News Flash

कथा : नवं नातं

सुधा चालवत असलेल्या स्कूटरपेक्षाही तिच्या मनातील विचारांचा वेग खूप होता.

‘‘जोशी मॅड्डम तुमचा फोन हाये!’’ शिपाई सांगून गेला. पण ‘सुधा जोशी’ मॅडमना कळेना आता या वेळी कोणाचा फोन? सुधाने फोन घेतला. क्षणाक्षणाला सुधाचा चेहरा रागीट व त्रासिक दिसत होता. शेवटी ‘‘मी तिथे येऊन काय करणार आहे?’’ असा प्रश्न विचारून, तिने काहीही उत्तर न देता फोन खाली ठेवला आणि ती परत स्टाफ रूममध्ये आली. तिला येताना पाहताच स्टाफ रूममधील सर्वाच्या नजरा जणू तिला विचारत होत्या, ‘‘कोणाचा फोन?’’ पण देशपांडे मॅडमनी स्पष्ट विचारले,

‘‘कोणाचा गं फोन?’’

‘‘सासूबाईंचा होता. अण्णासाहेबांना त्रास व्हायला लागलाय, तेव्हा लौकर ये. त्या घाबरल्यात!’’ अशी पचणारी थाप मारून ती खुर्चीत मटकन बसली. ‘‘मग तू जा सरांना विचारून! तुझ्या पीरियडचं मी बघते.’’ असे म्हणत देशपांडे मॅडमनी नाकावरचा चष्मा वर करायचे निमित्त करून सुधाकडे जरा रोखूनच बघितले. ‘सुधा बरेच काही लपवत आहे,’ हे त्यांच्या अनुभवी नजरेतून सुटले नाही. सुधापेक्षा त्यांचीच, सुधाने स्टाफ रूमच्या बाहेर पडावे म्हणून घाई सुरू झाली. सुधाला वाटले, ‘खरोखर एखाद्या समंजस मोठय़ा बहिणीप्रमाणे असणाऱ्या या देशपांडे मॅडमच्या कुशीत शिरून मनसोक्त रडावे, पण निकराने तिने हा विचार झटकून टाकला आणि ती बाहेर पडण्याच्या तयारीला लागली.

सुधा चालवत असलेल्या स्कूटरपेक्षाही तिच्या मनातील विचारांचा वेग खूप होता. सासूबाईंना सुधा ‘अहो आईच’ म्हणते. त्यांनी जेव्हा रडकुंडाला येऊन फोनवरून तिला ‘‘ताबडतोब घरी ये गं’’ असे अगतिक होऊन सांगितले. तेव्हा सुधाने ओळखले नेहमीप्रमाणे ‘आनंद’ ढोसून घरात काही गोंधळ घालत असेल आणि ते पाहून अर्धागाने अंथरुणावर खिळलेल्या अण्णासाहेबांनी आरडाओरडा सुरू केला असेल. त्यात दहावीच्या परीक्षेची तयारी म्हणून ‘सीमाही’ घरात आहे. हा नुसता नावाचाच ‘आनंद’! याने मला व दोन्ही मुलांना तर नाहीच, पण जन्मदात्या आईवडिलांनाही आनंद दिला नाही. समाधान तर लांबच! एकुलता एक म्हणून आईवडिलांनी लाडात वाढवला आणि हा वाहवत गेला.

एव्हाना सुधा घराजवळ आली. बंगल्याचे गेट उघडून ती आत आली. बंगल्याचे दार लावले होते. बाहेरच्या खोलीतून सीमाचा रडण्याचा आवाज येत होता. सुधाचा हात सवयीनुसार ूं’’ ुी’’ कडे गेला. तेवढय़ात तिच्या कानावर रडतरडत सीमाचे बोलणे आले. ती आजीला अत्यंत अगतिकपणे म्हणत होती, ‘‘आजी, तू उगीच आईला फोन केलास. आता ती आली की तिचे व बाबांचे भांडण होणार!’’

