लहानग्यांच्या निमित्ताने चॅनल सर्फिग सुरु झालं आणि एकेक वाहिन्या बघत लक्षात आलं की, छोटय़ा मंडळींसाठीचं एकही चॅनल आज नाही. ते का नाही हा प्रश्न कदाचित अनुत्तरितच राहील!

परवाची गोष्ट. कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान भावंडं जमली होती. थोडय़ाच वेळात त्यांना पकायला झालं. चांगल्या मराठीत यालाच कंटाळा येणं असं म्हणतात. क्रिकेट, आबाधुबीपासून पत्ते, सापशिडी, ल्युडो खेळून झालेलं. टॅब, स्मार्टफोनवरचे रंगीबेरंगी लेव्हल्स पार करायला लावणारे गेमही खेळून झालेले. दरम्यानच्या काळात एक मिनी आणि एक मोठी मारामारीपण करून झाली. मार देणारे आणि मार खाल्लेल्या दोघांनी भोकांड पसरून, जमलेल्या मंडळींचं लक्ष वेधून, आयांना दखल घ्यायला भाग पाडली. लगेचच कट्टी वगैरे झालं. थोडय़ाच वेळात बट्टीही झाली, अगदी राजकारण्यांना देखील शिकायला मिळेल असं मनोमीलन. रोज घरी टीव्ही बघताच, आज खेळा जरा, तुम्हाला नको असली तरी टीव्हीला विश्रांती द्या अशी तंबीच आयांनी देऊन ठेवलेली. त्यामुळे टीव्हीमहाराज अगदी व्याकूळ नजरेने बालगोपाळ मंडळींकडे पाहत होते. कल्ला कमी होऊन शांतता नांदावी असे वाटत असेल तर टीव्ही लावून देण्याचा प्रस्ताव समोर आला. सोसायटीच्या मीटिंगमध्ये २६ जानेवारीला सत्यनारायणाच्या पूजेनंतर मेजवानीचा बेत ठेवायच्या प्रस्तावाला आवाजी पाठिंबा मिळतो तसा मिळाला.

टीव्ही चालू करून देऊन, परिस्थितीला साजेसा चॅनेल लावण्याची जबाबदारी अस्मादिकांवर येऊन पडली. लवकरच काय बघायचं यावरून गलका उडणार याची जाणीव झाली. टीव्ही सुरू केल्यावर चॅनेल लिस्ट अ‍ॅक्टिव्हेट येईपर्यंत विचार केला- की पहिली ते आठवी वयोगटाला साजेसं कंटेट कुठल्या चॅनेलवर असेल. डोळ्यांसमोर काहीच येईना. त्यांची शाळा घेतली जाईल असं ग्यानरूपी नको पण किमान काही व्हॅल्यू अ‍ॅडिशन होईल असं कोणत्या चॅनेलवर बघायला मिळेल याची चाचपणी करू लागलो. पण ठोस असं काहीच समोर आलं नाही. बाय डिफॉल्ट लोकसभा टीव्ही लागलं आणि ‘हे नको’ असा जागर झाला. तसंही त्यावर बघण्यासारखं नव्हतंच की! टीव्ही बघणाऱ्या मंडळींच्या आजोबांच्या वयाची माणसं जोरजोरात घोषणाबाजी करत होती. कागद भिरकावत होते. त्यांनी शांत बसून काम सुरू ठेवावं हे सांगायला दुसरं माणूस होतं. बाजूचा माणूस काय बोलतोय हेही ऐकायला येणार नाही असा मासळीबाजार भरलेला. असं काही केलं तर टीचर वर्गात बेंचवर उभं करतात तासभर असं एकाने सांगितलं. आता त्याला काय सांगणार, की तुझ्या टीचरांनुसार झालं तर देशाचा वर्ग चालवणाऱ्यांना वर्षभरच संसदेत बाकांवरच उभं राहावं लागेल. लोकसभा टीव्हीला विरोध म्हटल्यावर राज्यसभा टीव्ही पाहणं शक्यच नाही, मग स्पोर्ट्स चॅनेल आले.

