सुनिता कुलकर्णी

सरकारने ‘टिकटॉक’सह ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर तो अवकाश भरून काढण्यासाठी भारतीय समाजमाध्यमं सरसावली आहेत. ‘टिकटॉक’साठी भारत ही दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ होती. ही जागा भरून काढण्यासाठी आता भारतीय अॅप्समध्ये चुरस निर्माण झाली आहे, अशी बातमी फायनान्शियल एक्स्प्रेसच्या देविका सिंग यांनी दिली आहे.

‘टिकटॉक’ची जागा घेण्यासाठी ‘शेअरचॅट’ या भारतीय स्टार्टअपने ‘मौज’ हे अॅप आणलं आहे. ‘गाना’ या संगीतविषयक प्लॅटफॉर्मने ‘हॉटशॉट’ या व्हिडिओ फीचरचा नव्याने समावेश केला आहे तर ‘झी फाईव्ह’ हे ‘हायपाय’ हे अशाच प्रकारचं नव फीचर आणायच्या तयारीत आहे. ‘इन्स्टाग्राम’ने ही हा अवकाश भरून काढण्यासाठी ‘रील्स’ या शॉर्ट व्हिडिओ फीचरचा समावेश केला आहे.

‘रोपोसो’, ‘मित्रों’, ‘चिंगारी’ ही अॅपदेखील ‘टिकटॉक’नंतरच्या या भाऊगर्दीत आपापली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले तासाला पाच लाख डाऊनलोड होत असल्याचा ‘शेअरचॅट’चा तर आपले तासाला सहा लाख डाऊनलोड होत असल्याचा ‘रोपोसो’चा दावा आहे. लाँच झाल्यापासून गेल्या पाच दिवसात ‘शेअरचॅट’चेच ‘मौज’ अॅप ५० लाख जणांनी डाऊनलोड केल्याचं सांगितलं जात आहे.

अर्थात ही सगळी वाढ तात्कालिक असल्याचं या क्षेत्रामधल्या जाणकारांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते लोक बंदी घातलेल्या अॅप्सना पर्याय शोधत आहेत आणि वेगवेगळ्या अॅप्सचा अनुभव घेऊन बघत आहेत. महिनाभरात ते त्यांना हव्या असलेल्या योग्य पर्यायाची निवड करतील.
या काळात अडचण झालेली आहे ती वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची. ‘टिकटॉक’च्या माध्यमातून जाहिरात, मार्केटिंग करणाऱ्यांनी सध्या थांबून लोक कोणत्या भारतीय अॅप्सना पसंती देतात याची वाट पाहण्याचं धोरण अवलंबलं आहे. कारण, त्यांच्या दृष्टीने ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘युट्यूब’ ही समाजमाध्यमं जाहिरात करण्याच्या दृष्टीने ‘टिकटॉक’पेक्षा खूप महाग आहेत.

‘टिकटॉक’वर मनोरंजनाच्या दुनियेमधल्या तसंच लोकांच्या दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जात होत्या. २५ लाख रुपये ‘टिकटॉक’वरच्या जाहिरातीवर खर्च केले तर सहा कोटी लोकांपर्यंत पोहोचता येत होतं. कंपन्यांना ‘फेसबुक’ आणि तत्सम समाजमाध्यमांवर जाहिरात करण्यासाठी याच्या सहा पट खर्च करावा लागतो.

भारतीय बनावटीच्या अॅप्सना अधिकाधिक ग्राहकाभिमुख होण्यासाठी तंत्रज्ञानावर आणखी काम करावं लागेल. त्यांचं अॅप ग्राहकांना सहज हाताळता येईल याकडे तसंच त्याच्या गोपनीयतेशी संबंधित गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. या अॅप्सनी त्यांची उपयुक्तता लवकरात लवकर सिद्ध करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे चांगला आशय असणं गरजेचं आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे. तोपर्यंत तरी टिकटॉकची जागा कोण घेईल या प्रश्नाचं निश्चित उत्तर देता येणं कठीण आहे.