‘‘गप गं तू! तू लहान आहेस, तुझी आई आल्यावर मला म्हणेल, ‘आई, मला का नाही फोन केलात? मग मी तिला काय उत्तर देणार? तू गप! तुला नाही काही कळत.’’ आजी.

‘‘असं का गं आज्जी तू मला सारखं म्हणतेस? मला आता सर्व कळते. आई-बाबांची भांडणे ‘तिच्यावरून’ होतात. ‘ती’ पुण्याला असते. बाबा तिकडे जातात हे आईला आवडत नाही आणि मलाही!’’ सीमाच्या आवाजातील अगतिकता जाऊन चीड निर्माण झाली. ‘‘हळू बोल बाई! त्या खविसाने ऐकले की तुला दोन लाफे ठेवून देईल.’’ ‘‘आजी, देऊ देत. सहा महिन्यांपूर्वी, तू व आजोबा इथे नव्हतात. तेव्हा बाबांनी आईच्या मुस्काटीत मारली. ते असेच पुण्याला निघाले होते. आईने त्यांना अडवायचा प्रयत्न केला तर तिला बाबांनी ढकलून दिले. तेव्हा आईच्या कपाळाला किती लागले होते. आईचा संताप झाला. तिने बंगल्याबाहेर जाऊन आरडाओरडा केला. सगळी कॉलनी आपल्या बंगल्यासमोर जमली होती. तरी बाबा आईला व आम्हाला तसेच टाकून निघून गेलेच. सर्वाच्या कुचेष्टेच्या नजरा व कुत्सित प्रश्न! सूरज आणि मी भांबावून गेलो. आई तर तेव्हा वेडय़ासारखी बंगल्याच्या गेटपाशी किती तरी वेळ बसली होती. शेवटी मीच देशपांडे मावशीला फोन करून कळवताच ती आली. तिनेच आईला घरात आणले. सारे आवरले. आम्हाला जेवायला घालून शाळेला पाठवले. आईची व तिची रजा त्यांच्या कॉलेजकडे पाठवली. आणि दोन दिवसांनी तुम्हाला फोन केला.’’ ‘‘माहीत आहे गं, बाई मला ते!’’ त्रासिकपणे आजी सीमाला म्हणालाी. ‘‘काय माहीत आहे? तू घरात असतेस. बाहेर, शाळेत मला व सूरजला मित्रमैत्रिणी, त्यांच्या घरचे, शिक्षक वाट्टेल ते प्रश्न विचारतात. म्हणून  मला हल्ली कोणत्याच मैत्रिणीकडे जावेसे वाटत नाही. साऱ्या गावात आपल्याच घरची चर्चा चालते.’’ सीमा वैतागून वैतागून बोलत होती.

‘‘लोकांना काय लष्कराच्या भाकऱ्या भाजायची सवयच असते,’’ आजी. ‘‘अगं आजी झालंय असं, आजोबा आपल्या शहरातले प्रसिद्ध वकील, तू त्या काळातली मॅट्रिक झालेली बाई, बाबा इंजिनीअर, आई कॉलेजवर प्राध्यापक, मग चर्चा का होऊ नये? आजोबांनी बांधलेला हा बंगला! याऐवजी आपण जर झोपडपट्टीत राहत असतो तर कोणीच नावे ठेवली नसती,’’ सीमा. ‘‘सीमा, बास झालं हं! लहान तोंडी मोठा घास नको.’’ आजी सीमावर डाफरली. ‘‘शेवटी तुम्ही आम्हाला असेच म्हणणार? मला तर वाटते, बाबांच्या आधी आपणच लांब कुठल्या तरी होस्टेलला जाऊन राहावे. म्हणजे रोज उठून हा तमाशा  पाहणे नको.’’ सीमा फुरंगटून म्हणाली.