तिकडे क्रिकेटची मॅच सुरू होती. सिक्स-फोरची लयलूट, मग फटाके वाजत. चीअर लीडर्स धावत मेकशिफ्ट बोर्डवर नाचायला लागत. तेवढय़ात बाऊंड्रीच्या जवळ ख्रिस गेलनामक अतरंगी इसमाचा इंटरव्ह्य़ू सुरू झाला. १५ चेंडूंत ४० धावा कशा कुटल्यास विचारणाऱ्या निवेदिकेला गेलने ‘तू डेटवर यावीस, त्यासाठी तुला खूश करण्यासाठी’ असं म्हटल्यावर आमचा तोंडाचा चंबू झाला. सर्वप्रथम कॅलेंडरमधल्या आजच्या डेटकडे बघितलं आणि मग ‘अजि काही घडलेच नाही’ अशा आविभार्वात चॅनेल फिरवला. पुढच्या चॅनलवर मारिया शारापोव्हा आणि व्हिक्टोरिया अझारेन्का या सौंदर्यवती टेनिसपटूंची मॅच सुरू होती. चुरशीची होती मॅच पण अल्पवस्त्रांकित स्कर्टमध्ये वावरणाऱ्या त्या दोघींना पाहून आम्हालाही असाच शॉर्ट स्कर्ट हवा अशी मागणी झाल्यास समस्त आईवर्गाची पंचाईत होऊ शकते हे जाणून लगेच पुढच्या चॅनेलकडे वळलो. तिकडे डब्ल्यूडब्ल्यूई सुरू होतं. अंडरडेकर नावाचा भीमकाय माणूस दुसऱ्या एका माणसाला धोपटत होता. हे चॅनेल राहू दे असा जोर झाला. हे खोटं असतं, त्यांना लागत नाही, लुटुपुटूची लढाई असते; माझी शिकवणीही झाली. तेवढय़ात अंडरडेकरच्या पाठीत समोरच्याने पत्र्याची खुर्चीच घातली. ते पाहून मीही माझ्या खुर्चीत सरकलो.

हे सुरू ठेवल्यास सभोवताली रणकंदन सॉर्ट ऑफ होऊ शकतं हे ओळखून आम्ही न्यूज चॅनेल्सकडे आलो. ‘नेशन वाँट्स टू नो’ असं म्हणत एक माणूस ओरडत होता. पडद्यावरच्या १४ छोटय़ा स्क्रीन्सवर वेगवेगळ्या ठिकाणी बसलेली माणसंही काहीबाही ओरडत होती. बाबा रोज हे पाहतो आणि नको तो कचकचाट, काही देश बदलत नाही असं आई ओरडायला लागते असं बॅकग्राऊंडला ऐकायला आलं मला. तिकडून ‘आता जग बदलेल’ या आशावादी चॅनेलला आलो. मी तुमच्याकडे येतोय, मला तुम्ही सांगा, मला उत्तर द्या असं एक काका पोटतिडकीने बोलत होते. ‘या दाढीवाल्या काकांची भीती वाटते. जोरजोरात ओरडत राहिलं तर त्रास होतो शरीराला, हार्टअ‍ॅटकपण येऊ शकतो’, असं आजी म्हणते. (बाप रे!) हा वैधानिक सल्ला ऐकून त्वरेने निघालो दुसऱ्या चॅनेलकडे. अमुक अ‍ॅक्टर आणि तमुक नटी यांचा घटस्फोट झाला. अनुकरणीय, सेलेब अशा कपलला आमचे पाच सवाल म्हटल्यावर प्रश्नांची मालिकाच आली. या सवालजबाबात आपण निरुत्तर होऊ असं काही समोर येऊ शकतं हे जाणून मराठी चॅनेल्सकडे आलो. ‘हे नाहीच चालणार’ अशी बोंब झाली, आमच्या हातून रिमोट जातो की काय अशी परिस्थिती ओढवली. प्रेम, कुंडली, लग्न, सासर, माहेर यापैकी कशात तरी गुरफटलेलं पाहणार नाही, आई रोज हेच पाहात असते. तिकडे काही इमोशनल झालं की रडतेही हे सांगण्यात आलं. मग चुकूनच एम टीव्ही लागला. तिकडे रघु दिसला. तिथले कार्यक्रम नकोच ते असं म्हणून ‘इन्सॅक’वर आलो.

