-सुनिता कुलकर्णी

एकेकाळी भांडणं होत, एकमेकांचं पटत नसे तेव्हा लोक सरळ एकमेकांना भिडत. माऱ्यामारी करत. संघर्षाचा त्याच्या पुढचा
टप्पा म्हणजे लढाई. दोन किंवा अधिक राजे, दोन देश किंवा अधिक देश यांच्यामध्ये थेट लढाया व्हायच्या. शस्त्रास्त्रं कशी बदलत गेली आहेत, हे पाहिलं तर या लढायांचं स्वरूपही कसं बदलत गेलं आहे ते लक्षात येतं.

पण इंटरनेट हे माध्यम विकसित झाल्यापासून ट्रोलसेनांमधलं युद्ध हा वेगळाच प्रकार पहायला मिळतो आहे. निमित्त अगदी साधं असतं आणि बघता बघता ट्रोलसेना आभासी विश्वात एकमेकांना भिडतात. अर्थातच शाब्दिक हाणामाऱ्या करतात. कधीकधी तर शस्त्रं परवडली इतक्या त्या विखारी असतात.

नुकतंच रंगलेलं युट्यूबर्स आणि टिकटॉकर्स यांचं युद्धही याच प्रकारातलं. एकेकाळी चाळीत राहणाऱ्या लोकांची नळावरची भांडणं चालायची त्या पातळीवर येऊन हे भांडण खेळलं गेलं. त्याबद्दल सविस्तर लिहिलं गेलं आहेच, पण आज पुन्हा त्याकडे लक्ष वेधलं जायला निमित्त ठरले ते बिग बी अमिताभ बच्चन.

नाही, ते काही या भांडणात कुणाची बाजू घ्यायला उतरले नाहीत, पण त्यांनी त्यांचा नातू अगस्त्य नंदाबरोबरचं जिममध्ये वर्क आऊट करतानाचं छायाचित्र त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध केलं. नेटीझन्सना अगस्त्यमध्ये आणि एका व्यक्तीमध्ये कमालीचं साधर्म्य आढळलं आणि त्यांनी बिग बींना विचारलं, ‘ये आपके बाजू में कॅरी मिनाटी खडा है क्या ?’  बिग बींनी उत्तर दिलं, ‘हा माझा नातू अगस्त्य नंदा आहे. पण कॅरी मिनाटी कोण आहे?’ साक्षात अमिताभ बच्चन यांनी असा प्रश्न विचारावा हे काही कॅरी मिनाटीच्या फॅन्सना सहनच झालं नाही. त्यातच अलिकडचं ट्वीटरबरोबरच्या युद्धात त्यांचं पारडं जड असताना अमिताभ बच्चन कॅरी मिनाटी कोण म्हणून विचारतात…?
मग काय, त्यांनी बिग बींनाही सोडलं नाही. त्यांना भयंकर पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. ‘सर कॅरी मिनाटी, तोच ज्याचे युट्यूबवर तुमच्या मुलापेक्षा आणि नातवापेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.’

‘कॅरी मिनाटी तोच, जो युट्यूबवर मोस्ट लाईक्ड इंडियन आहे. त्याचा एक व्हिडिओ युट्यूबने डिलिट केला तर जगभर चर्चा झाली.’
‘कॅरी मिनाटी तोच जो एकटा सगळं जग हलवू शकतो.’ ‘कॅरी मिनाटी युटयूबवरचा बिग बी आहे सर’  अशी सगळी टीका वाचून अमिताभ बच्चन यांनी शेवटी उत्तर दिलं की ‘बरं… बरं… समजलं मला.’

यातला मुद्दा कुणी काय प्रश्न विचारले आणि कुणी काय उत्तर दिलं हा नाहीच आहे. मुद्दा असा आहे की ‘अब कोई नही बचेगा…’
समाजात वरच्या पातळीवर वावरणाऱ्यांना, सेलिब्रिटींना, बाहुबलींना आभासी विश्वात भिडायला आता लोक मागेपुढे पहात नाहीत. अमिताभ बच्चन यांना समोरासमोर असं उत्तर कुणी दिलं नसतं कदाचित. कॅरी मिनाटी माहीत नाही म्हणून माध्यमांनीही त्यांना कधी असं टोकलं नसतं.

पण आता कुणी कुणाला सोडत नाहीत. कॅरी मिनाटी माहीत नसणाऱ्या अमिताभ बच्चन यांना टोकायला कॅरी मिनाटीचे फॅन्स सरसावले. आपापल्या विरोधी विचारांचा सामना करायलाही लोक आभासी विश्वात एकमेकांना भिडतात. त्यात हे युद्ध राजकीय पातळीवरचं असेल तर विचारायलाच नको. ‘माझं अंगण, माझं रणांगण’ असं म्हणत करोनाकाळात आंदोलन करू पाहणाऱ्या भाजपलाही खूप ट्रोललं गेलं.
अर्थात प्रत्येकवेळी ट्रोलिंग काही फक्त विचारांची लढाई विचारांनी खेळायची म्हणून झालेलं असतं असं नाही. आभासी विश्वातल्या या रणांगणावर पगारी ट्रोलर कोण आणि हवशे- नवशे- गवशे कोण हे समजणं तसं फारसं अवघड नाही. काहीजणांवर तर ट्रोलिंग हे अस्त्र बुमरँगसारखं उलटतं आहे. त्यामुळेच यापुढच्या काळात ट्रोलधाड येणार असेल तर ‘कोई नही बचेगा’…