उपासना पद्धतींमध्ये या विषयाला प्राधान्य दिलेले दिसते. खजुराहो इथली मंदिरे ही विविध तंत्रमार्गाच्या उपासना पद्धतींशी निगडित असावीत, असे अभ्यासकांचे मत आहेत. कंदरिया महादेव मंदिराचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इथे असलेली चार पायांच्या शिवाची मूर्ती. हे काहीसे विचित्र वाटले ना? पण होय, या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे या मंदिरात असलेली ही मूर्ती जी आपल्याला इतरत्र अगदी क्वचित बघायला मिळते. खरोखरच विलक्षण आहे हे सगळे. या मूर्तीलाही चतुष्पाद विलक्षण सदाशिव असे म्हणतात. काय आहे हा प्रकार, असे कसे असेल असा प्रश्न पडणे साहजिक आहे. विज्ञान या विषयात जसा अनेक गोष्टींचा एकेक फॉम्र्युला असतो. त्या फॉम्र्युल्यावरून ठरावीक गोष्ट ओळखली जाते. जसे एच-टू-ओ हा जसा पाण्याचा फॉम्र्युला आहे तसेच ठरावीक मूर्ती या विशिष्ट संप्रदायाचा फॉम्र्युला समजल्या गेल्या आहेत. त्या मूर्तीवरून विशिष्ट संप्रदायाची ओळख होते. कंदरिया महादेव मंदिर हे शैव संप्रदायाचे मंदिर आहे. या संप्रदायाच्या विचारधारेनुसार शैव संप्रदाय चर्या, क्रिया, ज्ञान आणि योग अशा चार पायांवर उभा आहे. मग त्या चार पायांचे प्रतीक म्हणून शैव पंथियांची आराध्य देवता असलेल्या शिवाची मूर्ती ही चार पायांची दाखवतात. कंदरिया महादेव मंदिराच्या मुख्य सभामंडपात असलेल्या एका देवकोष्ठामध्ये ही मूर्ती आहे. इथे शंकराची बसलेल्या अवस्थेतील मूर्ती असून त्याचे दोन पाय मांडी घातलेल्या स्थितीत आहेत तर दोन पाय खाली सोडलेले आहेत. या विशिष्ट मूर्तीवरून आपल्याला शैव संप्रदायाची आठवण होते. शिवाच्या हातात विविध आयुधे दाखवली आहेत. मूर्ती काहीशी भग्न झालेली असली तरी इतकी वेगळी आणि विलक्षण मूर्ती हे या मंदिराचे भूषण म्हणावे लागेल. विविध मूर्तीनी अलंकृत असे हे मंदिर जसे त्याच्या स्थापत्य आविष्काराने खुलून दिसते तसेच या विलक्षण आणि अत्यंत दुर्मीळ अशा मूर्तीमुळे महत्त्वाचे झालेले आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हय़ात असलेल्या मरकडी मंदिरावर अशीच एक देखणी चतुष्पाद सदाशिवाची मूर्ती बघायला मिळते.

कंदारिया महादेव मंदिर इसवीसनाच्या दहाव्या ते १२ व्या शतकात इथे अस्तित्वात असलेल्या बलाढय़ अशा चंदेल राजवंशाची प्रतीक म्हणावे लागेल. समृद्ध आणि सशक्त राजसत्ता, आणि त्या राजसत्तांनी कलेला, कलाकारांना दिलेला आश्रय यामुळे अद्वितीय अशा मंदिरांची निर्मिती इथे झाली. राजसत्ता बलाढय़ असली आणि राजा कलेला प्रोत्साहन देणारा असला की स्थपती आणि कलाकार दगडामधून काय चमत्कार घडवतात याचे मूíतमंत उदाहरण म्हणजे कंदरिया महादेव मंदिर. कंदारिया महादेव मंदिर म्हणजे तत्कालीन राजसत्तांची आज अस्तित्वात असलेले गौरवचिन्ह आहे. हा आपला वारसा आहे, हा आपला इतिहास आहे. आज राजसत्ता अस्तित्वात नाहीत, परंतु त्यांनी निर्माण केलेले हे भव्यदिव्य स्थापत्य आज आपल्याला त्या राजसत्तांची, त्यांच्या ऐश्वर्याची, त्यांच्या कलाप्रेमाची जाणीव करून देते. आपला ठेवा, आपल्या पूर्वजांचा पराक्रम पाहून मन अभिमानाने भरून येते. भारतातल्या या पाच मंदिरांचे पर्यटन आपले अनुभवविश्व समृद्ध होण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केलेच पाहिजे असे आहे.
आशुतोष बापट – response.lokprabha@expressindia.com