त्या चॅनलवर गायक हातवारे करून गात असतात. आम्ही असं काही करून गाणं म्हणायला लागलो की नौटंकी पुरे कर असं म्हणतात, असा सूर लागला. मग नॅशनल जिओग्राफिकवर आलो. जैवसाखळी कशी चालते हे वाघ हरणाची शिकार करतो या उदाहरणातून सांगत होते. शास्त्र १चा सिलॅबस आठवला. पण छानशा हरणाचे लचके तोडताना पाहणं काहींना सहन झालं नाही. पुढे सरकलो तर ‘दया तोड दो दरवाजा’ लागलेलं. एका शहरात रोज रात्री खून होत असे असं काहीसं सुरू होतं. मृतदेह, रक्त, पोस्टमॉर्टेम असलं पाहणं नको या विचारातून पुढे निघालो आणि थेट सत्संगी स्वरूपाच्या चॅनेलवर आलो. मोठा जनसमुदाय बसलेला, एक बाबाजी कर्म, फळ सिद्धान्त समजावून सांगत होते. तीन सेविका चवऱ्या ढाळायला, एक सेवक चरणाशी लीन होऊन पाय चेपत होता. इन्डोअर एसी सभागृहात चाललेला तो सत्संग पाहूनच झोप येऊ लागली. यामुळेच रिमोटवरच्या भलत्याच बटनावर हात पडला. ‘माझे केस खूपच गळायचे. पण जेव्हापासून हे तेलं मिळालं, मी सगळीकडे आत्मविश्वासाने वावरू लागलो’ या छापाची जाहिरातबाजी सुरू झाली. तूर्तास तरी ही समस्या बच्चेकंपनीच्या वाटय़ाला येणार नाही हे लक्षात घेऊन मूव्हीज सेक्शनकडे पोहचलो. बायडिफॉल्ट सूर्यवंशम लागलेला, दुसरीकडे गोलमाल पार्ट ३ लागलेला, कालिया मर्दन सुरू होता, पुढे जाववेना. शेवटी जे चॅनेल्स बघू द्यायचे नव्हते ते आले- कार्टून्स. एकाला मोटो पटलू पाहायचं होतं, एकाला डोरेमॅन, एकाला टॉम अँड जेरी, एकाला ऑगी अँड कॉकरोच बघायचं होतं. आणि मग एकच कल्ला उडला.

मनात आलं शाळेतल्या मुलांचं विश्व किती भारी असतं- पण त्यातलं काहीच प्राइम टाइममध्ये नसतं. शालेय वयातच संकल्पना समजतात, रुजतात. बालचित्रवाणी नावाचा कार्यक्रम सह्य़ाद्री वाहिनीवर सकाळी १०.४० वाजता लागतो. पण बालचित्रवाणीलाच घरघर लागलेली. तरीही गेली अनेक वर्ष शाळकरी विद्यार्थ्यांना सामील करून घेऊन हा कार्यक्रम होतो. फार ग्रेट नसला तरी शाळेतल्या मुलांसाठीचा एकमेवच कार्यक्रमच असावा हा. प्राचीन काळी ‘संस्कार’ मालिका लागायची. मोहन जोशी मुख्याध्यापकाच्या भूमिकेत असलेली ही मालिका मुलं, शाळा, त्यांचं भावविश्व यांचा सुरेख वेध घेणारी होती. जे. के. रोलिंगच्या पुस्तकावर हॅरी पॉटर चित्रपट निघतो. तो धो धो चालतो. पण आपल्या फास्टर फेणेचं रूपांतर छोटेखानी मालिकेत होत नाही. दहाबारा वर्षांपूर्वी ‘दे धमाल’ नावाची मुलांसाठीची मालिका लागायची. या मालिकेत काम करणारी अनेक मुलं आता व्यावसायिक अभिनेता, अभिनेत्री झाली आहेत. बोक्या सातबंडेही आता भुरळ घालू शकेल असं वाटत नाही. मधल्या काळात झी मराठीवर ‘मिशा’ नावाची मालिका सुरू झालेली. हषिकेश जोशी आणि श्रृजा प्रभुदेसाई असे उत्तम कलाकार होते आणि मुख्य म्हणजे मालिका लहान मुलाच्या भावविश्वावर बेतलेली होती. फार काळ चालली नाही.

