एके काळी तीर्थाटनाला जाऊन आल्यावर मावंदे घालणाऱ्या भारतीय माणसाच्या पर्यटनाच्या विविध कक्षा विस्तारु लागल्या आहेत. त्याच्या धार्मिक पर्यटनाला आता वेगळी किनार तर आहेच, शिवाय तो जंगले, वन्य प्राणी बघायला, चिंब भिजायला भटकंती करायला लागला आहे. त्याच्या या बदलत्या आवडीनिवडींनुसार पर्यटन व्यवसायाची आर्थिक गणितेही बदलायला लागली आहेत.

पर्यटन हा विषय म्हटला तर हौसमौजेचा, म्हटला तर आजच्या काळात गरजेचादेखील झाला आहे. कामाच्या रगाडय़ातून दोन दिवस सुटका इतकाच हेतू न राहता एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून भटकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एकंदरीतच पैशाची वाढती आवक अनेक नवनवीन पर्याय हाताळण्याची पर्यटकांची क्षमता वाढवत आहे. आणि त्यातूनच नवनवीन ट्रेण्ड  स्थिरावताना दिसत आहेत.

पावसाळ्यात जवळच्याच एखाद्या धबधब्यावर, हिल स्टेशनवर वर्षां सहली हा पारंपरिक प्रकार हल्लीदेखील सुरू असला तरी मान्सून सहलींमध्ये होणारे काही मूलभूत बदल होताना दिसतात. कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जचे करण आनंद सांगतात की, ‘‘हल्ली अनेक जण मान्सूनमध्ये शनिवार-रविवारच्या सुट्टीसाठी कूर्ग, केरळाला पसंती देत आहेत. विशेषत: कूर्गमधील अंतर्गत भागातील एखाद्या रिसॉर्टमध्ये मचाणावर, कॉटेजमध्ये निसर्गाच्या सहवासात दोन दिवस त्यांना केवळ आराम करत घालवायचे असतात.’’ तर अनेकांना याच काळात साहसी पर्यटनाचादेखील आनंद घ्यायचा असतो आणि चेरापुंजीसारख्या ठिकाणीदेखील भटकायचे असते.

पूर्वी केरळ हे पावसाळ्यात भटकण्यासाठी फारसे लोकप्रिय नव्हते. किंबहुना अतिपावसाळ्यात केरळकडे पर्यटकांची नापसंतीच असायची. पण सध्या मान्सून भटकंतीसाठी केरळालादेखील तेवढाच अग्रक्रम मिळत असल्याचे अनेक टूर ऑपरेटर्सच्या बोलण्यातून दिसून येते. त्यामुळेच दोन दिवसांचे शॉर्ट टूर पॅकेज देत असल्याचे करण आनंद सांगतात.  याच काळातील सणासुदीमुळे शनिवार- रविवारी जोडून येणारी सुट्टी हीदेखील अशा लांबच्या टूरसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे.

याच अनुषंगाने केसरी टूर्सच्या झेलम चौबळ सांगतात, ‘‘विशेषत: केरळमध्ये पावसाळ्यात हॉटल्सच्या दरात बरीच कपात होते. तो फायदा आम्ही पर्यटकांना देतो. आणि जून ते ऑगस्ट या कालावधीतला केरळ पाहणे हे नक्कीच वेगळे असते. किंबहुना या कालावधीत मुद्दाम केरळ पाहायला पाहिजे.’’

गोवा हे पावसाळी पर्यटनासाठी नेहमीच हॉट डेस्टिनेशन राहिलेले आहे. २०१५ मध्ये गोव्यात आलेल्या पर्यटकांपैकी मान्सून कालावधीतील पर्यटकांच्या संख्येत तब्बल २२ टक्क्यांची वाढ गोवा पर्यटन महामंडळाने नोंदवली आहे. पण गोवा पर्यटन महामंडळ आता त्याच जोडीला विशेष प्रयत्न करताना स्थानिक उत्सवांना प्रमोट करताना दिसत आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सावो जावो, सानगोड्ड, चिखलकालो, पॅटोलिअनचेम फीस्ट, टॉक्साकेम फीस्ट हे सहा फेस्टिव्हल गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षण कसे राहतील याकडे पाहिले जात आहे.