‘‘सीमा, बास झाले! मुकाटय़ाने तू तुझ्या खोलीत जाऊन अभ्यास कर बरं!’’ आजी. ‘‘काय फरक पडणार आहे, घरात हे असं असल्यावर अभ्यास तरी कसा होणार? आई आली की तिचा व बाबांचा आरडाओरडा, भांडण सुरू होणार. आई बाबांना अडवणार, आजोबा जोरजोराने रडणार, बाबांच्यामुळे आजोबांना अर्धागवायूचा झटका आला ना?’’ सीमाने आजीला खडा सवाल केला. ‘‘अगं, पण आता सारखे तसे म्हणून चालते का? त्यांच्या नशिबी हा भोग आहे. कधी हा ‘आनंद’ सुधारणार देवा?’’ आजी रडकुंडीला आली. ‘‘ते कसले सुधारतायत! आजी, मी तर परवा ऐकलं, आई आता बाबांकडून घटस्फोट घेणार आहे. आणि हे घर सोडून जाणार आहे’’ सीमा अगतिकपणे म्हणाली.

‘‘माहीत आहे गं! नको ते पाहणे, ऐकणे माझ्या नशिबी आलेय,’’ आजी. ‘‘आजी, मग मला व सूरजला कोण सांभाळणार?’’ इतका वेळ चुरूचुरू बोलणाऱ्या सीमाचा स्वर कातर झाला.

दाराशी उभ्या असलेल्या सीमालाही ऐकवेना. तिने कॉल बेल दाबली. सासूबाईंनी दार उघडले. सीमा तिच्या खोलीत पळाली. अण्णासाहेबांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. ‘अहो आई’ कोचावर अगतिकपणे बसल्या होत्या. सुधा बाथरूममध्ये गेली, विशेष म्हणजे कोणाशीही न बोलता सुधा थेट बाथरूममध्ये गेली. दहा-पंधरा मिनिटांनी तोंड धुऊन बाहेर आली. तिचे रडून लाल झालेले डोळे आईच्या नजरेतून सुटले नाहीत. एवढी मोठी करारी माणसे, पण स्वत:च्या एकुलत्या एक नादान, उनाड मुलाच्या वागण्यामुळे अगतिक झाली होती? अण्णासाहेबांनी पडल्या पडल्या सुधाकडे बघून हात जोडण्याचा प्रयत्न करून तिला ‘क्षमस्व’! म्हणण्याचा प्रयत्न केला. जणू अण्णासाहेबांनी सुधाची क्षमा मागितली.

कारण मागच्या सहा महिन्यांपूर्वी आनंदने जो प्रकार घरात केला, सुधाच्या अंगावर हात टाकला, त्या वेळी गावाहून आल्यावर अण्णासाहेबांना व आईंना सर्व प्रकार कळाला. तेव्हा त्यांनी निक्षून आनंदला बजावले, ‘‘पुन्हा असा गैरप्रकार व बेजबाबदारपणे सुधाशी वागलास तर मी तुझा बाप असून सुधाला, एका सुविद्य, सुशील प्राध्यापिकेला ‘वकील’ म्हणून कोर्टात उभा राहून तिला घटस्फोट मिळवून देईन. तेही रीतसर पोटगीसहित! मग पुढचे तुझे तू बघ!’’ आणि तेव्हा सुधानेही सांगितले होते की, ‘‘आनंद, ज्या दिवशी पुण्याला ‘तिच्याकडे’ जायला निघेल त्या दिवशी त्याच्या आधी मीच माझी बॅग घेऊन घराबाहेर पडेन.’’

आता पुढे काय घडणार याची पूर्ण कल्पना आईंना, अण्णासाहेबांना व सीमाला आली होती. आनंदला स्वत:च्या चैनीपुढे कोणाचाच विचार नव्हता. सुधा शांतपणे कोचावर आईंच्या शेजारी बसली. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना तिने पूर्ण वाट करून दिली. आईही खाली मान घालून रडतच होत्या.