‘महाराणा प्रताप’सारख्या मालिका बघून हळदीघाटची लढाई समजू शकेल असं वाटत नाही. लहान मुलांचं सारेगमप कार्यक्रमाने लोकप्रियतेचं शिखर गाठलं पण त्यानंतर या कार्यक्रमाच्या लोकाश्रयाला ओहोटी लागली. मोठय़ांच्या मालिकांमध्ये हल्ली लहान मुलं हटकून असतात. मोठय़ांपेक्षाही पल्लेदार वाक्यं, हावभाव आणि इम्पॅक्टिंग संवाद त्यांच्या तोंडी असतात. पण हे पाहून बच्चेकंपनीचा काहीच फायदा होत नाही. आता तृणमूल काँग्रेसचे खासदार झालेले डेरेक ओब्रायन यांनी ‘बोर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट’ नेटाने चालवला. याच धर्तीवर मराठीत ‘अल्फा स्कॉलर्स’ होतं. तुषार दळवी यांचं नेटकं सूत्रसंचालन, मुलांना बोजड ठरणार नाहीत आणि त्यांच्या बुद्धीला खाद्य ठरतील असे प्रश्न, राज्यभरातल्या शाळांतल्या मुलांनी घेतलेला सहभाग यामुळे हा कार्यक्रम अनेकांच्या रविवारच्या सकाळच्या रुटिनचा भाग होता. स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, म्युझिक, मुव्हीज, रिजनल, किड्स असे बीट तर पडलेत चॅनेल्सचे पण पाहून काहीतरी मिळेल अशा स्वरूपाचा चॅनेलच नाही. शास्त्रीय संगीताला वाहिलेला चॅनेल आहे, २४ तासांचा रेसिपी दाखवणारे चॅनेल्स आहेत, पण मुलांसाठीचा चॅनेल असं काहीच नाही. बहुतांशी गोष्टी तर त्यांनी पाहूच नयेत अशा. शाळेत पहिली तासिका मूल्यशिक्षणाची असते. अन्य विषयांचे शिक्षक आपापले राहिलेले सिलॅबस पूर्ण करण्यासाठी ही तासिका हक्काने वापरतात. टीव्हीने मूल्यशिक्षक व्हावं अशी अपेक्षा, आशावाद नाहीच. पण किमान टीव्ही पाहून मूल्यघसरण तरी होऊ नये. हे सगळं वाटायला आम्ही वानप्रस्थाश्रमी दाखल झालेलो नाही, पण मालिकांच्याच प्रभावामुळे अकाली प्रौढ झालो आहोत. स्मरणरंजनातून बाहेर आलो तेव्हा ऑगीवर एकमत झालं असावं कारण ते सुरू होतं. काही मंडळी एकमेकांच्या मांडीवर बसून पाहत होती. काही लोळून आस्वाद घेत होती. काही ऑगीला हात लावू शकतील इतकं टीव्हीजवळ बसून पाहत होती. काहींनी ऑगीचा निषेध करून, धुसफूस सुरू होती. आता काय पाहतो बापुडा ऑगी अशा थाटात काही मंडळी दिवाणावर रेलली होती. तेवढय़ात प्रसन्न करणारी घोषणा झाली- पानं वाढतोय, तो खोका बंद करा, हात धुवा आणि जेवायला बसा. यापेक्षा सुखी घोषणा जगात नाही. बौद्धिक श्रमही बरेच झालेले, कावळ्यांची फौज ओरडू लागली होती. अनुत्तरित प्रश्नांच्या चळतीपेक्षा वदनी कवळ केव्हाही चांगलं!
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com