थोडक्यात काय, तर केवळ जवळची मान्सूनची पिकनिक यापलीकडे जाऊन आता मान्सून पर्यटन हा घटक पर्यटन व्यावसायिकांमध्येदेखील महत्त्वाचा ठरताना दिसत आहे. आकडेवारीतच मांडायचे तर कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जच्या मान्सून पॅकेजेसमध्ये जवळपास ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

मान्सून पर्यटनाच्या जोडीनेच हमखास चलती असलेला भाग म्हणजे धार्मिक पर्यटन. खरे तर एके काळी आपले पर्यटन व्हायचे तेच मुळी धार्मिक कारणांकरिता. केवळ नवीन प्रदेश पाहायला म्हणून जाणाऱ्यांची संख्या इतिहासातदेखील फारशी सापडत नाही. पण सध्या हा घटक अतिप्रचंड वेगाने विकसित होताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात अगदी कमी खर्चातील भक्त निवास, धर्मशाळा ते हजारोंची पॅकेजेस देणारी हॉटेल्स असा सर्वच स्तरांतील पर्यटकांचा समावेश आहे. त्याला जोडून विविध सुविधा पुरवणे हे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. वैष्णोदेवीच्या यात्रेत माफक खर्चात हेलिकॉप्टरची सुविधा हे त्याचेच प्रतीक म्हणावे लागेल असे ईशा टूर्सचे आत्माराम परब नमूद करतात.

अर्थात पर्यटनातील इतर क्षेत्रांप्रमाणे येथेदेखील अनेक बदल नोंदवले जात आहेत. परदेशात वास्तव्यास असलेली मुले जेव्हा सुट्टीवर येतात, तेव्हा आपल्या पालकांना तीर्थयात्रेला नेण्याचादेखील ट्रेण्ड नव्याने रुजत असल्याचे करण आनंद सांगतात. तर एकाच कुटुंबातील अथवा दहा-बारा जणांचा क्लोज ग्रुप धार्मिक आणि साहसी पर्यटनाची जोड घालताना दिसत असल्याचे ते नमूद करतात. विशेषत: उत्तराखंडच्या भटकंतीत ग्रुपमधील ज्येष्ठ चारधामची यात्रा करतात, तर तरुण साहसी पर्यटनाचा आनंद घेतात. प्रवास एकत्र असतो, पण उद्दिष्ट वेगळे असते असाच हा काहीसा प्रकार म्हणावा लागेल.

या बाबतीत वेगळे निरीक्षण नोंदवताना झेलम चौबळ सांगतात की, ‘‘कैलास-मानस सरोवराच्या यात्रेमध्ये पस्तीस ते चाळीस या वयोगटाचे प्रमाण वाढत आहे आणि त्याचबरोबर आजी आणि नातू, आई आणि मुलगी अशा जोडय़ादेखील वाढल्या आहेत.’’ साहस आणि धार्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून ही संख्या वाढताना दिसत असल्याचे त्या सांगतात.

धार्मिक पर्यटनातील आणखी एक वेगळी बाब आत्माराम परब नोंदवतात, ती म्हणजे जसे हिंदू धर्मीय पर्यटकांची संख्या भरपूर आहे, तशीच ख्रिश्चन धर्मीयांचे प्रमाणदेखील बरेच आहे. हज यात्रा, जेरुसेलमची सफर या परदेशी टूरचे भारतातून प्रमाण बरेच वाढल्याचे ते नमूद करतात. वर्षांतून किमान चार-पाच पर्यटन कंपन्या केवळ जेरुसेलमच्या ट्रीप आयोजित करतात. विशेष म्हणजे ख्रिश्चनांबरोबरच त्यामध्ये तीन-चार तरी हिंदू असतात.

अर्थातच सरकारी यंत्रणादेखील या धार्मिक पर्यटनाकडे गांभीर्याने पाहत असल्याचे दिसून येते. रामायण सर्किट, कृष्णा सर्किट, बुद्धिस्ट सर्किट अशा महत्त्वाकांक्षी योजना या वर्षी केंद्र सरकारच्या अजेंडय़ावर असून त्यावर कोटय़वधी रुपये खर्च होत आहेत.

नेहमीच्या लोकप्रिय देवस्थानांवर तर पर्यटकांची गर्दी असतेच, पण त्याहीपलीकडे जाऊन अशा देवस्थानांच्या जवळचे दुसरे देवस्थान प्रमोट करण्याकडे अनेक राज्य सरकारांचा कल दिसून येतो. आंध्र प्रदेश पर्यटन महामंडळाने नुकतेच तिरुपतीपासून २० किलोमीटरवर असलेले कालहस्तीश्वराच्या मंदिराच्या प्रसिद्धी सुरु केली आहे.