दहा-पंधरा मिनिटांनी सुधा जागची उठली. सीमाच्या खोलीत गेली. अभ्यासाचे नाटक करीत असलेल्या कावऱ्याबावऱ्या झालेल्या सीमाला जवळ घेतले. दु:खाचा आवेग ओसरू दिला. सुधाने सीमाला विचारले, ‘‘बाबा कुठेत?’’

‘‘बेडरूममध्ये! त्यांची बॅग घेऊन ते निघाले पुण्याला जायला, म्हणून आजीने त्यांना बाहेरून कडी लावून, तू येईपर्यंत ‘जाऊ नको’ म्हणून आजी अक्षरश: बाबांच्या पाया पडली गं!’’ सीमा रडतरडत सांगत होती.

‘‘बरं, आता तू तुझ्या खोलीत वाचत बस, मी बघते.’’ सुधाने सीमाला सांगितले. पण तेव्हा तिला सीमाच्या डोळ्यात असंख्य प्रश्न दिसले.

सुधाने बेडरूमचे दार उघडले. आनंद आक्रमक पवित्र्यात होता. त्याच्या तोंडाला सिगारेटचा भरपूर वास येत होता. बेडरूम सिगारेटच्या वासाने भरून गेली होती. सुधाला पाहताच आनंदने एक लिफाफा तिच्या अंगावर फेकला आणि जवळजवळ ओरडूनच तो म्हणाला,

‘‘त्यात घटस्फोटाचे कागदपत्र आहेत. मी सह्य केल्यात. तुला जे करायचे ते कर, जा! मला कोण अडवतो ते मी बघतोच आता! मी माझ्या मनाचा मालक आहे. मला वाट्टेल ते मी करीन. तू कोण मला विचारणार? स्वत:ला शहाणी समजतेस. तुझा शहाणपणा तुला लखलाभ! हा मी चाललो. तुलाही जायचे तर जा; अगदी आत्ताच्या आत्ता!’’

‘‘आणि तुझ्या आईवडिलांचा काय विचार केलास?’’ सुधा

‘‘मस्त पैसा आहे त्यांच्याकडे, माणसे ठेवून ते सेवा करून घेतील. तुझी नाही कोणाला जरूर!’’ उर्मटपणे आनंद बोलत होता. तितक्याच शांतपणे सुधाने विचारले, ‘‘सीमा, सूरज यांचे काय ठरवलेस?’’

‘‘आईबाप नसलेली मुले अनाथाश्रमात राहतात की!’’ आणि तो छद्मीपणाने हसला. सुधाने ताडले की ‘काम’ हाताबाहेर गेलंय. ती बेडरूमच्या बाहेर आली. पाठमोठ आनंद बॅग घेऊन आला. खुर्चीत बसून बूट घालू लागला. न राहवून काकुळतीने त्याची आई म्हणाली,

‘‘अगं, सुधा, अडव ना त्याला!’’

‘‘अहो आई, घाबरू नका. तारुण्याकडे झुकत चाललेली दोन मुले आणि वृद्ध झालेली, रुग्णाईत दोन मुले अशी चार मुले माझ्यासारख्या ज्या ‘आई’च्या पदरात आहेत, ती ‘मी’ घर सोडूच शकत नाही. या ‘नव्या नात्याची’ मला आज या नीच पुरुषामुळे जाणीव झालीय. मी चांगली भानावर आले आहे. याला खुशााल जाऊ देत. मी तुम्हा दोघांना, माझ्या मुलांना व या घराला सोडून कधीच जाणार नाही.’’
कादंबरी देशमुख – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:14 am

Web Title: news relationship
Next Stories
1 भ्रमंती : रानातील एक दिवस
2 आवाहन : रेसिपी पाठवा 
3 प्रयोग : अंतर्मुख करणारं नाटक
Just Now!
X