थोडक्यात काय, तर धार्मिक पर्यटन हा कधीही खळ नसलेला व्यवसाय होत चालला आहे. एका आकडेवारीनुसार केवळ दक्षिण भारतातील पर्यटनात धार्मिक पर्यटनाचा वाटा २५-३० टक्के असल्याचे आढळून आले आहे. दुसरीकडे धार्मिक पर्यटनासाठी अनिवासी भारतीय आणि उच्चभ्रू वर्गाकडून येणाऱ्या मागणीचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढल्याचे कॉक्स अ‍ॅण्ड किंग नमूद करते. अर्थात या साऱ्याकडे पर्यटन म्हणून कितपत पाहायचे आणि श्रद्धेचा भाग म्हणून कितपत हा प्रश्न उरतोच.

गेल्या दहा वर्षांत सर्वात वेगाने विकसित झालेला पर्यटनाचा सेगमेंट म्हणजे वन्यजीव पर्यटन. अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत असलेले आत्माराम परब सांगतात की, ‘‘पूर्वीचे वन्यजीव पर्यटन हे केवळ ठरावीक अभयारण्ये आणि वाघांभोवती केंद्रित होते. पण आता त्याचा फोकस जंगलाच्या इतर घटकांवर विशेषत: पक्ष्यांवर केंद्रित होताना दिसतो. आणि महत्त्वाचे म्हणजे नेहमीच्या अभयारण्यांच्या पलीकडे विचार होताना दिसत आहे. अगदी मोराच्या चिंचोलीसारखे छोटेसे जंगलदेखील हल्ली गजबजलेले असते.’’

नव्याने या क्षेत्रात उतरणाऱ्यांची संख्या जाणवण्याइतपत वाढली आहे. अशाच प्रकारे पक्षी पर्यटन हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आठ वर्षे वैविध्यपूर्ण टूर आखणारे आदेश शिवकर सांगतात की, ‘‘केवळ पक्षी पाहणेच नाही तर पक्षी छायाचित्रण हेदेखील सध्या लोकप्रिय होत आहे. त्याहीपुढे जाऊन फुलपाखरांसाठी देखील पर्यटन होऊ लागले आहे.’’ मुख्यत: अनेक अभयारण्यांचे पर्याय खुले होणे, तेथील परवानग्या व इतर सोपस्कार सुकर होणे, छायाचित्रणातील तांत्रिक बदल या सर्वामुळे हे बदल वेगाने होत असल्याचे ते सांगातात. लिटल रण ऑफ कच्छपासून ते अरुणाचल, नागालॅण्डमधील घनदाट अभयारण्यांमध्येदेखील दळणवळणाच्या दृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध असणे हा आणखी एक परिणामकारक घटक असल्याचे ते नमूद करतात. त्याचबरोबर वन्यजीव पर्यटनामध्ये छायाचित्रणाच्या प्रगतीचा मोठा वाटा आहे. जोडीला फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी आणि नेटवर्किंग हे या वन्यजीव पर्यटनाच्या वाढीसाठी पूरक ठरल्याचे ते सांगतात.

फक्त पिकनिकसाठी न जाता निसर्गात जाऊन वेळ घालवायचा आहे अशांचा ओढा याकडे खूप मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. वेगळे काही तरी हवे आहे असे पर्यटक वन्यजीव पर्यटनाकडे वळताना अधिक दिसतात. अर्थात यात अजून संपूर्ण कुटुंबाने सामील होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी ते हळूहळू का होईना वाढताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एके काळी केवळ निसर्गप्रेमी संस्थांपुरता मर्यादित असणारे हे क्षेत्र आता चांगलेच व्यापारी आणि व्यावसायिक झाले आहे.

अर्थात वन्यजीव पर्यटनातील हे बदल निश्चितच स्वागतार्ह असले तरी या वाढीबरोबर या क्षेत्राचे नियंत्रणदेखील गरजेचे असल्याचे अनेक आयोजक सांगतात. मुळात सरकारला या क्षेत्रात नेमके किती क्षमता आहे याची जाणीव नसल्याचे या पर्यटन आयोजकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच वन्यजीव पर्यटनात अनेक गैरप्रकारांचा शिरकाव झाल्याचे दिसून येते.

थोडक्यात काय, तर नेहमीच्या सरधोपट पर्यटनाची पद्धत आता जुनीच झाली म्हणावे लागेल. जुन्यामध्ये नावीन्य येत आहे, तर नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आपला ट्रेण्ड स्थिरावत आहेत.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com